# तु असा जवळी रहा..( भाग ४३ वा)
©® आर्या पाटील
"श्रेयश, तुम्ही ठिक आहात ना ?" म्हणत त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला.
तसा तो ही भानावर आला. मघापासून भूतकाळात रमलेल्या त्याला वास्तवाची जाणीव झाली. ज्या चुकीची शिक्षा तो आजतागायत भोगतोय त्याच्या माफीसाठी तो आर्जव करत होती ही जाणीव त्याच्यासाठी भावनिक ठरली. तिच्या भोवतीची मिठी सोडत तो उठून उभा राहिला. तोंड दुसऱ्या दिशेला फिरवत त्याने डोळे टिपले.
" आय ॲम सो सॉरी मिसेस कर्णिक. मी हे असं वागायला नको होतो." तो मान खाली घालत म्हणाला.
त्याच्या बोलण्याने ती ही बैचेन झाली.
" मला बोलायचं होतं तुमच्याशी." विषय सावरत ती म्हणाली.
" बोला." तो अजूनही पाठमोराच होता. मघाशी तिने लगावलेली चपराक आठवत तो शांततेत म्हणाला.
तिलाही तिने लगावलेल्या त्या चपराकीची आठवण झाली. यावेळेस आपण चुकलो. त्याची बाजू न ऐकताच त्याला अपराधी बनवलं ही भावना आभाला छळू लागली.
" आय ॲम सॉरी श्रेयश. मघाशी मी खूप चुकीचं वागले तुझ्याशी. तुझी काही चुकी नसतांना मंदारच्या अपघातासाठी तुला जबाबदार मानून मोकळी झाले. किंबहुना तुझ्यावर हात उगारला." ती खाली मान घालत म्हणाली.
तो अजूनही पाठमोराच होता.
" खरच मला माफ कर. मी खूपच चुकीचे वागले." म्हणत तिने हात जोडले.
तसा तो तिच्या दिशेने वळला. हात जोडून उभ्या असलेल्या तिला पाहून तो अगतिक झाला.
" तुमची चुकी नाही. पहिला संशय हा अपराधी व्यक्तीवरच जातो.मी तर मोठा गुन्हा गेला आहे आणि आयुष्यभर त्या गुन्ह्याची शिक्षा भोगत राहणार आहे." तो भरल्या नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला.
तशी तिने नजर वर केली. त्याच्या ओलेत्या नजरेत पाहतांना तिला गहिवरून आले.
त्या दिवशी गावकऱ्यांनी मारलेल्या दगडाने जखमी झालेला श्रेयश तिला आठवला. त्याच्या लगावलेली चपराक तिच्या काळजाला भेदून गेली. दुसऱ्याच क्षणी तिने डोळे गच्च मिटले. श्रेयशचे बदलले आयुष्य डोळ्यांसमोर तरळले आणि ती भावनिक झाली.
" श्रेयश आय ॲम सॉरी. मी चुकीचा विचार केला. स्वतःला दोष नको देऊस.आपल्या आयुष्यात घडलं तेच आपलं प्रारब्ध होतं." बोलतांना तिचा स्वर बदलला.
" पण या प्रारब्धाने आयुष्यच उद्धवस्त केलं.आता पुन्हा जगणे नाही." तो निराश होत म्हणाला.
" प्लिज मला माफ कर. मी मघाशी तुझ्यासोबत जे काही वागले त्याच्यासाठी सॉरी." तिने पुन्हा एकदा माफी मागितली.
" तुम्ही मनाला नका लावून घेऊ.मला सवय आहे या साऱ्याची." तो पुन्हा हळहळला.
" श्रेयश, प्लिज मी हात जोडून माफी मागते." ती अगतिक होत म्हणाली.
" मंदार, ठिक आहेत ना ?" तिची अगतिकता ओळखून त्याने विषय बदलला.
" हो, तो ठिक आहे." मनावरचा भार सुसह्य झाल्यागत ती म्हणाली.
तोच आभाचे बाबा तिला शोधत बाहेर आले.श्रेयशला आभासोबत पाहून त्यांचाही जीव घुटमळला. मघाशी श्रेयशसोबत आभा जे वागली होती ते पाहून त्यांनाही वाईट वाटलं होतं. त्यांचा हळवा दृष्टीक्षेप आपल्यावर पडताच श्रेयशने डोळे टिपले. तसे ते ही सावरले.
" आभा, डॉक्टरांनी ही औषधे सांगितली आहेत मंदाररावांसाठी. मी आलोच घेऊन तु त्यांच्यासोबत थांब." ते म्हणाले.
तशी आभाही सावरली. पुढचं काही बोलणार तोच श्रेयश पुढे आला.
" बाबा, द्या इकडे मी घेऊन येतो." तो म्हणाला.
" श्रेयश, मी आणतो. तु घरी जा. केव्हापासून इथे आहेस." बाबा काळजीने म्हणाले.
" काही हरकत नाही. मंदारसाठी मी नक्कीच एवढं करू शकतो पण मिसेस कर्णिक मी औषधे आणली तर चालतील ना ?" तो नजर खाली घेत विचारता झाला.
आभाचं काळीज कातर झालं. आपल्या वागण्याचा पुन्हा एकदा पश्चाताप झाला. डोळे भरून आले. ओलेत्या नजरेने त्याच्यावर कटाक्ष टाकत तिने मानेने होकार दिला.
" मी आलोच." म्हणत तो लगेच तिथून निघून गेला.
तो निघून जाताच हळवी झालेली आभा मात्र तिच्या बाबांच्या कुशीत शिरली.
" बाबा, मी मघाशी चुकले. विचार न करता श्रेयशवर नको नको ते आरोप केले." ती रडत म्हणाली.
आभाचे बाबाही तिच्या रडण्याने हळवे झाले.
" शांत हो बाळा. श्रेयशने खूप सहन केलय. त्याच्यावर तेव्हाही अन्याय झाला आणि आताही." तिच्या डोक्यावरून हात फिरवीत ते म्हणाले.
तशी ती चमकली. त्यांच्या कुशीतून बाहेर पडत तिने डोळे टिपले.
" बाबा, मंदारकडे जाते तो एकटाच आहे." म्हणत तिने तेथून पळवाट काढली खरी पण मनातून बाबांचे बोलणे काही केल्या निघायला तयार नव्हते. श्रेयशचा चेहरा डोळ्यांसमोर सारखा तरळत होता. आठवणींचा आधार घेत ती मंदारच्या खोलीत पोहचली. भूतकाळात हरवलेली ती मंदारला पाहून भानावर आली.
तशीच धावत जात ती मंदारपाशी पोहचली. त्याच्या कुशीत शिरून मनसोक्त रडावं अशी मनानी आस धरली. तिच्या चेहऱ्यावरचा बदललेला भाव मंदारच्या डोळ्यांतूनही लपला नाही.
" आभा, काय झालं गं ? बोललीस का श्रेयशसोबत ? ते ठिक आहेत ना ?" एका दमात त्याने सगळे प्रश्न विचारले.
श्रेयशचा विषय निघताच ती आणखी अगतिक झाली. बाजूला बसत तिने मंदारचा हात हातात घेतला.
डोळ्यांतून अश्रू ओघळले. तिच्या डोळ्यांतील अश्रू मात्र मंदारला बैचेन करून गेले.
" ये वेडाबाई, काय झालं ? का रडतेस ?" तिच्या हातातून आपला हात बाजूला काढत त्याने तिचे डोळे टिपले.
तिने मानेनेच नकार दर्शवला.
" मग का अशी रडतेस ? श्रेयश काही बोलले का ?" त्याने पुन्हा प्रश्न केला.
श्रेयशचा विषय तिला कातर करत होता.
तिने पुन्हा मानेने नकार दिला.
" अगं मग नक्की काय झालं आहे ? आभा, बोल. माझा जीव टांगणीला लागला आहे. तुला असं रडतांना पाहून वाईट वाटत आहे. " तो आणखी बैचेन होत म्हणाला.
त्याची काळजी पाहून तिने डोळे टिपले.
" तुम्ही नका काळजी करु. मी ठिक आहे. मी विचार न करता श्रेयशना खूप जास्त बोलले त्याचेच वाईट वाटले. त्यांची माफी मागितली पण तरी मनावरचा भार हलका होत नाही." ती हळवी होत म्हणाली.
" ये वेडाबाई, तु सॉरी म्हणालीस ना मग का एवढा विचार करत आहेस. श्रेयश खूप चांगले आहेत त्यांनी मनापासून तुला माफ केले असेल. नको त्रास करून घेऊस." म्हणत त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
" मी खूप चुकीचे वागले रे त्यांच्यासोबत." ती पुन्हा रडकुंडीला आली.
" चुकीचं तर वागलीस पण ती चुक तुला उमगली हे सर्वात जास्त महत्त्वाचं आणि त्यासाठी तु त्यांची माफीही मागितलीस. त्यांनी नक्कीच तुला माफ केलं असणार. मनाने खूप चांगले आहेत ते. आपली चुकीची क्षमा मागणे आणि क्षमाशीलपणे दुसऱ्याला माफ करणे यासाठी मोठं मन लागतं. तुम्हां दोघांकडे ते आहे." तो म्हणाला.
त्याचा प्रत्येक शब्द तिला हळवा करून गेला. बसल्याजागी ती त्याच्या कुशीत शिरली. डोळ्यांतील अश्रूंना त्याच्या सहवासात रितं करीत ती गहिवरली.
" आभा, किती गं हळवी तु ? मी बोलतो श्रेयश सोबत. मनाला नको लावून घेवूस." म्हणत त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
त्याच्या मायेच्या स्पर्शाला ती पूर्णपणे शरण आली आणि त्याला गच्च बिलगून रडू लागली.
" ये, शांत रहा ना राणी. तुला रडतांना पाहून मला जास्त त्रास होतोय." तो मायेने तिची समजूत काढता झाला.
" आय ॲम सॉरी मंदार." ती बोलतांनाही रडतच होती.
तोच श्रेयश औषधे घेऊन रुममध्ये आला. आभाला मंदारच्या कुशीत पाहून मन पुन्हा एकदा रडवेलं झालं. आवंढा गिळत त्याने कसेबसे स्वतःला त्यांच्या नजरेतून वाचवले आणि तो रूमबाहेर पडला. तिथेच बाहेर बाकड्यावर बसत त्याने ओंजळीत चेहरा लपवला अजूनही डोळ्यांसमोर आभाच होती. मंदारच्या कुशीत विसावलेली. त्याने डोळे उघडले आणि स्वतःला सावरले.
'तिचं विश्व आहे तो. मी का त्या विश्वालाच अमान्य करतोय. जे मी पाहिलं तेच सत्य आहे आणि हे सत्य स्विकारण्यातच आमच्या नात्याचा...' मनाशी संवाद साधणंही त्याला कठिण जात होतं. त्याने स्वतःला शांत केले. तोच आभाचे बाबा तिथे येऊन पोहचले.
" श्रेयश, बाळा ठिक आहेस ना ?" त्याला या अवस्थेत पाहून ते विचारते झाले.
त्यांच्या आवाजाने तो भानावर आला.
" हो.. हो मी एकदम ठिक आहे." स्वतःला सावरत तो म्हणाला.
" औषधे मिळाली का ?" त्यांनी प्रश्न केला.
" बाबा, ही औषधे मंदारना द्या. काही लागल्यास सांगा मी आहे बाहेरच." औषधाची पिशवी त्यांच्यासमोर धरत तो म्हणाला.
आभाच्या बाबांनी ती पिशवी घेतली आणि त्याच्या बाजूला बसले.
" आभा तुला जे काही म्हणाली त्याबद्दल मी माफी मागतो." ते हात जोडत म्हणाले.
" बाबा, आहो असे काय करता ? आधीच का कमी पापं आहेत माथ्यावर त्यात माझ्यासमोर हात जोडून आणखी एका पापाचं वाटेकरी बनवता.गैरसमज असला तरी तो चुकीच्या माणसाबद्दलच झाला होता. आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या व्यक्तीबद्दल असाच समज होईल कोणाचाही." तो नकारात्मकतेने म्हणाला.
तसा आभाच्या बाबांनी दिर्घ सुस्कारा घेतला.
" श्रेयश, जुनं आठवायचं नाही असं ठरलय ना आपलं मग का स्वतःला त्रास करून घेतोस ? तु खूप थकला असशील. कालपासून खूप धावपळ सुरु आहे तुझी. मी आहे इथे हॉस्पिटलमध्ये तु जाऊन आराम कर." म्हणत त्यांनी त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवला.
त्या मायेच्या स्पर्शात त्याला त्याचे बाबा भेटले. क्षणाचा अवकाश की त्याने त्यांनी मिठी मारली. डोळ्यांतील आसवं त्यांच्या खांद्यावर रिती करतांना मन शांत होत होतं. ते ही त्याच्या स्पर्शाने भारावले. अधाश्यागत मायेने भरलेला हात त्याच्या डोक्यावरून फिरवू लागले.
तोच आभा रुममधून बाहेर आली. त्यांना असे एकत्र पाहून तिलाही अश्रू अनावर झाले. स्वतःला सावरत तिने तिच्या उपस्थितीची जाणिव करून दिली.
ती आल्याचे लक्षात येताच श्रेयश त्यांच्या मिठीतून दूर झाला. तोंड विरुद्ध दिशेला घेत उठून उभा राहिला. आपले अश्रू टिपत त्याने स्वतःला शांत केले.
" तुम्ही दोघेही घरी जा. मी आहे मंदारसोबत." ती म्हणाली.
" मी थांबतो तुझ्यासोबत बेटा." बाबांनी स्पष्ट केले.
" नको बाबा. आधीच तुम्हांला बीपीचा त्रास त्यात दवाखान्यात झोपही लागणार नाही. तुम्ही नका काळजी करू मी सांभाळेन सर्व. घरी आई आणि श्रेयाही एकट्या आहेत." तिने समजावले.
" बाबा, तुम्ही जा घरी. मी थांबतो इथे." त्यांच्याकडे वळत श्रेयश म्हणाला.
" खरच त्याची गरज नाही. मी आहे इथे. तुम्ही दोघेही घरी जा प्लिज." ती विनंती करती झाली.
" ठिक आहे. मी जातो घरी पण श्रेयशला थांबू दे इथे. रात्री काही इर्मजन्सी आल्यास कोणीतरी सोबत असावं. श्रेयश इथे असेल तर मला काळजी नाही तुम्हा दोघांची." म्हणत बाबांनी आपली भूमिका मांडली.
बाबांचे म्हणणे ऐकून आभाला अवघडल्यासारखे झाले. ज्याला नको नको ते बोलली होती तोच तिच्या मदतीसाठी थांबणार होता याची तिला आतून पोखरून गेली.
" पण.." ती पुढे काही बोलणार तोच तिच्या बाबांनी तिला अडवले.
" आता पण बिन काही नाही. श्रेयश तुझ्यासोबत थांबणार असेल तर मी जातो नाहीतर मी इथेच थांबणार." ते स्पष्टपणे म्हणाले.
" ऐका मिसेस कर्णिक. बाबांना त्रास होईल. तुम्ही काळजी करू नका मी इथे बाहेर थांबेन." श्रेयश विनंती करीत म्हणाला.
त्याच्या या विनंतीने तिला पुन्हा एकदा ओशाळल्यागत झाले. तिने मानेनेच होकार दिला.
बाबांची काळजी मिटली. आत जात त्यांनी मंदारची भेट घेतली आणि निघाले.
क्रमश:
©® आर्या पाटील
(काही वैयक्तिक कारणास्तव कथेचा भाग खूपच उशीरा पोस्ट केला. यापुढे वेळेत भाग पोहचेल याची काळजी घेईन. उशीराबद्दल मनापासून क्षमस्व.)