Login

तोच चंद्रमा नभात - भाग ७

शेवटापर्यंत साथ देणारे असे हळवे प्रेम
तोच चंद्रमा नभात - भाग ७


अखेर आज तो दिवस उजाडला. आज सकाळपासूनच निधीची धावपळ सुरू होती. अभी पण तिला घर आवरायला मदत करत होता तर परी तिच्या रूममध्ये बसून तिचे कॉल अटेंड करत होती.

पाहुणे दुपारपर्यंत येणार होते; त्यामुळे त्यांनी नाश्त्याच्या भानगडीत न पडता सरळ जेवणाचा कार्यक्रम आखला. जेवणात काय काय बनवायचं हे निधीने आधीच ठरवून ठेवले होते; त्यामुळे एक एक पदार्थ करून ती बाजूला ठेवत होती. घरात एकदम मस्त मसालेदार सुगंध दरवळत होता. त्याने अभीची भूक आणखी चळवली जात होती.

"आहाहा! काय सुगंध पसरलाय घरात."
असे म्हणत अभी किचनमध्ये आला.

"मस्त झणझणीत मसालेदार भाजी केली ना म्हणून."
निधी तिचे काम करता करता बोलत होती.

"मला टेस्ट करायला दे ना थोडे, म्हणजे मी सांगतो काही कमी जास्त असेल तर."
अभीला खरंतर भूक लागलेली होती म्हणून तो असे बोलत होता हे निधीला कळत होते.


"हम्म्म हे घे आणि लगेच सांग कसे झाले आहे ते?"
निधीने एका प्लेटमध्ये त्याला थोडेसे जेवण वाढून दिले.


"वाव सुपर्ब निधी! तुझ्या हाताला काय चव आहे; त्यामुळे विषयच नाही."
अभी अक्षरशः बोटं चाटून खात होता आणि निधी त्याच्याकडे हसून बघत होती.

"बरं तुमचं झालं असेल तर आपल्या लाडक्या लेकीला बघून या एकदा. तिचं आवरून झालं असेल तर बाहेर मदतीला बोलवा."
निधी दमल्यामुळे जरा वेळ बाहेर येऊन बसली.


एखाद्या आज्ञाकारी नवऱ्याप्रमाणे तो अगदी नम्रपणे निधीचे ऐकून परीच्या खोलीत गेला. त्याला खरे वाटतंच नव्हते की आपल्या लेकीला आज पाहुणे बघायला येताय.


"परी... बाळा येऊ का आता?"
तिच्या रूम बाहेर उभ राहून त्याने तिला आवाज दिला.

"हो पप्पा, या ना आत. माझं झालंय आवरून."
परीने दरवाजा उघडला तसे अभी आतमध्ये गेला.


"हे बघ बाळा, तुझ्यावर काही प्रेशर नाहीये. आणि हा एकच मुलगा नाही की त्यालाच पसंत करायला पाहिजे. तुला नसेल आवडला तर खरचं स्पष्ट सांग, आपण नंतर विचार करू पुन्हा."
अभी अजूनही काळजीत बोलत होता.

"हो पप्पा, मला समजतेय तुमची काळजी."
परी पण एकदम बिनधास्त बोलली. मागे निधी उभी होती.


"घ्या, पोरगी एकदम बिनधास्त दिसत आहे आणि बापाचा जीव पिळवटून निघतोय. असा कसा रे अभी तू? कसं होणार तुझं?"
असे म्हणत निधी त्याच्याकडे बघून हसत होती.


"जाऊ दे तुला काय कळणार माझं बापाचं काळीज."
असे म्हणून अभी तोंड पाडून बसला.

"अरे काय तुम्ही दोघं, परत सुरू झालं का तुमचं? पप्पा तुम्ही आधी तुमचा मुड ठीक करा बरं, आता येतीलच ते पाहुणे इतक्यात."
परी तिच्या पप्पांजवळ जात बोलली.


"हम्म्म, तू पण छान दिसतेय."
अभीने तिच्याकडे बघत म्हटले.


"अरे, तू सलवार कुर्ती घालायची होतीस ना! हे काय जीन्स पँट घालून आलीस?"
निधी तिच्याकडे बघून बोलली.


"नाही, परी जशी आहे तशीच समोर येणार."
परीच्या बाजूने अभी बोलत होता.

"करा करायचं ते करा, मी जाते माझ्या किचनमध्ये."
असे म्हणून निधी निघून गेली.


बराच वेळ झाला तरी पाहुणे मंडळी काही आली नव्हती. अभी नुसता इकडून तिकडे घरात फेऱ्या मारत होता आणि निधी पण तिचे किचन मधले कामं उरकून बाहेर येऊन बसली.


"अहो, मी काय म्हणते तुम्ही त्यांना फोन करून विचारून बघा ना! कुठपर्यंत आले त्याची चौकशी करा."
निधी फोन पुढे करत बोलली.


अभीने त्यांना फोन लावून बघितला.
"हा हॅलो, आशा कुठे आहेस?"
अभीने फोन लावताच चौकशी सुरू केली.


"हो पोहोचतोच आहे बघ दहा मिनिटांत."
पलीकडून आशा म्हणजेच अभीची लांबची बहिण बोलली.


दहा मिनिटांत पोहोचणार हे ऐकल्या बरोबर तिघांची धावपळ सुरू झाली. नकळत का होईना पण परीला थोडी धडकी भरली. हे असं पहिल्यांदाच तिला बघायला घरी कोणीतरी येणार होते.


"परी, दुसरा एखादा ड्रेस घालून येतेस का?"
निधीने हळूच परीला सांगितले.

"अजिबात नाही हा, माझी मुलगी असं काहीही करणार नाहीये."
अभी तिथेच होता; त्यामुळे त्याच्या नजरेतून हे सुटले नव्हते.


"बरं बाबा जशी तुमची ईच्छा."
असे म्हणून निधी उठणारच की दारावरची बेल वाजली आणि अभी पळतच गेला.


"अरे या...या. काही त्रास नाही ना झाला तुम्हाला यायला."
अभीने त्याच्या लांबच्या बहिणीला आणि तिच्या घरच्यांना विचारले. निधी पण हसतच पुढे आली.


"नाही मामा, अजिबात त्रास नाही झाला. फक्त जरा ट्रॅफिक लागले म्हणून थोडा उशीर झाला."
मुलगा उत्तर देतच पुढे आला.


त्याला बघून निधी आणि अभी दोघेही एकदम चकित झाले. लहानपणी पाहिलेला अर्जुन आता चांगलाच मोठा झाला आणि दिसायलाही छान दिसत होता एकदम हँडसम. मागून परी त्याला चोरून चोरून बघत होती.


आशा अभीची लांबची बहिण जरी असली ते लहानपणी एकत्र खेळलेले होते; त्यामुळे त्यांच्यात काही औपचारिकता दिसून येत नव्हती. आशा आणि तिचे मिस्टर सगळे अगदी नॉर्मल वागत बोलत होते. आल्या आल्या निधीने सगळ्यांना पाणी आणून दिले आणि सगळ्यांची ओळख पण करून दिली.

"अर्जुन, ही आमची परी."
अभीने परीची ओळख करून दिली.

"अरे किती मोठी झाली परी, लहानपणी किती छान गोलूमोलू होती."
आशाने लगेच तिला जवळ घेतले आणि लाडाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला.


"हाय अर्जुन."
असे म्हणत परीने हात मिळवला.


"अरे तुम्ही दोघे जा पाहिजे तर तुझ्या रूममध्ये बोलायला. इथे आमच्यात बसून काय बोअर होणार? आम्ही आपल्या जुन्या आठवणी काढून बोलत बसू."
अभी असे म्हणताच परी आणि अर्जुन तिथून उठून रूम मध्ये गेले.


दोघेही अगदी नॉर्मल होते. एकमेकांची ओळख तर झालीच होती आता ते एकमेकांविषयी जाणून घेत होते. त्यांचे काम काय किंवा पुढे काय करायचा विचार आहे अशा गोष्टी जाणून घेत होते.

"परी, एक विचारू?"
अर्जुनने तिला आता डायरेक्ट बोलायला सुरुवात केली.


"हा बोल ना प्लीज."
परी पण अगदी लक्ष देऊन ऐकू लागली.


"तुला माहितीये आपण का भेटतोय असे?"
अभी तिच्याकडे बघत बोलू लागला.

"हो, पप्पा मम्मीने सांगितले होते मला तसे म्हणजे आधी कल्पना दिली होती."
परीने पण अगदी निसंकोचपणे उत्तर दिले.


"अरे वाह, एकदम कुल आहेत म्हणजे मामा मामी. बरं तुला आणखी काही विचारायचे असेल तर अगदी न विचार करता बोल."
अर्जुनने तर तिला पूर्ण परमिशन दिली.


"माझी प्रॅक्टिस अजून तशी झालेली नाहीये; त्यामुळे मला आणखी वेळ हवाय लग्नाचा विचार करायला."
परी पण तिचं जे काही असेल ते बोलत होती.


"ठीक आहे मग मी थांबायला तयार आहे."
अर्जुन तर एकदम हसून बोलला तिच्याकडे बघून.

"काय?"
परी पण हसायला लागली.


"हो, आता थोड स्पष्टच सांगतो. तुला मिसेस अर्जुन व्हायला आवडेल?"
अर्जुन तर एकदम फिल्मी स्टाईलमधे केसांवरून हात फिरवत तिच्याशी बोलला.


"येस मिस्टर अर्जुन."
परीने पण क्षणाचा विलंब न करता होकार देऊन टाकला.