Login

तोच चंद्रमा नभात - भाग ४

शेवटपर्यंत साथ देणारे असे हळवे प्रेम
तोच चंद्रमा नभात - भाग ४



"डॉक्टर परी... आपल्या लेकीच्या नावापुढे डॉक्टर ही पदवी लागण्यासाठी निधी तू कित्ती काय काय केले आहेस हे मला चांगलेच माहिती आहे."
सुट्टीच्या दिवशी अभी असाच घरात बसून निधी सोबत बोलत होता.

"हम्म्म, पण मी आज खूप खुश आहे. मी एकटीनेच नव्हे तर तिच्यासाठी आपण दोघेही तितकेच महत्वाचे आहोत. आपल्याला पहिले जे काही अपत्य होईल त्यावरच थांबायचं... ह्या माझ्या निर्णयाचा तू आनंदाने स्विकार केला त्याबद्दल तुझेही आभार."
निधी पण त्याच्याजवळ बसून निवांत गप्पा मारत होती.


"कित्ती दिवसांनी आपण असे निवांत बसून गप्पा मारतोय."
अभी हसून तिच्याकडे बघून बोलला.


"हो ना, नाहीतर तुमच्या दोघांची नुसती धावपळ चाललेली असते. आज बघा ना, रविवार असूनही परी हॉस्पिटलमध्ये निघून गेली."
निधी उदास होऊन बोलली.


"अरे त्यात काय एव्हढ, ती पहिले एक डॉक्टर आहे हे लक्षात ठेव नेहमी; त्यामुळे रविवार असो वा कोणताही वार... तिला तिचे काम पहिले राहिलं. आणि तुझ्यासाठी मी आहे ना! आपण दोघे जायचं का बाहेर? तेव्हढच तुला फ्रेश वाटेल. घरात राहून तुलाही कंटाळा येतच असेल ना, चल उठ जाऊया आपण असेच फिरून येऊ कुठेतरी."
अभी निधीकडे काळजीने बघत बोलला.


"नाही नको, परी आज डबा नाही घेऊन गेली. मी पटकन जेवण बनवते आणि तुम्ही तिला डबा देऊन या तरच माझ्या जीवाला शांती मिळेल."
असे म्हणून निधी तडक उठून किचनकडे वळली.


निधी इतके दिवस फक्त परीच्या मागे लागलेली असायची. तिला वेळेवर खायला देणे, तिचे कपडे नीट लावणे, तिच्यासोबत तिच्या मैत्रिणींना देखील सांभाळून घेणे. तिचे करता करता अभी आणि निधी दोघांना एकमेकांना वेळच देत नव्हते. त्यांच्या बोलण्यात पण सारखी परीच असायची. तिच्याच विषयी गप्पा मारत असताना अनेकदा तिच्या लग्नाचा विषय सुद्धा निघायचा, पण अभी आताच नको म्हणून टाळत राहायचा.


"अभी, अरे किती चांगली स्थळं स्वतः हुन चालत येताय आपल्या दारात आणि तू असा नाही नाही म्हणत राहिला तर कसे होईल?"
निधी अभीला समजावून सांगत होती.


"हे बघ, आपली मुलगी अजून लहान आहे आणि आताच तिच्या लग्नाचा विचार नकोय मला."
अभीला वाटतं होते की परी अजून लहानच आहे, पण प्रत्येक बापाला आपली मुलगी ही लहानच वाटते मग ती स्वतः भलेही बापाच्या खांद्यापेक्षाही उंच का दिसेना.


"अभी! अरे अठ्ठावीस वर्षांची झालीय परी आणि तू म्हणतोस अजून ती लहान आहे. कमाल आहे बाबा तुझी. अरे योग्य वयात लग्न झालेलं केव्हाही चांगल! आपल पण त्याच वेळी लग्न झालं होतं. विसरलास का तू?"
निधी त्याला त्यांच्या लग्नाची आठवण करून देऊ लागली.


"हो रे! कसे होतो आपण तेव्हा?"
असे म्हणून अभी हसू लागला.

"आता हसायला काय झालं? चांगलेच तर होतो... म्हणजे अजूनही आहोत."
निधी पण किचन मधुन डोकावून त्याच्याशी बोलत होती.


"तू तर कशी होती? एकदम डरपोक आणि काहीही झालं तर नुसती मारायचीस मला."
अभी बसल्या बसल्या तिला चिडवून देण्याचे काम करत होता.


"हम्म्म... स्वतः जसे काही खूप पेहेलवान, पण आता माझ्या तावडीतून काही सुटका होणार नाही म्हटले तुमची."
निधी पण आता चांगलीच चिडली होती.


"ते तर आहेच म्हणा, फसलो मी पार तुझ्यात."
अभी मुद्दाम बोलत होता.

"हम्म्म पुरे आता, मला माहितीय तुम्ही विषय टाळायला बघताय पण मी अशी सोडणार नाही."
निधी तिच्या मतावर ठाम होती.

"ते काहीही असो, पण आता नको तो लग्नाचा विषय."
अभीने पुन्हा पेपर मध्ये तोंड खुपसले.


"हे अस विषय टाळून काहीच होणार नाहीये. मी पाहुण्यांना घरी बोलावले आहे."
निधीने आता डायरेक्ट बोलून टाकले.


"अरे काय तू पण! मला विचारले सुद्धा नाही. ही काय पद्धत झाली?"
अभी चांगलाच चिडला होता, पण तिने योग्य केले होते.

"तुम्हाला विचारत बसले असते तर आणखी चार वर्ष असेच निघून गेले असते. जरा विचार करायला पाहिजे आता आपण. मुलगी मोठी झाली आपली, चांगली शिकली, स्वतःच्या पायावर उभी राहिली... अजून काय पाहिजे? तिच्या लग्नाचा विचार करायला पाहिजे आता आपण आणि त्याची हिच योग्य वेळ आहे."
निधी आता एकदम सिरियस मोडवर बोलत होती हे अभीला चांगलेच समजत होते.


"बरं केलंस तू, पण आता मला एक सांग परीलाच जर आता लग्न करायचं नसेल तर?"
अभी नेहमी त्याच्या मुलीच्या बाजूने बोलत होता.


"अभी, तिला आता लग्न नसेल करायचं तर तसे तिला विचारून घेऊ आपण आणि नंतर काही दिवसांनी पुन्हा विचार करू."
निधी त्याच्या प्रत्येक बोलण्याला उत्तर देत होती.


"आणि जर समजा तिचे दुसरे कोणावर प्रेम असेल तर!"
अभी अजूनही मुलीचीच बाजू घेत बोलत होता.


"मग तर चांगलेच होईल, पण आधी त्या मुलाची चांगली चौकशी करून मगच पुढे जाऊ."
काहीही झाले तरी निधी एका मुलीची आई आहे; त्यामुळे ती असा विचार करणारच.


"पण तरीही मला काय वाटतं निधी, आपण आधी परी सोबत बोलून घेऊया. तुला काय वाटतं?"
अभीचे बोलणेही बरोबरच होते म्हणा.


"हो, आज रात्री बोलूया आपण तिच्याशी."
निधी पण अभी जवळ येऊन बसली.


"निधी, आपली मुलगी इतकी मोठी झाली का? की तिचे लग्न लावून दिले पाहिजे."
अभी मुलीच्या लग्नाच्या नुसत्या विचारानेच खूप हळवा झाला होता.


"अभी, मी तिच्या वयाची असताना माझ्या मांडीवर परी दोन वर्षांची होती."
निधी त्याच्याकडे हसून बघू लागली.


"निधी, आपली तेव्हाची गोष्ट वेगळी होती."
अभी तिला अजूनही नको म्हणत होता.


"अरे काय तेव्हाची गोष्ट वेगळी होती. अभी तू पण ना!"
निधीला त्याच्याकडे बघून आता हसू यायला लागले होते.


"अरे काय हसतेस तू? मुलीचा बाप आहे मी, मग काळजी तर वाटणारच ना!"
अभी खरचं खुप हळव्या मनाचा होता.

मुलीच्या लग्नाचा विषय हा एका बापासाठी खूप अवघड असतो, कारण आपल्या काळजाचा तुकडा असा दुसऱ्याला सोपवणे खूप कठीण काम असते.


क्रमशः