तु असा जवळी रहा (भाग ४५ वा)

वर्तमानाला सावरतांना जेव्हा भूतकाळाशी गाठ पडते..
तु असा जवळी रहा ( भाग ४५ वा)

©आर्या पाटील

( सर्वप्रथम, सर्व वाचकांची मनापासून माफी मागते. तुम्ही माझ्या या कथेला भरभरून प्रेम दिलं होतं ; पण काही वैयक्तिक कारणांमुळे ही कथा अर्ध्यावरच सोडावी लागली. काही कथामालिका या हृदयाच्या खूप जवळ असतात. त्या जोपर्यंत सुरु राहतात तोपर्यंत आपण त्याच्याशी जोडलेले राहतो, ती कथा जगतो. अश्या कथांचा शेवट करण्याची हिंमत होत नाही. सहा महिन्यांपूर्वीच ही कथा पूर्ण करून ठेवली होती पण पोस्ट करण्याची हिंमत होत नव्हती. तुम्हां सर्वांची पुन्हा एकदा माफी मागून मी कथेचे उर्वरित भाग रोज एक अश्याप्रकारे पोस्ट करून, तुम्ही भरभरून प्रेम दिलेल्या या कथेचा शेवट करत आहे.परत एकदा मनापासून सॉरी)
(सगळ्यात शेवटी पोस्ट झालेल्या भागात आपण पाहिलं की, श्रेयशच्या गाडीमुळे मंदारचा अपघात होतो. त्यानंतर श्रेयश त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमीट करतो. दरम्यान जेव्हा आभाला त्याच्या अपघाताचं कळतं तेव्हा ती श्रेयशला दोषी ठरवते.भूतकाळाच्या त्या घटनेचा आधार घेत श्रेयशला सगळ्यासाठी कारणीभूत ठरवते; पण जेव्हा गाडी श्रेयश नसून त्याचा ड्रायव्हर चालवत असल्याचे कळते तेव्हा ती चांगलीच खजील होते. मनापासून श्रेयशची माफी मागते. तिचे आरोप सहन करत श्रेयश मात्र तिथेच थांबतो. रात्री मंदारसाठी हॉस्पिटलमध्ये थांबतो.आता पुढे...)

मनात जर तर चे अंदाज बांधत मंदारला झोप लागली. बराच वेळ श्रेयश मात्र जागाच होता. झोप आणि त्याचं समीकरण तसं जुळत तरी कुठे होतं.विचारांच्या अश्या अनेक रात्री त्याने जागून घालवल्या होत्या. आज तर तो त्याच्या भूतकाळाला नव्याने भेटला होता त्यामुळे झोप येण्याचा प्रश्नच नव्हता.दिवसभराचा थकवा होता त्यामुळे पहाटे चारच्या सुमारास त्यालाही झोप येऊ लागली. मंदारच्या कॉटशेजारी भिंतीवर डोकं टेकवून त्याने डोळे मिटले. त्याच वेळेस आभाला जाग आली. अंगावरचे पांघरुण बाजूला करत ती लगबगीने उठली आणि मंदारजवळ पोहचली. त्याला शांत झोपलेलं पाहून तिला हायसं वाटलं तोच नजर श्रेयशवर पडली. झोपेत त्याची मान एका बाजूने कलली होती. त्याला जागं केलं नाही तर मानेला हिसका बसेल या आशंकेने ती त्याच्यापाशी पोहचली.
" श्रेयश.." बारीक आवाजात तिने साद घातली.
तिच्या आवाजाने भर झोपेतही तो दचकून जागा झाला. कललेल्या मानेला हिसका बसणार तोच तिने त्याच्या डोक्याला आधार दिला.
" सांभाळ." ती म्हणाली.
तिच्या अश्या एवढ्या जवळ असण्याने क्षणभर तो गोंधळला.
" जाऊन कॉटवर झोप." तिने म्हणताच तो झोपेतून जागा झाला.
" सॉरी ते डोळा लागला.मी बघतो मंदारकडे. तुम्ही झोपा." डोळे चोळत त्याने प्रतिउत्तर दिले.
" त्याची गरज नाही. मी थांबते इथे.तुम्ही झोपा.रात्रभर जागे होता." मघासचं तिचं एकेरी संभाषण आता बदललं होतं.
तिला नाही म्हणणं त्याला अवघड होतं. तो उठला आणि जाऊन कॉटवर पडला. मघाशी आभाने पांघरलेलं पांघरुण अंगावर घेत त्याने डोळे मिटले.त्या पांघरुणात आज क्रित्येक वर्षांनी आभाची ऊब भेटली त्याला. आश्चर्यच म्हणावं लागेल कारण पडल्या पडल्या तो झोपलाही.
इकडे आभा मंदार जवळ येऊन बसली.कधी एकदा सकाळ होते आणि त्याला घेऊन घरी जाते असे काहीसे झाले होते तिला. तिला आणि श्रेयाला जीवापाड जपणाऱ्या मंदारला अश्या अवस्थेत पाहून मन कातर होत होते तर दुसऱ्या बाजूने तेच मन जास्त काही अघटित घडलं नाही म्हणून देवाचे आभारही मानत होते.
तोच मनात श्रेयशचा विचार झाला. त्याने तातडीने मंदारला हॉस्पिटलमध्ये आणले आणि आपण पूर्वग्रहातून त्याला किती दोष लावले या विचाराने ती पुरती अगतिक झाली. नजर श्रेयशच्या दिशेने वळली. त्याला शांत झोपलेलं पाहून भूतकाळाने पुन्हा एकदा मनाच्या गाभाऱ्यातील तोच जुना काळ आळवला.क्षणभर चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले. सारे सारे क्षण दृष्टिपटलावर रेंगाळू लागले. या क्षणासोबतच भूतकाळाची ती दुखरी आठवण डोळ्यांना रितं करून गेली.तिने डोळे टिपत तातडीने श्रेयशवरची नजर हटवली. मन पुन्हा एकदा कातर झाले. मंदारच्या हाताचा आसरा घेत तिने त्यावर डोकं टेकवलं.डोळ्यांतून ओघळणारं पाणी त्याच्या हातावर विसावलं. भूतकाळाच्या आठवणींनी जणू तिच्या मनाला ग्लानी आली असावी.बसल्या जागी तसाच डोळा लागला. थोड्याच वेळात तांबडं फुटलं.मंदारला जाग आली ती आभाचा वेध घेतच.तिला आपल्या जवळ हातावर डोकं टेकवून झोपलेलं पाहून तो सुखावला. दुसऱ्या हाताने त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तोच नजर कॉटवर झोपलेल्या श्रेयशवर गेली. कालचा त्याचा तो अगतिक चेहरा पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यांसमोर साकार झाला. पुन्हा एकदा मन अंदाज बांधू लागले पण पुढच्याच क्षणी त्याने मनाची समजूत घातली.
' आभाला झालेला त्रास पाहून श्रेयशला वाईट वाटले असावे. बाकी काहीच नसेल.' त्याने स्वतःची समजूत काढली.
तोच दारावर टकटक वाजली.बहुधा नर्स आली असावी. त्या आवाजाने श्रेयशची झोप मात्र चाळवली. तो गडबडून जागा झाला.समोर मंदार उठण्याच्या तयारीतच होता पण आभाला उठवण्याची इच्छा होत नव्हती.
श्रेयशने नजरेनेच त्याला इशारा केला आणि कॉटवरून उठत दरवाजा उघडला. नर्सच होती. ती लगबगीने आत आली.
" आता ठिक वाटतय ना ?" म्हणत तिने मंदारची चौकशी करायला सुरवात केली.
तिच्या आवाजाने आभा जागी झाली.
नर्सने पुन्हा एका सलाईनची बॉटल काढून मंदारला चढवली.
" मी ठिक आहे आता." मंदार ते टाळण्याच्या उद्देश्याने म्हणाला.
" ते डॉक्टर ठरवतील. तूर्तास मला माझं काम करू द्या." खोचकपणे म्हणत सलाईन लावून ती निघून गेली.
" बरं वाटतय ना ?" त्याचा हात हातात घेत आभा म्हणाली.
" एकदम ठणठणीत. आता फक्त डॉक्टरांनी डिस्चार्ज द्यावा एवढच." म्हणत मंदार गोड हसला.
" श्रेयश, माझ्यामुळे तुमची खूप गैरसोय झाली." बाजूला शून्यात नजर लावून असलेल्या श्रेयशला उद्देशून तो म्हणाला. तशी आभा उठून उभी राहिली. नजर श्रेयशवर जाताच तिने स्वतःला सावरले.
" मित्र म्हणता आणि लगेच परकं ही करता." म्हणत तो त्याच्याजवळ आला.
तो येताच आभा तशीच मागे सरकली आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेली.
" आता ठिक वाटत आहे ना ?" त्याने काळजीने विचारले.
" बरा आहे आता." तो उत्तरला.
तोच डॉक्टरही आत आले.
नर्सने आधीच रुटीन चेक अपची माहिती डॉक्टरांना दिली होती.स्टिचेस जास्त नव्हते त्यामुळे डॉक्टरांनी मंदारला घरी सोडायचा निर्णय घेतला.
" तुम्ही डिस्चार्जची सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करा. आपण यांना डिस्चार्ज देत आहोत." डॉक्टर म्हणाले.
डिस्चार्जचं ऐकून मंदारला आणखी हायसे वाटले.
आभाही बाथरूममधून बाहेर पडली.
" मी बघते बाहेर डिस्चार्जचं." म्हणत आभाने आपली पर्स घेतली.
" माफ करा मिसेस कर्णिक पण तुम्ही मंदारजवळ थांबा मी पाहतो डिस्चार्जचं." तिच्याकडे न पाहता श्रेयश विनंतीवजा शब्दांत म्हणाला.
" त्याची खरच काही गरज नाही. मी पाहते." म्हणत तिने मोर्चा मंदारकडे वळवला.
" मी आलेच." स्मितहास्य वदनाने ती म्हणाली.
" मंदार, माझी पर्सनल रिक्वेस्ट समजा हवं तर पण ही प्रोसिजर मला कम्प्लीट करु द्या निदान तेवढच मनावरचं दडपण कमी होईल." तो विनंती करत म्हणाला.
" कसलं दडपण ? तुमची काहीच चुक नव्हती किंबहुना गाडीही तुम्ही चालवत नव्हता. मी मधेच थांबलो नसतो तर कदाचित हे सर्व झालं नसतं. त्यात आभाने.." म्हणता म्हणता तो एकदम शांत झाला.
आभाची नजरही खाली गेली. श्रेयशला बोललेलं सारच तिला छळू लागलं.
" झाल्या प्रकाराची मी मनापासून माफी मागतो." मंदारने माफी मागितली.
" हे काय करता आहात मंदार ? मिसेस कर्णिकांच्या जागी दुसरं कोणीही असतं तरी त्यांनी हेच केलं असतं. तुमच्यावरील प्रेमापोटीच त्यांनी." आता त्याचा कंठ दाटून आला.
आभाला त्याच्या शब्दातील वेदना कळली.
" श्रेयश, आज तुमच्या ऑफिसचा पहिला दिवस असूनही तुम्ही इथे आमच्यासोबत आहात हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे." मंदार आपलेपणाने म्हणाला.
" एक मित्र म्हणून माझं ते कर्तव्यच आहे आणि त्याच हक्काने विनंती करतो प्लिज नाही म्हणू नका." म्हणत पुन्हा त्याने आपले म्हणणे पटवून दिले.
मंदारचा नाइलाज झाला. त्याने आभाकडे पाहिले. तिने नजरेनेच होकार दिला.
" ठिक आहे." म्हणत मंदारने होकार दिला. लागलिच श्रेयश रूमबाहेर पडला.
" अवलिया आहेत श्रेयश. ना कुठलं नातं, ना कसला संबंध तरी किती करतात ते आपल्यासाठी ?" आभाकडे पाहत तो म्हणाला.
आभा मात्र शून्यात नजर लावून आपल्याच विचारात मग्न होती.
" आभा.." त्याने परत आवाज दिला.
त्याच्या आवाजाने भानावर येत ती त्याच्याजवळ आली.
" कसला विचार करत होतीस ? काल श्रेयशला बोलल्याचा ?" तिचा हात हातात घेत तो म्हणाला.
क्षणभर गोंधळलेल्या तिने स्वतःला सावरले.
मानेनेच होकार देत ती त्याच्या जवळ बसली.
" नको विचार करूस एवढा. त्यांनी तुला माफ केलं असणार. मनाने खूप चांगले आहेत ते." तिच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला.
चेहऱ्यावर अगतिकता न आणता तिने पुन्हा एकदा मान हलवली. थोड्याच वेळात आभाचे बाबाही दवाखान्यात येऊन पोहचले.
" मंदारराव ठिक आहात ना ?" आत येत त्यांनी काळजीने विचारले.
" मला बरं वाटतय बाबा. तुमची लेक जवळ असल्यावर मग काय चिंता. सोबत श्रेयशही होते. त्यांची खूप मदत झाली." पुन्हा एकदा श्रेयशचं कौतुक करत तो म्हणाला.
" गुणी आहे मुलगा. इतरांना मदत करायचा गुण पिढीजातच आहे." बाबा बोलून गेले.
" म्हणजे ?" त्यांच असं बोलणं मंदारला मात्र कोड्यात पाडून गेलं.
तसे बाबा चाचपडले. आभाही सावध झाली. नकळत त्यांच्या एका वाक्यातून भूतकाळाने डोके वर काढले.
" म्हणजे... म्हणजे हा गुण आईवडिलांकडूनच मिळाला असणार ना." शब्दांना कसेबसे सावरत ते उत्तरले.
मंदारचे समाधान झाले नाही पण यापेक्षा आणखी काय असेल असा अर्थ लावून तो शांत झाला. तोवर श्रेयशही आत आला.
" डिस्चार्जची सगळी प्रोसिजर झाली आहे. मिसेस कर्णिक तुम्ही डॉक्टरांना भेटून औषधांच्या वेळा बघून घ्या तोवर मी गाडी काढतो. बाबा तुम्ही मंदारना घेऊन या. " म्हणत त्याने रुममधून काढता पाय घेतला.
आभाही डॉक्टरांना भेटायला निघून गेली. बाबांनी मंदारला आधार देत उठवलं. पायाला मुका मार होता त्यामुळे चालतांना तोल जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी मंदारला हात दिला. मंदारही त्यांच्या आधाराने रूमबाहेर पडला.
दोन दिवसांनी ड्रेसिंगसाठी बोलवून डॉक्टरांनी आभाला औषधांची माहिती दिली. तोवर बाबा मंदारला घेऊन रिसेप्शन एरियात पोहचले होते. आभाही बाहेर आली.
दुसऱ्या बाजूने मंदारला आधार देत ते तिघे बाहेर निघाले. तोवर श्रेयश गाडी घेऊन बाहेर आला होता. गाडीतून बाहेर येत त्याने मागचा दरवाजा उघडला आणि मंदारला आत बसण्यासाठी मदत केली. त्याला एवढं सगळं करतांना पाहून आभाला स्वतः चा राग येत होता. राहून राहून कालचं सारच आठवत होतं.
आभा मंदारच्या शेजारी बसली आणि बाबा फ्रण्टसीटवर जाऊन बसले.
" थँक यु सो मच श्रेयश..." मंदार पुढचं काही बोलणार तोच श्रेयशने त्याला अडवले.
" तुम्ही पुन्हा तेच थँक्यु पुराण लावणार असाल तर मी गाडीतून उतरतो." पुढच्या आरश्यातून त्याच्यावर कटाक्ष टाकत तो थोड्या रागानेच म्हणाला.
" बरं बाबा नाही बोलत काही." मंदारही स्मितहास्याने म्हणाला.
यासाऱ्यात आभा मात्र शांत होती. काचेबाहेरचं दृश्य न्याहाळत ती आपल्याच विश्वात गुंग होती. श्रेयशने नकळत आरश्यातून आभाचा वेध घेतला. मनाच्या गाभाऱ्यात तिच रोजची घालमेळ झाली. तात्काळ नजर फिरवीत त्याने स्वतःला सावरले.
अजूनही औषधांची ग्लानी असल्याने मंदारने आभाच्या खांद्यावर डोकं टेकवलं. तिचा हात हातात घेत डोळे मिटले. त्याच्या अश्या जवळ येण्याने ती थोड़ी बावरली. त्याच आरश्यातून तिने श्रेयशचा वेध घेतला. क्षणाचा अवकाश की नजरानजर झाली.श्रेयशला मात्र ही जवळीक पुन्हा एकदा छळून गेली. डोळ्यांतून येणारं पाणी लपविण्यासाठी तात्काळ त्याने डोळ्यांवर गॉगल चढवला.
थोड्या वेळाने ते घरी येऊन पोहचले. गाडी दाराशी थांबताच मंदारची झोप चाळवली. गाडीचा आवाज ऐकून छोटी श्रेया घराबाहेर आली. आभाच्या आईही भाकर तुकडा घेऊन लागलीच दाराजवळ पोहचल्या. गाडीतून बाहेर पडत श्रेयशने मंदारला एका बाजूने आधार दिला तर दुसऱ्या बाजूने आभाने त्याला सावरले. श्रेया धावतच त्याच्याजवळ पोहचली. आपल्या लाडक्या बाबाला असं लागलेलं पाहून तिला मात्र भरून आलं. लागलिच श्रेयशने तिला उचलून घेतले.
" तुझा बाबा बरा आहे आणि आता तु काळजी घेतल्यावर तर अजून लवकर बरा होईल." श्रेयशने समजूत काढताच तिची कळी खुलली.
" बाबा तुला दुखतं का?" ती खाली उतरत मंदारजवळ आली.
" नाही गं. आईजवळ असल्यावर आपल्याला दुखतं का ? " म्हणत त्याने वातावरण हलकं केले. तशी श्रेयाही हसली. त्या तिघांना एकत्र सोडून श्रेयश मात्र चार पावले मागे झाला.
दाराजवळ आभाच्या आईने ओलेत्या नजरेने मंदारची द्रिष्ट काढली.असं हळवं झालेलं पाहून मंदारने त्यांना तात्काळ सावरलं.
" आई मी ठिक आहे. तुमचा आशीर्वाद सोबत असतांना मला काहीच होणार नाही." मंदारने असे म्हणताच त्यांच्या डोळ्यांतून मात्र अश्रुधारा ओघळू लागल्या. अमितच्या आठवणींनी मनाचा गाभारा व्यापून घेतला. त्यांना रडतांना पाहून श्रेयशलाही पुन्हा त्या अघटित घटनेची आठवण झाली. तात्काळ नजर फिरवीत त्यानेही डोळे टिपले. आभालाही गहिवरून आले.
" आई, मला काहीही झालेलं नाही. तुमचा मुलगा तुमच्यासमोर ठणठणीत आहे. मला असं रडत घरात घेणार." मंदारने असे म्हणताच त्यांनी मात्र लगेच डोळे टिपले. मानेने नकार देत तात्काळ त्याला आत घेतले. श्रेयश मात्र आल्यापावली मागे निघाला.
" श्रेयश, आहो घरात तरी या. एवढी मदत केली आम्हांला आणि आता परक्या सारखं सोडून निघालात. चहा तरी घ्या." मंदारने त्याला थांबवले.
" चहा नको. ऑफिसमध्ये जातो. पहिला दिवस आहे त्यामुळे .." बोलता बोलता तो थांबला.
" ठिक आहे पण रात्री जेवायला मात्र इकडे यायचं." मंदारने गळ घातली.
" त्याची आवश्यकता नाही.." तो पुढचं काही बोलणार तोच मंदारने त्याला अडवले.
" मी विचारले नाही तर हक्काने सांगीतले आहे." तो ठामपणे म्हणाला तसा श्रेयशचाही नाइलाज झाला.
त्याने इच्छा नसतांनाही होकार दिला आणि तेथून काढता पाय घेतला.
घरी आल्यावर फ्रेश होत त्याने लागलीच ऑफिसला जायची तयारी केली.
ऑफिसचं सगळं सेट करून दोन चार दिवसांत तरी तिथून निघून जाण्याचा त्याचा मानस होता. ऑफिसला पोहचल्यावर त्या दृष्टीनेच त्याने कामांची आणि जबाबदारींची विभागणी करायला सुरवात केली. स्टाफ मध्ये असलेली जुनी लोकं विश्वासाची होती.नविन मेंबर्सही ॲक्टिव्ह असल्याने तो निश्चिंत झाला.ऑफिसमध्ये तसं येणं तर होणारच होतं पण ते फक्त ऑफिसपुरतं मर्यादित राहिल याहेतूने त्याने व्यवस्थापन केलं. मागील काही दिवसांपासून झालेली धावपळ आणि त्या रात्रीही झोप नीट न झाल्याने त्याला थकल्यासारखे वाटत होते, पण कामाला महत्त्व देत त्याने तब्येतीकडे दुर्लक्ष केलं. ऑफिस संपल्यानंतरही बराच उशीर तो कामातच व्यस्त होता. दरम्यान त्याच वेळेस मंदारचा कॉल आला.
" हॅलो, श्रेयश कुठे आहात ? जेवायला यायचं आहे तुम्हांला घरी." मंदार म्हणाला.
" अजून ऑफिसमध्येच आहे. वर्कलोड आहे त्यामुळे यायला उशीर होईल. आज नाही शक्य होणार जेवायला यायला. मी बाहेरच खाईन काहीतरी." संधी साधत श्रेयश म्हणाला.
" ठिक आहे. जेव्हा काम संपेल तेव्हा या पण या. आम्ही थांबतो तुमच्यासाठी." मंदारही त्याच्याच शब्दांत उत्तर देता झाला.
" पण..." तो पुढचं काही बोलणार तोच त्याने त्याला अडवले.
" आता पण नाही की बिन नाही. आई आणि आभा स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या आहेत. तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करा." म्हणत मंदारने फोन ठेवूनही दिला.
श्रेयशचा नाईलाज होता. आता जाणे भागच होते. उगाच उशीर करून त्यांना त्रास देणे योग्य नाही या विचारांत त्याने कामाचा उरक वाढवला. तासाभरातच काम संपवून तो ऑफिसबाहेर पडला.गाडीत बसणार तोच त्याला गरगरल्यासारखे झाले.स्वतःला सावरत तो आत बसला. ड्रायव्हरही नव्हता त्यामुळे गाडी चालवण्याशिवाय पर्याय नव्हता. बाटलीतील पाणी पित त्याने दिर्घश्वास घेतला आणि गाडी सुरु केली. थकवा प्रचंड होता त्यामुळे सर्व होत होते. त्यात दुपारचं जेवणही व्यवस्थित झालं नव्हतं. घरी पोहचल्यावर त्याला हायसे वाटले. फोन करून मंदारला नाही म्हणून सांगावे असा विचार मनात येऊन गेला, पण मंदार ऐकणार नाही हा ठामपणा त्यावर वर्चस्व प्रस्थापित करता झाला. शेवटी फ्रेश होत त्याने मंदारच्या घराचा रस्ता धरला.
त्याला लवकर आलेलं पाहून मंदारलाही बरं वाटलं.
" या श्रेयश, तुमचीच आठवण काढत होतो. शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हांला." म्हणत मंदारने त्याचे स्वागत केले.
घरात येताच मात्र पुन्हा एकदा श्रेयशला गरगरल्यासारखे झाले आणि काही कळायच्या आत तो कोसळला.

क्रमश:

©आर्या पाटील

🎭 Series Post

View all