तु असा जवळी रहा ( भाग ५० वा)

त्याच्या मांडीवर अमितने ठेवलेला देह, त्याच्या रक्ताने माखलेले हात, काळीज भेदरणारी त्याची आरोळी आणि त्याचच ' तु मारलस अमितला ' म्हणत दोष देणारे गावकरी सगळं सगळं आठवलं त्याला.
तु असा जवळी रहा ( भाग ५० वा)
©® आर्या पाटील

आभावर मात्र परत एकदा दुःखाचा डोंगर कोसळला. श्रेयशचं आयुष्य पूर्णपणे उद्धवस्त करण्याची किती मोठी चुक झाली होती तिच्या हातून. डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त श्रेयशच येत होता.वेदनेची अनामिक कळ मस्तिष्कातून सरळ हृदयात शिरली आणि तिचा तोल गेला. सोफ्याला पकडत तिने स्वतःला सावरले पण मनाला मात्र सावरणे अशक्य होते. ज्याच्यासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, सात जन्माची सोबत देण्याचं वचन दिलं, त्यालाच आपण त्याच्या सर्वात कठिण प्रसंगात एकटं सोडून पुढे निघून आलो ही विवंचना आता तिलाच उद्धवस्त करू पाहत होती. क्षणभर तिला तिच्या वर्तमानाचा विसर पडला. डोळे पुसत ती वायुवेगे घरातून बाहेर पडली. पायात चप्पल घालण्याचेही भान तिला उरले नाही. पाऊले श्रेयशच्या बंगल्याच्या दिशेने निघाली. काही मिनिटांच्या त्या प्रवासात पूर्ण जीवनपट डोळ्यांसमोरून सरकला. गेटवर वॉचमन नव्हता त्यामुळे ती तडक आत शिरली. बंगल्याचा दरवाजा मात्र उघडाच होता. एरवी लवकर ऑफिसल्या जाणाऱ्या श्रेयशला आज मात्र उशीर झाला होता . ऑफिसमधलं सगळचं मार्गी लागलं होतं किंबहुना उद्याच इथून कायमचं निघून जाण्याचे त्याने निश्चित केल्याने तिच तयारी सुरु होती.
पाठमोऱ्या श्रेयशला पाहताच तिचं काळीज दाटून आलं.
" श्रेयश.." म्हणत तिने आवंढा गिळला.
आपल्याला घातलेल्या सादेतील तिच जुनी आर्तता कानी पडताच श्रेयश अचंबित झाला.
' आभा..' मनातच म्हणत त्याने मागे पाहिले.
तिला असं अचानक घरी आलेलं पाहून त्याला आश्चर्य वाटलच होतं पण तिचा बदलेला स्वर त्याला जास्त अचंबित करत होता.
" मिसेस कर्णिक, काय झालं ? तुम्ही बऱ्या आहात ना ? मंदार ठिक आहेत ना ?" तिला असं पाहून तो काळजीने म्हणाला.
आता मात्र तिचं हृदयावरचं नियंत्रण सुटलं. दाटून आलेल्या मनातल्या आभाळाला त्याच्या शब्दांचा वारा भिडला आणि भावनेचा पाऊस तिच्या डोळ्यांतून रिता झाला. ती रडू लागली. तिला असं रडतांना पाहून तो मात्र हळवा झाला. आजही तिच्या डोळ्यांत पाणी नव्हतं पाहू शकत तो.
नकळत त्याचे डोळेही भरून आले. योग्य अंतर ठेवत तो तिच्या जवळ आला.

" आभा, अगं काय झालं बोलना." तो भावनिक होत म्हणाला.

काही कळायच्या आत ती तशीच त्याच्या कुशीत शिरली. वर्तमानाचा विसर पडला. भूतकाळाच्या त्याच सोनेरी पर्वाला तिने घट्ट मिठी मारली. नात्याची व्याख्या बदलली असली तरी व्याप्ती तिच होती. प्रेम जसं सांगून होत नाही तसच सांगून संपतही नाही. आज तिच्या प्रेमावर जरी मंदारचा अधिकार असला तरी गतकाळात श्रेयशवर केलेलं प्रेम हृदयाच्या एका कोपऱ्यात जिवंत होतच ना. कोण्याकाळी तो तिचा जिवलग मित्र होता. तिरस्काराच्या रुपात का होईना पण मैत्रीचं ते नातं अजूनही तिच्या मनात जिवंत होतच ना. तिच्या आयुष्याला दिशा देणारा तो एक मार्गदर्शक होता. जरी मार्ग वेगळे झाले तरी मनात त्याच्या आठवणी जिवंत होत्याच ना..आज त्याच प्रेमाने, मैत्रीने किंबहुना त्याच्या सोबतच्या आठवणींनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं. आजवर तिरस्काराच्या सूर्याने पोळलेल्या त्याला ती सावलीसारखी बिलगली.
तिच्या अश्या अचानक जवळ येण्याने तो मात्र गोंधळला. संमिश्र भावनांचं वादळ मनात दाटून आलं. आपली आभा आज आपल्या जवळ आहे या भावनेवर ती आता आपली नाही ही वास्तविकता वरचढ ठरली.

" मिसेस कर्णिक, सावरा स्वतःला." म्हणत त्याने जड अंतःकरणाने तिला स्वतःपासून दूर केले. पाठमोरा वळत त्याने डोळ्यांतले अश्रू टिपले.

ती मात्र रडत तशीच खाली बसली. तिला रडतांना पाहून पाठमोरा वळलेला तो क्षणात तिच्याजवळ बसला.

" आभा,सांग ना काय झालं ? तुला रडतांना पाहून.." बोलतांना त्याचा स्वर दाटून आला.

" मला माफ कर श्रेयश. मी चुकले." त्याच्या हातांच्या ओंजळीत चेहरा झाकत तिचं रडणं आणखी तीव्र झालं.

" आभा, काय बोलत आहेत तु ? मंदार कुठे आहेत ?" तिला शांत करण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला.

" मी खूप मोठी चुकी केली आणि त्यामुळे तुझ्या भविष्याचा,आपल्या नात्याचा किंबहुना मॅडम आणि सरांचा बळी गेला." ती रडत रडतच म्हणाली.
तिच्या अश्रूंनी त्याच्या हाताची ओंजळ ओली झाली तर शब्दांची काळजावर घाव घातला. भूतकाळ आठवला. त्याचं प्रेम, अमितचा अपघात, त्याचं तुटलेलं नातं, तिचं त्याला आयुष्यातून कायमचं वजा करणं, डिप्रेशन, आई वडिलांचा मृत्यु सारं सारं नजरेसमोर तरळलं.

" आभा, आधी शांत हो." एवढ्या मोठ्या आघातातही तिला सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न तो करत होता.
ती मात्र आतून पूर्णपणे कोसळली होती, जसा तो त्या दिवशी तुटला होता अगदी तसाच. तिला त्याचा आधार हवा होता.
बसल्या जागी ती पुन्हा त्याच्या कुशीत शिरली आणि रडू लागली. तिला असं तुटतांना पाहून तो ही आतून तुटत होता. वास्तवाचे भान राखून त्याने तिला आधार दिला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्याने तिला शांत होऊ दिले. त्या दिवशी त्यालाही याच आधाराची गरज होती. तिच्या कुशीत शिरत त्यालाही शांत व्हायचे होते पण तिने मात्र तो आधार नाकारला होता. त्याला स्वतःपासून कायमचं वेगळं करून त्याच्या जगण्याचाच आधार हिरावून घेतला होता. आज त्याच्या कुशीत शिरताच तिला आपल्या त्या चुकीची तीव्रतेने जाणिव झाली.

" किती स्वार्थी बनले होते मी त्या दिवशी. तुझं काहीच न ऐकता अमितच्या खुनाचा आळ घेतला होता तुझ्यावर. त्या अपघातासाठी तुला सर्वस्वी दोषी ठरवत मोठी शिक्षा दिली होती." ती रडतच म्हणाली.

" बरोबरच तर वागली होतीस तु. माझ्यामुळे अमित आपल्याला कायमचा सोडून गेला यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं असेल. मीच कारणीभूत होतो सगळ्यासाठी. माझ्या कर्माची शिक्षा मिळाली मला पण आभा मी मुद्दामहून नव्हतं केलं काही.कसा आणि कुठून अमित गाडीसमोर आला कळलच नाही." बोलतांना आता तो ही रडू लागला.
त्याला रडतांना पाहून तिच्या काळजाला जखम झाली.

" प्लिज नको रडूस आता. खूप रडवलं आहे मी तुला.." म्हणत तिने त्याचे डोळे टिपले.

" त्या दिवशीही तुझी चुकी नव्हती. अमित मित्रांसोबत फिरायला गेला होता. आपल्याच धुंदीत मश्गुल असलेल्या त्यांना आपण रस्त्यावरून चालतो आहोत याचाही विसर पडला असावा. मज्जा मस्ती सुरु होती आणि त्याच मस्तीत रुपेशने अमितला ढकळलं. अमितला आपला तोल सावरता आला नाही. रस्त्याच्या बाजूने चालत असल्याने तो अचानक तुझ्या गाडीसमोर आला.त्या क्षणभरात तु काय पण दुसरं कोणी असतं तरी गाडी कंट्रोल झाली नसती. तुझी काहीही चुकी नसतांना त्या अपघाताचं खापर तुझ्या माथ्यावर फोडण्यात आला." म्हणत त्या दिवशीचा खरा प्रसंग तिने कथन केला.

" तुला कळायच्या आत अमित गाडीसमोर आला आणि..." म्हणत ती पुन्हा रडू लागली.

हे सगळं ऐकून तो मात्र एकदम शांत झाला.त्या घटनेनंतर मनात उठलेलं वादळ तिच्या बोलण्याने अचानक शांत झाले. जे ऐकतोय तो भास नाही ना असं क्षणभरासाठी वाटून गेलं पण पुढच्याच क्षणी भूतकाळाचं ते शल्य त्याच्या नजरेसमोर अवतरलं.
त्याच्या मांडीवर अमितने ठेवलेला देह, त्याच्या रक्ताने माखलेले हात, काळीज भेदरणारी त्याची आरोळी आणि त्याचच ' तु मारलस अमितला ' म्हणत दोष देणारे गावकरी सगळं सगळं आठवलं त्याला. आपल्याच धुंदीत तो उठून उभा राहिला. वर्तमानाचा विसर पडला. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी अमितला मृत घोषित करताच दुःखाचा कोसळलेला डोंगर, आभाच्या बाबांना कोसळतांना पाहून सावरायला पुढे आलेला तो आणि तेवढ्यातच पोलिसांनी त्याला घातलेल्या बेड्या सगळच तो पुन्हा अनुभवत होता. तो तसाच पुढे चालत टेबलापाशी पोहचला. त्यावर ठेवलेली आपल्या आईवडिलांची फोटो फ्रेम त्याने उचलली. तुरुंगाआड त्याला पाहून तुटलेली आई, त्याला सोडवण्यासाठी धडपडणारे त्याचे बाबा आणि अमितला गमावूनही त्याला वाचवायला आलेले आभाचे बाबा आठवून त्याचे डोळे भरून आले. भितींचा आसरा घेत तो खाली बसला. . डोकं भिंतीला टेकलं.
रडण्याचा स्वर हळू हळू वाढत होता.
त्याला असं रडतांना पाहून आभाही त्याच्याजवळ पोहचली.
आता मात्र त्याला आधाराची प्रचंड गरज होती. वर्तमानाचं वास्तव मनाआड दडलं. त्याची आपली म्हणवणारी ती एकच तर व्यक्ती या जगात होती.जवळ बसलेल्या तिच्या मांडीवर डोकं टेकवत त्याने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्याचं डोकं मांडीवरून उचलत तिने मात्र त्याला उराशी कवटाळलं.शरिराच्या पुढे जाऊन मनाच्या आधाराची शांतता होती त्या मिठीत, हृदयाची हृदयाला घातलेली साद होती त्या मिठीत किंबहुना अर्ध्यावरती सुटलेली आश्वासक साथ होती त्या मिठीत.मिठीत सामावत त्यानेही स्वतःला तिच्या सावलीत लपेटून घेतले. त्याचं रडणं छळत होतं पण तिला त्याला आपल्या कुशीत रडू द्यायचं होतं, एवढी वर्ष एकट्याने वाहिलेलं अपराधीपणाचं ओझं कायमचं रितं होऊ द्यायचं होतं, आपल्या आधारात आज तिला मात्र त्याला सांभाळायचे होते.तिला घट्ट बिलगून तो खूप रडला.त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ती त्याला शांत करत होती पण तिच्या मनात तिने त्याच्यावर केलेल्या अन्यायाचे जे वादळ उठले होते त्याचं काय ? तिच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू आज मुके झाले होते. तिने त्याच्यावर केलेला अन्याय आज तिलाच अपराधी बनवत होता. हंबरठा फोडून रडण्याचा अधिकारही ती आज गमावून बसली होती.
तिच्या डोळ्यातले अश्रू त्याच्या गालावर ओघळताच तो मात्र भानावर आला. तिच्यापासून बाजूला होत त्याने स्वतःचे अश्रू टिपले. पुढच्याच क्षणी थरथरणाऱ्या हातांनी तिच्या अश्रूंनाही वेचले.
" आभा, प्लिज तू नको रडूस." तो असे म्हणताच ती हळवी होत त्याच्या कुशीत शिरली.

मघापासून दाबून धरलेला हंबरठा मोकळा करून ती रडू लागली.
" मला माफ कर श्रेयश." म्हणत तिने त्याच्याभोवतीची मिठी आणखी घट्ट केली. निखळ मैत्री आणि पवित्र प्रेमाचा स्पर्श होता तो ,शरीराच्या पलिकडचा. त्याच्या हृदयाची तिच जुनी धडधड तिला आणखी भावनिक करून गेली.

" तु आधी शांत हो ना गं. तुला रडतांना पाहिलं की आतून तुटायला होतं." म्हणत त्याने तिचा चेहरा ओंजळीत पकडत समोर धरला.
तिला मात्र त्याच्या नजरेला नजर देण्याची हिंमत नव्हती.
तिला असं पाहून तो मात्र पुन्हा हळवा झाला. जुन्या आठवणींनी पुन्हा एकदा अश्रूंचे बांध फोडले.
तिच्या मांडीवर डोकं ठेवत तो रडू लागला.


क्रमश:
© आर्या पाटील


🎭 Series Post

View all