Login

तोच चंद्रमा नभात - भाग १०

शेवटपर्यंत साथ देणारे असे हळवे प्रेम
तोच चंद्रमा नभात - भाग १०


निधी अभीवर चिडून आत बेडरूम मध्ये जाऊन बसली. तिला परीची खूप आठवण येत होती आणि त्यात अभी तिच्यावर ओरडत होता; त्यामुळे तिला खूप रडू येत होते. इकडे परीसोबत बोलून अभी खूप खुश झाला होता.

अभीचा हसताना आवाज येतो. इतक्यात निधी बाहेर येते आणि त्याच्याकडे नजर रोखत उभी राहते.


"काय गॉसिप करत होतात तुम्ही दोघं माझ्या विषयी?"
निधी एकदम कमरेवर हात ठेवून विचारू लागली. तिला असे पाहून अभी आणखी हसत सुटला.


"अरे आता काय पोलिसांसारखी चौकशी करणार का तू माझी?"
अभीला हसू रोखता येत नव्हते.


"हो मग, सांगा पटकन काय बोलली परी. सगळं ठीक आहे ना? माझा फोन माझा मेसेज का नव्हता पहिला तिने?"
निधी एकदम काळजीच्या सुरात बोलून गेली.


"अरे हो हो, जरा श्वास तर घे. ती बाहेर होती म्हणूनच फोन बघितला नाही. आता इथून गेल्यावर तिला तिकडे तिचे बस्तान बसवावे तर लागणारच ना! इतकी शिकली आहे तर घरात थोडीच बसणार. हॉस्पिटल बघत होते ते. एकमेकांसोबत छान फिरायला जातात. मस्त मजा चालू आहे त्यांची. सासूबाई काही काम करू देत नाही म्हणे."
अभी तिला सगळं पुन्हा सांगत बसतो आणि निधी ते ऐकून मनोमन खुश होत असते.


"बरं झालं, चांगल सासर मिळालं पोरीला. आता मी निवांत राहीन."
निधीने असे म्हणून हात जोडले.


"हम्म्म, कोण बोलतंय बघा. आता थोडा वेळाने लगेच फोन करशील तिला आणि म्हणे निवांत राहीन."
असे म्हणून तो तिच्यावर हसू लागला.


"अभी, झालं का सुरू तुमचं पुन्हा चिडवण."
निधी त्याच्यावर नजर रोखत बोलली.


"अरे मग काय? आपली पोरगी काय म्हणत होती माहितीय का?"
अभी तिला जवळ घेत बोलला.

"काय?"
निधी एकदम उत्सुकतेने त्याचे ऐकत होती.

"तुम्हाला पण कुठेतरी फिरून यायला पाहिजे. जरा भांडणं कमी करा आणि एकमेकांना वेळ द्या म्हणे."
अभी हे सांगताना पण हसत होता.


"खरचं अभी, आपण किती फिरायचो आधी. अगदी वाटेल तेव्हा, दिवस बघितला नाही की रात्र, बाईक काढली की निघालो आपण. नंतर आपल्या घरात परी आल्यापासून आपली स्वप्न, आपली आवड सगळं काही विसरून गेलो ना!"
निधीला त्यांचे आधीचे दिवस आठवले.  


"हम्म्म, खरचं. ती म्हणतेय ते बरोबरच आहे म्हणा."
अभी तिच्याकडे बघत बोलला.


"आधी किती छान गायचास तू, फक्त माझ्यासाठी आणि आता विसरून गेलास ना!"
निधी त्याच्याकडे बघत उगाच रागावली.


"अरे त्यात काय एवढं, तुझ्यासाठी आजही मी गाणं गायला तयार आहे."
अभी तिच्याकडे बघून उगाच स्टाईलमध्ये बोलत होता.


"राहू द्या, उगाचच स्टाईल नका मारू. तुम्हाला नाही जमणार आता ते गाणं बिणं."
निधी पण त्याला चिडवू लागली.


"आपली परी खूप समजदार आहे. तिला बरोबर कळत सगळं. आपली काळजी करतच बोलत होती ती. सासरी पण अगदी थोड्याच दिवसात तिचा लळा लागलाय सगळ्यांना. ती म्हणते त्यात काही चुकीचं नाहीये."
अभी पुन्हा परी बद्दल बोलू लागला.

"हम्म्म आपली परी आहेच तशी, सगळ्यांना लळा लावते. तिला म्हणावं थोडे दिवस इकडे येऊन जा."
निधी पुन्हा तसेच वागू लागली.

"झालं तुझं पुन्हा सुरू? अग तिला थोडा वेळ दे सेटल व्हायला मग येतीलच ये इकडे. तू बिलकुल त्रास द्यायचा नाही तिला मेसेज आणि फोन करून."
अभी पुन्हा चिडून बोलला.


"अभी... हल्ली तू माझ्यावर खूप रागावून बोलतोस. माझ्याकडे जरा पण लक्ष नाहीये तुझे. मी घरात एकटी असते, परीची खूप आठवण येते मला. सारखं बोलावंसं वाटतं तिच्याशी. मी खूप समजावते स्वतःला पण मला नाही राहवत खरचं. तू पण तर मला वेळ देत नाही. नेहमी तुझ्या कामात गुंग असतोस. मला हाताला काल किती लागलं, पण तू काहीच न बोलता निघून गेलास."
निधी उदास होऊन बोलू लागली.

"अरे कुठं लागलं बघू तुला? मला सांगितल का नाही तू कालच? बघू हात दाखव."
असे म्हणून अभी तिचा हात बघू लागला. चाकूने बरेच लागले होते.

"आता ठीक आहे माझा हात, पण मलाही वाटतं ना माझ्याकडे कोणी लक्ष देणारे पाहिजे, माझी काळजीने विचारपूस करावी. तू तुझ्या कामात बिझी असतोस, पण मी मात्र घरात एकटीच झुरत असते."
निधी अभीकडे बघून बोलली.

"पण तुला असं का वाटतं माझं तुझ्याकडे लक्ष नाही. मी बघतो नेहमी. सकाळी मीटिंग होती महत्त्वाची म्हणून घाईघाईने निघालो होतो मी, पण तू सांगायचं तरी मला. किती चिरलेय हाताला."
अभी काळजी करत बोलाला.

"इतकं काही नाही झालं रे, मला सवय आहे त्याची. फक्त तू लक्ष दिलंस की आणखी ठणठणीत होईल मी."
असे म्हणून निधी हसायला लागली.


"तू पण ना लहान मुलीसारखी वागते कधी कधी. तिकडे परी अगदी मोठी झाल्यासारखी समजून घेत असते आणि इकडे तू आणखी लहान झाल्यासारखी खोड्या करते."
अभीला परीचे कौतुक वाटतं होते तर निधी असे वागताना हसू येत होते.


"हम्म्म, मी आजही तीच तुझी अल्लड निधी आहे, पण तू खूप बदललास अभी. मी तोच अभी शोधतेय जो तीस वर्षांपूर्वी मला भेटला होता. जो माझ्यावर अगदी वेड्यासारखं प्रेम करायचा."
निधी त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती.


"आता आपण लहान आहोत का? मुलीचे लग्न झालेय काही दिवसांपूर्वी."
अभी मात्र तिला स्वप्नातून जाग करत होता.

"हे बघ, तू अजूनही माझ्याशी कसा रुक्ष वागतोय."
इकडे निधी तिचा आधीचा अभी शोधत होती.

"अस आहे का? बरं मग कुठे जाऊया फिरायला? आय मीन आपल्या सेकंड हनिमूनला?"
आता मात्र अभी सुद्धा तिच्या सारखा तिला हवा तसा अभी बनून बोलत होता.


"अभी काहीही काय तुझं? सेकंड हनिमून म्हणे."
निधी असे म्हणताच छान लाजली.


"ओय होय, आजही तू अगदी तशीच लाजते."
अभी तिला आणखी चिडवत बोलत होता.


"आपण खरंच आधी जसे रहात होतो तसेच आताही का नाही राहू शकत?"
निधी त्याला विचारू लागली.


"आपण आताही तसेच आहोत अगदी अधीसारखे. फक्त आता तुला थोडं विसरायला होतं बाकी काही नाही."
अभी तिला मुद्दाम चिडवण्याच्या हेतून बोलत होता.

"काहीही, मी कुठे काय विसरते? काहीतरीच तुझं आपलं."
निधी त्याचा हात झटकत बोलली.

"हो मग, काल कोण आवाज देत होतं बरं परीला?"
आता अभीने बरोबर पॉइंट काढला होता.

"ते तर मला जास्त आठवण येत होती म्हणून चुकून तिला आवाज दिला गेल्या."
आता मात्र निधी उगाच सारवासारव करत बोलली.


"निधी, आपल्याला खरचं कुठेतरी फिरायला जायला पाहिजे. परी बरोबर बोलली होती. मी हल्ली खूप कमी वेळ देतो ना तुला. खरचं सॉरी, माझं लक्ष असतं सगळीकडे पण कामाच्या व्यापात माझे तुझ्याकडे दुर्लक्ष तर होत नाहीये ना! तरी तू नेहमी माझी काळजी घेत असतेस आणि मी मात्र असा. मलाही जाणवते, मी सगळं तुझ्यावर सोडून अगदी निवांत असतो, पण तू मात्र अगदी नेटाने संसार केलास. परी आल्यानंतर तर तू तुझा जॉब सुद्धा सोडून दिलास... का तर फक्त तिच्याकडे नीट लक्ष देता यावे म्हणून. तिच्याकडे दुर्लक्ष नको व्हायला. तू खरंच खूप करतेस... मी मात्र सगळं तुझ्यावर ढकलून मोकळा असतो, पण आता नाही. आता परी सुद्धा तिच्या संसारात रमली आहे. आता माझा वेळ फक्त तुझा."
अभी तिच्याकडे बघून बोलत होता. त्याने त्याच्या मनातले सगळे बोलून दाखवले.


"अभी, बास अरे. मी इतकी काही मोठी कामगिरी नाही केली. आपल्या संसारासाठी केलं हे सगळं जे प्रत्येक स्त्री, आई ही करत असते. तू नको इतकं मनाला लावून घेऊ."
निधी त्याच्या हातावर पुन्हा हात ठेवून बोलते.


"नाही निधी, आता मी ठरवले आहे. आपण आपल्यासाठी जगायचं. अगदी आधीसारखे."
अभी एकदम अचानक उठून असे बोलू लागतो.