Login

तोंड दाबून मुक्क्यांचा मार – भाग-  3 अंतिम भाग

Tond Dabun Maar
तोंड दाबून मुक्क्यांचा मार – भाग-  3 अंतिम भाग


गावात सकाळी दहा वाजता शांताबाई वस्तीत जाऊन तिच्या सहकारी बायकांना हाक मारायची,
“चला बाईनो, गटाचं काम सुरु करायचंय! आज नवीन ऑर्डर आलीये — पाचशे पोळ्यांची!”
त्या आवाजात आत्मविश्वास होता, जिवंतपणा होता, आणि सर्वात महत्वाचं — स्वाभिमान होता.


गेल्या दहा वर्षांत सगळं बदललं होतं.
तीच शांता, जी एकेकाळी चुलीच्या धुरात गप्प जगायची, आता महिलांसाठी आदर्श बनली होती.


गावातल्या “सखी उद्योग” या महिला गटाचं नेतृत्व ती करत होती.


संतोष आता शहरात इंजिनीअर झाला होता.
त्याने स्वतःचं छोटं ऑफिस उघडलं होतं, पण प्रत्येक सुट्टीला तो गावात यायचा.


सुषमा गावात शिक्षिका झाली होती.
ती शाळेतल्या मुलींना सांगायची —
“वाचा, शिका, आणि कुणाच्या भीतीनं तुमचं आयुष्य दडपून टाकू नका.”


मुली तिच्याकडे पाहून म्हणायच्या, “सुषमा मॅडम, आम्हालाही शांताताईसारखं व्हायचंय!”
ते ऐकून शांतेच्या डोळ्यांत समाधान यायचं.


गावातल्या बायकांनी आता कामावर जाणं सुरु केलं होतं.
कोणीतरी पापड बनवायचं, कोणीतरी साडीवर भरतकाम करायचं, कोणीतरी शाळेच्या कँटीनमध्ये काम.


शांताताई म्हणायची —
“घर चालवणं आणि घर वाचवणं, यात फरक आहे. आता आपण दोन्ही शिकतोय.”


पण सर्वांना हा बदल पचला नव्हता.

काही पुरुषांचा गट नेहमी म्हणायचा,
“आता बायका हातातून सुटतायत. घर, स्वयंपाक, मुलं — हे सगळं विसरल्या ह्या!”

गावात हळूहळू नव्या विचारांचा आणि जुन्या रुढींचा संघर्ष पेटू लागला.



एक दिवस गावातल्या ग्रामसभेत चर्चा होती —
“महिला गटासाठी सरकारी निधी वाढवावा.”


शांताताई उभी राहून म्हणाली,
“आम्ही नुसतं स्वयंपाक करत नाही, तर समाजासाठी काम पण करतोय. विधवा स्त्रियांना काम, शिक्षण, आणि सन्मान देतोय. निधी वाढला पाहिजे.”


पण काहीजणांना हे पटलं नाही.
त्यांनी उघडपणे विरोध केला.
“शांताबाई, तुम्ही जास्त पुढं जाताय. बायकांनी घरातच चूल सांभाळावी, समाज नाही.”


शांता काही क्षण. शांत राहिली, नंतर म्हणाली —
“चूल मीही सांभाळली, समाजही सांभाळतेय. दोन्ही गोष्टी शिकल्या म्हणूनच माझ्या पोरांनी आज उंची गाठली आहे.

जर स्त्रिया समाजात बोलल्या, तर घर मोडत नाही... घराचं भविष्य मजबूत होतं.”


गावभर तिच्या या वाक्याची चर्चा झाली.

त्याच वर्षी सुषमाने महिला शिक्षण केंद्र सुरू केलं.
गावोगावी जाऊन ती मुलींना शिकवू लागली —
केवळ गणित नव्हे, तर आत्मसन्मानाचं महत्त्व.


पण जीवन नेहमी सहज नसतं.


एके दिवशी बचतगटाच्या पैशातल्या हिशेबावरून वाद झाला.
काहींनी शांतेवर आरोप लावला —
“तुम्ही निधीतून काही पैसे स्वतःसाठी ठेवलेत!”


शांतेला धक्का बसला. तिने आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केलं होतं.पण आरोप करणारे तिचेच ओळखीचे लोक होते.


रात्रभर ती झोपली नाही.
तिच्या मनात पुन्हा तोच प्रश्न —
“मी नेहमी प्रामाणिक राहिले... तरी मला संशयाचं ओझं का?”

पण यावेळी ती गप्प राहिली नाही.

दुसऱ्या दिवशी तिने सर्व हिशोब ग्रामसभेसमोर सादर केला.
शेकडो महिलांच्या उपस्थितीत तिने शांतपणे सांगितलं —
“माझ्यावर आरोप करणाऱ्यांना दोष नाही, कारण समाज अजूनही स्त्रीच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवायला तयार नाही.
पण माझ्या सत्याला आवाज द्यायलाच हवा.”


पुरावे पाहून सर्व शांत झाले.
लोक उठून टाळ्या वाजवू लागले.


ग्रामपंचायतीच्या मुखियाने स्वतः जाहीर केलं —
“शांताबाईंचं नाव आता ‘ग्राम गौरव पुरस्कार’ साठी सुचवलं जावं.”


त्या रात्री शांता घराच्या अंगणात बसली होती.
संतोष तिच्याजवळ आला आणी म्हणाला,
“आई, आज मला वाटतं तू माझी नाही — सगळ्या गावाची आई झालीस.”


शांता हसली, आणि म्हणाली,
“नाही बाळा… मी फक्त माझा आवाज ओळखला.


पूर्वी गप्प राहणं माझं सामर्थ्य वाटायचं, पण आता मला कळलं —
सत्य बोलणं हेच खरं सामर्थ्य आहे.”


ती हळूच आकाशाकडे पाहत म्हणाली —
“किती वेळा तोंड दाबून मुक्क्यांचा मार सहन केला मी…
पण आज त्या प्रत्येक घावाने मला मजबूत बनवलं आहे.”


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0

🎭 Series Post

View all