तोच चंद्रमा नभात - भाग ८
निधी आणि अभी बाहेर आलेल्या पाहुण्यांशी बोलत बसले होते तर आतमध्ये परी आणि अर्जून त्यांच्या भविष्याचा विचार करत बोलत होते. अखेर दोघांचे बोलणे संपून ते हसतच बाहेर येताना दिसले. तेव्हा मात्र सगळ्यांची नजर त्यांच्यावर रोखून होती.
दोघांची पसंती झाली असे त्यांनी बाहेर येऊन सांगितले तेव्हा निधी पेक्षा अभी आणि त्याची बहीण आशाच जास्त खुश दिसत होती. दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
"बरं मी काय म्हणते अभी, आपण लग्न अगदी साध्या पद्धतीने करूया. नाही म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर."
आशाला मनापासून तसे वाटतं होते त्यामुळे तिने तिचा विचार मांडला.
"हो हो, काही हरकत नाही ना. आपण ठरवू ते, पण त्याआधी जेवण तर करूया."
निधी लगेच उठून तयारीला लागली.
सगळ्यांची जेवणं झाली. त्यानंतरही बराच वेळ गप्पा झाल्या. लग्न कुठे? आणि कसे करायचे? हे सगळं बोलून झाले. दोघांकडचे नातेवाईक एकच असल्यामुळे जास्त वेळ लागला नाही ठरवायला. सगळा विचार करून झाला अगदी बोलणे ही छान झाले. आशा आणि तिच्या घरचे दोघेही अभीकडे बघत बोलत होते.
"चला आता आम्हाला निघायला पाहिजे. नाहीतर पुन्हा पुढच्या कामांना उशीर नको व्हायला."
असे म्हणून आशा उठून उभी राहिली. तिच्या मागे तिचे मिस्टर आणि अर्जुन पण उठून उभा राहिला.
असे म्हणून आशा उठून उभी राहिली. तिच्या मागे तिचे मिस्टर आणि अर्जुन पण उठून उभा राहिला.
"अग थांबली असतीस ना आजच्या दिवस, उद्या सकाळी लवकर निघाले असते."
अभीने बहिणीला म्हंटले.
"नाही अरे, हे डॉक्टर लोकांचं माहिती आहे ना तुला; त्यामुळे थांबायला नाही जमायचं. पुढच्या वेळी नक्की थांबू."
आशा अभी आणि निधीकडे बघत बोलली.
आशा अभी आणि निधीकडे बघत बोलली.
आशाने परीसाठी सोबत एक छानशी साडी आणलेली होती. त्यांनी परीला जवळ बोलवून तिला हळदीकुंकू लावून दिली. निधीने पण त्यांना हळदीकुंकू दिले आणि त्यांची ओटी भरली.
अर्जुनने हळूच त्याच्या खिशातून एक छोटासा बॉक्स काढला आणि परीच्या हातावर कोणाच्याही नकळत टेकवला. दोघेही चोरून चोरून एकमेकांकडे बघत होते.
आता फोनवर तासनतास बोलणे, एकमेकांना भेटणे, भेटवस्तू देणे याला सुरूवात झाली होती. अभी आणि निधी तर खूप खुश होते परीसाठी. तिला हवा तसा मनाजोगता जोडीदार मिळाला होता.
परीची प्रॅक्टिस संपली आणि लग्नाची तारीख काढली. दोघांचे लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचे ठरवण्यात आले. लग्नाच्या दोन दिवस आधी सगळी पाहुणे मंडळी जमली. खूप मजा करत होते सगळे जण, पण इकडे परी आणि अर्जुन एकमेकांसोबत बोलण्याची, एकमेकांना चोरून भेटण्याची एकही संधी सोडत नव्हते.
लग्न अगदी छान निर्विघ्नपणे पार पडले. दोन्हीकडची पाहुणे मंडळी पण खुश होती. परी आणि अर्जुन तर एकमेकांच्या प्रेमात पार बुडून गेले होते.
लग्न होऊन परी तिच्या सासरी जायला निघाली तेव्हा निधीच्या डोळ्यातले पाणी थांबायचे नाव नव्हते घेत तर अभीने इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका शेवटी बाहेर पडलाच. मुलीची पाठवणी म्हणजे खूप अवघड काम आणि त्यात एकुलत्या एक मुलीची पाठवणी म्हणजे काळजावर दगड ठेवून करण्यासारखेच आहे.
परी सासरी जाताना एकच विचार तिच्या मनात घोळत होता, की तिच्या जाण्याने घरी मम्मी पप्पा एकटेच पडतील. ती खूप काळजीत दिसत होती. तेव्हा अर्जुन तिच्याशी बोलला.
"परी, तुला जेव्हा केव्हा वाटेल मम्मी पप्पांना भेटून यावे तेव्हा मी तुझ्यासोबत असेन. मी समजू शकतो."
अर्जुन असे बोलताच परीला खूप हायसे वाटले आणि तिच्या डोळ्यातून ती काळजी वाहू लागली.
लग्न झाले, लग्नातले सगळे कार्यक्रम सुद्धा अगदी छान व्यवस्थित पार पडले. चार दिवस घरात असणारा गोंधळ, पाहुणे सगळे आपापल्या घरी निघून गेले. निधीला घर अगदी रिकामे रिकामे वाटू लागले.
कधी कधी तर निधी एकटीच परीसोबत बोलायची तिला आवाज द्यायची, जणू काही तिला भास व्हायचा की परी इथेच आहे. तिला असे बोलताना बघितले की अभी तिच्या बाजूने उभा राहून तिच्याशी बोलायचा.
निधी एकटी पडलीय हे जाणवत होते अभीला, पण तो तरी काय करणार. त्याच्याकडून शक्य तितका वेळ तो तिला देत होता, पण तरीही निधी उदास वाटायची.
परी जशी लग्न होऊन गेली तसे निधीला घरात खूप एकटे एकटे वाटू लागले. तिला सारखी परीची आठवण यायची आणि ती अचानक तिच्या नावाने आवाज द्यायची, मग अभी तिला शांत करायचा. हे असे बरेच दिवस चालले.
"अभी, मला खूप आठवण येते रे आपल्या परीची."
निधीने अभीला बोलून दाखवले.
"हम्म्म..."
पण अभी तिच्या बोलण्यावर फक्त इतकेच करत होता.
"अभी, तुम्ही दोघे खूप त्रास देतात मला. तू तुझ्या कामात बिझी असतोस आणि परी लग्न होऊन गेली. मला खूप कंटाळा येतो घरात."
निधी आता चांगलीच चिडली होती.
"अरे ऐकतोय ना मी, इतकं चिडायला काय झालं तुला?"
अभीने हातातले काम बाजूला ठेवून पहिले तिच्याकडे लक्ष दिले.
"अभी मला वाटले की परीला कोणी आवडत असेल, ती पण आल्यासारखी लव्ह मॅरेज करणार... पण ही तर सरळ सरळ आपल्याला नाही म्हणाली."
निधी तिच्या मनातले बोलू लागली.
"अरे मग सगळेच सारखे थोडीच असतात. प्रत्येकाचे विचार वेगळे आवड वेगळी. नसेल आवडले तिला कोणी. तू नको इतका विचार करू."
अभी पुन्हा पेपरमध्ये डोकं घालून बसला.
"काय करू... उलट डबल काम लावून दिलं माझ्या मागे. मुलगा आपण शोधा आणि लग्न पण करून द्या."
निधीने असे म्हणताच दोघेही तिच्या म्हणण्यावर हसायला लागले.
"तुला काय वाटले आपण लव्ह मॅरेज केले म्हणजे आपल्या मुलीने पण तसे करायला पाहिजे होते का?"
अभी तिला विचारू लागला.
"तसे नाही रे, पण मनात एक शंका होती. जी परीने दूर केली."
निधी अजूनही तिच्या आठवणीत बोलत होती.
"हो मग, आपण तसे केले म्हणजे आपली मुलगी सुद्धा तसेच करणार असे होत नाही ना! म्हणजे प्रत्येक जण वेगळा विचार करत असतो. नसेल भेटले तिला कोणी चांगले त्यात ती तरी काय करणार? जसा मी तुला भेटलो होतो."
अभीने लगेच स्वतः किती चांगला आहे हे दाखवून दिले.
"हो हो, तुमच्या सारखा तर शोधून पण सापडणार नाही."
निधी पण आता त्याच्यावर हसत होती.
निधी पण आता त्याच्यावर हसत होती.
"अरे, मी आहेच किती भारी."
असे म्हणून अभी स्वतः ची कॉलर ताठ करत होता.
"पण मी खूप खुश आहे आपल्या परीसाठी. तिला चांगले घर मिळाले. नवरा तिला हवा तसा भेटला... अगदी माझ्यासारखेच."
निधी पण आता अभीकडे बघून उगाचच हसत होती.
"आता तूच बघ अशी म्हणते आणि माझ्यावर हसतेस."
अभी मुद्दाम नाराज होत बोलला.
"बरं बाबा, मला सांगा आता काय खाणार तुम्ही?"
निधी किचनकडे वळत म्हणाली.
"काहीही, तुला जे आवडेल ते कर."
संध्याकाळ झाली तरी अभी अजूनही पेपर वाचत बसला होता.
"काहीही उत्तर आलं म्हणजे खिचडी असते."
निधी हसतच गेली.
थोडा वेळाने अभीने किचनमध्ये जाऊन पाहिले तर निधी डोळे पुसत होती. तिला काय झाले असावे बरं? हा विचार करतच अभी तिच्याशी बोलायला गेला.
"निधी, काय रे काय झालं?"
अभीने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारले.
"काही नाही, आपल्या परीची आठवण आली."
निधी डोळे पुसत बोलली.
क्रमशः
©®तृप्ती कोष्टी
रायगड