Login

तूच माझं जग...(अंतिम भाग...५)

कथा मालिका
तूच माझं जग...५


शर्वरी हळूहळू शुद्धीवर येऊ लागली. तिच्या मेंदूला झालेल्या जखमा गंभीर नव्हत्या, पण तिला थोडा गोंधळल्यासारखं वाटत होतं. तिने डोळे उघडले,...

पाहुया पुढे...


तर समोर कबीर उभा होता—त्याच्या डोळ्यांत काळजी, भीती आणि प्रेमाचं मिश्रण होतं.

"कबीर..." तिच्या ओठांतून अस्पष्ट आवाज आला.

"शर्वरी, तू बरी आहेस. काळजी करू नकोस. मी आहे ना!" तो तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला.

शंकर आणि रखमा सुध्दा तिला भेटतात. कबीरच्या डोळ्यात तिच्या विषयी असलेली, काळजी, प्रेम , विश्वास दिसत होता. आपल्या मुलीची निवड चुकीची नाही. हे त्यांना कळून चुकले.

पोलिसांना एका सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एक महत्त्वाचा पुरावा सापडतो. त्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं की, शर्वरी ज्या ठिकाणी उभी होती, तिथे एक गाडी तिच्यावर वेगाने धावून आली आणि अचानक तिच्या अंगावर येऊन तिला धडक दिली. गाडीचा नंबर स्पष्ट नव्हता, पण पोलिसांनी वेगवेगळ्या रस्त्यावरील फुटेज तपासल्यावर त्यांना धक्कादायक सत्य समजलं—ती गाडी रियाची होती.

जेव्हा पोलिसांनी कबीरला सांगितलं की रियानेच शर्वरीला उडवलं, तेव्हा त्याचा संताप अनावर झाला.

"रिया...! हिने हे केलं? पण का? ती इथे कधी आली आणि कशासाठी?"

दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी रियाला ताब्यात घेतलं. तिला विचारल्यावर सुरुवातीला ती काहीही कबूल करायला तयार नव्हती, पण जेव्हा पोलिसांनी पुरावे दाखवले, तेव्हा शेवटी तिने कबुली दिली.

"हो! मीच केलं! कारण मला कबीरला परत मिळवायचं होतं. पण त्याच लक्ष तुझ्याकडे होतं, शर्वरी! त्यामुळे तुला दूर करण्यासाठी मी हा अपघात घडवला."

"इन्स्पेक्टर साहेब , रियाला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे."

"नको, कबीर.  मला तिच्या विषयी तक्रार नाही. तू सोड तिला. तिचे आयुष्य मला बिघडवायचे नाही."

पोलिस रियाला  सक्त ताकीद देऊन सोडून देतात‌.

"रिया तू माझ्या आयुष्यातून केव्हाच निघून गेली आहे. आता माझा आणि तुझा काहीच संबंध नाही. तेव्हा चुकूनही परत आमच्या आयुष्यात डोकावू नकोस."

रिया खाली मान घालून निघून जाते. शर्वरीला जेव्हा या सगळ्याचा उलगडा झाला, तेव्हा ती हादरली. पण या प्रसंगाने कबीरच्या प्रेमाची भावना  तिला समजली.
पंधरा वीस  दिवसांत शर्वरी पूर्णपणे बरी झाली. कबीरने तिच्या स्वप्नांना कशी साथ दिली. तिचा कसा आधार बनला, त्याने तिला शिष्यवृत्ती मिळवून देण्यात कशी  मदत केली. हे सगळं सांगितलं. शर्वरीच्या आई-वडिलांनाही कळून चुकलं की, कबीरच आपला योग्य जावई आहे. योग्य  जोडीदार आहे. आपल्या नंतर तिला 'हक्काचे प्रेम' कबीरच देऊ शकतो. 

शेवटी  शंकर आणि रखमाने त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर लग्न करू असे ठरवले.

"कबीर, आधी तुझ्या घरी...."

"काका, काळजी करू नका. मी बोलतो घरी."

परंतु कबीरच्या घरीही काही समस्या होत्या. त्याचे आई-वडील  विलासराव आणि आई  रागिणी परंपरावादी विचारसरणीचे होते. त्यांना असं वाटत होतं की त्याने आपल्या जाती-धर्मातील मुलीशीच लग्न करावं. कबीर आणि शर्वरीच्या कुटुंबांमध्ये सांस्कृतिक , आर्थिक आणि सामाजिक अंतर होतं. त्यामुळे हे नातं स्वीकारणं सोपं नव्हतं.

"आई- बाबा, माझे शर्वरीवर मनापासून प्रेम आहे आणि या प्रेमाला मी न्याय देणार आहे."

"अरे, कबीर आपली प्रतिष्ठा, माझे पद बघ. आपली समाजात वेगळी ओळख आहे. आपली एवढी मोठी संपत्ती आहे. एवढे मोठे कारखाने आहेत. बहुतेक ती शर्वरीला त्याचीच भुरळ पडली असावी."

"अरे, आधीच त्या रिया प्रकरणातून नीट  सावरला  देखील नाही आणि आता ही शर्वरी....."

"आई , मध्यंतरीच्या काळात जो काही बिझीनेस मध्ये जे नुकसान झाले होते, आपल्या जवळ काहीच शिल्लक नव्हते ना. तुम्हाला  तुमच्या मित्रांनी फसवले. या सगळ्या प्रकारात ती रिया घाबरली.  खरंतर ती या श्रीमंतीला भाळली होती. म्हणून सतत माझ्या मागेपुढे करत होती. पण आपल्यावर आलेले संकट बघून तिने मला दूर केले. आता रिया माझ्या आयुष्यातून दूर निघून गेली आहे. शर्वरीने जरी तिला माफ केले असले. तरीही मी तिला कधीच माफ करणार नाही. आई, शर्वरी तशी मुलगी नाही. ती स्वभावाने खूप गरीब आहे. तिला परिस्थितीची जाणीव आहे. प्रेम, आपुलकी जिव्हाळा तिच्या नसानसात भिनला आहे. ती खूप गरीब असली तरी सुद्धा गरीबीची तिला लाज नाही. कष्टाचे चीज करणारी मुलगी आहे. "

"पण  कबीर. हा समाज काय म्हणेल?

"आई, समाजाच्या भितीमुळे मी माझे जगणेच सोडून देऊ काय? एवढं सगळ ऐकूनही माझा  निर्णय  तुम्हाला मान्य नसेल तर मी हे घर सोडून देतो."

"नाही कबीर. तू आमचा एकुलता एक मुलगा आहे आणि तुझ्या आनंदासाठी आम्ही शर्वरीला स्विकारायला तयार आहोत. तुमचे शिक्षण पुर्ण होताच आपण लग्नाची बोलणी करू या." विलासराव

"आई... बाबा. लव्ह यू ."

या वेळी कबीरचे प्रेम जिंकले होते. त्याने ही बातमी  शर्वरीला सांगितली. शर्वरी कबीरच्या घरी गेली. विलासराव आणि रागिणीताईंचा आशीर्वाद घेतला.

आता मात्र कबीर आणि शर्वरीच्या नात्याला एक नवीन नाव मिळाले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हक्काने शर्वरी कबीरला भेटायला गेली. तेव्हाची शर्वरी आणि आताची शर्वरीमध्ये खूप बदल झाला होता.
त्यामुळे येणाऱ्या व्हॅलेंटाईन डे च्या आदल्या दिवशी ती कबीरला हक्काने भेटायला गेली. तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली.

गुलाबी साडी नेसलेली शर्वरी... ओठांवर गुलाबी लिपस्टीक, तिचे भुरभुर उडणारे केस बघताच  "शर्वरी तू खूप सुंदर दिसत आहे."
शर्वरीच्या डोळ्यात प्रेमाची भावना दिसत होती. चेहऱ्यावर लाजरे हास्य आणि समाधान दिसत होते.

"कबीर," शर्वरीने हळूच त्याचा हात धरला. "आजपर्यंत तू माझ्यासाठी जे काही केलंस, त्याबद्दल मला तुला काही सांगायचंय."

"सांग ना," कबीर तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला.

"मी तुला खरंच मनापासून प्रेम करते. तुझ्या सहवासात मला सुरक्षित वाटतं. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुझी साथ हवी आहे."

कबीर हलकेच हसला. "शर्वरी, हे तर मला आधीच माहिती होतं. पण तोंडून ऐकायची मजा काही औरच आहे."

शर्वरी हसली. "मी तुला एक गिफ्ट आणलंय."

"असं का? मला तर तुझ्याशिवाय दुसरं काहीच गिफ्ट  नकोच आहे."

शर्वरीने एक लहानसं बॉक्स काढलं आणि त्याच्यासमोर उघडलं. त्यात एक साधं, पण सुंदर ब्रेसलेट होतं, ज्यावर "साथ जिवलगाची" असं कोरलेलं होतं.

कबीरने ते गहिवरून स्वीकारलं आणि शर्वरीला मिठीत घेतलं. "तू माझ्यासाठी जगातील सर्वात मोठं गिफ्ट आहेस. तुच माझं जग आहे."

त्या संध्याकाळी दोघंही समुद्रकिनारी फिरायला गेले, हसत-खेळत, भविष्याचे सुंदर स्वप्न रंगवत. त्यांच्या प्रेमाला आता फक्त वेळ आणि सोबत मिळायची होती.

"हक्काचे प्रेम" अशा एका नव्या प्रवासाला निघाले होते.

©® अश्विनी मिश्रीकोटकर
प्रेमकथा
अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५

🎭 Series Post

View all