Login

आजकालची रीत-विभक्त कुटूंबपद्धती की एकत्र कुटूंबपद्धती?

विभक्त कुटुंबपद्धती योग्य की एकत्र कुटुंबपद्धती योग्य?



आज संत बहिणाबाई ज्येष्ठ महिला मंडळ सप्तशृंगीदेवी मंदिरात नेहमीप्रमाणे भजन गायनासाठी आले होते.आज बुधवार असल्याने चर्चात्मक मीटिंगसाठी खास कुलकर्णी मॅडम यांना निमंत्रित केले होते.कुलकर्णी मॅडम,एक खुमासदार,रुबाबदार,वैचारिक प्रगल्भता असलेले व्यक्तिमत्व.आपल्या सामाजिक कार्यात त्यांनी आजवर अनेक स्तरांवर यशस्वी प्रबोधन केले होते.

एव्हाना, भजनी मंडळातील महिलांचे भजन संपत आले होते.
" जय जय रघुवीर समर्थ!!
पुंडलिक वरदे श्री हरी विठ्ठल,श्री ज्ञानदेव तुकाराम,पंढरीनाथ महाराज की जय!!


" वाह! कुलकर्णी मॅडम आल्यात,म्हणजे मीटिंगमध्ये काहीतरी मस्त चर्चा रंगणार आणि मग सरते शेवटी एक छान प्रबोधनपर विचार सर्वांच्या मनात रुजणार!"

" हो सुलभा ताई! आज मस्त चर्चासत्र रंगणार.पण
आजचा विषय काय आहे?"

"अगं,सुरेखा कळेल लवकर.जरा धीर धर! केवढी ही अधीरता!"

तेवढ्यात कुलकर्णी मॅडम उठल्या आणि सर्वांना म्हंटल्या,

" माझ्या बंधू आणि भगिनींनो,मला माहित आहे की तुम्ही या चर्चासत्र असणाऱ्या मीटिंगची दर बुधवारी आतुरतेने वाट पाहत असता.यात विविध मान्यवर तुमच्यासोबत चर्चा करून एक छान विचार सर्वांच्या मनात रुजवतात.मीही असाच प्रयत्न आज करणार आहे.तर आजचा विषय आहे,"आजकालची रीत-विभक्त कुटूंबपद्धती की एकत्र कुटूंबपद्धती?", तर मग सुरू करूया आजचे चर्चासत्र! यावर तुम्ही तुमचे मत मांडू शकता,पण चर्चेअंती सारासार विवेकबुद्धीला पटेल तोच विचार घेवून आपण इथून बाहेर पडाल अशी मी आशा करते."

" मॅडम माझे नाव सुलभा.पहिला मुद्दा मी मांडते.विभक्त कुटूंबपद्धतीमूळे घटस्फोटांचे वाढते प्रमाण आटोक्यात आणले जाऊ शकते.
आता बघा आपल्या सर्वांच्या कानावर हल्ली सतत घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत.बरोबर ना? मुलीचे किंवा मुलाचे लग्न झाले की चार - सहा महिन्यात घटस्फोटाचे प्रमाण जणू काही एक चिंतेची बाब बनली आहे.म्हणजे आजकालचे आई वडील आपल्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न लावताना खूप जागरूक झाले असल्याचे भासतात.नव्हे व्हायलाच हवेत,या मताची मी आहे.
मग सर्वप्रथम या वाढत्या घटस्फोटांचे कारण काय असू शकते? तर सारासार विचार केला किंवा आतापर्यंतचे लोकांचे अनुभव ऐकले की एकत्र कुटुंब पद्धती याचे प्रामुख्याने कारण आढळते. माझ्या जवळच्या व्यक्तींच्या अनुभवावरून सांगते,एक जोडपे नुकतेच घटस्फोट घेऊन वेगळे झाले,कारण काय तर म्हणे सासू आणि नणंद खूप त्रास देत होत्या. दुसरे जोडपे घटस्फोट घेऊन विभक्त झाले कारण सासू सतत उणे दुणे बोलणे करायची आणि नवरी मुलगी यामुळे चक्क मानसिक रुग्ण बनली. तिसरे एक जोडपे पुन्हा घटस्फोट घेऊन विभक्त झाले कारण नवीन सूनेला एवढ्या जणांचा सुंदर स्वयंपाक करून सुद्धा सतत हिच्या हाताला चवच नाही, असे हिणवले जायचे.चौथे एक जोडपे विभक्त झाले कारण सासूच्या मैत्रिणीला नवीन सुनेने लवकर पाणी दिले नाही; त्यामुळे सासूने मुलास फर्मान सोडले की, हीची आपल्या घरात राहण्याची लायकी नाही,ही माझे ऐकत नाही,त्यामुळे तू तिला घटस्फोट दे.बघा म्हणजे ही कारणे काही गंभीर पण काही अतिशय अवाजवी किंवा गमतीशीर आहेत."

" नमस्कार मॅडम, मी सुरेखा. आता लग्नानंतर नवरा मुलगा आणि नवरी मुलगी वेगळे राहायला गेले तर बिघडले कुठे? आता माझीच एक मैत्रीण नवऱ्यासोबत बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहते आणि सण-वार असेल की सासूच्या घरी म्हणजे शेजारच्या बिल्डिंगमध्ये जाऊन मदत करते आणि एकत्र साजरे सुद्धा करते.मग बघा बरं आहे की नाही इथे सामंजस्य?मला वाटतं आजकालची ही वाढलेली घटस्फोटाची प्रकरणे विभक्त कुटुंबपद्धती अंमलात आणली तर नक्कीच बऱ्यापैकी आटोक्यात येतील,म्हणून मला सुलभाताईंचे म्हणणे पटले आहे."

" नमस्कार मॅडम, मी सुरेश! मला वाटते,सासू नावाच्या व्यक्तीला नेहमीप्रमाणे जनरलाइज स्टेटमेंट करून बदनाम करणे हे काही योग्य नाही. आता सुलभाताईंच्या म्हणण्यानुसार त्यांच्या चारही उदाहरणांमध्ये सासरची मंडळी सुनेला त्रास देते. कदाचित सूनही त्यांना त्रास देत असेल म्हणून नवऱ्याने तिला घटस्फोट दिला असेल;कारण टाळी एका हाताने वाजत नाही!"

" अच्छा!माझ्या मताप्रमाणे,विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये नात्यात एकमेकांना स्पेस दिला जातो.याउलट एकत्र कुटुंबपद्धतीत प्रत्येक नात्यातील ओलावा हा केवळ नी केवळ सूनेनेच जपावा अशी मागणी नव्हे अपेक्षाच केली जाते. मी हे पटवून देण्यासाठी एक सत्य उदाहरण देऊ इच्छीते.अशातच एक सामाजिक कार्यकर्ती असल्या कारणाने एक दिपाली नावाची मुलगी माझ्याकडे आली होती.
आता मदन आणि दिपाली यांचे लग्न झाले.तसे पाहिले तर दोघेही उच्चशिक्षित.दोघेही जॉब करत होते.पण घरातील प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिपालीने जॉब सांभाळून लक्ष द्यावे ही सासू-सासऱ्यांची अपेक्षा.शिवाय तिने धाकट्या दीराला सतत चहा, नाश्ता,जेवण विचारले पाहिजे,अशीही सासू सासऱ्यांची एक तऱ्हेने बाळजबरीच असायची.मग चुकून एखाद्या दिवशी तिने घरातील कोणाच्याही आधी जेवायला घेतले की सासू मदन जवळ बायकोचे गाऱ्हाणे करत असे.मग मदन मी माझ्या आईपुढे काहीही बोलू शकत नाही ,तुला सर्व काम नोकरी सांभाळून करावेच लागेल असे म्हणू लागला.प्रसंगी तिच्याशी अबोलाही धरू लागला.मग या सर्व परिस्थितीला घाबरून दिपाली सर्वांना कितीही काम असले तरी ऑफीसवरून येवून मग रात्रीचे १० वाजले तरीही छान जेवण बनवायची.आश्चर्य म्हणजे तोपर्यंत ज्यांना भूक लागायची ते मात्र चक्क मॅगी करून खायचे.
पण दिपाली मात्र सर्वांना आपल्याबद्दल हेवा वाटावा म्हणून सतत राबू लागली.दिवसभर ऑफिस मध्ये आणि रात्री घरी.रविवार तर ती पूर्ण घरातील कामांमध्ये खूप व्यस्त असायची.म्हणजे दिपाली ही कुटुंबाची सून नव्हे तर मोलकरीण बनली होती.मग मी दिपालीसह तिच्या घरच्यांना समजावले,तेव्हा कुठे तिला जरा हायसे वाटले.म्हणजे सुरेशदादा जे म्हणत आहेत ते एकदम चुकीचे नाही पण पुर्णतः बरोबरही नाही असे मला वाटते."

" नमस्कार मॅडम.मी स्नेहा.मी माझ्या मैत्रिणीचे एक सत्य उदाहरण तुम्हाला सांगते.सोमेश आणि पूजा यांचे नवीन लग्न झाले.पूजा तशी वाणिज्य शाखेची पदवीधर होती,पण लग्नानंतर ती गृहिणी बनली.मग सासू-सासऱ्यांच्या साहजिकच तिच्याकडून अपेक्षा वाढल्या.मग दररोज काय नवीन मेन्यू बनवायचा हे तिला वेळापत्रकासारखे ठरवून देण्यात आले.घरातील संपूर्ण कामे तिच्याकडून केली जायची.जरा कधी ती निवांत बसली की सासू किंवा नणंद तिला काही तरी काम सांगून सतत व्यस्त ठेवायचे.त्यात सोमेश बाहेर गावी नोकरीला असल्याने तो पूजाला माझ्या घरच्यांना माझ्या विरहित नीट सांभाळ असे सतत सांगायचा.म्हणून पूजा सुद्धा तिच्यावर होणारा अन्याय नवऱ्याला वाईट वाटेल म्हणून सहन करीत होती. तसा सोमेश रविवारी न चुकता घरी यायचाच.अशातच अती कामाच्या ताणामुळे तिला लवकर दिवस राहत नव्हते.घरातले तिला राब-राब राबवत आहेत,हे सोमेशच्या लक्षात आले.
त्याने त्वरित पूजाला आपल्यासोबत नोकरीच्या गावी शिफ्ट केले.त्याने तिथे व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली.त्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या.पण पूजाची सासू मात्र मुलींना सांभाळायला आली नाही.इतक्या दिवस ज्या सासू सासऱ्यांसाठी,ज्या कुटुंबासाठी पुजाने आपले कष्ट दिले ते आता कोणीही तिच्या मदतीला पुढे येत नव्हते.कारण त्यांनी तिला गरज सरो वैद्य मरो या उक्ती प्रमाणे , तू तुझे बघून घे आम्हाला म्हातारपणात आता मुलांना सांभाळणे कठीण जाते,असे सांगितले. सोमेशला मात्र त्याच्या आईवडिलांचा आता खूप राग आला होता पण शेवटी जन्मदाते असल्याने तो त्यांच्यापुढे हतबल होता.शेवटी त्याने व पुजाने आळीपाळीने आपल्या मुलींना सांभाळायचे ठरवले.मग आता सांगा असे आजी आजोबा काय कामाचे? इथे नॉर्मल मुले आजकालच्या आजी आजोबांना सांभाळण्यास जड होतात,तर स्पेशल किंवा मतिमंद मुलांना सांभाळणे तर यांच्याकडून अगदी अशक्यप्राय गोष्ट आहे.या स्पेशल मुलांच्या आई वडिलांना विशेष करून आईला मात्र सासू सासरे असूनही संसार सांभाळत,नाती जपत कठीण मातृत्वाची अग्नीपरिक्षा द्यावी लागते,हे मी माझ्या दुसऱ्या मैत्रिणी बाबत पहिले आहे."

" नमस्कार मॅडम मी कल्पना.मला वाटते, आजी आजोबांसाठी त्यांचा नातू किंवा नात ही जणू दुधावरची साय असते.मग त्यांना सांभाळणे हे काही त्यांच्यासाठी कठीण काम नसते नव्हे त्यांना सांभाळण्यात त्यांना परमोच्च आनंद मिळतो.माझे आजी-आजोबा याचे ज्वलंत उदाहरण आहेत.त्यांनी आम्हा दोघी बहिणींना अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले म्हणून तर आमचे आई- वडील बिनधास्त नोकरी करू शकले."

" नमस्कार मॅडम मी विभावरी जोशी.विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये मुलांच्या पोषणाकडे नीट लक्ष दिले जाते. याउलट एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये मात्र मुलांचे खाण्याचे बऱ्याचदा हाल होतात,त्यावरून भांडणे देखील होतात म्हणून त्यांचे पोषण नीट होत नाही. म्हणून विभक्त कुटुंबात प्रसंगी स्वतःचे करिअर पणाला लावून आई मुलांचा सांभाळ करते आणि त्यांना प्रगतीपथावर नेते."

" हो,अगदी बरोबर.मॅडम मी कल्पना माने. एकत्र कुटुंबात वडीलधारे नेहमी एकमेकांची तुलना मुलांवरून करताना आढळतात. आता दोन भाऊ असतील तर त्यातील एक नेहमी,त्याचा मुलगा इंजिनियर आहे मग त्याला काय कमी आहे?ते पैसा फेको तमाशा देखो या उक्तीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या समस्या सोडवतील , आपल्याला आपले व्याप कमी आहेत का? अशी विचारसरणी असणारे आहेत.त्यामुळे आपापल्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो.
विभक्त कुटुंबपद्धती मध्ये लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही स्वावलंबन खूप आधीच कळते; याउलट एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये मात्र एकमेकांवर प्रत्येक कामासाठी विसंबून राहावे लागल्याने स्वावलंबन अस्तित्वात येतच नाही,आणि आपसुकच मुलांवरही याचा परिणाम होतो."

" नमस्कार मॅडम,मी गणेश शेलार.मला कल्पना ताईंचे म्हणणे पटत नाही.एकत्र कुटुंबात एकमेकांबद्दल नेहमी आपुलकी,प्रेम,आदर, शेयरींग( मग ते कामाचे असो किंवा खाण्याच्या पदार्थांचे) या गोष्टी अंमलात आणल्या जातात.मी स्वतः या सर्व गोष्टी,नव्हे जगण्याची मूलभूत तत्वे माझ्या स्वतःच्या एकत्र कुटुंबाकडून शिकलो आहे."

" नमस्कार मॅडम.मी सुभाष.
विभक्त कुटुंबपद्धती मध्ये आर्थिक नियोजनाचे बजेट कधीच कोलमडत नाही ;याउलट एकत्र कुटुंब पद्धती मध्ये मात्र फक्त एकालाच संपूर्ण घर चालवावे लागल्याने प्रचंड आर्थिक ताण सहन करावा लागतो."

"नमस्कार मॅडम मी रामराव. विभक्त कुटुंबपद्धती मध्ये आई वडील कुठल्याही कौटुंबिक तसेच मुलांच्या समस्या एकमेकांना पुरेसा वेळ देऊन सोडवू शकतात.याउलट एकत्र कुटुंबपद्धती मात्र आई वडील दोघेही घरातील इतर कामे करण्यात ,सर्वांची मने सांभाळण्यात खूप व्यग्र असतात,म्हणून एकमेकांना तसेच मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही.त्यामुळे मुले बिघडली जाऊ शकतात किंवा सख्ख्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो असे मला वाटते."

" मीही यांच्याशी अगदी सहमत.मी कोमल राणे.
आजकालच्या तरुण मुलींना स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी, ध्येयप्राप्तीसाठी नोकरी करावी लागते. अशा मुलींवर लग्न झाल्यावर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये विशिष्ट सणवार असले की साग्रसंगीत पूजा करणे, दिवसभर निरंकार उपवास करणे, पाळी आली असेल तर स्वयंपाक घरात प्रवेश न करू देणे, साडी घालण्याची सक्ती करणे या गोष्टी बंधने म्हणून लादली जातात. आता अशा जॉब करणाऱ्या मुली एवढी बंधने पेलवू शकत नाहीत. मग जर या मुलींनी नाही म्हणण्याची हिंमत केली तर त्यांना नास्तिक ठरवले जाते किंवा हिच्या आई-वडिलांनी हिच्यावर काही संस्कार केले नाहीत असे ऐकवले जाते. आता मग एकत्र कुटुंब पद्धतीतील मोठ्यांचे असे वागणे नोकरी करणाऱ्या मुलीचे स्वावलंबन प्रसंगी हिरावूनही घेऊ शकते. मग विभक्त कुटुंबपद्धतीत राहून जसे जमेल तसे सणवार साजरे केले तर बिघडले कुठे?"

" हो,बरोबर.मॅडम मी नरेश.एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मसाला वाटायला पाटा वरवंटा मोठ्या प्रमाणात आजही वापरला जातो. मग अशावेळी जर कोणी मिक्सर वापरले तर वादावादीही होऊ शकते. घराच्या रचनेत जर नवीन सुनेने घराच्या हितासाठी उदाहरणार्थ किचनमध्ये जर एक्झॉस्ट फॅन लावण्याची मागणी केली, एखादी भाजी किंवा पदार्थ जरा वेगळा बनवला किंवा काही बदल सुचवले तर तिला कानामागून आली आणि तिखट झाली असे हिणवले जाते. मग विभक्त कुटुंबपद्धतीत जर आधुनिकतेचे विविध प्रयोग अवलंबले आणि जरा स्मार्ट पद्धतीने कामे केली तर नक्कीच कुटुंबातील सर्वांचाच विकास वेगाने होऊ शकतो. घरातील स्त्रीला देखील घरातील कामांच्या व्यापातून काहीतरी वेगळे करण्यास वाव मिळू शकतो."

" नमस्कार मी साकेत कुलकर्णी.आजच्या आधुनिक काळात एकत्र कुटुंबात प्रत्येकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार केला जातो.मग तो त्या व्यक्तीच्या जॉब करण्याच्या इच्छेबाबत असो नाही तर आधुनिकीकरण करण्यासाठी असलेले विचार असो.हे दोन्ही मुद्दे एकत्र आणि विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये आजकाल पाहायला मिळतात,असा माझा अनुभव आहे."

" वाह! आजच्या चर्चेच्या विषयाबद्दल सर्वांनी छान मते मांडली.तर हे चर्चासत्र ज्येष्ठांच्या सर्वानुमते विभक्त कुटुंबपद्धती आणि एकत्र कुटुंब पद्धती हीच हवी आजकालची रीत,असे दर्शवते.

मला एकत्र कुटुंबपद्धतीबाबत दोन मुद्दे सांगावेसे वाटतात,
१) जर समजा,एखाद्या घरात तीन भावंडं असतील आणि कुठलाही मोठा निर्णय घेताना जर केवळ मोठ्या भावाचाच विचार म्हणजे पूर्व दिशा असे मानले जात असेल तर असे वागणे म्हणजे इतर दोन लहान भावांवर अन्याय केल्यासारखे आहे.
२) दुसरी बाजू पाहता या कुटूंबपद्धतीत घरात एकमेकांबद्दल कितीही भावनिक वितष्ट असले तरीही सुख- दुःखाला मात्र सारेच धावून येतात,किंबहुना आम्ही एक आहोत हे दाखवून देतात हे मी स्वतः बऱ्याच घरांमध्ये पाहिले आहे.

अशाच प्रकारे विभक्त कुटूंबपद्धतीबाबतही मला दोन मुद्दे सांगावेसे वाटतात,
१)समजा एखादे लहान मूल पटकन कोणालाही काहीही बोलून जाते किंवा मारून जाते,यात दोष कोणाचा? या मुलाचे आई-वडील दोघेही आपापल्या कामांत व्यस्त असतील तर या मुलावर योग्य ते संस्कार करण्याची जबाबदारी कोणाची?त्यासाठी काम करणाऱ्या आई-बाबांना वेळ मिळत नाही ही खरं तर खूप चिंताजनक बाब आहे.
२) दुसरीकडे जर एखादे जोडपे स्वतः लग्नानंतर विभक्त राहिले असेल आणि आता स्वतःच्या मुलाकडून लग्नानंतर एकत्र राहण्याची अपेक्षा करत असेल तर हे कितपत योग्य आहे?आपल्याच मुलावर असा अचानक एकत्र राहण्याचा अट्टाहास मला मात्र बिलकुल पटत नाही.

म्हणूनच कालापरत्वे प्रत्येकाने संभाव्य धोके ओळखुन विभक्त तसेच एकत्र कुटुंबपद्धतीला प्राधान्य दिले तर लहानग्यांसोबत मोठ्यांचेही आयुष्य सुखकर होईल यात शंका नाही.म्हणूनच दोन्हीही कुटूंबपद्धती या खरच काळाची गरज आहे असे मला वाटते.हाच आहे आजच्या चर्चासत्रातील एक विचार!

पण ज्येष्ठ नागरिकांनो,आपल्यातील काही जणांना हा विचार पटला नसेलही.कदाचित एकत्र कुटूंबपद्धती हीच सर्वोत्तम असे काहींना वाटत असेल,तर विभक्त कुटूंबपद्धती हीच श्रेष्ठ असेही काहींना वाटत असेल, काही हरकत नाही.कारण मी तुम्हाला आधीच सांगितले होते की सारासार विवेकबुद्धीला पटणारा निर्णय चर्चेअंती ठरवला जाईल.तरीही कोणालाही हा निर्णय बळजबरीने अंमलात आणण्याची गरज नाही.प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे त्यानुसार ज्याने त्याने निर्णय घ्यावा.आता यात तुमची द्विधा मनःस्थिती होत असेल तर मी सांगितलेल्या मुद्यांमध्ये स्वतःला जरा साचेबद्ध करून पहा आणि योग्य तो निर्णय घ्या.धन्यवाद."असे बोलून कुलकर्णी मॅडम स्थानापन्न झाल्या.

सर्वांनीच टाळांच्या कडकडाटात हा निर्णय पटला असल्याचे समर्थन दिले.