तोंडावर गोड आणि माघारी.....१

कथा मालिका
दुजाभाव १

"अहो, मी एक निर्णय घेतला आहे."

"कोणता निर्णय?"

"पुढच्या वर्षी मी सईला माझ्या माहेरी शिकायला पाठवणार?"

"का?" अजित ताडकन उठून उभा राहिला.

"प्रेरणा, तू असा कसा निर्णय घेऊ शकते. अग ती किती लहान आहे. तिच बालपण आपण घडवणार आहे ना? आपणही परत एकदा आपल लहानपण अनुभवत आहोत. हे लक्षात येतय का तुझ्या ?"

" तिच बालपण. हं..... आणि हो मला सगळ कळतय. पण तरीही मी माझा निर्णय बदलणार नाही."

"सई तयार होईल पण? शिवाय आई बाबांचे काय? त्यांना सई शिवाय एक मिनीट सुध्दा करमत नाही. तू असा एकटीने निर्णय घेऊ शकत नाही."

"अस फक्त तुम्हाला वाटत. प्रश्न आहे सईचा. तर सईला मी समजावेल आणि शनिवार रविवारी मी जात जाईल घरी. तसेही त्यांना सई बद्दल काहीही वाटत नाही. ना त्यांचे सईवर प्रेम आहे. ना कोणी तिचा लाड करत?"

"काय वाट्टेल ते बोलू नकोस. तू सरळ सरळ माझ्या आईबाबांवर आरोप करत आहे."

"मी अस का करेल? जे मला दिसतय तेच बोलतेय."

"प्रेरणा, तुझ अति झाल आता बस आता. माझ्या डोक्यात जाऊ नकोस तू." अजितचा आवाज वाढला होता.

"अहो, माझ एकदा शांततेने ऐका तरी."

"शांतता मला ठेवायला सांगते. एकतर बाहेर किती दिवसांनी दादा वहिनी आणि ताई आणि तिची मुले सुद्धा आली आहेत आणि त्यात तू काहीतरी बरळू नकोस."

"बर ठीक आहे साॅरी. चुकले मी." प्रेरणाने विषय तिथेच संपवला. दोघांचा आत चाललेला गोंधळ ऐकून सगळेच हाॅल मध्ये आले.

पण अजितला मात्र भयानक राग आला होता. तो कोणाशीही न बोलता बाहेर निघून गेला. प्रेरणाच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. यांना कस सांगू? कसं पटवून देऊ. ती सुद्धा बाहेर आली . तर सगळेच तिच्या कडे आश्चर्याने बघू लागले.

"काय झाल प्रेरणा? कशावरून वादावादी चालू होती तुमच्या दोघांत? "सुमनताईंनी विचारले.

"नाही, काही नाही." असे म्हणत ती स्वयंपाक घरात निघून गेली.

"दोघांमध्ये चांगलेच वाजले वाटत." मोठी जाऊ शलाका बोलली.

"जाऊ दे लक्ष नको देऊ. या रे लेकारांनो खाऊ खाणार का?" सुमनताई

खाऊचे नाव ऐकताच शलाका चे दोन मुले, नणंदेची दोन मुले आणि छोटी सई सुमनताईंकडे आले. सुमनताईंनी स्वतः च्या लोखंडी पेटीतून काही खाण्याच्या वस्तू बाहेर काढल्या. स्वयंपाक घरातून प्रेरणाचे सगळ लक्ष होतेच. तिने आता मोबाईलमध्ये व्हिडिओ घेण्यासाठी सुरूवात केली. सई सगळ्यात लहान म्हणून पटकन सुमनताईंच्या मांडीवर जाऊन बसली.

"आजी मला पण दे ना खाऊ." सई

सुमनताईंनी बघून न बघीतल्यासारखे केले. तिने समोर केलेल्या हातावर त्यांनी एक चापट मारली आणि तिला पटकन मांडीवर खाली उतरवले. ती रडायला लागली. पण आजीच्या हातात खाऊ दिसताच तिने डोळे पुसले. सुमन ताईंनी एका मांडीवर नणंदेच्या मुलाला आणि एका मांडीवर जावेच्या मुलीला घेतले. सगळ्यांच्या हातावर त्यांनी बदाम,काजू, खडीसाखर ठेवली. पण सईच्या चिमुकल्या हातावर फक्त खडीसाखरेचे दोन दाणे टिकवले. सई आता संपला खाऊ तुला उद्या देते हं....

तेवढ्या दोन दाण्यानेही सई खूप खूश झाली. सई च्या निरागस बालपणाला मायेची झालर लावली तर नवलच. हा सगळा प्रसंग प्रेरणाने मोबाईलमध्ये शूट केला. पण सध्या शांत राहून सईच्या बाबतीत अजून काही घडते का हे बघू लागली.

इकडे अजितमात्र बराच नाराज झाला होता. तो प्रेरणा सोबत नीट बोलत सुध्दा नव्हता. पण प्रेरणाही आता हट्टाला पेटली. सासुसासऱ्यांचे आणि नणंद , जावेचे वागणे मोबाईलमध्ये शूट करून अजितला दाखवायचे आणि त्याचे डोळे उघडायचेच. हे निश्चित. कारण स्वतः च्या मुलाच्या नजरेत ते दोघेही खूप चांगले वागत होते

सगळ्यांचे वाईट वागणे उघडकीस येईल का?
पाहुया पुढच्या भागात...

©® अश्विनी मिश्रीकोटकर






🎭 Series Post

View all