Login

भटकंती नवलाईची २

प्रवासवर्णन
भटकंती नवलाईची
भाग २
नवसारी दांडी महुवा

दोन उनाड दिवस

उन्हाळ्याच्याच पूर्ण सुट्ट्यांमध्ये उन्हामुळे कुठेच गेलो नाही. पण मे महिन्यातच पावसाचा शिडकावा झाला, आणि काही मैत्रिणींनी कुठेतरी दोन उनाड दिवस साजरे करूया असे ठरवले. नाशिकच्या जवळची ठिकाण निवडायची होती मग "कुछ तो दिन बताओ गुजरात मे" आठवलं आणि निघालो गुजरात टूरला.

सकाळी सकाळी सापुताऱ्याचे प्रसन्न वातावरण आणि तिथल्या जैन धर्म शाळेमध्ये नाश्ता करुन आम्ही निघालो पुढे नवसारीला. नवसारीच्या दादावाडी ला पोहोचलो आणि तिथे आम्ही जेवणार होतो महुआ जैन मंदिरात राहायची सोय न मिळाल्यामुळे ,णवसारीला राहणार होतो. त्यामुळे गेल्या गेल्या रूम घेतल्या आणि थोडा वेळ विसावलो.
जेवण करुन निघालो दांडी म्युझियम बघायला. महात्मा गांधींनी मुठभर मीठ उचलून, जिथे सत्याग्रह केला होता ती जागा. दांडी बीचजवळची. तिथे एक नवे आणि एक जुने दोन म्युझियम आहेत.दोन्ही खूपच छान आहेत. गांधीजींच्या जीवनातील प्रसंगांचे कोरीव काम केलेले ओपन एअर मधले प्रदर्शन खूपच छान अतिशय सुंदर आहे. बारकाईने केलेले ते काम बघून थक्क होतो.
तिथे माहिती देणारी फिल्म ही चालूच असते. पाण्यापासून मीठ बनवण्याच्या प्रक्रियेचेही तिथे डेमॉन्स्ट्रेशन आहे.
खादीच्या बनवलेल्या अनेक वस्तूंचे विक्री दालन आहे.
अर्थातच आम्ही सगळ्या मैत्रिणी आणि स्त्रिया मग खरेदी नाही केली तर कसं बरं चालणार? त्यामुळे थोडीफार खरेदी तिथे झालीच.
ऊन होतेस थोडेसे, त्यामुळे तिथल्या थंडगार रसाने भुरळ पडलीच. छान थंडगार उसाचा रस पिऊन पुढे निघालो, जवळच असणाऱ्या' सांस्कृतिक गोदान' या स्वामीनारायण मंदिरात.
अतिशय भव्य दिव्य नक्षीदार ,असे स्वामीनारायण मंदिर. तिथे असणारी गोशाला आणि केवळ गाय या संकल्पनेवर आधारित रचना, त्याचबरोबर मनोरंजन करण्यासाठी छोट्यांबरोबरच मोठ्यांनाही खेळता येईल अशा खेळण्यांचा पार्क ,आरसे महाल, काही प्रदर्शने,स्विंमींग पुल, रामायणातील प्रसंगांचे केलेले प्रदर्शन अशा अनेक गोष्टी पाहता दोन अडीच तास कसे गेले कळलेच नाही.
तिथल्या कॅन्टीनमध्ये मग भरपेट नाश्ता करून, आम्ही पोहोचलो राहण्याच्या ठिकाणी परत दादावाडीला मुक्कामी.

सकाळी उठून निघालो महुवाच्या विघ्नहर पार्श्वनाथच्या दर्शनला.
रविवार असल्याने भरपूर गर्दी होती. तरीही दर्शन करून प्रभूच्या सानिध्यात मन शांत केले.
तिथेही भरपूर खाण्यापिण्याच्या वस्तू आणि इतर वस्तूंची खरेदी झालीच. तिथे नाश्ता करून आम्ही निघालो धरमपूरच्या श्रीमद रायचंद आश्रम बघण्यासाठी.
अतिशय विस्तिर्ण परिसर आणि नेत्र सुखद असे जिन मंदिर ,रायचंदजींचा मोठा पुतळा ,तसेच ध्यानमंदिर आणि मन प्रसन्न करणाऱ्या बागा. डोळ्याचे अगदी पारणे फिटले.इथे एखादे ध्यानशिबीर करायला यायचे याची मनाशी खूणगाठ बांधली आहे.
तिथून निघालो ते तळासरी इथल्या जिनशरणम या प्रसिद्ध मंदिराला भेट देण्यासाठी. संध्याकाळची शांत वेळ शांतिनाथ आणि पार्श्वनाथ भगवंतांचे दर्शन .ध्यानकुटी आणि नेत्र सुखद फुलांनी फुललेली बाग,जीवाला शांत होण्यासाठी एवढं पुरेससे होते.तिथे रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला.
संध्याकाळचा भक्तामर पाठ कानावर पडत होता, परंतु परतायला वेळ होईल, म्हणून पूर्ण न थांबता, आम्ही तिथून निघालो. परतीच्या प्रवासाला.
या दोन उनाड दिवसात सर्वांना खूप एनर्जी मिळाली, पुन्हा आपले कामकाज सुरू करण्यासाठी .आणि आता दोन ऐवजी पुढच्या वेळी चार उनाड दिवस अनुभवण्यासाठी जाऊया, अससे ठरवूनच, आम्ही मैत्रिणी घरी परतलो.

भाग्यश्री मुधोळकर
0

🎭 Series Post

View all