Login

तोच चंद्रमा नभात - भाग ११ अंतिम

शेवटापर्यंत साथ देणारे असे हळवे प्रेम
तोच चंद्रमा नभात - भाग ११ अंतिम


"निधी, परीचे लग्न होऊन महिना होऊन गेला तरी तू अजूनही त्यातच अडकून आहेस. तिला रमू दे तिच्या संसारात, तू आता फक्त माझ्याकडे लक्ष दे. सगळ्यांचं खूप केलंस, आता तू एकदम आरामात राहावं असं मला वाटतं."
अभी कधी मस्करीत तर कधी सिरियस होऊन बोलत होता.


"तू काय बोलतोय मला तर काहीच कळत नाहीये."
निधी त्याच्याकडे बघून गोंधळून गेली होती.


"मला फक्त इतकचं म्हणायचं आहे की आता माझा सगळा वेळ तुझा आणि तू फक्त माझ्याकडे लक्ष दे... बास्स."
अभी तिच्या एकदम जवळ येत बोलला.


"काय वेड बीड लागलंय की काय?"
निधी एकदम त्याला मागे ढकलत बोलली.

"नाही निधी, आता मी ठरवले आहे. आपण आपल्यासाठी जगायचं. अगदी आधीसारखे." 
अभी एकदम उठून बोलू लागतो.


"हम्म्म, खरचं. आता आपण दोघेच आहोत एकमेकांची काळजी घ्यायला; त्यामुळे मस्त खायचं आणि नुसतं फिरायच."
निधी पण त्याच्या सुरात सुर मिसळून बोलू लागली.


"मग सांग तर कुठे जाऊया आपण आपल्या सेकंड हनिमूनला?"
अभी तिला पुन्हा तेच विचारू लागला.


"अभी, काय सारखं सेकंड हनिमून लावलय तुम्ही. आपण फक्त असच थोडा बदल म्हणून फिरायला जातोय."
निधी अजूनही ओशाळून बोलत होती.


"बरं, कुठं जायचं मग आपल्याला फिरायला?"
तो तिच्याकडे बघत बोलला.

"अभी, पुन्हा महाबळेश्वर मध्ये जाऊया?"
निधी एकदम उत्साहात बोलून गेली.


"काय? काय म्हणालीस तू?"
अभी तिच्याकडे बघून एकदम हसायला लागतो.


"असे काय बघतोस. मी विचारतेय काहीतरी."
निधी त्याच्याकडे बघत बोलली.


"मला सेकंड हनिमून म्हणू नको म्हणतेस आणि स्वतः मात्र आपल्या पहिल्या हनिमूनच्या आठवणीत रमून आहेस."
अभी तिच्याकडे डोळे रोखून बघत असतो.


"खरचं कित्ती दिवस झाले आपण गेलो नाहीये तिकडे. चला ना जाऊया तिकडेच."
निधी त्याला मनवत असते.


"हम्म्म जायलाच पाहिजे आता. तसेही आपली लग्नानंतर फिरायची सुरुवात तर तिथूनच झाली होती. खूप आठवणी ताज्या होतील."


अभी तिच्याकडे अगदी प्रेमाने बघून बोलत असतो आणि निधी पण खुश होते. अगदी चार दिवसांनी त्यांचा जाण्याचा प्लॅन ठरतो. अभी आधीच परीला तसे सांगून ठेवतो. ती सुद्धा खूप खुश होते मम्मी पप्पा फिरायला जाताय म्हणून, कारण तिच्याभोवतीच तर त्यांचे जग होते. लग्नानंतर त्यांना पण थोडा निवांतपणा आणि आराम हा हवाच होता.


फिरायला जायचे म्हणून अभी निधीला तयारी करायला सांगतो. तिच्या म्हणण्यानुसार तो तिला शॉपिंगला सुद्धा घेऊन जातो. दोघेही भरपूर खरेदी करतात. निधी परीला फोनवर त्यांची सगळी धमाल सांगत होतीच.

"अभी, मी आपल्यासाठी काही गरम कपडे ठेवले आहेत. थंडी असेल ना तिकडे आता?"
निधी बॅगमध्ये ठेवायला स्वेटर काढून ठेवत होती.


"अग इतकी नसेल थंडी, कशाला उगाच ओझ घेतेस?"
अभी तिला नको म्हणत असतो.

"आता वय झालंय माझं, फक्त माझं म्हणण्यापेक्षा आपल्या दोघांचेही सेम आहे. जराही थंडी सहन होत नाही; त्यामुळे उगाच आजारी पडण्यापेक्षा स्वेटर सोबत असलेले केव्हाही चांगले."
असे म्हणून निधी सगळे ठेवून घेते बॅगमध्ये.


"अभी, मी घेऊ का गाडी."
तिने असे म्हणताच अभी हातातल्या चाविकडे आणि गाडीकडे बघत असतो.


"अरे मुद्दाम म्हटले मी, आता कुठे चालवता येणार आहे मला आणि आपल्याला सुखरूप घरी यायचे आहे."
निधी असे म्हणून स्वतःच हसत सुटते.


"तू पण ना, घाबरलो मी खरचं."
अभी हसतच ड्रायव्हिंग सीटवर बसला.


दोघेही मस्त गप्पा मारत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत प्रवास करत जातात. तीस वर्षापूर्वीचे निधी आणि अभी पुन्हा त्यांचा मागचा गेलेला काळ आठवत होते. कधी हसत तर कधी एकमेकांची खेचत होते. टोमणे मारायला तर निधी आजही तितकीच पक्की होती. इतक्या वर्षात काहीच बदलेले नव्हते, फक्त आता जरा वय वाढले होते इतकाच काय तो फरक. उत्साह मात्र आजही तोच होता.

ह्यावेळी सुद्धा अभीने पुन्हा तेच हॉटेल बुक केले होते जे आधी केलेले होते. अगदी रूम सुद्धा तीच घेतली होती. त्याला निधीला सरप्राइज द्यायचे होते म्हणून हा सगळा खटाटोप चालू होता. हॉटेल जसजसे जवळ येत होते तसे निधीला सगळे आठवायला लागले.


"अभी, अरे आपण पुन्हा तिथेच आलो?"
निधी एकदम आश्चर्याने बोलत होती.


"हो... तू मला बदलला असे बोलली होतीस ना! मग तुला तुझ्या त्याच अभीला भेटायला आवडेल?"
अभीने पण तिच्याकडे बघत तिला विचारले. 


"खरचं अभी?"
निधी पण अगदी प्रेमाने त्याला बोलली.


दोघेही हॉटेलमध्ये गेले. चेक इन झाले आणि रूम मध्ये जातानाही निधी अभीकडे आश्चर्याने बघत होती, कारण तिला त्यांचे जुने दिवस आठवत होते. तेच हॉटेल आणि तिचं रूम बघून निधी एकदम भारावून गेली. तिला एकदमच भरून आले आणि खूप रडायला आले. 

"अरे काय झाले? अशी का रडतेय तू?"
अभीने तिला काळजीने विचारले.


"परीची आठवण तर नाही ना आली तुला?"
अभी तिला हसण्यासाठी असे बोलला.


"नाही, आता तू आहेस ना माझ्यासोबत."
असे म्हणून तिने डोळे पुसले.


"मग... कसे वाटले माझे सरप्राइज?"
अभीने तिला विचारले.

"खूप खूप छान, अभी मला वाटले नव्हते की आपण पुन्हा तिथेच असे कधीतरी निवांत येऊ."
तिच्या डोळ्यांच्या कडा अजूनही ओल्या होत्या.


"अरे का नाही येऊ शकत? तू फक्त सांग तुला जेव्हा वाटेल तेव्हा आपण इथेच येत जाऊ."
अभी अगदी शांतपणे बोलत होता.


"अभी, आपण आज संध्याकाळी पण तिथेच जाऊया. जिथे आपण आपली आयुष्यातली सगळ्यात सुंदर संध्याकाळ घालवली होती."
निधीने त्याला अगदी लहान मुलीसारखे विचारले.


"तू फक्त म्हण, माझा संपूर्ण वेळ फक्त तुझाच आहे."
अभी तिच्यासाठी आजही ते सगळे करत होता अगदी आनंदाने, फक्त तिच्या आनंदासाठी.


"जेवण झालं की आपण निघुया, तोपर्यंत आराम कर हवं तर."
निधीने बॅग मधून त्यांचे गरम कपडे वर काढून ठेवले. थंडी थोडी जाणवत होती.

दोघांनी जेवण केले आणि रूममध्ये दुपारी थोडा आराम करून पुन्हा संध्याकाळी निघायचे ठरवले.

"अभी, हे स्वेटर घालून घ्या. बाहेर थोडा गारवा आहे."
निधीने त्याला हातात स्वेटर दिले.


दोघेही त्यांच्या आवडत्या ठिकाणी पोहोचले. ते ठिकाण तिथली दुकानं, माणसं तिचं होती, फक्त थोडासा बदल केलेला दिसून येत होता. आता काळानुसार बदल हा केव्हाही चांगलाच ना! अभीने तिच्या आवडीचे भाजलेले मक्याचे कणीस आणले.


दोघेही संध्याकाळचा देखावा बघत बाकड्यावर बसलेले होते. सूर्य दमून त्याच्या परतीच्या प्रवासाला निघाला होता... पुन्हा नव्याने भेटण्यासाठी. आकाशात मस्त गुलाबी नारंगी छटा दिसतं होत्या. दोघांनाही मावळतीचा क्षितिज खूप आवडायचा.


संध्याकाळ संपून रात्र होत आली तरीही ते दोघे तिथेच बसून होते. जणू काही कित्येक वर्षांपासून ते एकमेकांशी काही बोललेच नव्हते जितके आता बोलत होते.

रात्र झाली तसे आकाशात चंद्र आणि चांदण्यानी गर्दी केली. त्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांना बघून निधीला पुन्हा त्यांचे जुने दिवस आठवले. तेव्हा ते ऑफिसमधून डायरेक्ट बाहेर फिरायला जायचे आणि असेच बागेत बेंचवर बसून तासनतास गप्पा मारत राहायचे.


"अभी, आपण आजही तेच दोघे आहोत ना?"
निधी त्याच्याकडे बघून बोलली.


"हो, आजही तेच दोघे आहोत."
अभी सुद्धा तिला हवं तसे वागत होता.


"अभी, पण तू माझ्यासाठी आधीसारखे गाणे नाही गात आता."
निधी थोडीशी नाराज होऊन बोलली.

"अरे त्यात काय इतकं, वय वाढले तरी गळा शाबूत आहे आणि आवाज देखील खणखणीत आहे. सांग कुठले गाणे गाऊ तुझ्यासाठी?"
अभी एकदम उत्साहात बोलून गेला.


"तू पण ना, गळा ठीक आहे पण त्यातून आवाज तसाच निघेल का?"
निधी सुद्धा त्याला चिडवत बोलली.

"तुला काय वाटतं मी गाऊ शकत नाही? आरे माणसाने नेहमी तरुण राहायला हवे. मनाने आणि त्याच्या आवाजाने."
असे म्हणून अभी गाणे गायला सुरूवात करतो पण त्याचा आवाजच निघत नाही लवकर. निधी त्याच्याकडे बघतच बसते.


"ते मी जरा गळा साफ करत होतो. बरं कोणतं गाणं ऐकायचं आहे तुला? हे तर सांगितलेच नाहीस तू."
अभी मुद्दाम गळा खाकरून तिला विचारतो.


"हम्म्म... तेच जे तू नेहमी माझ्यासाठी गात होतास. खूप आधीपासून. ते गाणे ऐकले की मी तुझ्या प्रेमात पुन्हा नव्याने पडते."
निधी अगदी रोमँटिक होऊन बोलत होती.


"अरे, आता गातो ते गाणे. तू फक्त माझ्याजवळ बसून रहा."
असे म्हणून अभीने गायला सुरुवात केली आणि निधी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हातात हात घेऊन डोळे मिटून बसली.


सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ?
मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी


अभीने गायला सुरुवात केली आणि निधी त्याच्या आवाजात गुंग झाली. निधीला तिचा तोच अभी सापडला होता जो तीस वर्षांपूर्वी तिच्यासाठी सगळं करत होता. आजही अभी अगदी तसाच आहे. त्याला असे गाताना बघून ती खूप खुश होते.


त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी

एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी !
तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी!


समाप्त