Login

अस्तित्वाचा शोध भाग अंतिम

काय असेल मिराच्या कथेचा शेवट?


पूर्वसूत्र: मीरा मावशीला पुण्याला येशील का विचारते. मावशी आणि ती पुण्याला येतात. दोघींचीही आयुष्यं सुरळीत चालू होती. एक दिवस त्या दोघी सकाळी फिरायला गेलेल्या असताना एक बाळ रस्त्यावर सोडून दिलेलं सापडतं. त्या दोघी पोलिसांना कळवतात, पण त्याच्या आईबाबांचा शोध लागत नाही.

भाग 7

आज मीरा आणि मावशी दोघीही गडबडीत होत्या. त्यांना मिराच्या मुलीच्या, म्हणजेच सायलीच्या शाळेत जायचं होतं. आज शाळेत घेतल्या जाणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेत सायलीने भाग घेतला होता. पण ती कशावर बोलणार होती हे मात्र कोडंच होतं.

दोघीही अगदी वेळेत शाळेत पोचतात. सायलीच्या आधी पाच सहा मुलांची भाषणं झाली. त्यांनंतर सायली उभी राहिली. "आज आम्हाला कुठल्यातरी थोर व्यक्तीबद्दल बोलायचं होतं. मी माझ्या आईबद्दल बोलणार आहे. तुम्हाला सगळ्यांना कदाचित आश्चर्य वाटेल, की मी एखाद्या थोर पुरुषाबद्दल न बोलता, माझ्या आईबद्दल का  बोलतेय. पण माझ्या दृष्टीने आईच खूप थोर आहे.

काही वर्षांपूर्वी माझी आई आणि आजी जेव्हा फिरायला गेल्या होत्या. त्यांना एक लहान बाळ रस्त्यावर सापडलं. त्यांनी त्या बाळाच्या आईबाबांचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला. पण जणूकाही ते गायबच झाले होते. मग नियमांप्रमाणे त्या बाळाला ताब्यात घ्यायला अनाथाश्रमाची माणसं आली. पण आईने लहानपणापासून अनाथ होण्याचं दुःख अनुभवलं होतं. अठराव्या वर्षी अनाथाश्रमातुन बाहेर पडल्यावर स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःच्या आईबाबांचा शोध घ्यावा लागला तिला. स्वतःच्या अस्तित्वाचाच शोध घ्यावा लागला, तर काय वेदना होतात हे तिला माहीत होतं. त्यामुळे तिचा निर्णय पक्का होता. तिने त्या बाळाला दत्तक घ्यायचा निर्णय घेतला. आजीने पण तिला पूर्ण साथ दिली. सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या बाळाला घरी घेऊन आल्या.

ते बाळ म्हणजे मीच आहे. काही महिन्यांपूर्वी मी हे सगळं समजून घेऊ शकेन अशी खात्री पटल्यावर आईने मला सगळं खरं सांगून टाकलं. मला माझ्या आईबाबांना शोधायचं असेल तर ती मला सगळी मदत करेल असा विश्वास दिला मला. मी तिला अजून काही उत्तर दिलेलं नाही. पण आज मी सगळ्यांसमोर सांगतीये, आई मला नाही शोधायचं त्यांना. कारण माझं खरं कुटुंब तुम्ही दोघीच आहात. माझं खूप खूप प्रेम आहे तुमच्या दोघींवर."

सायलीचं उत्तर ऐकून दोघींच्याही डोळ्यात पाणी भरलं होतं. तिला सांगितल्यापासून आजपर्यंत सायली काय निर्णय घेईल ह्याचं टेंशन मिराला अस्वस्थ करत होतं.

थोड्याच वेळात बक्षिसं जाहीर झाली. सायलीला पहिलं बक्षीस मिळालं होतं. बक्षीस घेऊन सायली धावतच आईपाशी आली. तिने दोघींनाही घट्ट मिठी मारली. सगळ्या समाजमान्यतांना छेद देणारं ते त्रिकोणी कुटुंब आंनदात न्हाऊन निघालं होतं.
समाप्त

0

🎭 Series Post

View all