Login

तोंड दाबून मुक्क्यांचा मार - भाग -2

Tond Dabun Maar
भाग - 2


संतोषला मात्र खुप वाईट वाटत असे.
त्याला आईचा आदर वाटत होता, पण तिचं मौन त्याला त्रास देत होतं.


त्या गावात एक समाजसेविका यायची — मीना ताई.
महिलांसाठी प्रशिक्षण शिबिरं, आत्मनिर्भरतेच्या गोष्टी अशी सर्व काम ती करतं असे.
एकदा त्या ताई शांतेच्या घरी गेल्या.


“शांताबाई, तुम्ही इतक्या चांगल्या स्वयंपाकात तरबेज आहात. आमचा महिला सहकारी गट सुरू झालाय, तिथे काम कराल का?”


शांता म्हणाली - ताई, “घरचं पाहायला कोणी नाही गं.. गणपत मान्य करणार नाही.”


मीनाताई म्हणाल्या,
“शांता, नवरा मान्य करणार नाही म्हणून आपण आयुष्यभर असंच सहन करत राहायचं का? मुलांसाठी जगायचं असेल, तर स्वतःसाठी उभं राहावं लागतं.”


त्या रात्री शांता खुप वेळ विचार करत राहिली.

चुलीच्या धुरासोबत तिचे विचारही आकाशात विरले.


दुसऱ्या दिवशी सकाळी तिने गणपतला सांगितलं,
“मी महिला गटात कामाला जाणार आहे.”


गणपतने रागाने डोळे लाल केले,
“तू बाहेर कामाला जाशील? माझं नाव खराब करशील!”


पण या वेळी शांतेच्या आवाजात ठामपणा होता,
“मी घर चालवतेय, मुलांचं पोट भरतेय. आता नावापेक्षा घर महत्वाचं.”


गणपतने डोळ्यात राग आणला, पण शांता आता थरथरत नव्हती. वर्षानुवर्षं गप्प बसल्याचा स्फोट आज तिच्या आवाजात झाला होता.


हळूहळू शांता गटात काम करू लागली.

स्वयंपाकाच्या ऑर्डर्स मिळू लागल्या, पैशाची आवक वाढली.


गणपतला आता तिचं महत्व कळू लागलं.
शेजाऱ्यांच्या तोंडून ऐकू आलं —
“ शांताबाईचं जेवण तर शहरातल्या हॉटेलात जातं म्हणे! अशी वाक्य ऐकून त्याला मनातून आनंद होऊ लागला.


त्याचं दारूचं प्रमाण कमी झालं, आणि पहिल्यांदा त्याने बायकोच्या डोळ्यात पाहून म्हटलं —
“तू योग्य केलंस.”

शांतेच्या डोळ्यांत अश्रू आले — पण ते वेदनेचे नव्हते, स्वाभिमानाचे होते.

आज संतोष इंजिनीअर झालाय, सुषमा शिक्षिका.


गावातल्या महिलांसाठी शांताताई दर आठवड्याला एक वर्ग घेते. ती म्हणते,“बायकांनी फक्त संसार नाही, तर स्वतःचं स्वप्नही सांभाळायला शिकलं पाहिजे.
मार सहन करणं हे प्रेम नाही, ते अन्यायाची शरणागती आहे.

“तोंड दाबून मुक्क्यांचा मार” —
ही म्हण आता शांतेच्या आयुष्यात फक्त भूतकाळ आहे.
आता ती म्हणते —
“तोंड उघडलं की आयुष्य उजाडतं!”


तिच्या आयुष्याने अनेक बायकांना शिकवलं —
की “तोंड दाबून मुक्क्यांचा मार” हा म्हणीपुरता राहू नये.
कधी कधी आवाज उठवणंही आवश्यक असतं.
आवाज म्हणजे ओरडणं नव्हे — स्वतःचं अस्तित्व जपणं.आवाज उठवणं म्हणजे जगाशी भांडण नाही —
तर स्वतःशी मैत्री करणं आहे.


0

🎭 Series Post

View all