Login

अस्तित्वाचा शोध भाग 2

समोर आलेल्या आपल्या इतिहासाला मीरा कशी सामोरी जाईल?
पूर्वसूत्र: मीरा अठरा वर्षांची होणार असल्यामुळे तिला अनाथाश्रम सोडावा लागणार होता. पण तिच्यासमोर कुठे जायचे असा प्रश्न होता. पण अचानक तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला मावशीची चिठ्ठी मिळते आणि तिचा रहायचा प्रश्न सुटतो. 
भाग 2
मिराजवळ थोडे साठवलेले पैसे होते. तिच्या शिक्षणाचा खर्च आश्रमाकडून होणार होता; त्यामुळे सध्यातरी तिला नोकरीची चिंता नव्हती. आता तिला हे घर राहण्यायोग्य करायचं होतं. बरेच वर्षात कोणीच रहात नसल्याने घराला अवकळा आली होती. गेल्या अठरा वर्षांत तिथे कोणाचाही राबता नव्हता. फक्त कोळीष्टक, पाली आणि धुळीचं अनभिषिक्त साम्राज्य संपवायचं म्हणजेच एक लढाई होती तिच्यासाठी.
तिने आजूबाजूला चौकशी करून एका मावशींना कामाला बोलावलं. त्यांच्याबरोबर हळूहळू घर आवरायला सुरवात केली.  सगळ्यात आधी तिने स्वयंपाकघर आणि तिला रहायला खोली आवरून घेतली. माळी काकांच्या मदतीने बाग देखील आकार घेत होती. जसजसे दिवस जात होते तसतसं घराचं वैभव परत येत होतं.
आवरताना तीला का माहीत नाही पण  पहिल्या मजल्यावरची खोली खूप आपलीशी वाटली होती. तिने तिथेच आपलं सामान हलवलं. त्या खोलीत काहीतरी आपलंसं वाटावं असं होतं.  घर लावून झालं की ऍडमिशन आणि नोकरीचा शोध घ्यायचा असं तिने ठरवलं होतं. सध्यातरी कॉलेजमुळे अर्धवेळ नोकरी करावी लागणार होती. पदवी मिळवली की तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. 
एकेदिवशी रात्री अंधारात चालताना तिच्या  हाताला एक खिट्टी लागली. आता जवळजवळ दोन तीन आठवडे झाले होते तिला येऊन. तिची खोली तर व्यवस्थित माहीत झाली होती. पण अशी खिट्टी तर नव्हती कुठे. तिने पटापट दिवे लावले. परत त्याच जागेवर आली. पण तिथे तर काहीच दिसत नव्हते. असं कसं शक्य आहे? तिला नक्की लागली होती हाताला ती. तिने  काहीशा अविश्वासाने ती भिंत हाताने चाचपडायला सुरवात केली. आणि अचानक तिला पुन्हा एकदा ती खिट्टी लागली. जणू काही अदृश्य होती ती.वरून अजिबात मागमूसही लागत नव्हता.
तिने ती खिट्टी बाहेरच्या दिशेला ओढली. भिंतीचे अनेक पोपडे खाली पडले. ती खिट्टी म्हणजे एका लोखंडी पेटीची कडी होती. थोडा जोर लावल्यावर ती अक्खी पेटी बाहेर आली. ती पुर्णतः गंजली होती. कडी देखील घट्ट बसली होती. तिने जोर लावून ती कडी एकदाची उघडली. आत काय असेल ह्याची उत्सुकता तिला गप्प बसू देत नव्हती. तिची झोप पूर्णपणे उडाली होती. तिला एकदम रहस्यमय वाटत होतं. मावशी ही पेटी इथे विसरून गेली होती की अजूनच पूर्वीच्या काळातली होती?
तिने सावकाश आणि थोडंसं घाबरतच ती पेटी उघडली. आत एक जीर्ण पत्र होतं. कागद पिवळा पडला होता. धुळही बसली होती. तिने धूळ झटकून हळुवारपणे ते पत्र उघडलं. हृदय धडधडत होतं. त्याच्यावर तिचं नाव लिहिलं होतं. मीरा संकेत जोशी. तिच्या बाबांचं नाव आणि आडनाव तिला आज पहिल्यांदा कळलं होतं. त्यामध्ये तिचा एक लहानपणीचा फोटो होता. तिच्या आईबाबांसोबतचा. आयुष्यात पहिल्यांदा ती तिच्या आईबाबांचा फोटो बघत होती. तिला भरून आलं होतं.
मीरा विचारात पडली होती. पत्रात काय लिहिलेलं असेल? पत्र आईचं असेल? का बाबांचं असेल? की दोघांनी मिळून लिहिलं असेल तिच्यासाठी?

0

🎭 Series Post

View all