भाग 4
म्हणजे मला स्वप्नात दिसते ती माझी जुळी बहीण होती? ह्या विचारासरशी मीरा अस्वस्थ झाली. तिने भराभर कपाट आणि कप्पे शोधायला सुरवात केली. अखेर एका कप्प्यात तिला फोटो अलबम सापडला. पहिलाच फोटो त्यांच्या जन्माच्या वेळेस हॉस्पिटलमध्ये काढलेला होता. आई बाबा आणि दोन जुळ्या मुली. मीरा खूप रडली. तिला तिच्या बहिणीचं नावसुद्धा माहीत नव्हतं. तिने घरात खूप शोधलं पण तिचं नाव नाहीच कळलं.
मिराने घर बंद केलं आणि ती परत मावशीच्या घरी आली. तिथे राहावं वाटत होतं; पण कॉलेज साठी परत यावेच लागणार होते. हळूहळू तिने स्वतःला सावरलं. नोकरी मिळाल्यावर तर ती आणखीनच व्यस्त झाली. नोकरी, नवे मित्र मैत्रिणी, अभ्यास ह्यातून तिला फारसा वेळच उरला नव्हता.
दोनतीन वर्षात तिचं पदवीपर्यंत शिक्षण झालं. तिला स्वतःच कपड्यांचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यामुळे तिने अर्धवेळ नोकरी करून हळूहळू व्यवसायाची सुरुवात केली. चांगला जम बसल्यावर तिने नोकरी सोडून देऊन पूर्णपणे व्यवसायात झोकून दिलं. अधूनमधून त्या मावशीच्या पत्राची आठवण आली की मीरा अस्वस्थ व्हायची. अजूनही मावशिवरचा राग पूर्णपणे गेला नव्हता. पण तिला भेटायची इच्छा आता जोर धरायला लागलेली. मनात द्वंद्व सुरू होतं तिच्या जावं की नाही?
शेवटी भेटायच्या इच्छेने रागावर मात केली. जोडून आलेली सुट्टी बघून मिराने बसचं तिकीट बुक केलं. त्या पत्रातील पत्ता तिने गूगल मॅप वर सेव्ह करून ठेवला. आता फारशी अडचण येणार नव्हती तिला घर शोधायला.
आठ तासांचा प्रवास करून मीरा मावशीच्या घरी पोचली तेव्हा खूप दमली होती. तीने मावशीच्या घराची बेल वाजवली. एका मध्यमवयीन स्त्री ने दार उघडलं. मिराने मावशीला नीट निरखून पाहिलं. लहानपणीच्या अशा काही आठवणीच नव्हत्या. मावशी आईसारखी तर नक्कीच दिसत नव्हती. मावशीने तिच्या विचारांची तंद्री मोडली. "मला खात्री होती तू एक दिवस नक्की येशील". मावशीच्या स्वरातून जाणवणारे प्रेम मिराला सुखावून गेलं.
मावशीने पाणी दिलं. मिराला गेस्टरूम दाखवून विश्रांती घ्यायला सांगून मावशी दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागली. मीरा अंघोळ करून झोपली. जाग आली तेव्हा जेवणाचा सुगन्ध दरवळत होता. मीरा पटकन आवरून जेवायला आली.
सगळ्यांची जेवणं झाली. मीरा आणि मावशी आता निवांत बसले होते. मिराने मावशीला विचारलं, "तुला खात्री होती मी तुला भेटायला येईनच? तू सोडून गेलीच नसतीस तर मला आश्रमात जावंच लागलं नसतं. नन्तरही तू मला भेटायला न येता पत्र लिहून ठेवलस. मला ह्या प्रश्नांची उत्तरं हवी होती म्हणूनच मी इथे आलीये." "हं. तुझ्या मावशीला खात्री होती तू हे प्रश्न विचारशील." "म्हणजे?" "मी तुझी मावशी नाहीये मीरा."
…..
क्रमशः
…..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा