Login

तूच माझं जग.‌..(भाग १)

कथा मालिका
तूच माझं जग...१

व्हॅलेंटाईन डे च्या पुर्व संध्येला ती त्याला भेटायला निघाली होती. अगदी पहिल्यांदाच त्याच्या  सांगण्यावरून तिने शाॅट स्कर्ट, त्यावर सिल्व्हलेस टाॅप आणि त्यावर जॅकेट घातले होते. हाय हिल्स घालून, लांबसडक काळेभोर केस मोकळे सोडले होते. ओठांवर लालचुटुक लिपस्टीक लावून हलकासा मेकअप करून ती तयार झाली होती. ‌

"ए, सांगा ना मी कशी दिसते ?शर्वरी

"एकदम ब्यूटीफूल यार. तो तर एकदम लट्टू होऊन जाईल." प्रिया

"ए एक मिनीट थांब. एक काम राहिलच." साक्षी

"आता काय ग. तो माझी तिकडे वाट बघत असेल."शर्वरी

"बघू दे ग जरा वाट. 'इंतजार का फल मिठा होता है।"प्रिया

साक्षीने लगेच एक मस्त परफ्यूम आणले आणि तिच्या कपड्यांवर मारले. "हं आता जा आणि दोघेही प्रेमात आकंठ बुडून जा."

"ओय होय, हमारी सहेली तो आज झुम उठेगी।" प्रिया

शर्वरी लाजली आणि निघाली‌.

"ए चला मी निघते. बाय..."

"ए शर्वरी , पण हे सगळं तुला कबीरनेच दिले ना ?  म्हणजे हे कपडे, सॅंन्डल... वगैरे आणि ..ए तू खरोखरच त्या कबीरच्या प्रेमात...."

"नाही ग साक्षी. तो फक्त माझा चांगला...."

"साक्षी, अग थांब  तुला किती प्रश्न पडतात?" प्रिया

"शर्वरी तू कशी जाणार आहे? आज रिक्षानेच जा. उगाचच बसमध्ये धक्के खात जाऊ नकोस. सगळा मेकअप खराब होऊन जाईल तुझा." साक्षी

शर्वरी वीस एकवीस वर्षाची. तारूण्याच्या उंबरठ्यावर ती प्रेमात पडली होती.  प्रेमही असे की फक्त आकर्षण होते की खरे काहीच कळत नव्हते. वेगवेगळे गिफ्ट्स तिला मिळत होते, त्याच्या  सोबत गोड गोड बोलणे तिला आवडायचे. त्याचा स्पर्श, त्याचे हातात हात  घेणे, हलके हलके केसात  हात फिरवणे. तिला सगळ आवडायचे.

एका मध्यमवर्गीय कुटुंबात शर्वरीचा  जन्म झाला. जेव्हा पासून समजायला लागले. तेव्हा पासून घरच्या परिस्थितीची जाणीव व्हायला लागली. रखमा तिची आई चारघरची धुणीभांडी करून परत पोळ्या करायला जायची आणि वडील शंकर एका कारखान्यात रखवालदारीचे काम करत होते. शर्वरीला एक लहान भाऊ समीर आणि एक  बहीण काजल होती. तिघांनाही आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे तिघेही मन लावून अभ्यास करत होते.

शर्वरीने बारावी उत्तीर्ण केली. पण त्यानंतरचे शिक्षण शहरातल्या चांगल्या महाविद्यालयात घेणे गरजेचे होते. तिला कम्प्युटरवर सायन्समध्ये डिप्लोमा करायचा होता.‌ बारावीला सत्तर टक्के मार्क मिळवून तिला सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता आणि तिथल्याच  वसतीगृहात राहणार होती. त्यामुळे त्या दृष्टीने तिने तयारी सुरू केली होती. त्यासाठी तिच्या शिक्षकांनी तिला बरीच मदत केली. तिच्या आई वडीलांनी स्वतः थोडीफार उसनवारी करून पैसा गोळा केला. तिच्यासाठी दोन जोड्या कपडे विकत घेतले आणि ज्या ठिकाणी रखमा  काम करते त्या ठिकाणी  काही कपडे मागितले. एक  साधारण बॅग काढून तिला दिली. दोघांनी स्वतः जाऊन तिला प्रवेश  घेण्यासाठी मदत केली होती. 

आपली मुलगी शिकून आपलं नाव मोठे करणार ही भावना, हा उत्साह, आनंद रखमा आणि शंकरला स्वस्थ बसू देत नव्हता. एक वेळ पोटाला चिमटा देऊ पण आपल्या तिन्ही मुलांना शिकावायचेच. असा निर्धार केला होता. समीर सुध्दा दहावीला गेला होता आणि काजल नववीत. शर्वरी प्रमाणे दोघांनाही ते शहरातील सरकारी महाविद्यालयात शिकवणार होते. सध्यातरी त्यांनी शर्वरी वर फोकस केले होते.

काळजावर दगड ठेवून त्यांनी तिला वसतीगृहात सोडले आणि आपल्या गावी परतले. आठ पंधरा दिवसांनी भेटायला येऊ असे सांगितले. शहर फार दूर नसले तरी जायला यायला  दोनशे रुपये लागत होते. परिस्थितीच्या ओढाताणीने त्यांना फारसे जाणे जमत नव्हते.

इकडे शर्वरीच्या एका नवीन आयुष्याची सुरुवात झाली होती. सगळ काही नवीन. शहराची हवा काय असते ते फक्त ऐकून होती. आता तर प्रत्यक्षात ती बघत होती.
एवढा मोठा परिसर ती पहिल्यांदाच बघत होती. मुले मुली एकत्रच असायची.  कोणालाही काहीही संकोच वाटत नव्हता. तिला महाविद्यालयातूनच  नवीन पोशाख मिळाला होता. ओळखपत्र मिळाले होते. तिला हे जग म्हणजे एक मायानगरी प्रमाणे भासत होते. सगळ कस मुक्त. कोणी कुठेही बसा, बेंच साठी भांडण नाही, की कोणाशी बोलण्यासाठी रुसवे फुगवे नाही. सगळ कस मनमौजी. अशातच तिची ओळख प्रिया आणि साक्षी सोबत झाली. त्या दोघीही रुममेट झाल्याचं होत्या. आता एकाच वर्गात सोबतच होत्या.
सुरूवातीला अबोल असणारी, शांत बसणारी, मन लावून अभ्यास करणारी शर्वरी आता बरीच मोकळी झाली होती. पण मुलांसोबत बोलायला तिला अजुनही भिती वाटत. वसतीगृहात काही मैत्रिणींकडे फोन असल्याने ती तिच्या आई वडीलांना फोन लावायची.  घरी बोलणे होत असल्याने तिला छान वाटायचे. सुरूवातीला तिला एकटीला राहायची भिती वाटत होती. तिला सतत  घरच्यांची आठवण येत होती. शर्वरीला अजुनही शहरातल्या वातावरणाशी जुळवून घ्यायच होते. पण हळुहळू ती रुळायला लागली. त्यातच कबीर नावाच्या एका मुलांसोबत ओळख झाली. शर्वरी मुळातच हुशार त्यामुळे ती हुशार विद्यार्थ्यांमध्ये ओळखली जाऊ लागली. तसाच कबीरही होता. कबीरचा एक वेगळाच ग्रुप होता. तो शर्वरीच्या  एक वर्षं समोर होता.

शर्वरी, गालातल्या गालात हसत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी......

तिच्या मैत्रिणी तिला झोपेतून जागे करतात.

"शर्वरी, काय झाले? अशी का हसतेय? काही स्वप्न बघत आहे का?"

"काही नाही ग."
शर्वरी अचानक  लाजली. पण लगेच स्वतः ला सावरले.

शर्वरी आणि कबीरच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होते का पाहू....

© अश्विनी मिश्रीकोटकर
प्रेमकथा
अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५


🎭 Series Post

View all