# तु असा जवळी रहा...( भाग ४२ वा)
©® आर्या पाटील
कसेबसे सावरत सरपोतदार मॅडमनी श्रेयशला गाडीत बसवले. आत बसताच ती अपघाताची घटना त्याला पुन्हा एकदा पुरती पोखरू लागली. आईच्या कुशीत लहान लेकरागत शिरत त्याने डोळे गच्च मिटले. श्रेयशचे बाबा मात्र त्यांच्या सोबत न जाता दुसऱ्या गाडीने हॉस्पिटलकडे निघून गेले.
पुन्हा एकदा आपल्या दुःखाला जवळ करत आभाचे बाबा लेकापाशी पोहचले. आभाच्या आईला अजून काहीही कळलं नव्हतं.देवघरात बसून त्या एकसारख्या देवाचा धावा करत होत्या. जमलेल्या बायकांना त्यांना काहीही सांगण्याची हिंमत नव्हती.
हॉस्पिटलमध्ये रडणाऱ्या आभाला तिच्या बाबांनी सावरलं आणि पुढच्याच क्षणी तिचा आधार घेत तेच ढसाढसा रडू लागले. त्यांच दुःख एवढं मोठं होतं की कोणालाही पुढे येऊन त्यांचे सांत्वन करण्याची हिमंत होत नव्हती. त्यांचं भविष्य मरणाची सीमारेषा ओलांडून काळाआड झालं होतं. याहून अजून कोणतं मोठं दुःख असणार होतं त्यांच्या आयुष्यात ? डोळ्यांसमोर वाढलेलं आपलं लेकरू असं अचानक आयुष्यातून निघून जाणं यापेक्षा मोठा धक्का कोणता असणार होता ? दारी लेकीच्या लग्नासाठी सजलेल्या मांडवातून लेकाची अंत्ययात्रा काढावी लागणार होती यापेक्षा आणखी दुर्दैव कोणते असणार होते ? ज्याच्यासोबत लेकीची साताजन्माची गाठ बांधली जाणार होती आज त्याच्यामुळेच लेकाची आयुष्यगाठ कायमची तुटली आहे यापेक्षा भयानक वास्तव अजून कोणतं असणार होतं ?
दवाखान्यातील साऱ्या फॉरमॅलिटी पूर्ण केल्यानंतर अमितचा मृतदेह त्यांच्या ताब्यात मिळणार होता. तिथेच एका बाकड्यावर बसून आभा आणि तिचे वडिल हतबल होऊन बसले होते. डोळ्यांतील अश्रुधारा थांबत नव्हत्या.
गावकरी आधार बनून त्यांच्या सोबत होते. तोच सरपोतदार सर दवाखान्यात आले. आपली जड झालेली पाऊले उचलत ते आभाच्या वडिलांजवळ पोहचले.
त्यांना असे दवाखान्यात पाहून गावकरी मात्र कमालीचे संतापले. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या अमितच्या एका मित्राच्या वडिलांनी समोर येऊन त्यांना तिथेच थांबण्याचे संकेत दिले.
" तुमची हिंमत कशी झाली इथे येण्याची ? तुमच्या मुलाने अमितचा जीव घेतला आहे. माझ्या मुलाला काही झाले तर तुमच्या मुलाचा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. आताच्या आता इथून निघून जा." ते चवताळत म्हणाले.
" मला फक्त एकदा माझ्या मित्राला भेटू द्या. त्यांना गरज आहे माझी." ते कळवळून म्हणाले.
" गरजेला उपयोगी पडलेल्या या देवमाणसाचे उपकार चांगलेच फेडलेत तुमच्या मुलाने. आणखी उपकार नका करू त्यांच्यावर. आम्हांला धक्काबुक्की करायला भाग पाडू नका. शिक्षक आहात त्याची इज्जत करतो नाहीतर कधीच.." शर्टाच्या बाह्या वर करत एक गावकरी म्हणाला.
त्याचे उग्र रुप पाहून आभा पुढे आली.
" सर तुम्ही प्लिज इथून निघून जा. मी समर्थ आहे बाबांना सांभाळायला." ती त्यांच्यासमोर हात जोडत म्हणाली.
" बेटा पण.." ते पुढे काही बोलणार तोच एकाने त्यांचा हात पकडला.
" तुम्हांला सांगितलेलं कळत नाही का?" तो अंगावर येत म्हणाला.
तसे बाकड्यावर बसलेले आभाचे बाबा उठून त्यांच्याजवळ आले.
" खबरदार जर त्यांना कोणी हात लावाल तर. माफ करा सर पण तुम्ही इथून निघून जा. गावकरी चिडले आहेत." ते हात जोडत म्हणाले.
" तुम्ही हात नका जोडू. आम्ही गुन्हेगार आहोत तुमचे. माफ करा." म्हणत त्यांनी हात जोडले.
" एवढं कळतं ना ? मग निघा आताच्या आता." परत एकदा सगळेच आक्रमक झाले.
" सर तुम्ही निघा." आभाही हात जोडत म्हणाली.
त्यांचा नाईलाज झाला. भरल्या हृदयाने त्यांनी आपल्या मित्राकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यांतील दुःख हृदय आणखी कातर करून गेलं. अपराधीपणाचं दुःख सरळ वर्मी बसलं. श्वास गुदमरू लागला. स्वतःला सावरत ते तसेच बाहेर पडले.
" मुलाला चांगले संस्कार दिले असते तर असा दुसऱ्या निरपराध मुलाचा जीव घेतला नसता." जाता जाता कोणा एकाचे शब्द त्यांच्या वर्मावर घाव घालून गेले. जाणारा तोल सावरत त्यांनी कशीबशी गाडी गाठली आणि ते तिथून निघून गेले.
इकडे दवाखान्यात गावकरी आभाच्या बाबांवरही रागावले.
" आभा, जर तुम्हांला अजूनही त्यांच्यासोबतच नातं निभावायचं असेल तर आम्ही कोणीही तुमच्या सोबत नसू." एकजण सगळ्यांचे प्रतिनिधित्व करत म्हणाला.
" आभाचं लग्न ठरलय श्रेयशसोबत.." ते भरल्या नजरेने म्हणाले.
" अजूनही सुधारत नाहीस तु. आता तरी शहाणा हो आणि लेकीला त्या दलदलीत नको टाकूस. ज्याने भावाला मारलं त्याच्यासोबत संसार करायला लावणार आहेस का पोरीला ?" दुसरा तेवढ्याच त्वेषाने म्हणाला.
त्याचे शब्द दोघांच्याही जिव्हारी लागले.आभा तशीच मागे वळली आणि तोंडावर हात ठेवून बाकड्यावर बसली. सगळच संपलं होतं जणू तिच्यासाठी.
" बाळा, तु शांत हो. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस." तिचे बाबा तिच्या डोक्यावर हात फिरवीत म्हणाले.
" बाबा, काय चुकीचं म्हणाले ते ? कसा करू संसार मी त्याच्यासोबत.माझ्या अमितचा जीव.." बोलता बोलता तिला अश्रू अनावर झाले.
" जर त्यांच्याशी संबध ठेवायचा असेल तर गावातील कोणतीच व्यक्ती तुमच्या सोबत नसेल. तो श्रेयश जर समोर दिसला तर त्याला मारायला मागेपुढे पाहणार नाही आम्ही.इतकच काय पण अमितच्या प्रेताला खांदा द्यायला.." एकजण बोलत होता की आभाने त्याला शांत केले. प्रत्येक शब्द तिचं काळीज पोखरत होतं
" प्लिज शांत व्हा काका. निदान आता तरी असं नका बोलू. आमच्यावर जी वेळ आली आहे ती शत्रूवरही न यावी. आम्ही नाही ठेवणार संबंध त्यांच्यासोबत पण असं बोलू नका." ती रडत म्हणाली.
" आभा, आम्हांला कळतय तुमचं दुःख पण सरपोतदारांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे. तुम्ही भलेही केस मागे घेतली असेल पण आम्ही त्या श्रेयशला कधीच माफ करणार नाहीत. गावातल्या मुलाचा जीव घेतला आहे त्याने. बाकीचे तिघेही जबर धक्क्यात आहेत. काहीही बोलत नाहीत." गावकरी म्हणाला.
गावकऱ्यांच्या मनात खूप राग भरला होता. रागाच्या भरात ते श्रेयशला काहीही करू शकतात या जाणिवेने आभा पुन्हा एकदा घाबरली. या सगळ्यात कधी रात्र झाली कळलेच नाही. आयुष्यच काळरात्र झालेल्या त्या दोघांना आता कसलीच शुद्ध उरली नव्हती.अमितचं रुप डोळे भरून पाहता यावं एवढीच काय ती मनाला आस लागली होती
इकडे डॉक्टरांनी सगळी फॉर्मलीटी करून अमितचं पार्थिव त्यांच्या ताब्यात देता देता सकाळचे सहा वाजले.सफेद कपड्यात गुंडाळलेल्या लेकाला पाहून आभाच्या बाबांचा धीर सुटला आणि ते पुन्हा एकदा ओक्साबोक्सी रडू लागले. गावकऱ्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला पण ते पुन्हा एकदा अयशस्वी ठरले. अमितच्या चेहऱ्यावरून हात फिरवीत आभा त्याला साद घालू लागली. एका बहिणीची ती साद सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आणती झाली. त्या दोघांना सावरत गावकऱ्यांनी त्यांना अमितच्या पार्थिवासोबत ॲम्ब्युलन्समध्ये बसवले.
त्यांची ओलेती नजर अमितच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती. गावाच्या वेशीजवळ येताच काल घडलेला तो जीवघेणा अपघात काळी आठवण बनून सगळ्यांचं काळीज पोखरता झाला. गाडी जशी जशी घराकडे जात होती तशी तशी आभा मनाला आणखी खंबीर बनवत होती. आईसाठी तिला खंबीर व्हावच लागणार होतं. अमितला तर गमावलं होतं पण आईला नव्हतं गमावायचं . आभाची आईही रात्रभर तशीच देवासमोर बसून होती.
काल संध्याकाळी घरी आल्यानंतर सरपोतदार मॅडमनी त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला पण गावातीत बायकांनी त्यांना विरोध केला. माघारी आलेल्या सरपोतदार सरांनी त्यांना समजावले परिणामी त्या पुन्हा घरी आल्या. श्रेयशची अवस्थाही खूपच बिकट होती. जिवंत असूनही तो मरणयातना सहन करत होता. कपड्यावर लागलेले अमितच्या रक्ताचे डाग त्याला जगणं नकोसे करत होते. सारखा सारखा त्याला त्याच अपघाताचा भास होत होता. प्रयत्न करूनही अमितचा चेहरा दृष्टीआड होत नव्हता. लहान बाळ होऊन तो सरपोतदार मॅडमच्या कुशीत शिरला होता. भीतीने शहारलेल्या लेकराला पाहून त्यांचाही जीव कासावीस होत होता. मधेच ' मी नाही मारलं त्याला' म्हणत दचकून उठणाऱ्या श्रेयशला पाहून सरपोतदार सरही हतबल झाले होते. ती रात्र त्यांच्यासाठीही जीवघेणी होती.
ॲम्ब्युलन्सचा आवाज कानाच्या कानठळ्या बसवत होता. त्या आवाजासरशी सरपोतदार मॅडम सावध झाल्या.
" श्रेयश, आभाला गरज आहे तुझी. तिच्या आईवडिलांना सावरावं लागेल आपल्याला. तु असा नाही वागू शकत तिच्यासोबत. उठ आणि तिच्याजवळ जा." गर्भगळीत झालेल्या श्रेयशला समजावत त्या म्हणाल्या.
" आई, कोणत्या तोंडाने जावू तिच्यासमोर. अमितला मारलय मी." म्हणत तो पुन्हा रडू लागला.
" आभाही मरत असेल रे आतून तिला सावरावं लागेल. एकटी पोर कसं सांभाळेल सगळं ?" श्रेयशचे अश्रू पुसत त्या म्हणाल्या.
आभाची आठवण येताच तो आणखी गहिवरला.
" तिला काही झालं तर मी ही मरेन." तो बोलतच होता की मॅडमने त्याला थांबवले.
" श्रेयश, तु तिच्यासोबत रहा. आता फक्त एवढच आपल्या हातात आहे." त्यांनी पुन्हा एकदा त्याला समजावले.
अश्रू पुसत त्यानेही मनाला खंबीर केले. आभासाठी तो उठला.
ॲम्ब्युलन्स आभाच्या दारात येऊन थांबली. घराबाहेर आधीच गावकऱ्यांनी गर्दी केली होती. आभाची आई या सगळ्यापासून अलिप्त राहून देवाचा धावा करत होती. गाडीतून उतरत आभा आत आईजवळ पोहचली. तिला पाहताच त्या वेगाने तिच्याजवळ सरसावल्या.
" ताई, आपला बाबू बरा आहे ना ? तुझ्यासोबत आला आहे का? माझा बाप्पा मला कधीच निराश करणार नाही मला माहित आहे." त्या भाबडेपणाने बोलत होत्या.
त्यांच्या या प्रश्नाने आभा मात्र पुरती अगतिक झाली. त्यांच्या गळ्यात पडून ती ओक्साबोक्सी रडू लागली.
" यावेळेस नाही ऐकलं आपलं बाप्पाने आई. आपला अमित गेला गं आपल्याला सोडून." ती रडत म्हणाली.
" कुठे गेला ? त्याला अशी कशी जाऊन देईन ? तो म्हणाला होता एकदा इंजिनियर झालो की कुठेच जाणार नाही आपल्याला सोडून म्हणून. तुझ्या लग्नाची तयारी सोडून तो कुठे गेला?" म्हणत त्या तिच्या मिठीतून सुटू पाहत होत्या.
" आई अमित गेला गं.. गेला. कायमचा गेला. आता कधीच परत येणार नाही." आभाने टाहो फोडला.
" वेड्यासारखी काय बोलत आहेस ? माझा बाबू आता येईल बघ. सकाळी आल्या आल्या त्याला भाकर लागते. मी पटकन बनवते." म्हणत त्या तिच्या मिठीतून बाजूला झाल्या. तोच अमितचं शव घरात आणण्यात आलं. सोबत त्याचे बाबा ओक्साबोक्सी रडतांना पाहून त्या जाग्यावरच खिळल्या.
" आई, गेला गं आपला बाबू." म्हणत आभाने त्यांना सावरले.
तश्या त्या तंद्रीतून बाहेर आल्या. धावत जात त्यांनी अमितच्या पार्थिवाला मिठी मारली.
" माझ्या पाडसा, उठ ना रे माझ्या लेका. असा कसा निजलास तू. तुझी आई कधीची वाट पाहते." म्हणत त्यांनी आर्त आरोळी घातली. त्यातली आर्तता एवढी भीषण होती की प्रत्यक्ष देवही रडला असेल.
जन्म दिलेल्या लेकाला मृत्यूच्या शय्येवर पाहून एका आईची काय अवस्था होत असेल ही कल्पनाही असह्य वाटते. त्याला हृदयाशी कवटाळून त्या आर्ततेने रडत होत्या.
" देवा, माझे प्राण काढून घे आणि माझ्या पाडसाला जीवदान दे.." असे म्हणता म्हणता त्यांची छाती भरून आली आणि त्या बेशुद्ध झाल्या. आभा आणि तिचे बाबा घाबरले. आधीच एक जीव गमावला होता आता आईला नव्हतं गमावायचं.आभाने त्यांना आधार दिला. कोणीतरी एकीने कांदा आणून त्यांच्या नाकाजवळ धरला. त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडण्यात आले तश्या त्या शुद्धीवर आल्या. तोच बाहेर हा कल्ला माजला.
" त्याला जिवंत मारा. आपल्या पोराचा जीव घेऊन इथे येण्याची हिमंत कशी झाली त्याची ?" कोणीतरी ओरडले. तशी आभा सावध झाली. श्रेयश बाहेर आला आहे हा अंदाज बांधत ती बाहेर आली. गावातील लोकांनी त्याच्या दिशेने दगड भिरकावला होता. डोक्याला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तोच एकाने पुढे येऊन त्याची कॉलर पकडली.
श्रेयशला अश्या अवस्थेत पाहून आभा घाबरली. गावकरी त्याचा जीव घ्यायला मागेपुढे पाहणार नाहीत याची तिला खात्री होती. त्याला वाचवणे फक्त तिच्या हातात होते. ती तशीच पुढे आली. गावकऱ्याचा हात त्याच्या कॉलरवरून काढत तिने सगळ्यांसमोर श्रेयशच्या कानशिलात लगावली.
" तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची ? माझ्या आयुष्याला लागलेलं सगळ्यात मोठं ग्रहण आहेस तु. माझ्या भावाचा खून केलास. भलेही जग तुला माफ करेल पण मी कधीच तुला माफ करणार नाही.शेवटी त्याचा जीव घेऊन प्रतिशोध घेतलासच. त्याच्यासोबत फक्त दुश्मनीच निभावलीस. आता तुझी दुश्मनी माझ्यासोबत असेल. तुझ्यावर जेवढं प्रेम केलं त्याच्या दुप्पट तुझा तिरस्कार करते मी. तुझ्यासोबतच नातं संपलं अमितसोबत.लग्न तर लांबची गोष्ट पण मला उभ्या आयुष्यात तुझं तोंडही पाहायचं नाही. निघून जा माझ्या आयुष्यातून कायमचा नाहीतर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करेन.." ती पुढचं काही बोलणार तोच श्रेयशने हात जोडले.
तिच्या प्रत्येक शब्दाने त्याचा क्रित्येकदा जीव घेतला. तिची जीव देण्याची भाषा त्याला कायमचं शांत करून गेली. तिनं तोडलेलं नातं हिच आपली शिक्षा असं मानून तो माघारी वळला. तिच्या जीवाच्या भीतीने पुन्हा परतून पाहण्याची हिंमतही झाली नाही त्याची. डोक्याला झालेल्या जखमेपेक्षा मनाला झालेली जखम एवढी खोल होती की ती आजतागायत भरून आली नव्हती.
भूतकाळात हरवलेल्या श्रेयशच्या डोळ्यांसमोर आजही तो दिवस जसाच्या तसा आठवला. मंदारचा अपघात त्याला पुन्हा एकदा त्याच भूतकाळात घेऊन गेला. वेळेची खपली निघाली आणि ती गहरी जखम पुन्हा एकदा रक्ताने भळाभळा वाहू लागली.
तोच त्याचा शोध घेत आभा तिथे येऊन पोहचली. मंदारच्या अपघाताला तो जबाबदार नव्हता हे जेव्हा तिला कळालं तेव्हा त्याची माफी मागण्यासाठी म्हणून ती त्याच्याकडे आली होती. दवाखान्याबाहेर कोपऱ्यात एका बाकड्यावर हातांच्या ओंजळीत तोंड लपवून बसलेला श्रेयश तिला दिसला. जड पावलांनी ती त्याच्याजवळ पोहचली.
" श्रेयश, तु ठिक आहेस का ?" म्हणत आभाने त्याला साद घातली. भूतकाळात रमलेला तो तिच्या आवाजाने आणखी गहिवरला. ओंजळीतून चेहरा काढत तो आशेने मागे वळला. ती त्याच्या खूप जवळ होती. काही कळायच्या आत त्याने तिच्या कमरेभोवती हात लपेटले आणि तिला घट्ट मिठी मारली. त्या मिठीतील आर्तता अश्रू बनून त्याच्या डोळ्यांतून ओघळू लागली.
" आभा, मी नाही मारलं अमितला ? मी कोणताच प्रतिशोध घेतला नाही ? तो गाडीसमोर कसा आला कुठून आला काहीच कळलं नाही ?" रडत रडतच तो म्हणाला.
त्याचे असे अचानक वागणे तिला स्तब्ध करून गेले. त्याच्या स्पर्शाने अगतिकतेची स्पष्ट लकेर तिच्या चेहऱ्यावर उमटली. आज क्रित्येक वर्षांनी ती त्याला भावनिकतेने अनुभवत होती.
त्या दिवशीचा डोक्याला जखम झालेला, मान खाली घालून माघारी गेलेला श्रेयश तिलाही आठवला. त्या दिवशी कठोर झालेली ती आज मात्र मेणासारखा वितळली. आजूबाजूच्या परिस्थितीचा विसर पडला. जग दोघांपुरतं उरलं. नकळत तिने त्याच्या डोक्यावर अलवार स्पर्श केला. त्या मायेच्या स्पर्शासरशी त्याने आपली मिठी आणखी घट्ट केली. तसे तिने स्वतःला सावरले.
क्रमश:
©® आर्या पाटील