# तु असा जवळी रहा..( भाग ४१ वा)
©® आर्या पाटील
आभाने मारलेली चपराक त्याला पुन्हा गतकाळाच्या त्या खोल डोहात ढकलून गेली. पाहणाऱ्यांच्या त्यादिवशी सारख्याच नकोश्या नजरा टाळत तो कसाबसा हॉस्पिटल बाहेर पडला आणि तिथेच कोपऱ्यात जाऊन बसला. दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकत त्याने दिर्घ श्वास घेतला. त्याच्या ओलेत्या नजरेला पुन्हा एकदा त्या जीवघेण्या घटनेने घेरले.
आभाच्या लग्नसाड्या घेऊन परतत असतांनाचा तो उत्कट प्रवास जसाच्या तसा डोळ्यांसमोर साकार झाला.
" आभा, मी पोहचतो लवकर आणि सॉरी गं. काल मी तुझ्यासोबत असं नव्हतो वागायला पाहिजे होतं पण अमितमुळे.." तो फोनवर बोलत होता.
" कालचं सोड.तु लवकर ये मला तुला काही सांगायचं आहे. खूप महत्त्वाचं. कधीकधी आपण एकच बाजू ऐकून निकाल जाहिर करतो.." ती कोड्यात म्हणाली.
" म्हणजे ? कोणाबद्दल बोलायचं आहे तुला ?" तो गंभीर होत म्हणाला.
" कोणाबद्दलही नाही फक्त जी बाजू आपल्याला दिसली नाही ती दाखवायची आहे. तु फक्त लवकर ये मी वाट पाहतेय." ती त्याला समजावत म्हणाली.
" मी पोहचतो. गावाजवळ आलो आहे. घरी साड्या ठेवून लागलिच नदीवर येतो." म्हणत त्याने फोन ठेवला.
आभाचा गोड चेहरा नजरेसमोर अवतरला. तिला भेटण्याच्या ओढीने त्याने गाडीचा वेग वाढवला. रस्ता मोकळा होता त्यामुळे गाडी सुसाट निघाली. मनावर आभाचा रंग चढला होता त्यामुळे म्युझिक सिस्टिमच्या सुरात त्याचा सुर आपसुकच मिसळला.
गाडी गावाच्या वेशीतून आत शिरणार तोच त्याच्या भरधाव गाडीच्या आड कोणी आडवं आलं. गाडीच्या वेगामुळे ती व्यक्ती उंच उडाली आणि जोरात गाडीवर आदळून रस्त्यावर कोसळली. यासगळ्यात श्रेयशचा प्राण कंठाशी आला. आपल्या हातून अपघात झाला आहे या जाणिवेसरशी तो गर्भगळीत झाला. स्वतःला कसेबसे सावरत त्याने क्षणातच गाडीचा ब्रेक दाबला पण तोपर्यंत जे घडायचं ते घडून गेलं होतं. गाडीतून उतरून तो बाहेर आला. तिथे रस्त्याच्या बाजूला तिघेजण जखमी अवस्थेत पडले होते. तो त्यांच्यापाशी धावणार तोच त्याला गाडीसमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती व्यक्ती दिसली. डोळ्यांसमोर अंधारी आली पण पुढच्याच क्षणी स्वतःला सावरत तो त्या व्यक्तीपाशी पोहचला. ती व्यक्ती अमित आहे हे कळताच त्याचं उरलं सुरलं अवसानही गळून पडलं.तो तसाच खाली कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमितला पाहून काळजातून आर्त आरोळी उठली.
" अमित, अमित..." म्हणत त्याने त्याचं रक्ताळलेलं डोकं आपल्या मांडीवर घेतलं.
दोन्ही हात रक्ताने भरले. डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. त्याने पुन्हा पुन्हा त्याला साद घातली. त्याच्या सादेला प्रतिसाद देत अमितने क्षणभर डोळे उघडले. डोळ्यांत मरण स्पष्ट दिसलं त्याला. ती त्याची निरवानिरवीची नजर श्रेयशला खूप काही सांगून गेली आणि दुसऱ्याच क्षणी अमितने डोळे मिटले. पुन्हा एकदा श्रेयशने त्याला साद घालायचा प्रयत्न केला पण यावेळेस तो अयशस्वी ठरला.तोपर्यंत कोणीतरी दुरुन धावत येतांना दिसलं.
" हे काय केलस ? पोराला मरणाच्या दारात लोटलस." म्हणत त्या गावकऱ्याने त्याच्यावर निशाणा साधला.
त्याच्या बोलण्यासरशी श्रेयश भानावर आला.
" अमितला दवाखान्यात न्यावं लागेल." म्हणत त्याने त्या व्यक्तीच्या मदतीने त्याला गाडीत बसवलं. तोपर्यंत अजून काही जणं त्या ठिकाणी येऊन पोहचले. अमितच्या मित्रांना किरकोळ लागले होते पण प्रचंड मानसिक धक्का बसल्याने त्यांनाही दुसऱ्या गाडीतून दवाखान्यात नेण्यात आले.
" काका, त्याला आवाज देत रहा.." गाडी चालवता चालवता श्रेयश म्हणाला.
त्यांनीही त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पण सगळच व्यर्थ होतं.
थोड्याच वेळात ते दवाखान्यात येऊन पोहचले. तातडीने डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये घेतले. स्वतःला सावरत श्रेयश तिथेच बाहेर येरझाऱ्या घालू लागला.
" बड्या बापाची औलाद. हातात गाडी मिळाली की बस विमानासारखी चालवतात. यांच्या चुकीची शिक्षा दुसऱ्यांना मिळते." सोबत आलेले गावकरी कुजबुजले.
त्यांच्या बोलण्याने श्रेयश गहिवरला.
" पोलिस येतच असतील. तेच बरोबर ठिकाणावर आणतील याला." कोणी एक गावकरी म्हणाला तसा श्रेयश आणखी घाबरला.
तोच आभाचे बाबा धावत पळत दवाखान्यात येऊन पोहचले.
" अमित...कुठे आहे माझं लेकरू ?" त्यांनी आर्त आरोळी दिली. त्यांच्या आरोळी सरशी श्रेयशच्या काळजात गहरी जखम झाली. तो तातडीने त्यांना सावरायला पुढे आला.
" बाबा.." म्हणत तो रडतच त्यांच्यापाशी पोहचला.
" आता काय रडून फायदा ? गाडीने त्याला उडवायच्या आधी विचार करायचा होता." म्हणत गावकऱ्याने पुन्हा एकदा त्याला खजील केले.
तो हात जोडत काही बोलणार तोच डॉक्टर बाहेर आले.
आभाचे बाबा त्यांच्या दिशेने वळले.
" डॉक्टर, माझा मुलगा ठिक आहे ना ?" ते अजीजीने म्हणाले. त्यांच बोलणं ऐकून डॉक्टरांचा चेहरा मात्र पडला. धीर एकवटून त्यांनी त्यांचा हात हातात घेतला.
" सॉरी, आम्ही तुमच्या मुलाला नाही वाचवू शकलो. इथे येण्याआधीच.." ते पुढचं काही बोलणार तोच आभाचे बाबा खाली कोसळले. गावकरी त्यांच्या भोवती गोळा झाले. इकडे श्रेयशची अवस्था बिकट झाली. त्याला काहीच कळेना. क्षणभर सारच शून्यातीत झालं. पुढे जाऊन आभाच्या बाबांना सावरावं याचं भानही उरलं नाही. डोळ्यांसमोर अमितची तीच निरवानिरवीची नजर येताच तो आणखी विचलित झाला. अश्रूंचा बांध फुटला. तिथेच कोपऱ्यात बसून तो ओक्साबोक्सी रडू लागला.
कोसळलेले आभाचे बाबा अमितच्या नावाने आक्रोश करू लागले. आपले दोन्ही हात डोक्यावर मारून घेत त्यांनी टाहो फोडला.
" देवा, माझ्या लेकाने काय असा गुन्हा केला होता ? जग बघायला आलेल्या माझ्या पाडसाला असा कसा घेऊन गेलास. मी जगून काय करू ? कोणत्या शब्दात त्याच्या आईला समजावू ? देवा माझा जीव घे पण माझ्या लेकराला..." म्हणत ते जोरजोरात रडू लागले.
आजूबाजूच्या सगळ्याच लोकांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. एका हतबल बापाला समजवण्याची हिंमत मात्र कोणालाच झाली नाही.जाग्यावरून उठत ते ऑपरेशन थिएटरच्या दिशेने धावले. त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. कोणालाही त्यांना अडविण्याची हिमंत झाली नाही. आत जाताच आपल्या तरुणताठ लेकराला मृत्यूच्या शय्येवर पाहून ते ओक्साबोक्सी रडू लागले. जवळ जात त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवून त्याला उठवू लागले.ते चित्रच एवढं हृदयद्रावक होतं की साक्षात परमेश्वरही अगतिक झाला असेल. काही तासांपूर्वी बहिणीच्या लग्नाची तयारी करणारा त्यांचा समजूतदार मुलगा त्यांना कायमचा सोडून गेला होता. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. लेकाच्या जीवावर भविष्याची स्वप्ने रंगवणाऱ्या बापाच्या डोळ्यांत दुःखाचा काळा रंग उरला होता.आत येत गावकऱ्यांनी त्यांना सावरलं.पोलिस केस झाली होती त्यामुळे मृतदेहाचं पोस्टमार्टम होणार होतं.थोड्याच वेळात पोलिसही आले.
" हाच दोषी आहे. यानेच अमितचा जीव घेतला. भरधाव गाडीने अमितला उडवलं." विचारणा करणाऱ्या पोलिसांना गावकरी म्हणाले. डॉक्टरांची भेट घेऊन पोलिसांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली आणि प्रत्यक्षदर्शीचा जवाब लिहून घेत मोर्चा श्रेयशकडे वळवला.कोपऱ्यात रडत बसलेला श्रेयश त्यांच्या समोर हात जोडून आर्जव करू लागला पण त्याचा काही एक फायदा झाला नाही.पोलिस त्याला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले. इकडे दुःखाचा डोंगर कोसळूनही आभाचे बाबा श्रेयशसाठी हळहळले. ते बाहेर येईपर्यंत पोलिस श्रेयशला घेऊन गेले होते.
इकडे पोलिस स्टेशनमध्ये आणल्यानंतर पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकले. डोळ्यांसमोरून अजूनही अमित सरत नव्हता.त्याची ती नजर त्याच्या काळजाला हात घालत होती. आभाची आठवण येताच तो आणखी गहिवरला. तिची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही त्याला जीवघेणी वाटली.नियतीने असा काही डाव साधला होता की क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
थोड्यात वेळात त्याचे आईबाबा पोलिस स्टेशनमध्ये पोहचले. सरपोतदार मॅडम धावतच श्रेयशपाशी पोहचल्या. तुरुंगाआड शून्यात नजर लावून बसलेल्या आपल्या काळजाच्या तुकड्याला पाहून त्या गहिवरल्या. आर्त स्वरात त्यांनी त्याला साद घातली. आईच्या आवाजाने तो ही भानावर आला. ओलेती नजर आईवर पडताच त्याने हुंदका दिला. उठून उभा राहत तो आईपाशी आला.
" आई, आपला अमित.." त्याला पुढचं बोलणं जड जात होतं.
" हो रे बाळा. सगळच वाईट स्वप्नाप्रमाणे वाटतय." म्हणत त्यांनी त्याच्या हातावरून हात फिरवला.
त्याचे रक्ताने माखलेले हात पाहून त्या आणखी गहिवरल्या.
" हे कसं काय झालं श्रेयश ? तु वेगाची मर्यादा कधीच ओलांडत नाहीस मग ?" त्या अगतिकतेने म्हणाल्या.
" काही कळायच्या आत तो गाडीवर कसा आणि कुठून येऊन आदळला कळलेच नाही. मी मुद्दामहून नाही केलं काही." तो रडत म्हणाला.
" मला माहित आहे तु मुद्दाम काहीच करणार नाहीस ते. आमचा विश्वास आहे तुझ्यावर. आभा आणि तिच्या आईवडिलांची अवस्था बिकट आहे. जीवघेणा खेळ मांडला आहे देवाने." म्हणत त्या रडू लागल्या.
तोच त्याचे बाबाही तेथे येऊन पोहचले.
" पोलिस सोडायला तयार नाहीत. त्याच्यांकडे श्रेयशविरुद्ध जवाब नोंदवला आहे गावकऱ्यांनी." त्याचे बाबा अगतिकतेने म्हणाले. तश्या सरपोतदार मॅडम पोलिसाकडे धावल्या.
" माझ्या लेकाने काहीच केलं नाही. मी तुम्हांला विनंती करते माझ्या लेकाला सोडा." म्हणत एक आई वेड्या आशेने पोलिसांना विनंती करू लागली.
" हे बघा ताई आमच्या हातात काहीच नाही. तुम्ही सावरा स्वतःला." म्हणत पोलिसांनी हात वर केले.
जगण्याची ही अशी परीक्षा देतांना दोघेही उमेद हरु पाहत होते. तुरुंगाआड लेकराला पाहून काळीज गलबलून येत होतं.
" आपला लेक फक्त तुरुंगाआड आहे तर आपली ही अवस्था आणि तिथे तर अमित.. नाही. मला माझ्या मित्राकडे जावे लागेल त्याला माझी गरज आहे." म्हणत श्रेयशचे बाबा उठून उभे राहिले.
" तुम्ही जा. मी आहे श्रेयशजवळ " त्याच्या आईनेही दुजोरा दिला.
इकडे पोलिस त्याला घेऊन तेथून निघून गेले आणि आभा तिथे पोहचली. प्रसंगच एवढा भयानक होता की सावरणं अशक्यच. पाठचा भाऊ ज्याच्यावर तिची आईची माया होती तो तिला कायमचा सोडून गेला होता आणि तो ही तिच्या श्रेयशमुळे.सभोवताली फक्त अन् फक्त दुःखाचा महापूर आला होता.
गावकऱ्यांचे श्रेयश विरुद्धचे शब्द तिचे काळीज पिळवटून काढत होते. ज्याच्या सोबतीने आयुष्यात सुखाचे रंग येणार होते आज त्यानेच तिच्या रंगीत आयुष्याची माती केली होती. आपल्या बाबांच्या गळ्यात पडून ती ओक्साबोक्सी रडत होती.
" आभा, तु थांब इथे. मला पोलिस स्टेशनमध्ये जावे लागेल. मी केस मागे घेतल्याशिवाय पोलिस त्याला सोडणार नाहीत." ते उठून उभे राहत म्हणाले.
" बाबा..." अगतिकतेने म्हणत ती त्यांना गच्च बिलगली आणि रडू लागली.
" तुझं डोकं ठिकाणावर आहे का ? ज्या मुलाने आपल्या अमितला मारलं त्यालाच वाचवायला निघाला आहेस ?" गावातील कोणी एक म्हणालं.
" मी आधीच सांगत होतो बाहेरच्या लोकांवर अतिविश्वास ठेवू नको. इथे याने तर त्यांना डोक्यावरच बसवलं. कोण कुठले ते त्यांच्या मुलासोबत मुलीचं लग्न लावून द्यायला निघाला. त्यांनी चांगलच पांग फेडले तुझ्या उपकाराचे. अजूनही वेळ गेली नाही सावध हो. त्या श्रेयशला त्याच्या कर्माची शिक्षा मिळू दे." दुसरा एकजण म्हणाला.
" त्या दिवशी नदीवर त्याने आपल्या अमितला जीवे मारण्याची धमकी दिली होती. शेवटी त्याने ती खरी करून दाखवलीच." म्हणत एकाने मोठा गौप्यस्फोट केला. पुन्हा एकच कुजबुज उठली.
" तुम्ही शांत व्हा. हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मी माझा एक लेक गमावला आहे आणि आता दुसरा.." म्हणता म्हणता ते शांत झाले. पुढच्याच क्षणी मघाशी पोलिसांना जवाब दिलेल्या गावकऱ्याला घेऊन ते दवाखान्याबाहेर पडले.
ते निघून गेले पण लोकांचे बोलणे आभाला कातर करत होते.
" आभा, स्पष्टच सांगतो तुला त्यांच्याशी संबंध ठेवायचा असेल तर गावकऱ्यांशी तुमचा संबंध कायमचा संपला. गावातील अजून तिघांनाही त्याने जखमी केले आहे. नशिब बलवत्तर म्हणून ते वाचले पण मानसिक धक्कातून कसे सावरतील माहित नाही. तो श्रेयश आमच्या समोर आला तर त्याचा जीव घ्यायला आम्ही कमी करणार नाही." एकजण रागाने म्हणाला.इतरांनीही त्याच्या सादेला प्रतिसाद दिला.
आभाला काहीच सुचेनासे झाले होते. आयुष्यभराचा तिचा भाऊ आता तिला कधीच भेटणार नव्हता. गावकऱ्यांच्या अश्या बोलण्याने तिच्या दुःखाची व्याप्ती मर्यादेपलिकडे गेली.ती बेशुद्ध होऊन तिथेच कोसळली. गावकऱ्यांनी तिला आधार देत सावरले. डॉक्टरांना बोलावण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर ती शुद्धीवर आली पण भान मात्र हरवून बसली. गावकऱ्यांचे श्रेयश विरुद्धचे शब्द गरळीगत तिच्या मनाच्या गाभाऱ्यात साचू लागले.
इकडे सरपोतदार सर हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पोलिस स्टेशनबाहेर पडतच होते की आभाचे बाबा पोलिस स्टेशनमध्ये येऊन पोहचले. त्यांना पाहून श्रेयशच्या बाबांनी हात जोडत मुकपणे त्यांची माफी मागितली. रडत रडत आभाच्या बाबांनी त्यांना मिठी मारली. न बोलताही दोघे खूप काही बोलून गेले. भानावर येत आभाच्या बाबांनी त्या मिठीतून स्वतःला सोडवले आणि आत पोलिस स्टेशनमध्ये आले. तुरुंगाआड श्रेयशला पाहून पुन्हा एकदा अगतिकतेने परिसीमा गाठली. बाजूला रडत बसलेल्या सरपोतदार मॅडमना पाहून मनात चलबिचल झाली. सगळीच समीकरणे क्षणात बदलली होती. हतबल झालेला अभागी बाप अजूनही आपल्या मानस मुलाचा विचार करत होता.
पोलिसांना भेटून त्यांनी श्रेयश विरुद्धची केस मागे घेतली. त्या प्रत्यक्षदर्शीनेही आपला जवाब फिरवला. परिणामी पोलिसांना ती केस मागे घ्यावी लागली आणि श्रेयशला सोडून द्यावे लागले.कागदोपत्री सर्व फॉरमॅलिटी पूर्ण करून लागलिच आभाचे बाबा आल्यापावली परतही गेले.
इकडे पोलिसांनी श्रेयशला सोडून दिले.
" यावेळेस वाचलाय पण पुढच्या वेळेस गय केली जाणार नाही. तुझ्या चुकीची शिक्षा त्या आईवडिलांना आयुष्यभर भोगावी लागणार आहे." म्हणत पोलिसांनी त्याला सक्त ताकीद देऊन सोडले. एवढं होऊनही आभाच्या बाबांनी माणुसकी जपली होती, त्यांची मैत्री जपली होती. श्रेयशला मात्र आभाला भेटण्याची आस लागली होती. तिला, तिच्या आईवडिलांना सावरण्यासाठी त्याचं तिथे असणं गरजेचं होतं पण त्यांचाच अपराधी होऊन त्यांना कसे सामोरे जायचे ही विवंचना त्याला छळत होती. पोलिस स्टेशनबाहेर पडताच हातावर आणि कपड्यावर लागलेल्या रक्ताच्या डागांनी त्याला तो खुनी असल्याची जाणिव करून दिली. भान हरपून तो पाणी शोधू लागला. त्याला असे पाहून त्याची आई अगतिकतेने त्याला सावरू लागली. शेवटी पाण्याची बाटली हाती लागताच तो शांत झाला. ती उघडून त्याने त्या पाण्याने कपड्यावरचे डाग काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
त्याला असे सैरभैर पाहून सरपोतदार मॅडमने त्याच्या हातून ती पाण्याची बाटली खेचून घेतली.
" श्रेयश, सावर स्वतःला. बाळा शांत हो आधी." म्हणत त्यांनी त्याला जवळ घेतले. तिथेच त्यांच्या कुशीत शिरुन तो ओक्साबोक्सी रडू लागला.
क्रमश:
©® आर्या पाटील