Login

तोच चंद्रमा नभात - भाग १

शेवटपर्यंत एकमेकांची साथ देणारे असे हळवे प्रेम
तोच चंद्रमा नभात - भाग १


"अभी, झालं का तुझं? किती वेळ अरे! चल ना लवकर."
निधी गाडीवर बसून त्याची वाट बघत होती.

"अरे थांब ना, आलोच. सगळं चेक करायला नको का? तू बसलीस लगेच गाडीवर येऊन, मग बाकीचं कोण बघणार?"
ऑफिसमधून खाली येताच अभी गाडी जवळ येऊन तिला बोलू लागला.

"आता मी पण शिकलेय ना गाडी चालवायला, मग काय हरकत आहे? आणि चांगली चालवते मी गाडी. तुझ्यासारखी उगाच घासून नाही चालवत."
निधी त्याच्याकडे तोंड वाकडं करत बोलली.

"हो हो माहितीय मला, किती चांगली चालवते तू गाडी. तुझ्या स्पीडने गेलो ना तर दोन दिवस लागतील आपल्याला तिकडे पोहोचायला."
अभी तिच्याकडे बघून हसून हसून बोलत होता.

"ए काय रे अभी! जा बाबा आता मी नाही."
असे म्हणून निधी तोंड पाडून खाली उतरली.


बाईकवर जात असताना दोघेही छान गप्पा मारत जायचे. रात्री रस्त्यावर गर्दी नसायची तेव्हा अभी तिला गाडी चालवायला देखील द्यायचा.
खरंतर निधीला अभीनेच बाईक चालवायला शिकवली होती. बाईकवर बसून रात्रीचं लांब फिरायला खूप आवडायचं दोघांना. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे दोघे जण कधीच एकमेकांना दुखावत नव्हते की एकमेकांना सोडून कुठे जात नव्हते.


रस्त्याच्या कडेला बाईक उभी करून रात्रीचा चहा घ्यायला खूप आवडायचे दोघांना. ती एक वेगळीच मजा होती. दोघेही बरोबरीचे होते; त्यामुळे आवडीनिवडी देखील जुळत होत्या. दोघांच्या घरच्यांना त्यांच्या ह्या नात्याबद्दल थोडेफार समजले होते आणि म्हणूनच त्यांनी घरी जाऊन सगळे सांगायचे ठरवले होते.


"अभी, घरी गेल्यावर काय होईल माझे? हा विचार करूनच धडकी भरलीय मला आता."
निधी अभीकडे बघत बोलली.

"काही नाही होणार, आपल्या घरचे एकदम सॉलिड आहेत; त्यामुळे तू बिनधास्त बोल."
अभी तिला हसत हसत बोलला.


"अरे कितीही मॉडर्न असले तरी टिपिकल आई वडील आहेत ते."
निधी घाबरत होती.


"जानू, प्रेम केलंय आपण दोघांनी एकमेकांवर आणि आपण आपल्या स्वतःच्या पायावर देखील उभे आहोत; त्यामुळे आपल्याला कोणीही नकार देणार नाही... आणि तसेही माझ्यात नकार देण्यासारखं आहेच काय? उलट माझ्याकडे बघून तर तुझी आई पण लाईन मारायला लागेल."
अभी अजूनही मस्करी करत बोलत होता जेणेकरून निधीच्या उतरलेल्या चेहऱ्यावर थोडेफार तरी हसू येईल.


"अभी... तू असाच सांभाळून घेशील ना मला, नेहमी."
निधी त्याचा हात हातात घेऊन बोलली.


"तुला वाटतं मी तुला इतक्या सहजासहजी सोडून देईन म्हणून."
अभी तर एकही संधी सोडत नव्हता तिला हसवण्याची.


"अभी जा रे तू! इथे मी किती गंभीर विषयावर चर्चा करतेय आणि तुला नुसती मस्करी सुचतेय."
निधी त्याच्या हातावर फटका मारत बोलली.


"काय यार! इतका छान वेळ घालवतोय आपण एकमेकांसोबत आणि तू टेन्शन घेऊन बसलीय. माझ्यासाठी एक गाणं म्हण ना प्लीज."
प्रेमळ डोळ्यांनी अभी तिच्याकडे बघून बोलला, पण तिच्या टपोऱ्या डोळ्यात त्याला पाणी साचलेले दिसले.


"बरं बाई मीच म्हणतो गाणे, पण तू अशी भोकाड पसरून लगेच रडू नकोस."
अभी तर खरचं एकदम कूल होता. म्हणजे त्याला लगेच कळायचं की आता काय केलं पाहिजे हिच्यासाठी. हेच तर त्यांचं खरं प्रेम होतं.


निरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी
तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी...!


अभी तिच्याकडे बघत बघत अगदी धुंद होऊन गाणे गात होता आणि ती त्याच्याकडे बघून फक्त त्याला ऐकत होती. रात्री दोघेही आकाशातल्या चंद्राकडे बघून त्यांच्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत बसले होते.


"अभी, कित्ती छान गातोस रे तू! मला असे वाटते की तू असाच गात रहावा आणि मी तुला अशीच बसून ऐकत राहावी."
निधी त्याच्याकडे बघून बोलली.


"म्हणजे? आपण काय असेच रोडवर बसून गाण्यांच्या भेंड्या खेळायच्या का? घरी जायचं नाही?"
अभी तर मुद्दाम तिला असे काही बोलायचा की ती खळखळून हसायची.


"अभी गप रे! काहीही बोलतो तू."
निधी हसतच त्याच्या पाठीवर मारु लागली.

"बरं चला आता, उशीर झालाय भरपूर."
असे म्हणून दोघेही आपापल्या घरी गेले.


घरी गेल्यावर पण निधी तेच गाणं गुणगुणत होती जे काल अभीने तिच्यासाठी गायले होते. तिच्या ओठांवरून ते गाणे काही केल्या जातंच नव्हते इतकी ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती.


अभीचा आवाज ही खूप छान होता. गाणं गायला तर त्यालाही खूप आवडायचे. लहानपणी त्याचा क्लास देखील झाला होता गायनाचा, पण अभ्यास आणि करीयर घडवताना गाणे हळूहळू सुटत गेले. गायनाची आवड मात्र तो अजूनही जपून होता. आजुबाजूचे छान वातावरण आणि त्याचा मूड चांगला असेल तर त्याची मैफिल कुठेही सजायची. खास करून आता निधीसाठी तो गाणे म्हणायचा, कारण तिला आवडायचा तो तिच्यासाठी नेहमी गाणे गाताना. 

निधी तेच गाणं म्हणतच किचनमध्ये आली आणि तिच्या आईने तिच्याकडे हसून बघितले. आईचीच नजर ती, लेकीच्या मनातले तिला कळणारच ना सगळे.


"निधी, आज चक्क तू गाणं गुणगुणतेय!"
निधीच्या आईने तिच्याकडे आश्चर्याने बघून म्हटले.


"अग काल ऑफिसमध्ये ऐकले हे गाणे. किती छान आहे ना!"
निधी एकदम दचकून काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेली.


"हम्म्म, गाणं तर छानच आहे आणि तुझ्या ऑफिसमधला गाणं गाणारा देखील."
निधीच्या आईला देखील अभी पसंत होता; त्यामुळे त्यांनी तिची चोरी लगेच पकडली.


"का का... काय आई! आय मीन, खरचं आई!"
आईचे हे शब्द ऐकून निधी तर एकदम उड्याच मारायला लागली.