Login

अस्तित्वाचा शोध भाग 1

एक अनाथ मुलगी, तिला सतत पडणारं स्वप्न, अठराव्या वाढदिवसाच्या दिवशी अचानकपणे समोर आलेलं भयानक व


अस्तित्वाचा शोध:भाग 1



रात्रीची वेळ होती. रस्त्यावरची वर्दळ बर्यापैकी कमी झाली होती. एका गाडीत एक स्त्री, पुरुष आणि दोन लहान मुली होत्या. चार ते पाच वर्षांच्या. सगळे जण गप्पा मारत होते. अचानक डाव्याबाजुने ताबा सुटलेला ट्रक वेगाने येऊन त्या गाडीवर आदळला. त्या स्त्रीची किंकाळी ऐकू आली;

….. मीरा दचकून जागी झाली. तिला घाम फुटला होता. गेली पंधरा वर्ष ह्या एकाच स्वप्नाने तिला रोज रात्री छळले होते. ह्या रोज पडणाऱ्या स्वप्नाला ती वैतागली होती.न कधी त्या गाडीतल्या माणसांचा चेहरा दिसला होता न कधी त्याच्यापुढे काय झालं ते समजलं होतं.


मीरा एक अनाथ मुलगी होती. ती पाच वर्षांची असताना तिची मावशी तिला पुण्यातल्या ह्या अनाथाश्रमात सोडून गेली होती, एवढच तिला माहित होतं. न तिला तिची मावशी आठवत होती, न तिचं कुटुंब. आईवडिलांचाही चेहरा आठवत नव्हता. पुढच्याच महिन्यात ती अठरा वर्षांची होणार होती. नियमाप्रमाणे, तिला त्यानंतर अनाथाश्रम सोडून जावे लागणार होते. पण कुठे जाणार होती ती? ह्या विचाराने ती अस्वस्थ होती. त्यात भर म्हणून रोजच्याप्रमाणे हे स्वप्न!



दिवस भराभर उलटत होते. तिचा वाढदिवस आला. त्यादिवशी सकाळीच तिला आश्रमातल्या माईंनी बोलावले. ती गेल्यावर त्यांनी तिच्या हातात एक चिट्ठी ठेवली. बरीच जुनी चिठ्ठी दिसत होती. मिराने माईंकडे प्रश्नार्थक बघितलं. माईंनी तिला ती चिठ्ठी वाचायला सांगितलं.


प्रिय मीरा,

मी मालती म्हणजेच तुझी मावशी.कदाचित आता तुला मी एवढी आठवतही नसेन. तुझे आईबाबा गेल्यावर मी तुला माझ्या घरी घेऊन आले. तू खूप लहान होतीस तेव्हा. पण मीच तुला अनाथाश्रमात सोडलं. कदाचित तू माझ्यावर रागावली असशील. प्लिज जमलं तर मला माफ कर. माझ्या मनात नसतानाही मला तसं करावं लागलं.पण मी माझं घर शहर सोडण्यापूर्वी तुझ्या नावावर करून ठेवले आहे. खाली तेथील पत्ता देत आहे. तू हे पत्र वाचशील तेव्हा तू अठरा वर्षांची झालेली असशील. पण तुला कुठे राहू याची चिंता करायची काहीच गरज नाहीये. हे घर तुझेच आहे.

तुझी मावशी.


काय व्यक्त व्हावं ते मिराला कळत नव्हतं. असं अचानक समोर आल्यामुळे डोकं बधिर झालं होतं. आज सकाळपर्यंत असं वाटत होतं की आपलं ह्या जगात कोणीच नाही. कुठे जाऊन रहाणार आपण? आणि आज तिला कळलं होतं की तिचं घर आहे पुण्यात.


तो दिवस वाढदिवस साजरा करण्यात गेला. पंधरा वर्षात आश्रमात सगळ्यांशीच एक वेगळंच नातं तयार झालं होतं. त्यात तिचा अठरावा वाढदिवस. आता परत कधी भेट होईल सांगता येत नव्हतं. त्यामुळे सगळ्यांनीच अगदी धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. दुसऱ्या दिवशीच ती निघणार होती.


सामान बांधून झाल्यावर आश्रमतल्याच दोघांनी जाऊन रिक्षा बोलावून आणली. मिराला भरून आलं होतं. हे तिचं घरच होतं. कुठलाही रक्ताचा सम्बन्ध नसताना ईथल्या सगळ्यांनी तिला खूप जीव लावला होता. तिचाही पाय निघत नव्हता. पण निघणं भाग होतं. एक नवीन स्वतंत्र आयुष्य सुरू होणार होतं. तिचं घर तिची वाट बघत होतं.


घराच्या उंबरठ्यावर तिचे पाय थबकले. छोटा बैठा बंगला होता ती. बंगल्यापुढची बाग आता कोणी लक्ष द्यायला नसल्यामुळे ओसाड झाली होती. घरापुढंच कारंज कधीच बंद पडलं  असावं. ह्या घराची एकही आठवण नव्हती मिराकडे. ना मावशीची होती. आश्रमाबाहेर तिला काहीच ओळख नव्हती. कसं असणार होतं तिचं आयुष्य?

………..

                            क्रमशः

 


0

🎭 Series Post

View all