Login

तु असा जवळी रहा...(भाग ४४ वा)

' खूप सुखात आहेस तु. सुखाचा प्राजक्त असाच तुझ्या आयुष्यात दरवळत राहू दे. या सुखावर माझ्या एकटेपण

तु असा जवळी रहा ( भाग ४४ वा)

©® आर्या पाटील

एव्हाना रात्रीचे नऊ वाजत आले होते.

औषधं दिल्याने मंदार शांत झोपला होता. आभा त्याच्या बाजूला बसून त्याला न्याहाळत होती. त्याचा हात अलवारपणे आपल्या हातात घेऊन ती त्याच्या सहवासातील गोड आठवणी आठवत होती.

तोच दरवाज्यावर टकटक झाली. मंदारचा हात बाजूला सारत ती उठली आणि दरवाज्यापाशी पोहचली. बाहेर श्रेयश होता. त्याला पाहून तिने दरवाजा उघडला.

" मिसेस कर्णिक, खाऊन घ्या. उशीर झाला आहे." हॉटेलमधून आणलेलं पार्सल पॉकेट तिच्या पुढ्यात धरत तो म्हणाला.

" याची खरच गरज नाही. मला अजिबात भूक लागलेली नाही. तुम्ही खाऊन घ्या." तिने स्पष्टपणे नकार दिला.

" बाबांचा फोन आला होता ते डब्बा घेऊन पुन्हा येणार होते. त्यांना दगदग नको म्हणून मी जेवण पार्सल मागवायचं ठरवलं आणि त्यांना कळवलं तेव्हा कुठे ते तयार झाले. आता जर तुम्ही काहीच खाल्लं नाही तर ते एवढ्या रात्री डब्बा घेऊन येतील. निदान त्यांच्यासाठी तरी थोडसं खाऊन घ्या." तो बोलत होता पण तिच्या नजरेला नजर देण्याची अजूनही हिमंत होत नव्हती.

" तुम्ही खाल्लं का ?" त्याच्या हातून पॉकेट घेत तिने विचारले.

त्याने मानेनेच नकार दिला.

" का?" त्याच्याकडे पाहत तिने पुन्हा प्रश्न विचारला.

" भूक नाही." तो निर्विकारपणे म्हणाला.

" बाबांना कॉल करून सांगते तसं म्हणजे तुमच्यासाठी डब्बा घेऊन येतील." तिने असे म्हणताच त्याची नजर तिच्या दिशेने वळली.

' अजूनही तशीच आहेस तू. मला माझ्याच वाक्यात पकडणारी.' स्वगत होत त्याने तिला पाहिले.

' हो. तुझी सवय बदलली नाही मग मी तरी कशी बदलू ?' ती त्याच्याकडे रोखाने पाहत मनात म्हणाली.

तिच्या नजरेला नजर भिडताच तो पुन्हा एकदा अगतिक झाले.

" प्लिज नको. मी मागवतो आणखी एक पार्सल. तुम्ही खाऊन घ्या." नजर चोरत तो म्हणाला.

" त्याची गरज नाही. आत या." म्हणत तिने त्याला आत बोलावले.

 आत जातांना त्याला पुन्हा एकदा मंदारच्या कुशीत विसावलेली आभा आठवली. त्या आठवणीने मनात तिच जुनी घालमेल झाली पण क्षणाचा अवकाश की त्याने स्वतःला सावरले. जड पावलाने तो आला.

" बसा." ती पुन्हा गंभीरपणे म्हणाली.

 स्वतःसाठी काढून घेऊन तिने जेवणाचं एक पॉकेट त्याला दिलं. त्याची नजर अजूनही खालीच होती. मैत्रीच्या आणि त्यानंतर प्रेमाच्या राज्यात रमलेले असतांनाही त्यांनी कधीच अशी जेवणाची वाटणी नव्हती केली. श्रेयशच्या डोळ्यांसमोर ते जुने दिवस तरळले. नकळत चेहऱ्यावर स्मितहास्याची लकेर उमटली.

" काय झालं ? खाताय ना ?" आभा थोड्या आश्चर्याने म्हणाली.

" जुने दिवस आठवले." तो नकळतपणे बोलून गेला.

तशी ती उठून उभी राहिली. आठवणी तिच्या मनोपटलावरून तरी कुठे नाहिश्या झाल्या होत्या. आयुष्य जगली होती तीही त्याच्यासोबत. आयुष्य तिनशे साठ अंशात जरी बदललं असलं तरी आठवणींचा प्रत्येक अंश अजूनही तेवढाच जिवंत होता. तिला असे उठलेले पाहून श्रेयश सावध झाला.

" आय ॲम सॉरी." त्याने तिची माफी मागीतली.

" प्रत्येक गोष्टीसाठी सॉरी म्हणायची गरज नाही. खाऊन घ्या." म्हणत ती बाजूला बसली.

नजर मंदारकडे वळली. तो अजूनही शांत झोपला होता.

श्रेयशने नजर वळवून जेवायला सुरवात केली. आभानेही जेवण करून घेतले.

थोड्या वेळानंतर डॉक्टर पुन्हा व्हिजीट साठी आले.

औषधांमुळे मंदार शांत झोपेत होता.

" डॉक्टर, मंदार बरे आहेत ना ?" श्रेयशने विचारले.

"येस, ही इज फाइन. आज आराम करू द्या.उद्या सकाळी डिस्चार्ज देईन. स्टिचेस कमी आहेत तरीही घरी गेल्यावर चार दिवस सक्तीचा आराम करावा लागेल. ड्रेसिंगसाठी दोन दिवसांनी यावं लागेल." म्हणत डॉक्टरांनी मंदारला चेक केले.

डॉक्टरांच्या चाहुलीने मंदारलाही जाग आली.

" ठिक वाटतय ना ?" डॉक्टरांनी विचारले.

मंदारने मानेनेच होकार दिला.

" आराम करा." म्हणत डॉक्टर निघून गेले.

डॉक्टर निघून जाताच आभा मंदारपाशी पोहचली.

" मंदार, बरं वाटतय का ?" त्याचा हात हातात धरत ती म्हणाली.

तिच्या हातातून आपला हात सोडवत त्याने तो तिच्या गालावरून फिरवला आणि मानेनेच होकार दिला.

मंदार आणि आभाला एकत्र पाहणे श्रेयशसाठी खूपच कठीण होते पण हेच सत्य आहे याची जाणिव ठेवत तो त्यांच्यापाशी पोहचला. 

" मंदार ठिक आहात ना ?" त्याने आपुलकीने चौकशी केली.

" मी ठिक आहे. तुम्ही दोघेही का थांबलेत ? श्रेयश तुमची आधीच किती दगदग झाली आहे त्यात अजून हॉस्पिटलमध्ये थांबलात तर तुम्हांलाच त्रास होईल. खरच तुम्ही जा आणि आभालाही घरी सोडा." मंदार म्हणाला.

" मंदार, मी तुला घेतल्याशिवाय इथून कुठेच जाणार नाही आणि मला पाठवायचा प्रयत्नही करू नकोस." आभा रागानेच म्हणाली.

" आणि मला बाबांनी स्पष्ट सांगितलं आहे तुमच्या सोबत थांबायला नाहीतर ते इथे येथील. चालेल का ?" श्रेयशही स्पष्टपणे म्हणाला.

" तुम्ही दोघेही सारखेच आहात. अजिबात ऐकत नाहीत." मंदार म्हणताच दोघांनी समान जाणिवेने एकमेकांकडे पाहिले. नजरेला नजर भिडताच पुन्हा तिच गहरी वेदना हृदयाला स्पर्शून गेली आणि क्षणाचा अवकाश की त्यांनी नजरा वळवल्या.

" तुम्ही आराम करा मी आहे बाहेर." म्हणत श्रेयश बाहेर जाण्यासाठी वळला.

" श्रेयश, रात्रभर बाहेर कुठे थांबणार. तुम्ही थांबा आत." मंदारने त्याला अडवले.

" खरच याची गरज नाही. मी थांबतो बाहेर." त्याने स्पष्ट केले.

" आता माझं ऐकावं लागेल नाहीतर मीच फोन करून बाबांना बोलावतो." मंदारने त्याला बरोबर पकडले.

श्रेयशचा नाइलाज झाला. त्याला आत थांबावेच लागले. 

आभाला हायसे वाटले कारण त्याला आत थांबायला सांगायची तिची हिमंत नव्हती किंबहुना श्रेयश थांबलाही नसता. मंदारच्या विनंतीला त्याला टाळता आलं नाही त्यामुळे तो थांबला.

थोडावेळ गप्पा गोष्टी करून मंदारने पुन्हा एकदा डोळे बंद केले. औषधांमुळे त्याला झोप येऊ लागली. थोड्याच वेळात तो झोपला. तो झोपल्यावर मात्र त्या बंद खोलीत दोघांचा जीव घुसमटू लागला. आयुष्याचा सर्वात मोठा काळ एकत्र घालवलेले ते दोन जीव त्या रुममध्ये एकमेकांना अनोळखी होऊन घुसमटत होते. काय बोलणार आणि कसे बोलणार या दोन्ही विवंचना दोघांना स्वस्थ बसू देत नव्हत्या. रुममधील भयाण शांतता जीवघेणी वाटत होती. आभा मंदारच्या शेजारी स्टुलवर बसली होती तर श्रेयश बाजूच्या कॉटवर. नकळत त्याची नजर पाठमोऱ्या आभावर खिळायची. मग मनाला समज देत तो स्वतःला सावरायचा.

दिवसभराचा थकवा असल्याने आभाला झोप येऊ लागली होती. तिने बसल्या जागी डोकं मंदारच्या बेडवर टेकवलं.

" आभा, तुम्ही झोपा मी बसतो मंदारजवळ."कॉटवरून उठत तो म्हणाला.

तशी आभा सावरली.

" मी पडते इथेच. तुम्ही झोपा ." तिने सुचवले.

" आपण एक काम करुया. आळीपाळीने झोपूया. तुम्ही झोपा आधी मी बसतो मंदारजवळ. त्यानंतर लागल्यास तुम्ही बसा. प्लिज नाही म्हणू नका." त्याने मार्ग काढला.

तिच्याकडे पर्याय उरला नाही.

तिने मानेनेच होकार दिला. तसा तो उठून कॉटपासून बाजूला झाला. मंदारच्या डोक्यावर हात फिरवून आभा उठली आणि कॉटपाशी पोहचली. तसा श्रेयश मंदारपाशी जाऊन बसला. आभा कॉटवर जाऊन पडली. नजर पाठमोऱ्या श्रेयशवर जाताच मनाच घालमेळ सुरु झाली.

विचारांनी पुन्हा डोकं वर काढायला सुरवात केली पण तात्काळ तिने स्वतःला सावरलं. दिवसभराचा थकवा आल्याने तिला पडल्या पडल्या झोपही लागली.

थोडा वेळ गेला असेल तोच तिचा फोन वाजला. फोनच्या आवाजाने झोपलेल्या आभा आणि मंदारला जाग येऊ नये या हेतूने श्रेयश पटकन उठला आणि कॉटजवळ ठेवलेला तिचा मोबाईल उचलला.

" आई, तु ये ना घरी बाबाला घेऊन. मला करमत नाही " समोरून श्रेया रडत म्हणाली.

" हॅलो, बाळा श्रेया मी श्रेयश बोलतोय. तु आधी रडायचं थांबव पाहू. माझी फ्रेण्ड खूप स्ट्राँग आहे. बाबाला बरं नाही त्यामुळे आई काळजीत आहे आणि त्यात तु रडतेस म्हटल्यावर आईला आणखी वाईट वाटेल. तुला आवडेल का आईला त्रास झालेला ?" त्याने प्रेमाने समजावले.

" नाही. फ्रेण्ड, बाबा बरा आहे ना ?" ती आता शांत होत म्हणाली.

" हो बाळा, बाबा आता बरा आहे. डॉक्टरांनी औषध दिलय त्यामुळे झोपला आहे. आईही बाबासोबतच आहे. सकाळीच ते घरी येतील. तु काळजी करू नकोस. तु रडलीस तर आजी आजोबांनाही वाईट वाटेल. आई बाबाला आठव आणि आजीजवळ शांत झोप." तो समजावत म्हणाला.

" मी नाही रडणार पण आई बाबाला उद्या लवकर पाठव. त्यांच्याशिवाय मला करमत नाही." ती शहाण्या बाळासारखं म्हणाली.

" मी प्रॉमिस देतो बाळा की उद्या सकाळी मी त्यांना घेऊन घरी येईन." तिला प्रॉमिस देत तो म्हणाला.

" मी वाट बघेन फ्रेण्ड. तु लवकर ये. बाय." म्हणत तिने फोन ठेवला. 

श्रेयशने फोन पुन्हा होता तिथे ठेवला. नजर नकळत आभावर विसावली.अजूनही ती तशीच होती अगदीच निरागस.

' श्रेया तुझ्यासारखीच आहे समजूतदार. तुझ्या संस्कारांनी तिचं बालपण घडत आहे मग ते परिपूर्णच असणार. मंदार खूप नशिबवान आहे की ज्याच्या आयुष्यात तुम्ही दोघी आहात.' तिच्याकडे पाहत तो स्वगत झाला. कितीतरी वेळ तो तसाच तिला पाहत होता.

' खूप सुखात आहेस तु. सुखाचा प्राजक्त असाच तुझ्या आयुष्यात दरवळत राहू दे. या सुखावर माझ्या एकटेपणाची कधीच सावली पडणार नाही. मी लवकरच तुमच्या आयुष्यातून कायमचं निघून जाईन. तुमच्या सहवासातून मिळालेल्या आठवणी पुरेश्या आहेत जगण्यासाठी.' मनाशी निर्धार करत तो आताही तिला न्याहाळत होता.

तोच झोपेतच तिने हालचाल केली तसा तो सावध झाला. चेहरा दुसऱ्या दिशेला वळवून त्याने स्वतःला सावरले. थोड्या वेळाने हळूच चोरनजरेने तिचा वेध घेतला. ती गाढ झोपेत होती. हात छातीशी कवटाळून झोपलेल्या तिला थंडी लागत असेल असे वाटून त्याने तिथेच कॉटवर असलेली चादर तिच्यावर पांघरायचे ठरवले पण हिमंत मात्र होत नव्हती. शेवटी होय नाही करता करता तो तिच्यापाशी पोहचला.आज कितीतरी वर्षांनी तो तिला जवळून न्याहाळत होता. त्याने हिंमत करून चादर उचलली आणि तिच्यावर पांघरली. ती उठली तर तिला काय वाटेल या विवंचनेवर तिची काळजी वरचढ ठरली. तिच्यासोबत घालवलेलं बालपण, तरुणपण अन् प्रेमाचे ते सुंदर दिवस चित्रपटाप्रमाणे त्याच्या डोळ्यांसमोर तरळले. वास्तवाची जाणिव होताच मात्र त्या डोळ्यांना भावनेची भरती आली. ते बरसू लागले आठवणींना उराशी कवटाळून.

' का माझ्या आयुष्यात एवढी उलथापालथ झाली ? आभा, तुझ्याशिवाय मी शून्य होतो आणि आयुष्यभर राहीन. सुखी संसाराचं स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघितलं होतं. ते स्वप्न असं उधळलं जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. माझ्या जगण्याला अर्थ नाही आणि मरणही व्यर्थ आहे. या दोघांच्या मध्ये नरकयातना भोगतोय मी.' तो भावनातित झाला.

ओघळणारे अश्रू मनाची वेदना तिच्यापुढे मांडत होते.

तो रडून शांत झाला. पुन्हा एकदा स्वतःचे अश्रू स्वतःचं टिपत त्याने दिर्घ श्वास घेतला. नजर पुन्हा तिच्या दिशेने वळली.

' मी खूप चुकीचा विचार करतोय. तुझ्या संसाराला माझी नजर लागायला नको. भलेही या स्वप्नात मी नसलो तरी आपल्या स्वप्नाची पूर्तता तुझ्या सुखी संसारात झाली आहे याचा आनंद आहे. मंदार आणि श्रेया तुला कधीच एकटं पडू देणार नाहीत आणि तु कधी पडूही नकोस. एकटेपणाचं दुःख भोगतोय मी. तु सुखात रहा कायमची.' तो स्वगत होत तिच्याशी संवाद साधता झाला. 

त्याने एकवार मंदारला पाहिले. समाधानाची लकेर त्याला शांत करून गेली. आपली आभा सुखात आहे आणि मंदार तिला नेहमीच सुखात ठेवेल या आशावादी भावनेने त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले. तो तसाच उठला आणि मंदारच्या बेडपाशी स्टुलवर येऊन बसला.

या साऱ्यांत मधेच मंदारला जाग आली होती.श्रेयशच्या डोळ्यांतले अश्रू पाहून तो गोंधळला. त्याला आभाकडे अगतिकतेने बघतांना पाहून अनेक प्रश्नांची मांदियाळी त्याच्या मनावर भरली. त्याचं तिला इतका वेळ अश्रूपूर्ण नजरेने पाहणं त्याला कासावीस करून गेलं.

क्रमश:

©® आर्या पाटील