तोंडावर गोड आणि माघारी...४(अंतिम भाग)

कथा मालिका
दुजाभाव ४

दोन तीन दिवसांनी अजित काय निर्णय घेतो. पाहुय पुढच्या भागात....


"आई -बाबा, दादा -वहिनी आणि ताईचे बोलणे ऐकून अजितचे डोके फिरले होते. आपली बायको आणि मुलगी यांना एवढा त्रास असतांनाही प्रेरणाने तोंडातून कधीच एक चिक्कार शब्द काढला नाही.
रात्रभर त्याला नको नको ते विचार येत होते. आपण फक्त ऐकून एवढे शाॅक मध्ये आहोत. रोज या दोघींना काय काय झेलायला लागत असेल काय माहिती?'

विचार करून करून तो थकून गेला. केव्हा झोप लागली ते कळलेच नाही.

सकाळी जाग आली ते सईच्या रडण्याने.

" सई शांत हो ना बाळा. किती हट्टी झाली आहे ग हल्ली."

प्रेरणा तिला समजावू लागली.

"काय झालं प्रेरणा?" अजित

"अरे, काही नाही. तुझ्या छकुलीला फुगा हवा होता. पण ही पोर काही देईना. तू काळजी करू नको. मी तिला बाजुच्या दुकानातून आणून देते."
असे म्हणे पर्यंत सुमनताई सईला घेऊन निघाल्या सुध्दा.

"अरे ! किती हा विरोधाभास. किती हा दुजाभाव."
'आपली आई एक स्त्री असून सुद्धा ती प्रेरणाशी... सईशी.... शी!'

तो घरात जास्त कोणाशी बोलला नाही.‌ पण मनात मात्र खूप खळबळ उडाली होती. आपण वेगळ राहायच. बस ठरल. दोन तीन दिवसातच त्याने दोन रुमचे घर‌ शोधले. एके दिवशी सकाळी त्याने चहाच्या वेळी आई बाबांना सांगितले. दादा वहिनी आणि ताई तुम्हाला सुध्दा सांगतोय.

"आई बाबा मी वेगळ राहायच ठरवल आहे आणि दोन दिवसातच आम्ही राहायला जाणार आहोत."

"काय ! वेगळ आणि ते कशासाठी?" सुमनताई

"अहो, काय बोलताय तुम्ही ? आपण वेगळ व्हायच. कशासाठी? मला नाही पटत आहे." प्रेरणा

"वा ! ग वा ! म्हणे मला पटत नाही. तुच सांगितले असशील. आता माझ्या पोराला माझ्यापासून दूर नेते का?"

"अजित काय झाले? तू असा अचानक निर्णय घेणाऱ्यातला नाही. काहीतरी सलतय तुझ्या मनात. बोलून मोकळा हो." नारायणराव

" बाबा मला जास्त काहीच बोलायचे नाही. माझा निर्णय झालाय."

"अजित हा कसला निर्णय." अजितचा मोठा भाऊ अनिल मध्येच बोलला.

"हे बघ दादा. मी कोणाला बोलत नाही. पण जे सत्य मी ऐकलं आणि स्वतः च्या डोळ्यांनी अनुभवल ते मी नाकारू शकत नाही."

"अहो, पण वेगळ होण्याची काय गरज? आपण सगळ्यांसोबत आनंदात आहोत ना."

"तू आत्ता काहीच बोलू नको. माझा निर्णय झाला म्हणजे झाला."

अजितच्या या ठाम निर्णयामुळे सगळेच बिथरले. पण तो कोणाचेच ऐकून घ्यायला तयार नव्हता. तो सामान बांधण्यात गुंग झाला.

"अहो, आपण वेगळ राहण्याचा का अट्टाहास करत आहात. या वयात आईबाबांना कामे झेपत नाही. शिवाय दादा वहिनी येथे नसतात." प्रेरणा

"हे बघ तू माझ्यासोबत यायच. बाकी मला काही माहित नाही."

इकडे सुमनताईंच्या मनात भिती निर्माण झाली.

"अहो, प्रेरणा गेल्यानंतर घरातली कामे कोण करणार ? कशीही असली तरी माझी सून आहे ती. निदान उलट उत्तर तरी द्यायची नाही. जे सांगेल ते करायची. पण आता..." सुमनताई

" अग मला तर वेगळीच भिती वाटत आहे. आता घर खर्चाचे काय? आपलं औषध पाणी सगळ काही तो बघायचा. प्रत्येक वेळी दोघेही सोबत यायचे. आपल्या तब्येतीची ते खूप काळजी घेतात. एक सांगू सुमन याला तुच जबाबदार आहे."

"मी कशी जबाबदार? "

"प्रेरणाच्या रंगामुळे तू नाराज होती. सईचा जन्म झाल्यापासून तू तिचाही राग करतच आहे."

तेवढ्यात अजित बाहेर आला.

"काय चर्चा चालली आहे. आई बाबा तुम्ही कसलीच काळजी करू नका. मी घरकामाला बाई लावणार आहे. उद्यापासून ती येणार. तिच्या कडून सर्व कामे करू‌न घेत जा आणि बाबा घरखर्च म्हणाल तर मी तो देणारच. कारण माझ कर्तव्य मी पार पाडणार. दर रविवारी आम्ही तिघेही येथे येणार. आपण एकत्र मजा करून रात्री परत जाणार."

"पण दादा.."
थांब अनिता...

"अहो भाऊजी.... "

नाही वहिनी. आज मी कोणाचेच ऐकणार नाही.

मुलाच्या या निर्णयामुळे सुमनताईंच्या डोळ्यात अश्रू आले.

"आई आता रडून काय उपयोग? प्रेरणा आणि सईचा राग करतांना, त्यांना वाईट साईट बोलताना तुम्हाला काहीच वाटल नाही."

"पण मी केव्हा बोलले."

"हो आम्ही कोणीच बोलत नाही त्या दोघींना."
अनिता

"अरे किती खोटं बोलणार तुम्ही सगळे. त्या दिवशी रात्री मी माझ्या कानांनी सगळ ऐकल आहे आणि म्हणूनच मी बोलतोय."

सगळे विचारात पडले.

"आम्ही आलो तेव्हा तू घरी होतास"

"हो आई, तुम्ही घरून निघताना पासून तुम्ही घरी आल्यानंतर काय काय बोलला. हे सगळ ऐकल आहे."

"आई, मी फक्त ऐकून मला धक्काच बसला. पण प्रेरणा आणि माझी निरागस सई यांना काय वाटतं असेल? "

सगळेजण खाली मान घालून उभे होते.

"चल प्रेरणा. आपण आपल नवीन आयुष्य सुरू करू. सईला तिच्या रंगावरून जर कोणी बोलत असतील तर अशा रंगहीन असलेल्या लोकांमध्ये मला राहायचेच नाही. ज्यांना काळा रंग त्यांच्या आयुष्यात नकोच आहे. ज्यांच्या दृष्टीने सईचा रंग काळ्या मांजरी प्रमाणे आहे. तो बोलताना गहिवरला होता. त्यांचे ह्दय दुःखाने विव्हळत होते.
मला माहित नव्हते की आपल सुशिक्षित घर आणि विचार मात्र अशिक्षित आणि असंस्कृत. वहिनी आणि ताईंच्या मुलांसोबत वेगळे वागणे आणि सईसोबत मात्र वेगळे. हा एवढा दुजाभाव ! कशासाठी? म्हणूनच मला .....

"थांब अजित. या वयात आम्हाला असं सोडून जाणार का तू? आम्ही खरच चुकलो रे." नारायणराव

"बाबा तुम्ही या घरातील कर्ता पुरुष. तुम्ही इतके कठोर वागाल अस कधी वाटलेच नाही."

संपूर्ण घरात शांतता पसरली होती. तेवढ्यात सई
रडत घरात आली.

"आजी माझा फुगा फुटला. मला नवीन फुगा दे ना." सई आजीकडे धावत गेली.

नातीचा आवाज ऐकताच आजीच्या मनावर खोल परिणाम झाला. आजीने लगेचच तिला कडेवर उचलून तिचे खूप मुके घेतले. निरागस सई कडे बघून सगळ्यांचे मन बिथरले.

"तू रडू नकोस बाळा. मी तुला नवीन फुगा आणून देईल ह."

"अजित आम्हाला माफ कर. प्लीज... तू आमचे डोळे उघडले. आम्ही खरच रंगहीन झालो होतो. पण यापुढे हा दुजाभाव होणार नाही. आपल एकत्र कुटुंब , प्रेम हे असच कायम राहो." नारायणराव

दुसऱ्याच दिवशी सकाळी अजितने काही सामान खोलीच्या बाहेर काढले.
"प्रेरणा चल बॅग घे तुझी आणि सईची"

"बाबा, आपण कुठे चाललो?"

"आपण नवीन घरी राहायला चाललो. तू मी, आणि आई."

"आपण तिघेच फक्त."

"आजी, आजोबा ,आत्या ,काकू नाही का येणार आपल्या सोबत."

"नाही."

पण सई जोरजोरात रडायला लागली. तिला एकटीला जायचे नव्हते. सगळेजण तिच्या भोवती जमले. आजी तुझी पण बॅग भर.आपण नवीन घरी जाऊ.

हे दृश्य बघून सगळ्यांचे मन हेलावले.

"सई रडू नकोस. आपण कुठेच जाणार नाही. आपण सगळे इथेच राहून या एकत्र. मग तर झाल." अजित.

सईने डोळे पुसले आणि टाळ्या वाजवून उड्य मारत खेळायला गेली. सईमुळे अजितने सगळ्यांना माफ केले.

"बघीतले आई ,बाबा. सई तुमच्यावर किती प्रेम आहे."

आम्हाला खरच माफ कर. अशी चुक परत होणार नाही आम्हा कोणाच कडून. मी वचन देते." सुमनताई.


©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all