तु असा जवळी रहा (भाग ४७ वा)

रुपेशच्या नजरेसमोरून श्रेयशचा चेहरा मात्र हलत नव्हता. गाडी तर सुरु झाली होती पण तो मात्र गतकाळाच्या त्या थांब्यावर अजूनही तसाच हतबल होऊन थांबला होता. श्रेयाची बडबड सुरू होती तेवढीच, बाकी आईबाबाही शांतच होते.
तु असा जवळी रहा ( भाग ४७ वा)

©® आर्या पाटील

रात्री उशीरा झोपल्याने आभाची सकाळही उशीराच झाली. मंदार अजूनही झोपेतच होता. त्याच्या बाजुने वळत तिने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. झोपेतही तो तिला हळवा भासला. कितीतरी वेळ त्याला न्याहाळून झाल्यावर ती उठली. आन्हिके उरकून रूमबाहेर पडली. एव्हाना आभाच्या आईने स्वयंपाकघराचा ताबा घेतला होता. बाबाही उठून देवपूजेला लागले होते. छोटी श्रेयाही तयार होऊन शहाण्या लेकरागत नाश्ता करीत होती.

" हे काय श्रेया, तु एवढ्या लवकर उठून तयारही झालीस ? स्कूलला सुट्टी लागली आहे." म्हणत तिने चपातीचा घास उचलला आणि तिला भरवला. हातानेच थांब असा इशारा करीत तिने घास संपवला.

" हो गं आई माहित आहे. मला आजी आजोबांसोबत जायचे आहे. आणि तुला माहित आहे का आम्हांला घ्यायला रुपेश मामा येणार आहे." ती खूपच आनंदाने म्हणाली.

" आई, आणि हे कधी ठरलं. कालपर्यंत तर श्रेयाला कुठेही जायचं नव्हतं आणि आज अचानक ?" ती किचनमध्ये जात आईला म्हणाली.

" सकाळी रुपेशचा कॉल आला तेव्हाच ठरलं बघ त्याच्या भाचीचं." आई हसत म्हणाली.

" अगं पण ती राहणार नाही. पुन्हा आणून सोडावं लागेल. उगा त्रास देईल." आभा समजावत म्हणाली.

" नाही गं आजी. मी नाही त्रास देणार. मी शहाण्या बाळासारखी राहीन. मला तुमच्यासोबत यायचं आहे." ती हट्ट करू लागली.

" तु गप्प रहा. " म्हणत आभाने तिला शांत केले आणि मोर्चा पुन्हा आईकडे वळवला.

"आई, ही आता हो सांगेल पण तिकडे गेल्यावर गोंधळ घालेल. मागे तिच्या आत्याकडे थांबल्यावर असेल केले होते. घर जवळ होते म्हणून भाऊंनी रात्रीच आणून सोडलं. तिकडे असा हट्ट केला तर काय करशील ?" ती समजावत म्हणाली.

" मी नाही असा हट्ट करणार. मला जाऊ दे ना आई. रुपेश मामाच्या गाडीत जायचं आहे.." ती लाडात येत म्हणाली.

" रुपेश येणार आहे का घ्यायला ?" तिने आईला विचारलं.

" हो.. सकाळीच फोन आला होता त्याचा. मागे सोडायलाही येणार होता पण अर्जन्ट काम निघालं." आईने सांगितले.

" अमितचा जीवाभावाचा मित्र. अमित नंतरही त्याने त्याची मैत्री कायम निभावली किंबहुना निभावत आहे." आभा हळवी होत म्हणाली.

" त्याचा खूप मोठा आधार आहे आम्हांला. दिवसाआड एकदा तरी घरी येऊन जातो. काही हवं नको ते सगळं बघतो." बाबा आत येत म्हणाले.

" मला जायचं आहे रुपेश मामासोबत." श्रेया पुन्हा एकदा हट्ट करत म्हणाली.

" पण बेटा मला करमणार नाही तुझ्याशिवाय." तिला जवळ घेत आभा म्हणाली.

" आभा, एवढी इच्छा आहे तर येऊ दे श्रेयाला आमच्यासोबत. इकडे मंदाररावांना आरामाची गरज आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. अश्या वेळेस श्रेयाचीही दगदग होईल. शाळेलाही सुट्टी आहे तर राहील थोडे दिवस." बाबा समजावत म्हणाले.

" आम्हांलाही बरं वाटेल सोबत श्रेया आली तर." आईनेही दुजोरा दिला.

" पण..." ती परत आढेवेढे घेत म्हणाली.

" पण नाही आणि बिन नाही. मी माझ्या भाचीला घरी न्यायला आलो आहे." म्हणत रुपेश आत आला.

त्याला पाहून आभाला अमितची आठवण आली. हृदय जड झाले पण पुढच्याच क्षणी स्वतःला सावरत तिने रुपेशचे स्वागत केले. छोटी श्रेयाही मामा मामा म्हणत त्याच्या गळ्यात पडली. रुपेशनेही तिला उचलून घेतले. हातातल्या कॅडबरीज तिला देत भाचीचे लाड पुरवले.

" कशी आहेस ताई ?" रुपेश तिची आपुलकीने चौकशी करता झाला.

" मी ठिक आहे. खूप दिवसांनी आलास ताईला भेटायला." त्याच्यातच अमितला अनुभवत ती म्हणाली.

" अगं आई बाबांना सोडायला येणार होतो पण महत्त्वाचं काम निघालं.." त्याने उत्तर दिले.

त्या अपघातात अमित सोबत तो ही होता. नशिब बलवत्तर म्हणून तो वाचला पण अपघाताने बसलेला जबर मानसिक धक्का त्यालाही उद्धवस्त करून गेला. खूप प्रयत्नांती तो त्यातून बाहेर पडला होता किंबहुना पडत होता. अमितनंतर त्याच्या आईवडिलांना त्याने आपलं मानलं होतं.

" भावोजींना बरं वाटतय ना ? काल आई बाबांनी सांगितलं त्यांच्या अपघाताविषयी." मंदारची चौकशी करीत तो म्हणाला .

" मी एकदम ठिक आहे. तुझी ताई असतांना मला काही होईल का ?" म्हणत मंदारही बाहेर आला.

नाश्ता पाण्याचं पाहून आभा श्रेयाची बॅग भरायला रुममध्ये गेली. इकडे आईबाबांनी ही आपलं सामान आवरलं. रुपेशने बॅगा गाडीत भरल्या. छोटी श्रेया मामाच्या गाडीत जायचं म्हणून खूप खुश होती.

" बाबा, तु तुझी काळजी घे आणि आईची पण घे. माझी आठवण आल्यावर आई रडत बसेल नाहीतर.." म्हणत तिने मंदारच्या गालावर गोड पापा दिला.

" एवढं वाटतं तर जाऊ नकोस ना ?" आभा पुन्हा आडकाठी टाकत म्हणाली.

" मी घेईन तुझ्या आईची काळजी. तु आजी आजोबांची काळजी घे." मार्ग काढत मंदार म्हणाला.

" मस्त आयडिया.." श्रेयाच्या गालावर खळी पडली.

" चला. मग निघायचं ना.." रुपेश म्हणाला.

मंदारने जेवणाचा आग्रह केला पण रुपेशला शक्य नसल्याने त्याने विनंतीला मान ठेवून पुढच्या खेपेस जेवायला येण्याचे कबूल केले .
आई बाबांना निरोप द्यायला आभाला नेहमी प्रमाणे जड झाले होते पण पर्याय नव्हता. मंदारला काळजी घेण्याचे सांगून दोघेही बाहेर निघाले. रुपेशने गाडी काढली. श्रेयशला भेटायची इच्छा अनावर झाली होती पण रुपेश त्याला समोर पाहून कसा रियॅक्ट करेल याची भीती असल्याने त्यांनी ते टाळले.

" मी माझ्या फ्रेण्डला बाय तर केलच नाही. बाबा,मी श्रेयशला बाय करून येऊ ?" तिने मुद्दामहून मंदारलाच हा प्रश्न केला.
तिच्या या प्रश्नाने आभा गोंधळली. आईबाबांनीही रुपेशकडे पाहिले. श्रेयशचं नाव ऐकून त्यालाही आश्चर्य वाटले.

" श्रेया, मामाला उशीर होत आहे." म्हणत आभाने तिला अडवले.

" मामा मी लगेच आली." म्हणत तिने त्यातूनही मार्ग काढला.

" आभा, भेटू दे तिला. कदाचित नंतर ती त्यांना भेटू शकणार नाही." मंदार हळू आवाजात म्हणाला.

" पण..." ती पुढचं काही बोलणार तोच समोरच्या बंगल्यातून श्रेयशची गाडी निघाली.

" फ्रेण्ड.." म्हणत श्रेयाने आवाज देताच तो थांबला. आईबाबांना निरोप देण्याच्या उद्देश्याने त्याने गाडी बाजूला लावली.
तो गाडीतून उतरला. त्याला पाहून रुपेशला मात्र दरदरून घाम फुटला. अपघाताची जुनी आठवण ताजीतवानी झाली. डोळ्यांतून अश्रू ओघळले.

" रुपेश,बाळा ठिक आहेस ना ?" त्याला भानावर आणत आई म्हणाली.

मानेनेच होकार देत तो गाडीतून बाहेर आला. तोच मंदारचा फोन वाजला. ऑफिसचा कॉल असल्याने तो बोलण्यासाठी घरात गेला.
इकडे गाडीजवळ येताच रुपेशला पाहून श्रेयश जागीच थबकला.
स्मृतीपटलावर तिच जुनी आठवण तेवढ्याच तीव्रतेने जागृत झाली. मांडीवर निपचित पडलेला अमित, रस्त्याच्या कडेला पडलेला रुपेश सारं सारं त्याला जसेच्या तसे आठवले. रुपेशची मनस्थितीही वेगळी नव्हती. त्याच्याही नजरेसमोर अपघाताची ती घटना जशीच्या तशी तरळली.

" श्रेयश, मी मामाकडे निघाली आहे. रूपेश मामा घ्यायला आला आहे." म्हणत श्रेया त्याच्याकडे धावली.
तिच्या बोलण्याने तो भानावर आला.
रुपेशकडे पाहणेही त्याला शक्य नव्हते. द्विधा मनस्थितीत तो श्रेयाच्या पुढ्यात बसला.

" मग आता कधी भेटणार तुझ्या फ्रेण्डला ?" तिच्या पुढ्यात कॅडबरी पकडत तो म्हणाला.

" मी मामाकडून आल्यावर लगेच." ती निरागसपणे म्हणाली.
ती परत येण्याआधी आपण येथून कायमचे निघून जाणार या जाणिवेने त्याचे डोळे पाणावले.
तसाच उठत तो आईबाबांजवळ आला. त्यांना नमस्कार करताच दोघेही भावूक झाला. रुपेशच्या समोर जाण्याची हिंमत नव्हती. रुपेशलाही त्या स्थितीत अवघडल्यासारखे होत होते. हात जोडून श्रेयशने मुकपणे त्याची माफी मागितली. त्याने मात्र तात्काळ नजर फिरवून भरून आलेले डोळे टिपले. रुपेशला असं पाहताच श्रेयशने मात्र तेथून काढता पाय घेतला. त्याचा त्रास श्रेयशला आणखी वाढवायचा नव्हता म्हणूनच तो तेथून निघून गेला. त्या सगळ्यात आभा मात्र मंदारचा वेध घेत होती.त्याच्यासमोर कोणतीही गोष्ट अयोग्य पद्धतीने न यावी हीच तिची इच्छा होती. काल रात्रीनंतर त्यांच्या नात्याबद्दल ती खूप सतर्क झाली होती.
गाडी सुरु करून तो निघून गेला आणि तेवढ्यात मंदारही आला.

" हे काय श्रेयश गेले ही ?" तो पुढचं काही विचारणार तोच आभाची आई त्यांच्यासमोर आली.

" मंदारराव निघतो आम्ही. काळजी घ्या." आई म्हणाली.
मंदारनेही होकारार्थी मान हलवली.

" रुपेश निघायचं ना ?" बाबांनी विचारताच तो भानावर आला.

मंदारची रजा घेत तो गाडीत बसला खरा पण मनात मात्र अजूनही श्रेयशचाच विचार सुरु होता.
सगळे गाडीत बसले. श्रेयाला निरोप द्यायला आभाला खूप जड जात होते. थोड्याच वेळात गाडी निघाली आणि बघता बघता नजरेआड गेली.
आभा मात्र अजूनही न दिसणाऱ्या गाडीचा वेध घेत होती. मंदारने तिला जवळ घेतले तशी ती हळवी झाली.

" बघ ना कशी निघून गेली .." त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत ती म्हणाली.

" थोडे दिवस. आई बाबांना बरं वाटेल." त्याने समजावले.

" आणि माझं काय ?" ती गहिवरली.

" तुझ्यासाठी मी आहे ना." त्याने असे म्हणताच तिने त्याच्या हातावर मारले.

" आ! दुखतय मला." तो कष्टाने म्हणाला.

" सॉरी सॉरी." म्हणत ती त्याच्या हाताला गोंजारु लागताच तो मात्र मिश्किलपणे हसला.

" वेडाबाई, माझ्या डोक्याला लागलं आहे. हाताला नाही." त्याने असे म्हणताच ती ही हसली. तिच्या गालावर आज खूप दिवसांची पडलेली खळी त्याला घायाळ करून गेली.

रुपेशच्या नजरेसमोरून श्रेयशचा चेहरा मात्र हलत नव्हता. गाडी तर सुरु झाली होती पण तो मात्र गतकाळाच्या त्या थांब्यावर अजूनही तसाच हतबल होऊन थांबला होता. श्रेयाची बडबड सुरू होती तेवढीच, बाकी आईबाबाही शांतच होते. थोड्याच वेळात श्रेयाही झोपली.
" श्रेयश दादा तिथे कधीपासून राहतो." श्रेयाला झोपलेले पाहून त्याने आईबाबांना प्रश्न विचारला.
त्यांनी ही हातचा न राखता श्रेयशविषयीची सगळी माहिती त्याला दिली.

" ताई, बोलते त्याच्यासोबत ?" तो म्हणाला.

" नाही.." बाबा शांतपणे म्हणाले.
तसा तो पुन्हा अवघडला.

" तिने अजूनही त्याला माफ केले नाही. तो अजूनही त्याच पश्चातापाच्या अग्नित जळत आहे. त्याचं पूर्ण आयुष्यच उद्धवस्त झालं आहे त्या एका घटनेने." म्हणतांना आभाची आई हळवी झाली.

" त्याचं लग्न..." त्याने विचारले.

" नाही. त्याने लग्न केले नाही आणि करेल असे वाटतही नाही. अपराधाच्या ओझ्याखाली त्याचं आयुष्य दबलं गेलं. तो जिवंत आहे पण जगणं मात्र सुटलय. आभाने माफ करावं एवढीच काय ती त्याची इच्छा उरली आहे." आई उत्तरली.

" भावोजी बोलतात का त्याच्यासोबत ?"झोपलेल्या श्रेयाकडे पाहत तो म्हणाला.

" मंदाररावांच्या मैत्रीपूर्ण वागण्यामुळेच तो तिथे राहू शकला नाहीतर एव्हाना कधीच निघून गेला असता." बाबा असे म्हणताच तो शांत झाला.
मनात विचारांच काहूर माजलं आणि तो अंर्तबाह्य पोखरला जाऊ लागला.

इकडे भूतकाळाच्या वेदनेतून मार्ग काढत श्रेयश ऑफिसला पोहचला पण मन मात्र पुन्हा तेथेच रेंगाळू लागलं.आता मात्र त्याने जाणिवपूर्वक स्वतःला सावरले आणि कामात मश्गूल करून घेतले.
घरी काम आवरल्यानंतर आभाने मंदारकडे मोर्चा वळवला.त्याला नाश्ता, गोळ्या देत ती त्याच्याजवळ थांबली.

' श्रेयशने नाश्ता केला असेल का की नेहमीसारखच दुर्लक्ष केलं असेल. गोळ्या घेतल्या असतील ना..' अचानक मनात त्याचे विचार उचंबळून आले.

" श्रेयशना कॉल करून विचारतो बरं वाटतं का म्हणून." मंदारने असे म्हणताच ती मात्र भानावर आली.

तिने मानेनेच होकार देत तेथून काढता पाय घेतला पण कान मात्र त्यांच्या संभाषणाकडे होते.
फोनवर त्यांच्या बोलल्यातून त्याने नाश्ता केल्याचे आणि गोळ्या घेतल्याचे कळताच तिला हायसे वाटले.
पूर्ण दिवस आज मंदारच्या सहवासात घालवत तिने त्याची काळजी घेतली.

क्रमश:
©® आर्या पाटील




🎭 Series Post

View all