Login

तु असा जवळी रहा (भाग ४६ वा)

आज पहिल्यांदाच त्यांच्या नात्यात अंतर आल्याचे तिला स्पष्ट जाणवले होते आणि त्यातच मंदारला असे अंधारात एकटे बसलेले पाहून ते अंतर कोसोंचे वाटू लागले. श्रेयशच्या बाबतीत तिचा हळवेपणा त्याच्या नजरेतून सुटला नव्हता याची जाणीव तिला अजून आरक्त करीत होती.
तु असा जवळी रहा ( भाग ४६ वा)

©® आर्या पाटील

"श्रेयश, श्रेयश काय होतय तुम्हांला ?" मंदार जागेवरून उठत सावरत त्याच्यापाशी पोहचला. तोवर बाबा त्याच्याजवळ पोहचले होते. त्याचं डोकं मांडीवर घेत त्याला साद घालू लागले.

" आभा, आभा लवकर पाणी घेऊन ये." बाबा ओरडले.

त्यांचा आवाज ऐकून आभा तशीच धावत बाहेर आली. श्रेयशला असं बेशुद्धावस्थेत पाहून ती प्रचंड घाबरली. क्षणभर तिला कसलच भान राहिलं नाही. तशीच ती त्याच्याजवळ पोहचली.
मागचा पुढचा विचार न करता तिने आपल्या ओढणीने त्याच्या चेहऱ्यावरचा घाम टिपला.

" श्रेयश... श्रेयश " म्हणत ती ही साद घालू लागली.
मंदार मात्र या सगळ्या घटनेने चांगलाच चकित झाला.

" मंदारराव तुम्ही डॉक्टरांना कॉल करा." म्हणत बाबांनी आभाच्या आईला आवाज देत किचनमधून पाणी आणायला सांगितले.
त्यांच्या आवाजाने तात्काळ त्या पाणी घेऊन तिथे पोहचल्या आणि श्रेयशच्या चेहर्‍यावर ते शिंपडले. तोवर श्रेयाही तेथे येऊन पोहचली.श्रेयशला असं बेशुद्ध पाहून ती घाबरली. मंदारने आवाज देत तिला जवळ घेतले.

" श्रेयश, बाळा उठ.." म्हणत आभाची आईही त्याला उठवू लागली.

तोवर मंदारनेही डॉक्टरांना कॉल करून लागलिच बोलावून घेतले.
मनात असंख्य विचारांची दाटी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. आभाचं वागणं त्याला कोड्यात टाकत होतं.तिच्या डोळ्यांत दाटून आलेलं पाणी त्याच्या डोळ्यांतून लपलेलं नव्हतं. या साऱ्या गडबडीत अगतिक झालेल्या आभाची नजर जेव्हा मंदारकडे वळली तेव्हा त्याच्या डोळ्यांत निर्माण झालेले अनेक प्रश्न तिला विचलीत करून गेले. क्षणभर ती गडबडली. पाणी शिंपडल्यानंतर श्रेयशला शुद्ध आली.

" श्रेयश, तुम्ही ठिक आहात ना ?" म्हणत तिने त्याला उठून बसायला मदत केली.

तिला आपल्या एवढ्या जवळ पाहून श्रेयशलाही अवघडल्यासारखे झाले. सगळी शक्ती एकवटून तो उठून बसला. तशी आभाही उठून उभी राहिली.

" श्रेयश, तुम्ही बरे आहात का ?" मंदार बसल्या जागेवरून उठत म्हणाला. त्याला चालायला अजूनही त्रास होत असल्याने तो थोडा लांबच होता.

त्याच्या प्रश्नाला होकारार्थी मान हलवित श्रेयशने प्रतिउत्तर दिले.

" श्रेयश, इथे सोफ्यावर पड.." म्हणत बाबांनी त्याला आधार देत उठवले.
सावरत तो ही जाऊन सोफ्यावर झोपला. तसा मंदार उठला आणि हळू हळू सावरत त्याच्या दिशेने निघाला. तोच आभा त्याला आधार द्यायला पुढे सरसावली. तिला जवळ आलेले पाहून मंदारने मात्र इशार्‍यानेच आपण जाऊ अशी खूण केली. तिला मेल्याहून मेल्यासारखे झाले. बाबांनी श्रेयशजवळ बसायला त्याला खुर्ची आणून दिली. तोवर डॉक्टरही आले. बी.पी लो झाल्याने चक्कर आल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

" अपुरी झोप, जेवणाच्या चुकीच्या वेळा यामुळे हे सर्व होत आहे. यांच्या जेवणाकडे लक्ष द्या. बाकी या औषधांनी बरं वाटेल पण पुरेशी झोप महत्त्वाची आहे." डॉक्टरांनी सल्ला दिला.

" हो डॉक्टर, आम्ही लक्ष देऊ." म्हणत त्याने ती औषधे घेतली.

डॉक्टर निघून गेल्यावर परत मोर्चा श्रेयशकडे वळला.
" श्रेयश, बाळा तब्येतीची काळजी घेत जा." त्याच्या डोक्यावरून हात फिरवित आभाच्या आई म्हणाल्या.
श्रेयशला मात्र गहिवरून आले. आईच्या स्पर्शाने तो हळवा झाला.

" हे खाऊन घ्या. औषधं घ्यायची आहेत." किचनमधून ताट वाढून आणत आभा त्याच्याजवळ पोहचली.

" आपण सगळे एकत्रच जेवूयात. मी ठिक आहे आता." तो मंदारकडे पाहत म्हणाला.

" ठिक आहे." म्हणत मंदारने आभाला सगळ्यांसाठी जेवायला घ्यायला सांगितले.

डायनिंग टेबलवर जेवतांना शांतता पसरली होती.
" फ्रेण्ड, आता तुला बरं वाटतय ना?" छोटी श्रेया शांतता भंग करत म्हणाली.

" हो गं.. मी आता बरा आहे." त्यानेही प्रतिउत्तर दिले.

" तु वेळेवर जेवत नाहीस ना म्हणून तुला बरं वाटत नाही. आई तुच ओरड फ्रेण्डला म्हणजे तो तुझं ऐकेल." छोटी श्रेया निरागसपणे बोलून गेली.

तिच्या अश्या बोलण्याने आभा आणि श्रेयशलाही अवघडल्यासारखे झाले. मंदारच्या मनात उठलेलं प्रश्नाचं वादळ आणखी गतिमान झालं.
" आभा,आधी श्रेयाला ओरड पाहू. काल तुम्ही दोघे घरी नव्हता तेव्हा काहीच खाल्लं नाही तिने." आभाच्या आईने मधेच बोलत विषय बदलला.

" मला दोघांची खूप आठवण येत होती म्हणून नाही जेवले." श्रेयानेही पटकन आपली बाजू सावरली.

" बाबा, आता तु लवकर बरा हो आणि मला एकटं सोडून कुठेच जावू नका." म्हणत श्रेया मंदारला बिलगली.

तिला जवळ घेत त्यानेही होकारार्थी मान डोलावली. आभालाही भरून आले.
जेवणं आटोपल्यावर बाबांनी श्रेयशला गोळ्या दिल्या.
" या उद्या सकाळी घ्यायच्या गोळ्या आहेत. आठवणीत घे." म्हणत त्यांनी उरलेल्या गोळ्यांचे डोस त्याच्या हातात दिले.

" अच्छा, निघतो मी. माझ्यामुळे तुम्हां सर्वांना खूप त्रास झाला." म्हणत श्रेयश उठला.

" काहीतरीच काय बोलता श्रेयश. आहो आमच्यामुळे तुमची खूप दगदग झाली आणि त्यामुळेच.." बोलता बोलता मंदार थांबला.

" नाही हो. काही दिवसांपासून बी.पी चा त्रास होतच होता मीच दुर्लक्ष केले. आता ठिक आहे." श्रेयश म्हणाला.

" उद्या घरून डब्बा पाठवतो. शक्यतो बाहेरचं खाऊ नका आणि नाही म्हणू नका." मंदारने स्पष्टपणे सांगितले.

होकारार्थी मान हलवित श्रेयश घराबाहेर पडला. मागोमाग आभाचे आईवडिलही घराबाहेर पडले. गेटपाशीच त्याला गाठत आभाच्या आईने मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

" बाळा, काळजी घे स्वतःची. त्रास करून घेऊ नकोस. शक्य असल्यास या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पड आणि स्वतःचं आयुष्य जग. तुला असं नाही पाहवत आमच्याने " म्हणत त्या गहिवरल्या.

" श्रेयश, कदाचित हेच आपलं प्रारब्ध होतं म्हणून सुखाची रांगोळी क्षणात विस्कटली पण त्याने आयुष्य थांबत नाही. तु खूप काही सहन केलं आहेस, खूप काही भोगलं आहेस पण आता सावर स्वतः ला. एका मुलाला तर गमावलं आहे पण दुसऱ्या मुलाला असं कुडत जगतांना नाही पाहवत." बाबांनी असे म्हणताच श्रेयशला अश्रू अनावर झाले. क्षणाचा अवकाश की त्यांना मिठी मारत तो रडू लागला.

" बाबा, माफ करा मला." तो रडत रडत म्हणू लागला.

" शांत हो पाहू. जुनं आठवायचं नाही असं ठरवलं आहे ना आपण मग अजून तेच. घडून गेला तो आपल्या नशिबाचा भाग होता. आता सावरायचं आहे. आम्ही सावरतोय तु ही सावर एवढी या बापाची इच्छा. उद्या आम्ही घरी जाणार आहोत. पुन्हा कधी भेटू माहित नाही पण जेव्हा कधी भेटू तेव्हा तुला सुखात पाहायचे आहे . एका चांगल्या जोडीदारासोबत तुझाही संसार थाटलेला पाहायचा आहे . हवं तर ही आमची शेवटची इच्छा समज." त्याच्या पाठीवरून हात फिरवित बाबा म्हणाले.

" बाबा, या अश्या इच्छेच्या ओझ्याखाली माझी घुसमट होईल." तो अगतिकतेने म्हणाला.

" ही घुसमट तुझ्या सुखी आयुष्याची पायरी ठरेल. आभानेही वास्तव स्विकारले आता तु ही ते स्विकार आणि पुढे जा." आई त्याला समजावत म्हणाल्या.

" हे सगळं अशक्य आहे माझ्यासाठी." तो म्हणाला.

" आमच्या इच्छेखातर तुला ते शक्य करावं लागेल" आई म्हणाल्या.

" पण..." तो म्हणतच होता की बाबांनी त्याला अडवले.

" अमितजवळ एखादी इच्छा बोलून दाखवली असती तर त्याने ती पूर्ण केली असतीच ना. आता तुच आमचा.." म्हणता म्हणता बाबा गहिवरले.
त्यांना असं गहिवरलेलं पाहून मात्र तो हतबल झाला.

" मी प्रयत्न करेन बाबा.." म्हणत त्याने पुन्हा त्यांना आलिंगन दिले. आभाच्या आईलाही गहिवरून आले.

घरातून मंदार सारं काही पाहत होता. त्यांचे शब्द कानावर नव्हते पडत पण भावनिक झालेले ते तिघे त्याला स्पष्टपणे दिसत होते.

" मिस्टर श्रेयशच्या बाबतीत आईबाबा खूप हळवे बनले आहेत. उद्या घरी जाणार म्हणून त्याला भेटत असणार." मंदारला त्यांना असं एकटक पाहतांना पाहून आभा म्हणाली.

मंदारने होकारार्थी मान हलवली.
" मी खाली झोपतो. पायऱ्या चढतांना त्रास होईल." तो थोडा तुटकपणेच बोलत होता.

" हम्मम.. आईबाबा श्रेयासोबत आपल्या रुममध्ये झोपणार आहेत. आपण खाली त्यांच्या रुममध्ये झोपूया." आभा म्हणाली.

" ठिक आहे." एवढेच काही ते म्हणून मंदार खोलीकडे निघाला. त्याला हात देण्यासाठी आभा पुढे येताच त्याने नजरेनेच नकारार्थी मान हलवली. आभाला पुन्हा एकदा वाईट वाटले. त्याच्या मनात उठलेल्या वादळाची जाणिव होती कदाचित ती. तोवर आईबाबाही आत आले.

" आभा, मंदारराव झोपले का गं?" आभाच्या बाबांनी चौकशी केली.
त्यांच्या बोलण्याने ती भानावर आली. मान हलवत तिने होकार दिला. आभाशी काही बोलण्याच्या उद्देश्याने दोघेही सोफ्यावर बसले.

" बाळा, थोडा वेळ बस." आई म्हणाली.
तशी ती ही आईजवळ जाऊन बसली. आईच्या खांद्यावर डोकं ठेवत तिचा हात हातात घेतला.

" आभा, ठिक आहेस ना गं ?" तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवित आई म्हणाली.
तिने पुन्हा एकदा मानेनेच होकार दिला.

" बाळा, उदया आम्ही निघतो. मंदाररावांची काळजी घे आणि स्वतःचीही." बाबांनी सांगितले .

" थांबा ना थोडे दिवस. तुम्ही गेल्यावर करमत नाही." ती हळवी होत म्हणाली.

" नको थांबवूस आता. पुन्हा येऊ लवकरच." ते समजावते झाले.

" बाबा, घरी गेल्यावर पुन्हा जुन्या आठवणींत हरवून जाऊ नका. आईला सांभाळतांना स्वतः ला विसरू नका." म्हणत ती बाबांच्या जवळ येऊन बसली.

" हो.." म्हणत त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

" आभा, श्रेयशही निघेल बहुतेक काही दिवसांत. शक्य झाल्यास त्याच्याशी बोलून त्याला माफ कर. मनावरचं ओझं कमी होईल. त्याचा त्रास नाही पाहवत आता. अपराधीपणा त्याच्या जगण्याच्या मार्गात अडसर ठरत आहे. तुझ्या माफ करण्याने कदाचित त्याचा पुढचा प्रवास सुखकर होईल." त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
त्यांच्या बोलण्याने ती हळहळली. मानेने होकार देत तिने त्यांच्या मांडीवर डोकं टेकवलं.

" कालच्या घटनेने तर तो आणखी हतबल झाला होता. सुदैवाने सत्य समोर आलं आणि तुझा गैरसमज दुर झाला. बाळा, श्रेयशला आमच्यापेक्षा तु जास्त ओळखतेस त्यामुळे त्याचं चांगलं वाईट तुझ्याशिवाय आणखी कोणाला कळेल. एकदा भेट त्याला त्याची पूर्वीची मैत्रीण बनून आणि आयुष्यात पुढे जाण्याची गळ घाल. हक्काची सोबत मिळाली तर तुझ्यासारखं त्याचं जगणंही सुसह्य होईल." बाबांनी असे म्हणताच तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

" पण जे काही करशील ते योग्य पद्धतीने कर. मंदाररावांना या सगळ्याची झळ बसता कामा नये. भूतकाळ सावरतांना वर्तमानाला दुखावू नकोस. खूप प्रेम आहे त्याचं तुझ्यावर. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस." आईने स्पष्ट शब्दांत तिला समजावले.

" नियतीने खूप मोठं कोडं घातलं आहे आमच्या जीवनात. ज्या भूतकाळाला मी मंदारपासून अलिप्त ठेवू पाहते त्यालाच त्याने मैत्री म्हणून स्विकारले आहे. त्याला जर आमचा भूतकाळ कळला तर तो तुटेल आणि त्याला असं तुटतांना नाही पाहावलं जाणार माझ्याने." बोलतांना तिचा स्वर जड झाला.

" म्हणूनच बाळा जे करशील ते विचारपूर्वक कर. त्यांची मैत्री तुटू देऊ नकोस." बाबांनी तिला शांत केले.

" श्रेयश समजूतदार आहे. तो लवकरच येथून निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यातूनही, परंतु येथून जाण्याआधी त्याचं जगणं सुसह्य करण्याची जबाबदारी तुझी असेल. जगू दे त्यालाही." आईने तिला तिच्या कर्तव्याची जाणीव करून दिली.

तिनेही त्या जबाबदारीला कर्तव्य म्हणून स्विकारायचे ठरवले.
आभाला समजावून ते दोघेही झोपायला निघून गेले. त्यानंतरही कितीतरी वेळ ती तिथेच बसून राहिली आपल्या फाटक्या नशिबाला सात्वंनाचं ठिगळ लावत.

एव्हाना बराच उशीर झाला होता. विचारांच्या गर्दीतून वाट काढत तिला वास्तवाची जाणीव झाली. मंदारची आठवण येताच ती लागलिच दिवे माळवून खोलीत आली. खोलीतील लाईट बंद होती. मंदारची झोपमोड होऊ नये म्हणून लाईट न लावता मोबाईलच्या मंद प्रकाशात ती बेडपर्यंत पोहचली.बेडवर मंदार नव्हता.तिच्या काळजात चर्र झाले. मंदारने आपलं बोलणं ऐकलं नसेल ना या विचाराने ती धास्तावली तोच नजर बाल्कनीत गेली. तेवढ्या अंधारातही बाल्कनीतल्या सोफ्यावर बसलेला मंदार तिला स्पष्ट दिसला . मनाने नको नको ते अंदाज बांधायला सुरवात केली होती.
आज पहिल्यांदाच त्यांच्या नात्यात अंतर आल्याचे तिला स्पष्ट जाणवले होते आणि त्यातच मंदारला असे अंधारात एकटे बसलेले पाहून ते अंतर कोसोंचे वाटू लागले. श्रेयशच्या बाबतीत तिचा हळवेपणा त्याच्या नजरेतून सुटला नव्हता याची जाणीव तिला अजून आरक्त करीत होती. ती त्याच्या जवळ पोहचली. मोबाईलच्या प्रकाशात सोफ्यावर डोकं टेकवून बसलेला तो तिला अगतिक वाटला. प्रकाशामुळे मिटलेले डोळे उघडत त्याने तिच्याकडे पाहिले आणि पुन्हा डोळे मिटले.
" मंदार, असा का बाहेर बसला आहेस ?" ती भावनिक होत म्हणाली.
डोळ्यांवरून हात फिरवत त्याने सुस्कारा सोडला.

" झोप येत नाही आहे." बोलतांनाही त्याचे डोळे मिटलेलेच होते.

" मग हॉलमध्ये यायचं ना किंबहुना मला बोलवलं असतच.." ती बोलता बोलता शांत झाली.

" मी ठिक आहे." तो एवढच उत्तरला.

" गोळ्या घेतल्यास ?" ती काळजीने म्हणाली.

" नाही.." तो उत्तरला.

तिला मात्र मेल्याहून मेल्यासारखे झाले. मंदारला वेळेवर गोळया देणे, त्याच्या आरामाची काळजी घेणे ही तिची जबाबदारी होती पण तिच्याकडून नकळतपणे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं.
" सॉरी मंदार.. मीच लक्ष द्यायला हवं होतं. " म्हणत तिने रुमची लाईट लावली. औषधांच्या पॉकिटातून गोळया काढल्या. पाण्याची बॉटल घेऊन ती त्याच्यापाशी पोहचली.

" आधी गोळ्या घे." म्हणत तिने त्याच्या हातात गोळ्या दिल्या.

काहीही न बोलता त्यानेही निमूटपणे त्या घेतल्या.
" त्रास होत आहे का ?" त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत ती म्हणाली.

त्याने एक गहिरा कटाक्ष तिच्यावर टाकला. त्याची ओलेती नजर तिला बैचेन करून गेली. त्याने मानेनेच नकार देत डोळे मिटले.
" मंदार, आत चल. तुला आरामाची गरज आहे." म्हणत पुन्हा एकदा तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

" तु झोप मी येतो थोड्या वेळात." त्याने डोळे न उघडताच उत्तर दिले.

आता मात्र तिचं उरलं सुरलं अवसानही गळून पडलं. मंदारचं असं अलिप्त वागणं तिला छळून गेलं. तशीच खाली बसत तिने त्याच्या मांडीवर आपलं डोकं टेकवलं.

" माझं काही चुकलं असेल तर माझ्यावर ओरड पण असा शांत नको राहूस. ही शांतता मला छळते रे. मी तुझ्यात जिवंत आहे. नव्याने जगले ते तुझ्यामुळे. या जगण्याचा आधार नको हिरावून घेऊस नाहीतर मरेन मी.." बोलता बोलता तिला अश्रू अनावर झाले.
तिला रडतांना पाहून तो पुन्हा एकदा विरघळला.
डोळे उघडत त्याने तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यांतील अश्रू त्याला तिच्याप्रती हळवं करून गेले.

" आभा, प्लिज रडू नकोस. तुला रडतांना नाही पाहू शकत मी." म्हणत त्याने तिचे डोळे टिपले.
तशी ती आणखी गहिवरली.

" लग्नानंतर पहिल्यांदाच तुला एवढं शांत पाहिलं आहे मी. मघाशी मी आत येण्यासाठी तुझा हात पकडत असतांनाही तु ते नाकारलेस. माझ्याशी निट बोललाही नाहीस आणि आता हा असा अंधारात बसून राहिला आहेस." ती लहान मुलाप्रमाणे रडत म्हणाली.

" तु आधी शांत हो." म्हणत त्याने तिचा चेहरा ओंजळीत पकडला.
तिची ओलेती नजर त्याला कासावीस करीत होती. तिला आपल्यामुळे कोणताच त्रास होऊ नये म्हणून तो नेहमीच आग्रही असायचा पण आज तोच तिच्या दुःखाचं कारण ठरत होता.

" बोल ना श्रेयश. माझे कुठे चुकले का ? स्पष्ट बोल." त्याचा हात हातात घेत ती आर्जव करू लागली.

" नाही गं वेडाबाई. तु स्वतःला दोष नको देऊस. आधी आत चल." म्हणत तो तसाच उठून उभा राहिला. एका हाताने सोफ्याचा आधार घेत त्याने आभाला उठवले. दोघेही आत आले. तिला बेडवर बसवत तो बाजूला बसला. तशी ती त्याच्या कुशीत शिरली.

" तुझं माझ्याशी असं अलिप्त वागणं छळतं रे." ती परत रडवेली होऊन म्हणाली.

" आय ॲम सॉरी." म्हणत त्याने तिला शांत केले.

" म्हणजे नक्कीच काही तरी कारण आहे." म्हणत आता तिने त्याचा चेहरा ओंजळीत पकडला.

" मंदार एरव्ही माझं दुःख किती सहजपणे रितं करतोस आणि तुझ्या एकटेपणात मला विसरतोस किंबहुना तुझ्या दुःखाचं कारण मी तर नाही ना ?" ती प्रश्नार्थक स्वरात म्हणाली.
श्रेयश सोबतचं आपलं वागणं आठवताच तिला अपराधी वाटलं.

" तु माझ्या जगण्याचा आधार आहेस मग माझ्या दुःखाचं कारण तु कशी ठरशील फक्त तुझं सतत विचारांच्या अधीन असणं त्रास देऊन जातं." तिच्या डोक्यावरून हात फिरवीत तो म्हणाला.

" कितीही सावरायचा प्रयत्न केला तरी तोल जातोच.भुतकाळ डोकावतोच वर्तमानाच्या सुखात.भावनिकतेने जोडले गेले आहे मी माझ्याच दुःखाशी. कधी कधी खूप अपराधी वाटते." ती कोड्यातच म्हणाली.

" कसला अपराध ? जगण्याचा ? आभा, तुला काही सांगायचं आहे का मला ? स्पष्टपणे बोल मी कायम तुझ्यासोबत असेन." तो स्पष्टपणे म्हणाला.

तशी ती आणखी गहिवरली. त्याच्या भोवतीची मिठी आणखी घट्ट केली. मनात चलबिचल झाली. क्षणभर वाटलं सगळं सांगावं त्याला. श्रेयशसोबत जगलेला आपला भूतकाळ विश्वासाने त्याच्यासमोर उलगडावा. आपल्या दुःखात खऱ्या अर्थाने त्याला सामील करून घ्यावं.

' आभा, चुकत आहेस तु.श्रेयशच्या बाबतीत तुला हळवी होतांना पाहून मंदारला किती वाईट वाटले ते पाहिलं आहेस तु.आपल्या हळव्या प्रेमाची कहाणी उलगडून त्याला आणखी दुःख देण्याचा तुला कोणताच अधिकार नाही. तुझ्या बाबतीत तो किती अगतिक आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आयुष्यात अनेक आघात स्विकारून तो ही भक्कमपणे उभा राहिला आहे आणि या भक्कमपणाचा आधार आहे त्याचं तुझ्यावरचं निर्व्याज प्रेम. त्याच प्रेमाला भूतकाळाचं ग्रहण नको लागू देऊस. मंदारशी लग्न करून श्रेयशच्या प्रेमाची एकदा प्रतारणा झाली आहे आता पुन्हा मंदारच्या बाबतीत तेच पाप माथ्यावर नको लावून घेऊस. दोघांच्या मैत्री आड नको येऊस. उदया श्रेयश निघून जाईल पण मैत्रीच्या गोड आठवणी मंदारला त्याच्याशी जोडून ठेवतील. मी माझ्या भूतकाळाने मैत्रीच्या या गोड जाणिवा नाही संपवू शकत. मनात उठलेलं हे गतकाळाचं वादळ मनातच शांत करावं लागेल.' तिच्या बुद्धीने पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं.

" माझं अस्तित्व तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्यात येऊन संपतं हे एवढच माझ्या आयुष्याचं समीकरण आहे.जे आहे ते तुझ्यासमोर आहे. अमितनंतर हळवेपणा प्रचंड वाढला आहे आणि त्याची प्रचिती तुला नेहमीच येते." ती मनाला सावरत म्हणाली.

' मी असा कसा विचार करू शकतो. श्रेयशच्या बाबतीत तिचं आजचं वागणं म्हणजे हा हळवेपणाच असेल. आईबाबांनाही ते मुलासारखा वाटतात म्हणूनच ते भावनिकतेने श्रेयशशी जोडले गेले असणार. मी किती चुकीचा विचार करत होतो.' स्वगत होत त्याने आभा भोवतीची मिठी घट्ट केली.

"मंदार, भूतकाळाला मागे सोडून मी मनापासून वर्तमान स्विकारलं आहे.मी तुझ्यातच जिवंत आहे आणि असेन." तिने असे म्हणताच आता तो गहिवरला.
" आभा, आय ॲम सॉरी.खरच मला माफ कर.तुला समजून घ्यायला मी अजूनही कुठेतरी कमी पडत आहे. तुझ्या भूतकाळाला अजूनही उलगडायचा चुकीचा प्रयत्न करत आहे.साधर्म्याच्या जोरावर मी आपल्या प्रेमाची परीक्षा घेत आहे. आय ॲम सॉरी." म्हणत आता तो हळवा झाला.
त्याच्या शब्दांतून सारेच तर कळले होते तिला किंबहुना तेच तर सत्य होतं. तो फक्त साधर्म्य नव्हता तेच शाश्वत सत्य होते हे सांगण्याची हिंमत तिच्यात नव्हती आणि तिला ती दाखवायचीही नव्हती.
" तु का स्वतःच्या मनाला लावून घेतोस. तु चुकीचा नव्हतास, नाहीस
आणि कधीच नसशील. चुकलं तर माझं. मला माफ कर." ती त्याला शांत करीत म्हणाली.
त्याने मानेनेच नकार देत तिच्या मांडीवर डोकं टेकवलं.
तिनेही मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
एकमेकांना समजून घेत ते दोघे एकमेकांत विसावले.
इकडे श्रेयशनेही स्वतःला सावरायचे ठरवले होते.आभाच्या आईबाबांच्या शब्दाखातर त्याने जगायचे ठरवले होते. आभाचं त्याच्याबाबतीत आजचं वागणं त्याच्या वेदनेवर रामबाण उपाय ठरू पाहत होतं. तिने माफ करावं एवढच तर हवं होतं त्याला. तिचा त्याच्यावरच्या प्रेमाचा अधिकार त्याने कधीच सोडला होता पण तिच्यावरचं त्याचं प्रेम त्याला कायम अबाधित ठेवायचं होतं. त्याचा निर्णय ठाम होता.ऑफिसची घडी निट बसताच तो कायमचा तिच्या आयुष्यातून निघून जाणार होता पुन्हा कधीही न भेटण्यासाठी.मंदारची मैत्री आठवणीच्या रुपात का होईना पण त्याला जपायची होती.श्रेया सोबत जगलेल्या अनमोल क्षणांनी आपला येणार भविष्यकाळ सुसह्य करायचा होता.आभाच्या माफीचं दान पदरात पाडून घेत स्वतःला सावरायचं होतं.

क्रमश:

©® आर्या पाटील