Login

तोच चंद्रमा नभात - भाग ६

शेवटपर्यंत साथ देणारे हळवे प्रेम
तोच चंद्रमा नभात - भाग ६


अभी आणि निधी, दोघांनी आपल्या लेकीसाठी आधीच खूप काही ठरवून ठेवले होते. तिच्यासाठी जे योग्य आणि चांगले असेल तेच करायचे. तिचाही नकार नव्हता मुलगा बघायला; त्यामुळे तिचे आई वडील म्हणून दोघेही खूप खुश होते.


परीला एक वेगळीच हुरहूर जाणवत होती. तिला बघायला येणारा मुलगा कसा असेल? काय करत असेल? त्याचा स्वभाव कसा असेल? हे जाणून घेण्यात तिला आता उत्सुकता लागून होती.


"आई, आपल्याकडे पाहुणे येणार होते ते कधी येणार आहे?"
परीने हळूच निधीला विचारले आणि ती समजून गेली.


"ते... ते येतील ना येत्या चार पाच दिवसांत. का ग? तुला तेव्हा काही काम आहे का?"
निधी मुद्दाम तिला काही सांगायचे टाळत होती.


"हम्म्म, तसे काही नाहीये. तेव्हा बहुतेक शनिवार असणार ना! मग मला सुट्टी घ्यावी लागेल का? हा विचार करत होते बाकी विशेष असे काही नाही."
परी आता नजर चोरून इकडे तिकडे बघत होती.

"हो, तुझे कितीही महत्वाचे काम असले तरी तुला घरी थांबावे लागेल. मी तुझं काही एक ऐकून घेणार नाही त्यादिवशी."
निधीने तिला आताच सांगून ठवले तशी तिने होकारार्थी मान डोलावली.

"हो माझे आई, म्हणून तर विचारत आहे मी."
परी हसतच बोलली.

"बरं सुचलं तुला हे."
निधी तिची गंमत बघत होती. कारण ती कधी अशी स्वतः हुन तिच्याशी बोलायला किचनमध्ये आली नव्हती.


"बरं मला एक सांग, ते येणारे पाहुणे कोण आहेत? कुठले आहे? कोणी लांबचे नातेवाईक आहेत का?"
परी आता हळूहळू त्यांच्या विषयी चौकशी करू लागली.


"हो अग, म्हणजे तुझ्या पप्पांची लांबची बहीणच लागते ती त्यांचा मुलगा आहे."
निधी भाजी करता करता तिच्याशी बोलत होती.


"अच्छा, नाव काय म्हणालीस ग त्यांचं?"
परीचे प्रश्न काही संपत नव्हते.


"चिटणीस आहे बहुतेक. नाशिकला असतात राहायला."
निधी तिला माहिती सांगू लागली.


"ओके, आणि तिकडे काय करतात ते?"
परी मुद्दाम आडून आडून विचारत होती.


"बदमाश, मला चांगल माहितीय तुला कोणाविषयी जाणून घ्यायचं आहे ते."
निधी पण तिला हसत हसत बोलली.


"आई, सांग ना आता."
परीने खाली मान घालून नजर चोरतच तिला म्हटले.

"त्यांचा मुलगा पण डॉक्टरच आहे; त्यामुळे त्यांनी पण आपल्या सारखाच विचार केला असणार."
परी डॉक्टर आहे म्हंटल्यावर निधीने पण तिच्यासाठी तसाच मुलगा शोधला होता.


"नाईस, म्हणजे त्याचे डिटेल्स मिळतील का मला?"
परीने तर डायरेक्ट विषयच संपवून टाकला.


"हो, का नाही? मी जेवण झाले की सांगते तुला सगळे आणि त्याचा फोटो पण दाखवते मोबाईल मधला. बघ तुला कसा वाटतो ते आणि ठरव."
निधी पण अगदी कुल होती. मुलीसाठी ती तिची मैत्रीण म्हणून सगळ्या गोष्टी अगदी सोप्या करून सांगत होती.


"थँक्यू आई, तू खूप छान आहेस."
असे म्हणून परी उड्या मारतच बाहेर गेली.


"अरे अरे, इतकं खुश कसं काय आमचं पिल्लू?"
अभी हॉलमध्ये बसून टिव्ही बघत होता.


"पप्पा, कुठे काय? ते असंच."
परीला एकदम लाजल्या सारखे झाले होते. ती पळतच तिच्या रुममध्ये निघून गेली.


"निधी, काही बोलणं झालं का तुमचं?"
अभीने निधीला विचारले.


"मुलाचे डिटेल्स मिळतील का? म्हणून मला विचारत होती."
निधी पण हसून हसून अभीला सांगत होती.   


"काय? हे तर कमालच झाले."
अभीला तर विश्वासच बसत नव्हता, पण तोही खुश होता त्यांच्या मुलीसाठी.


"अभी, ते दोघे एकमेकांना पसंत पडायला पाहिजे म्हणजे आपण सुटलो यातून."
निधी पण किचन मधुन दमून आली आणि सोफ्यावर बसत बोलली.


"का? आणि जर नाही पसंत पडले ते एकमेकांना तर त्यात काय इतकं."
अभी तर नेहमी त्यांच्या मुलीच्या बाजूने विचार करायचा.

"अरे तुम्ही आधीच का असे म्हणताय?"
निधी आता त्याच्यावर चिडली होती.


"अरे म्हणजे त्यांचा निर्णय त्यांनाच घेऊ दे ना! आपण कशाला फोर्स करायचा."
अभी खरंतर बरोबरच बोलत होता.

"हो, मी कुठे बळजबरी करणार आहे."
निधी पण आता अभीकडे रागात बघत होती.

"मग अस का बोलली तू?"
अभी पुन्हा तेच बोलत होता.


"जाऊ दे, सोड तो विषय आता. तुला माहितीये परीच्या चेहऱ्यावर मला ते दिसले जे मला तुझ्याकडे बघून नेहमी वाटायचे."
निधी आता त्याच्याकडे बघून बोलली.


"म्हणजे? मला नाही समजले."
अभी अजूनही चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह आणून बोलला.


"अरे म्हणजे मला आता किचनमध्ये परी त्या मुला विषयी चौकशी करत होती. तिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसले मला. म्हणजे मनातून ती तयार असावी लग्नासाठी असे जाणवले."
निधी एकदम खुश होऊन बोलू लागली.


"अरे वाह! हे खरचं खूप छान झालं. फक्त तो मुलगा चांगला निघावा."
एक बाप म्हणून अभीला आपल्या मुलीची काळजी जास्त वाटतं होती.


"का नसेल चांगला तो? इतके सगळे योग जुळून येताय म्हणजे काहीतरी चांगलेच घडणार आणि मी दोघांची कुंडली तर आधीच बघून आलेय. चांगले तीस गुण जुळताय दोघांचे."
निधी तर खूप खुश होऊन बोलत होती.


"हो, ते सगळं ठीक आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं."
अभी पण आता पुढचा विचार करत बोलला.


"अभी मला ना लग्नात शालू पाहिजे."
निधी आतापासूनच तयारी करू लागली.


"अरे हो हो, लग्नात शालू, घागरा, साड्या... अगदी सगळं घेऊ आपण. जे परीला आवडेल ते सगळे घेऊन देईन मी."
अभी पण एकदम उत्साहात बोलून गेला.

"अभी, परीला नाही... मी माझ्यासाठी घेऊ म्हणतेय."
निधी एकदम त्याच्याकडे डोळे मोठे करून बोलली.


"आता तुला कशाला पाहिजे शालू?"
अभीला तिचे हसू येत होते.


"का नको? आपल्या लग्नात कुठे शालू नेसला होता मी? मग मला आता हवाय शालू, निदान लेकीच्या लग्नात नेसून तरी मिरवता येईल."
निधी अगदी छान बोलत होती, पण अभी अजूनही तिच्याकडे पाहून हसतच सुटला होता.


क्रमशः