Login

तो, ती आणि... ते? | भाग ५

This Is The Story Of Nalini, Nishant And Him?
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

भाग ५

नलिनीच्या बंद डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. तिने हळू हळू डोळे उघडले. तिच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला,
" रितेश..."

तेव्हा अचानक तिच्या समोर एक काळी आकृती हळूहळू तिला झाडामागून पुढे येताना स्पष्ट दिसू लागली. ती समोर येताच डोळ्यांमध्ये अश्रू तसेच ठेवून ती त्याला विचारू लागली,
" रितेश... तू आहेस का?"


तिचा तो प्रश्न ऐकून तिच्या नजरेसमोर एक फूल पडलं आणि सर्वत्र रातराणीच्या फुलांचा सुगंध पसरला.

तो सुगंध जाणवताच ती पुढे बोलू लागली, " काय झालं रे तुला? कुठे होतास तू? असा का झालास?"

तिने प्रश्न विचारल्यावर काही वेळ तसाच शांततेत गेल्यावर  समोरून तिला एक घोगरा आवाज ऐकू येऊ लागला,
" मी कुठे नव्हतो गेलो नलू.. अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत तुझी वाट पाहिली, पण तू कधीच परत आली नाहीस. तुझ्या विरहात मी इतका बुडालो की, गावच्या नदीत बुडून माझा जीव गेला तरी मला समजलं नाही. मारून देखील हा विरह दूर नाही झाला. तेव्हा मग तू गाव सोडून जाताना मी तुला दिलेल्या ह्या रातराणीच्या सुगंधाने मला तुझ्या जवळ बोलवून घेतले. मी तुझ्या जवळ ओढला गेलो. मी त्या झाडावरच राहून तुला पाहू लागलो. तुझा स्पर्श अनुभवू लागलो, पण नंतर लग्न करून मला इथे घेऊन आलीस. तेव्हा मला तो तुझ्या सोबत असल्याचं बघवलं नाही. तुम्हाला एकत्र बघून माझ्या जीवाची आग आग होते आणि म्हणून आता मी त्याला जिवंत सोडणार नाही तू फक्त माझी आहेस. अजून कोणालाच मी तुझ्या जवळ येऊ देणार नाही."

शेवटचं वाक्य बोलताना त्याच्या घोगऱ्या आवाजात राग जाणवू लागला. त्याचं ते बोलणं ऐकून ती आता मनातून खऱ्या अर्थाने घाबरून गेली होती.

घाबरतच ती त्याला बोलू लागली, " रितेश... त्या वेळी आपण लहान होतो. आपल्याला कळत नव्हतं, पण आता निशांत माझा वर्तमान आणि माझा भविष्य सगळ काही आहेत. तुला इथून जायला हवं. मी तुझी नाही होऊ शकत कधीच."

तिच्या त्या बोलण्याने ती समोरची आकृती एकदम चिडून जोरात किंचाळू लागली. सर्वत्र सुसाट वारा वाहू लागला. काही वेळापूर्वी येणाऱ्या सुगंधाचे आता दुर्गंधात रूपांतर झाले. नलिनी त्या किंचाळीला घाबरून तशीच मागे फिरून तिथून धावत सुटली.

धावत ती घरात आली  दरवाजा लावून घेतला. भीतीने तिला घाम फुटला. आता काय करावं तिला काहीच समजत नव्हते, तेव्हा तिचं लक्ष समोरच्या देव्हाऱ्यात गेले. संध्याकाळी लावलेला दिवा आता तिला पुन्हा पेटलेला दिसला. ते पाहून घाबरलेल्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा वेगळीच ऊर्जा दिसू लागली.

तिने स्वयंपाक घरात जाऊन रॉकेलचा डब्बा हातात घेतला आणि मग देव्हाऱ्याजवळ जाऊन देवा समोर हात जोडून तिने देवा समोरचा दिवा उचलला आणि ती तशीच घरा बाहेर निघून पुन्हा बागेत त्या झाडाजवळ आली.

तिला पुन्हा तिथे आल्याचं बघून तिथे जोरजोरात घोगऱ्या आवाजात हसण्याचा आवाज सर्वत्र घुमू लागला, पण तो काहीच क्षणांसाठीच होता. कारण काही वेळाने तो आवाज थांबून वारा आणखी जोरात वाहू लागला.

जणू त्या आकृतीला तिच्या हातात असलेल्या त्या दिव्याची जाणीव झाली आणि आता ती तो दिवा विझवायचा प्रयत्न करू लागली, पण इतक्या वाऱ्यात देखील त्या दिव्याची ज्योत मात्र तसूभर सुद्धा हलली नव्हती.

नलिनीने तसंच पुढे जाऊन तो दिवा त्या झाडाच्या पायाशी ठेवला आणि हातातील रॉकेलच्या डब्ब्याच झाकण उघडून ती त्या झाडावर ते ओतू लागली. त्यातील काही शिंतोडे दिव्याच्या ज्योतीवर पडले आणि लगेचच त्या संपूर्ण झाडाने पेट घेतला आणि ते पेटताना त्यातून जोरजोरात किंचाळण्याचा वेदनेने ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.

ते झाड पेटताना बघत ती स्मित करत स्वतःशीच बोलू लागली,
" तू आता आनंदाने तुझ्या जगात निघून जा."

इतकं बोलून ती तिथून निघून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी तिने निशांतला सगळा प्रकार समजावून सांगितला. त्याला त्याच्या बायकोचे कौतुक वाटले. दोघे खिडकीत उभे राहून ते संपूर्णपणे जळलेले झाड पाहू लागले.

पण त्यांच्या नकळतच बागेत तिथेच एका जागेवर रातराणीचं नवीन रोप जन्म घेऊ लागलं होतं!

समाप्त.

लेखक : चेतन सुरेश सकपाळ
0

🎭 Series Post

View all