# तु असा जवळी रहा...( भाग ४० वा)
©® आर्या पाटील
अमित मित्रांसोबत निघून गेला तसा तिनेही तेथून काढता पाय घेतला. नदी किनारा गाठत ती श्रेयशची वाट पाहू लागली.
' श्रेयश आल्यावर आपण त्याच्या मनातील गैरसमज काढून टाकू. अमित आणि त्याच्या नात्याची कदाचित ही एक गोड सुरवात ठरेल. मला फक्त त्यांना सोबत पाहायचे आहे आणि त्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागतील.' हातातील दगड नदीच्या डोहात टाकत ती विचारांत रमली.
अमितचा हसरा चेहरा समोर साकार झाला आणि नकळतच तिच्या गालावर खळी पडली.
' लहान आहेस पण तरीही मोठ्या भावासारखा पाठीशी उभा राहतोस. माझ्या सुखासाठी नेहमीच धडपडतोस पण श्रेयश सोबत जुळवून घ्यायची वेळ येते तेव्हा मात्र कशाचाही विचार तु करत नाहीस.यावेळेस मात्र तुला माझं ऐकावं लागेल. बहिणीला ओवाळणी म्हणून तुमचं नातं द्यावं लागेल. मला माहित आहे माझ्यासाठी तु हे नक्की करशील.' तिने मनातच अमितशी संवाद साधला.
आता श्रेयशची आणखी वाट पाहणे तिला अशक्य झाले. काठावरून उठत ती प्राजक्ताच्या झाडाखाली येऊन बसली. फुलांचा मंद दरवळ पुन्हा एकदा श्रेयशची आठवण करून देता झाला. तो रागात निघून गेल्यानंतर तिला भेटलाच नव्हता त्यामुळे कधी एकदा त्याला डोळ्यांत बघते असे काहीसे झाले होते तिला. ओढ अनावर झाली आणि तिने पुन्हा एकदा त्याला कॉल केला.गाडी चालवत असल्याने त्याला फोन उचलायला जरा उशीरच झाला.
" हा बोल आभा.." कॉल रिसीव्ह करत तो म्हणाला.
" अजून किती उशीर श्रेयश ? मी कधीची पोहचले आहे नदीवर. तु लवकर ये." ती लडिवाळपणे म्हणाली.
" मी पोहचतो आहे गावात. घरी सामान उतरवतो आणि लागलिच येतो. थोडा वेळ वाट पहा मी आलोच." म्हणत त्याने फोन ठेवला.
फोन ठेवतांना तिच्या गालावर स्मितहास्याची लकेर उमटली. तोच तिच्या बरोबर पुढ्यात साप सळसळतांना दिसला. ती जागेवर उठून उभी राहिली. आज पहिल्यांदा असा साप समोर दिसला होता. कितीतरी संध्याकाळी इथेच प्राजक्ताखाली त्यांच्या प्रेमाचा गुंजारव चालायचा पण कधीही असा सर्प दृष्टीस पडला नव्हता. समोर सापाला पाहून ती चांगलीच घाबरली. आजूबाजूलाही कोणीच नव्हते त्यामुळे नाइलाजाने तिने तेथून काढता पाय घेतला. परतीच्या वाटेवर मात्र पाय जड झाले. मन वेगळ्याच भावनेने भरून आलं. खोल हृदयात एक जीवघेणी कालवाकालव सुरु झाली. तिला काहीच कळत नव्हतं पण खूप काही घडल्याची जाणिव मात्र दाटून येत होती. तिने पुन्हा फोन काढला आणि श्रेयशला कॉल केला. एकदा, दोनदा, तीनदा असे क्रित्येकदा कॉल वाजले पण त्याने फोन रिसीव्ह केला नाही. तिच्या मनातील धाकधूक आणखी वाढली. नदीपासून घरापर्यंतचा वीस ते पंसवीस मिनिटांचा रस्ता तिची दमछाक करून गेला. अर्ध्या रस्त्यात असतांना शेजारचा एक लहान मुलगा धावत तिला तिच्या दिशेने येतांना दिसला.
" आभा ताई, अमितदादा..." धावत आल्याने त्याचाही श्वास जड झाला होता.
" छोटू, अरे दम घे. आणि अमितचं काय ?" ती त्याला सावरत म्हणाली.
" अमित दादाचा ॲक्सिडेन्ट झाला आहे.गावाच्या वेशीवर एका गाडीने त्याला उडवले." बोलतांना आता मात्र त्याचा स्वर जड झाला.
त्याचे शब्द विषापरी तिच्या काळजाला भिडले.क्षणभर तिला भोवळ आल्यासारखी झाली पण दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरत तिने तशीच धाव घेतली. डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या.अमितचा हसरा चेहरा सारखा समोर येऊ लागला.ज्याच्यावर तिचं जीवापाड प्रेम होतं तो तिच्या हृदयाचा तुकडा आज मोठ्या संकटात सापडला होता.उचंबळून आलेल्या भावनांना सावरत ती कशीबशी घरात पोहचली. मघाशी ज्या घरात लग्नाची लगबग सुरु होती त्याच घराला आता भेसूर रुप आले होते. तिच्या बाबांना कळताच ते तसेच गावाच्या वेशीवर धावले होते. पाठोपाठ आईही तिकडेच गेल्याचे कळताच ती तशीच आल्यापावली मागे वळली. तोच गावातील काही महिला तिच्या रडणाऱ्या आईला सावरत घेऊन आल्या. आभा लगेचच आईच्या दिशेने धावली. तिला समोर पाहताच त्यांचं उरलंसुरलं अवसानही गळून पडलं. तिला बिलगत त्या लहान मुलासारख्या रडू लागल्या. तिलाही अश्रू अनावर झाले.
" तायडे, हे काय होऊन बसलं गं?आपला अमित.. आपला अमित ठिक असेल ना ?" त्या रडत रडतच म्हणाल्या.
त्यांच्या बोलण्यातील आर्तता तिला जीवघेणी वाटली.
" तु शांत हो आधी. आपल्या अमितला काहीच होणार नाही." सांगतांना तिचं हृदयही भरून आलं. ती ही त्यांना कुशीत घेऊन रडू लागली.
आजूबाजूच्या महिलांनी त्यांना सावरलं. आभाच्या आईला एका जागी बसवत पाणी दिलं.
" जोपर्यंत माझा अमित सुखरूप घरी येत नाही मी पाण्याला हातही लावणार नाही." म्हणत त्यांनी ते नाकारलं. भरधाव येणाऱ्या एका कारने चौघा मित्रांना उडवल्याचे एका प्रत्यक्षदर्शी कडून कळले होते.अमितला जास्त मार लागल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्याचे गावातल्या बायकांनी सांगितले. तिच्या आईबाबांनाही त्याला पाहता आले नाही. ते पोहचण्याआधीच त्याला दवाखान्यात नेण्यात आले होते. त्याच्या सोबत असलेल्या मित्रांपैकी दोघांना मार लागला होता त्यांनाही हॉस्पिटलमध्ये भरती केले होते आणि हे सर्व पाहून चौथ्या मित्राला मानसिक धक्का बसला होता. तो काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता.
" आई, तु थांब मी आणि श्रेयश जातो हॉस्पिटलमध्ये." तिने फोन काढत पुन्हा त्याला कॉल लावला.
" त्यानेच तर उडवलं पोरांना. कुंपणानेच शेत खाल्लं गं पोरी." कोणी एक जण म्हणाली.
ते शब्द ऐकताच आभा जाग्यावरच कोसळली. डोळ्यांनी पुन्हा एकदा साथ सोडली आणि अश्रू ओघळू लागले.
तिने भरल्या नजरेने आईकडे पाहिले.
" आपल्या सुखाला नजर लागली गं आभा." म्हणत त्या पुन्हा रडू लागल्या.
" म्हणूनच आधी माणसं ओळखायला हवी होती. त्या दिवशी नदीवर अमितबरोबर भांडला आणि आज त्याचा ॲक्सिडेन्ट." कोणी एक कुजबुजली.
प्रत्येक शब्द काळजावर घाव घालता झाला.
" आई, मी जाते हॉस्पिटलमध्ये. काळजी करू नकोस. आपल्या अमितला काहीच होणार नाही." म्हणत ती घरातून निघाली.बाजूचे काका गाडी घेऊन तिच्या सोबत गेले. गावाच्या वेशीवर जिथे अमितचा ॲक्सिडेन्ट झाला होता तिथे पडलेला रक्ताचा सडा पाहून आभाच्या काळजात चर्र झाले. ती आवंढा दाबत रडू लागली. त्याला जरासं लागलं तरी हळहळणारी ती आज त्याला या अश्या अवस्थेत कशी पाहू शकणार होती ? मनोमन गणरायाकडे अमितला सुखरूप ठेव हिच एक प्रार्थना ती करत होती.
" श्रेयश अमितशी असा काही वागेल असं वाटलं नव्हतं." गाडी चालवता चालवता तिचे काका म्हणाले.
" काका, उगीच तोंडला येईल ते बोलू नका." म्हणत तिने त्यांना शांत केले.
' देवा कोणत्या धर्मसंकटात टाकलं आहेस ? दोघांच्या नात्याची घडी अशी काही विस्कटलीस की आता सावरणे अशक्य आहे. दोघंही सुखरूप असू देत.' पुन्हा एकदा मनातच तिने देवाला आळविले.
दवाखान्याच्या जवळ पोहचताच तिच्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडू लागले.
तोच काकांचा फोन वाजला.
" काय ?" एवढच म्हणत त्यांनी चेहरा गंभीर केला. आभाच्या नजरेतून ते सुटलं नाही. थोड्याच वेळात ते दवाखान्यात पोहचले. गाडीतून उतरत ती तशीच दवाखान्यात धावली.
' देवा, या परिस्थितीशी सामना करण्याचं बळ दे पोरीला.' मनात म्हणत त्या काकांनी भरून आलेले डोळे टिपले.
रिसेप्शनिस्टकडे चौकशी करत ती लागलीच अमितला ॲडमिट केलेल्या ठिकाणी पोहचली. बाबांचा रडण्याचा आवाज ऐकून मात्र अंगावर कंपने निर्माण होऊ लागली. पावले जड झाली. तिचे बाबा तिथेच कोपऱ्यात बसून ओक्साबोक्सी रडत होते. आपले दोन्ही हात डोक्यावर मारून घेत नशिबाला दोष देत होते. काही गावकरी त्यांचे सांत्वन करीत होते. ती लागलिच त्यांच्या जवळ पोहचली. तिला पाहताच तिचे बाबा आणखी तुटले.
" ताई आपला दादा गेला गं आपल्याला कायमचा सोडून. देवा त्याच्याऐवजी मला का नाही नेलस. का असं वागलास ?" म्हणत ते पुन्हा डोक्यावर मारत रडू लागले.
त्यांच्या शब्दासरशी आभा भोवळ येऊन खाली कोसळली. गावकऱ्यांनी जेमतेम तिला सावरलं आणि बाजूला बसवलं. लागलिच कोणीतरी पाणी घेऊन आलं. चेहऱ्यावर पाणी शिंपडताच ती शुद्धीत आली. समोर बाबांना पाहून ती त्यांच्या कुशीत शिरली आणि रडू लागली. भावना अश्या काही गहिवरल्या की शब्द मुके झाले. अमितचं नाव घेऊन ती ओक्साबोक्सी रडू लागली.
" मला अमितला पाहायचे आहे." म्हणत ती उठली. उठतांना पुन्हा एकदा तोल गेला नि ती कोसळली. कोणी एकाने तिला समोरच्या वॉर्डमध्ये जिथे अमितची डेडबॉडी ठेवली होती तिथे आणले. पोलिस डॉक्टरांचा जवाब लिहून घेत होते. त्यातून वाट काढत ती अमितपाशी पोहचली. सळसळत्या उत्साहाचा तिचा भाऊ मृतावस्थेत पडला होता. काही तासांपूर्वी तिला आलिंगन देऊन घरी लवकर ये असं सांगणारा तो कायमचा तिला सोडून गेला होता. डोक्याला गुंडाळलेली रक्ताळलेली पांढरी पट्टी पाहून ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवती झाली. त्याला स्पर्श करताच हृदयाच्या जाणिवा
गहिवरल्या आणि मनाने जोरात आक्रोश सुरु केला. मनाचा तो आक्रोश शरिराला पेलवला नाही आणि ती पुन्हा भोवळ येऊन पडली.
फोन वाजला आणि मघासपासून भूतकाळाच्या त्या कडू आठवणीत हरवलेली आभा भानावर आली. आपण मंदारसोबत दवाखान्यात असल्याचे तिच्या लक्षात आले.
' अमित..' मनाच्या कोपऱ्यातून आर्त साद आली आणि ती पुन्हा अगतिक झाली. तोच पुन्हा फोन वाजला. आता मात्र तिने फोन उचलला. आईने कॉल केला होता.
" आभा, मंदारराव कसे आहेत गं ?" आई रडवेली होत म्हणाली.
" आई तु शांत हो. तो ठिक आहे. काळजी करण्याचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या औषधं घेतल्याने झोपलाय." तिने समजावले.
" देवालाच काळजी सगळ्याची. मी काय बोलते आभा ते श्रेयश.." त्या श्रेयशची बाजू मांडतच होत्या की मंदार शुद्धीवर आला.
" आई आपण नंतर बोलू. मंदारला जाग आली.." म्हणत तिने फोन ठेवला आणि ती त्याच्याकडे धावली.
तो तिच्याकडे पाहून स्मितहास्य देता झाला. ती रडत रडत त्याच्या कुशीत शिरली.
" ये वेडाबाई मला काहीच झालं नाही. एकदम ठणठणीत आहे मी." तो तिला सावरत म्हणाला.
तरीही तिचे रडणे काही थांबत नव्हते.
" आभा, तु आधी शांत हो." डोळे पुसत त्याने तिला शांत केले.
" तु ठिक आहेस ना ?." म्हणत तिने डोळे टिपले. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवित ओठ कपाळावर टेकवले. डोक्याला लावलेली पट्टी पाहून ती पुन्हा अगतिक झाली.
" अगं साधी जखम आहे. होईल लवकर बरी. तु नको काळजी करूस." तिची अगतिकता पाहून तो म्हणाला.
" मी नाही पाहू शकत तुला या अवस्थेत." म्हणत ती पुन्हा रडू लागली.
" अगं पण मी ठिक आहे. श्रेयश होते म्हणून वेळेत दवाखान्यात आणलं नाहीतर." तो बोलतच होता की तिने त्याला शांत केले.
" आधी ॲक्सिडेन्ट करायचा आणि मग दवाखान्यात आणायचं एवढच जमतं त्याला." ती रागात म्हणाली.
" म्हणजे ?" तो आश्चर्याने उद्गारला.
तसं तिने स्वतःला सावरलं.
" काही नाही. मला कळलय त्याच्या हातूनच हा ॲक्सिडेन्ट झाला आहे." तिने उत्तर दिले.
" अगं तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे." तो तिला समजावत म्हणाला.
" गैरसमज तर तुझा झाला आहे मैत्रीच्या बाबतीत." ती म्हणाली.
" आभा, तु त्यांना काही बोलली नाहीस ना?" तो शंकेने म्हणाला.
" गालावर हाताचे ठसे उमटवून चांगलच सुनावलं आहे." बोलतांना तिच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट जाणवत होता.
" हे तु काय केलस आभा ? त्यांची काहीही चुक नव्हती. हा ॲक्सिडेन्ट त्यांच्या ड्रायव्हरच्या हातून झाला आणि तो ही माझ्या चुकीमुळे." म्हणत त्याने घडलेली सारी हकिगत सांगितली.
ते ऐकून आभा मात्र चांगलीच ओशाळली. श्रेयशला सुनावलेले खडे बोल तिच्या काळजावर आघात करते झाले. त्याच्या कानशिलात लगावल्याचे आठवताच वेदनेची अनामिक सल तिच्या मस्तिष्कात उठली.
आभा, देवमाणूस आहेत गं ते. तु उगाचच त्यांना दोष दिलास." तो पुन्हा एकदा तिला समजावित म्हणाला.
" हे माझ्या हातून काय घडलं ? मी त्याची बाजू ऐकूनही घेतली नाही." ती पुटपुटली.
" माझं ऐकशील तर त्यांची माफी माग. मला दवाखान्यात आणून त्यांनी मदत केली आणि त्याबदल्यात....
नाही आभा. तु त्यांची माफी मागितली पाहिजे." त्याने पर्याय सुचवला.
ती तशीच बाहेर धावली पण श्रेयश दृष्टीस पडला नाही.
तिने पूर्ण दवाखान्यात शोधले पण तो कुठेच नव्हता. धापा टाकत ती दवाखान्याबाहेर आली. तिथेच बाजूच्या कोपऱ्यात शून्यात नजर लावून बसलेल्या त्याला पाहून ती अगतिक झाली आणि त्याच्या दिशेने वळली.
क्रमश:
©® आर्या पाटील