Login

अस्तित्वाचा शोध भाग 5

काय बोलायचं असेल मावशीला मिराशी?


पूर्वसूत्र: मीरा मावशीकडे जाते. तिथे मावशीचं प्रेम आणि अगत्य बघून ती सुखावते. मावशीच्या हातचं सुग्रास जेवण झाल्यावर त्या दोघी गप्पा मारत बसलेल्या असतात. तेव्हा मावशी म्हणते की ती मीराची मावशी नाहीये. मीराला हे ऐकून धक्का बसतो.

भाग ५

“मावशी अग काय बोलतियेस तू हे” मीराने मावशीला विचारलं. तिला धक्काच बसला होता. मावशी काही न बोलता उठली. तिने एक फोटो आणला तिच्या खोलीतून. तो एका महिला सैनिकाचा फोटो होता. मावशी हा फोटो का दाखवत असेल? मीरा गोंधळली. “ही तुझी मावशी आहे मीरा. लेफ्टनंट जनरल मालती. मी तिची सगळ्यात जवळची मैत्रीण. ती इथे आली तेव्हापासून आम्ही ह्याच घरात राहत होतो.” “मावशी कुठे आहे?” मीराने अस्वस्थपणे विचारलं. “मीरा, तिला दोन वर्षांपूर्वी युद्धात गोळी लागून वीरगती मिळाली. पण तिने मला सांगितलं होतं, तू नक्की येशील तिला भेटायला इथे. म्हणून तर मी ओळखलं तुला. तिला इथे येताना तुला सोबत घेऊन येणं शक्य नव्हतं मीरा. तिचाच काही पत्ता नव्हता. रहायला कुठे जागा मिळेल, सोबत कोण असेल, हे काहीच निश्चित नसताना तुला सोबत आणून तुझी परवड व्हायला नको होती तिला. तुला ज्या आश्रमात सोडून ती इथे आली, त्या माई तिच्या खूप चांगल्या ओळखीच्या होत्या. तिला खात्री होती तुझी तिथे व्यवस्थित काळजी घेतली जाईल.”

“पण इथे तर तू होतीस ना? मग का नाही आणलं मला इकडे. मला तर तिचा चेहराही आठवत नाही. मावशी मला एका अनोळखी लोकांसोबत सोडून गेली ह्याचा धक्का बसला आणि मी चक्कर येऊन पडले. दुखापतीमुळे माझ्या सगळ्या आठवणी पुसल्या गेल्या. मला तिचं, आईबाबांचं कोणाच साध नावही माहित नव्हत. मला एक बहिण होती हे मला आत्ता समजलं, जेव्हा मी आमच्या घरी गेले. मावशीलापण मी नको होते का ग? म्हणूनच सोडून गेली ती मला. कधीच भेटली नाही परत मला.” आपण नकोसे होतो ह्या भावनेने मिराला रडू फुटतं.

“असं नाहीये ग मीरा. ती रोज फोन करून तुझी चौकशी करायची. तिला जेव्हा कळालं तुझा अपघात झालाय तेव्हा ती लगेच निघाली होती तिकडे येण्यासाठी. पण तिला ताबडतोब हजर व्हायचा आदेश मिळाला. त्यानंतर तिला सुट्टी मिळाली तेव्हा  तू तिथे रमली होतीस. तिला पूर्ण विसरली होतीस. असं अचानक तुला इकडे घेऊन आली असती तर तुलाच खूप त्रास झाला असता. म्हणून तिने तुला तिथेच ठेवायचं ठरवल. त्यानंतर जेव्हा तिला कळलं की तिला त्या युद्धावर जायचं आहे, का वाटलं तिला काय माहित, ती परत पुण्याला गेली. तिचं घर तुझ्या नावावर केलं. तिथेच ही पेटी आणि पत्र ठेवून परत आली. मला हे कळलं तेव्हा मी पण अशीच चिडले तिच्यावर की तुला इकडचा पत्ता का नाही दिला. तेव्हा ती म्हणाली, ‘ मला माहित आहे मीरा चिडली असणारे माझ्यावर. मला तिला त्रास नाही द्यायचाय अजून. तिला जेव्हा मनापासून वाटेल मला भेटावसं तेव्हाच भेटीन मी तिला.’ दोनच दिवसात ती ड्युटीवर गेली. पंधरा दिवसांनी तिच्या मृत्यूचीच बातमी आली. तिला आधीच सगळं कळालं असल्यासारखं हा अल्बम मला देऊन गेली. तुझं गिफ्ट म्हणून. तुझे लहानपणापासूनचे सगळे फोटो आहेत ह्यात.”

मीराने तो अल्बम घेतला आणि ती खोलीत निघून गेली. हे सगळं ऐकून ती सुन्न झाली होती. पुढचे दोन दिवस कसे गेले दोघींनाही कळलं नाही. मावशी मीराची खूप काळजी घेत होती. पण मीरा शांत शांतच होती. तिच्या डोक्यात विचारांचं वादळ चालू होतं. दुसर्यादिवशी मीरा परत जायला निघणार होती. दोघीही शांतच होत्या. ह्या चारपाच दिवसात मावशीला मीराचा लळा लागला होता. पण तिला मीराचा अंदाज येत नव्हता. शेवटी मिरानेच शांततेचा भंग केला. “मावशी, मला तुला एक विचारायचं होतं.” “मीरा मी तुला सगळच तर सांगितलं. आता काय विचारायचं आहे तुला? काय चाललंय तुझ्या मनात?
……...
                                                               क्रमशः

0

🎭 Series Post

View all