Login

तु असा जवळी रहा ( भाग ५४ वा)

माझ्या जगण्याचा जसा तु आधार बनलास तसाच त्यालाही जगण्याचा तो आधार स्विकारावा लागेल. योग्य जोडीदारासोबत त्याचं जगणं सुसह्य होईल, तिच्या प्रेमाच्या छायेत त्याच्या थकलेल्या मनाला नवचेतना मिळेल.चांगला नवरा,चांगला बाबा बनून त्याला संसारात रमतांना पाहायचं आहे,त्याला सुखात पाहायचं आहे . कदाचित तेव्हाच मी त्याच्यावर केलेल्या अन्यायाचं ओझं कमी होईल. तो जर इथे राहिला तर ते कधीच शक्य होणार नाही आणि असे झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही
तु असा जवळी रहा ( भाग ५४ वा )
©® आर्या पाटील

श्रेयशच्या घरातून बाहेर पडतांना आभाला मंदारची आठवण झाली. कोलमडलेला भूतकाळ सावरतांना काही क्षणांसाठी विसरलेला वर्तमानकाळाने पुन्हा साद घातली. मंदारच्या जाणीवेने तिला कुठेतरी चुकल्यासारखं वाटलं. मंदारचा कानोसा घेतच ती गेटबाहेर पडली. तिचं श्रेयशप्रती वागणं अजिबात चुकलं नव्हतं पण ते सत्य मंदारपासून लपविण्याची चुक मात्र ती करून बसली होती. त्याच्याच दडपणात ती आपल्या घराच्या गेटमध्ये शिरली.

' खूप उशीर झाला आहे. मंदारने विचारलं तर काय सांगायचं ? सांगावं का सत्य? त्याला खूप त्रास होईल आणि हा त्रास माझ्याने पाहावणार नाही. श्रेयश म्हणाला तसं जर बाहेरून समजलं तर तो आणखी त्रास करून घेईल.मी त्याला सगळं सांगायला हवं.' स्वगत होत तिने मनाचा कौल स्विकारला.

घराचे दार आताही उघडेच होते. तिने हॉल,खालची बेडरूम, किचन सगळीकडे पाहिले पण मंदार कुठेच नव्हता. तो वर बेडरुममध्ये आराम करत असेल असा विचार करून तिने डायनिंग टेबलवर ठेवलेला आपला मोबाईल उचलला. सुरवातीला त्यावर मंदारचे आलेले कॉल आणि त्यानंतर आईने केलेले कॉल पाहून क्षणभर ती धास्तावली. पुढच्याच क्षणी खुर्चीवर बसत तिने आईला कॉल लावला. काही वेळातच फोन उचलला गेला.
" आभा, मंदाररावांना श्रेयशविषयी कळलय सगळं." म्हणत त्यांनी आभाला त्यांच्यात झालेल्या संभाषणाविषयी सांगितले.
काही कळायच्या आत आभाच्या हातून फोन खाली पडला. तो तसाच सोडून ती लागलिच रुमच्या दिशेने निघाली. मनात नानाविध शंकांचं वादळ घोंघावू लागलं. मंदारचा चेहरा, त्याच्या मनाची झालेली अवस्था आठवत ती रूमपर्यंत पोहचली.रूम आतून लॉक असल्याने बाहेरून उघडण्याचा तिचा प्रयत्न फसला. दरवाज्यावर थाप मारत तिने मंदारला आवाज दिला पण पलिकडून काहीच प्रतिसाद आला नाही. धास्तावलेल्या तिला आता काहीच सुचत नव्हते.

" मंदार, प्लिज दरवाजा उघड ना." म्हणतांना ती रडू लागली.
तरीही त्याचा काहीच प्रतिसाद नव्हता.

मंदार अजूनही त्याच कोपऱ्यात शून्य अवस्थेत बसून होता. तिचे शब्द कानावर पडत होते पण दरवाजा उघडण्याची इच्छा होत नव्हती. तिच्याशी लग्न केल्यानंतर आयुष्यातील सर्वात सुखी पर्व अनुभवणाऱ्या त्याच्या सुखालाच जणू नजर लागली होती. तिचा आवाज कानावर पडताच त्याच्या वेदना आणखी तीव्र झाल्या. मघासचे ते दोघे त्याच्या डोळ्यांसमोर तरळले आणि क्षणात त्याने डोळे गच्च मिटून घेतले. अंतरीची वेदना डोळ्यांतून ओघळू लागली.

" तू ठिक आहेस ना आत. प्लिज दरवाजा उघड मंदार." आता मात्र दारावरची थाप तीव्र करत ती गयावया करू लागली.

मंदारने मात्र कानावर हात देत मागे भिंतीला डोके टेकले.
जवळ जवळ दहा मिनिटे ती दरवाजा वाजवत राहिली पण काहीच प्रतिसाद आला नाही. खाली जाऊन तिने मोबाईल आणला आणि त्याला कॉल केला. आतून रिंगचा आवाज येत होता पण त्याने फोनही उचलला नाही.
तिच्या काळजाचा ठोका चुकत होता.
' मंदारने स्वतःला काही..' मनात आलेल्या शंकेला मनातच रोखत तिने पुन्हा दरवाजा ठोठावला.
" मंदार, दरवाजा उघड ना. मी मरेन अश्याने.." तिने असे बोलताच त्याला मात्र असह्य झाले. जागेवरून उठत त्याने डोळे टिपले. मनाला खंबीर बनवले आणि दरवाजा उघडण्याचा निर्णय घेतला. ती दारातच रडत बसली होती. दरवाजा उघडण्याचा आवाज येताच ती उठून उभी राहिली. कडी उघडून तो मात्र बाल्कनीच्या दिशेने पाठमोरा उभा राहिला. दरवाजा ढकलून आभा आत आली.मंदारला पाहून तिचा जीव भांड्यात पडला. ती त्याच्या दिशेने धावली. पाठमोऱ्या त्याला मिठी मारत ती रडू लागली. त्याला मात्र तिचं जवळ येणं असह्य झालं. मघाशी तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडणारा श्रेयश आठवताच वेदनेने मनाचा ताबा घेतला. तिची मिठी सोडवत तो तिच्या दिशेने वळला. तिच्या दंडांना पकडून त्याने तिला भिंतीच्या दिशेने वळवले. त्याचा तो स्पर्श तिला प्रचंड बोचरा भासला. ज्या हातांनी तिला जपले होते आज तेच हात तिच्या वेदनेचं कारण ठरत होते. तिला मात्र आपली शरीराची वेदना त्याच्या मनाच्या वेदनेपुढे तुच्छ वाटत होती.भिंतीच्या कोपऱ्यात तिला जेरबंद करत तो रडू लागला.

" का वागलीस माझ्यासोबत अशी ? मी क्रित्येकदा तुझ्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण तु कधीच काहीच कळू दिलं नाही." तो रडत रडत म्हणाला.

त्याने तिचे हात सोडत भिंतीवर मुठीने मारत आपला राग व्यक्त केला. त्याने हात मोकळे करताच त्याचे अश्रू टिपण्यासाठी तिने ते त्याच्या चेहऱ्याच्या दिशेने उचलले पण क्षणाचा अवकाश की मंदारने चेहरा फिरवत तिला तसं करण्यापासून अडवलं.
आता मात्र तिलाही आपल्या मनावर ताबा राहिला नाही आणि ती रडू लागली.

" लग्नाआधी आणि लग्नानंतरही तुझ्या मनात उठणारं वादळ फक्त अमितच्या अपघाताचं नव्हतं तर श्रेयशच्या आठवणींचही होतं." तो असं बोलताच ती मात्र ओलेत्या नजरेने त्याच्याकडे अपराधीपणाच्या भावनेने पाहू लागली. त्याच्या डोळ्यांतील अश्रू तिला जास्त त्रासदायक वाटले. आतून तुटणारा तो तिला स्पष्ट दिसत होता .

" तुझ्या गावाला गेल्यानंतर त्या घराकडे बघणं टाळण्याचं तुझं कारण आज मला कळतय . तुझ्या जुन्या आठवणी ,सॉरी तुमच्या जुन्या आठवणी जपणारं सरपोतदाराचं घर होतं ते. त्याच बागेतल्या प्राजक्ताखाली तुझं आठवणींत हरवणं आज उलगडतय . इतक्या वर्षांनी जेव्हा त्या दिवशी तुम्ही पुन्हा भेटलात तेव्हा तुमच्या वागण्यात झालेला बदल आज समजतोय. तुझ्या त्याच्या तिरस्काराचं कारण, तुझ्या रडण्याचं कारण, आपल्या घरी येणं टाळण्याचं त्याचं कारण , त्याच्या प्रोजेक्टमधून माघार घेण्याचं तुझं कारण, त्याच्या घरी तुला लागल्यानंतर कासावीस झालेल्या त्याच्या मनाचं कारण,त्याला पाहून हळवं झालेल्या आईबाबांच्या अगतिकतेचं कारण , त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मी ॲडमीट असतांना त्याचं तुला भरल्या नजरेनं पाहण्याचं कारण, तो बेशुद्धावस्थेत असतांना तुझ्या झालेल्या तगमगीचं कारण, त्याला पाहून स्तब्ध झालेल्या रुपेशच्या वागण्याचं कारण, आईबाबांना निरोप देतांना रडवेला झालेल्या त्याच्या रडण्याचे कारण, मघाशी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून रडणाऱ्या..." तो आणखी काही बोलणार तोच तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला.

त्याच्या अश्या बोलण्याने तिचं रडणं आणखी तीव्र झालं.नकारार्थी मान हलवत तिने नजरेनेच त्याला शांत राहण्याची विनंती केली. त्याने मात्र तिचे हात आपल्या तोंडावरून बाजूला करत ते भिंतीवर धरले. मनाची वेदना आणखी तीव्र होत होती आणि ती तीव्रता त्याच्या वागण्यात तिला जाणवत होती.

" हेच सत्य आहे आभा. तुमचं सत्य जे तु प्रयत्नपूर्वक माझ्यापासून लपवून ठेवलस. अमितचा अपघात त्याच्याकडून झाला म्हणून माझ्याशी लग्न करून तु त्याला शिक्षा दिलीस.." बोलतांना मात्र त्याचा स्वतःवर ताबा राहिला नाही.
तिचे हात भिंतीवर दाबतांना हातातली बांगडी फुटली आणि तिला लागली. तिच्या हातातून रक्त आलं. तिला लागलेलं पाहून त्याच्या मनातल्या रागाची जागा लगेच हळवेपणानं घेतली. तो कासावीस झाला. तिचे हात सैल करत रक्त आलेला हात त्याने हातात घेतला.

" आभा, आय ॲम सॉरी. खूप त्रास होत आहे का ? मी ड्रेसिंग करतो." म्हणत तिच्या जखमेवर फुंकर घालणाऱ्या त्याला तिने आलिंगन दिले. हाताची जखम खूप शुल्लक होती त्याच्या प्रेमापुढे.

" मंदार, त्याने मुद्दामहून अमितचा अपघात नव्हता केला. न केलेल्या गुन्हयाची खूप मोठी शिक्षा भोगली आहे त्याने. त्या दिवशी रुपेशच्या धक्क्याने अमित श्रेयशच्या गाडीपुढे आला आणि त्याचा अपघात झाला." म्हणत तिने रुपेशने सांगितलेली त्या दिवशीची घटना त्याला सांगितली.

" मी खूप चुकीचे वागले. त्याला अपराधी जाहीर करून त्याचं आयुष्यच उद्धवस्त केलं. त्याच्या डिप्रेशनचं कारण बनले. माझ्यामुळे त्याने आईवडिलांना गमावले, माझ्यामुळे त्याने आत्महत्या करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर प्रेम करणं त्याच्या आयुष्याचा मोठा गुन्हा ठरलं. आज जेव्हा रुपेशने सत्य सांगितलं तेव्हा माझा स्वतःवर ताबा राहिला नाही. कालपर्यंत त्याला माफ करण्याचं ठरवलेल्या मला त्यावेळेस त्याची माफी मागण्याशिवाय आणखी कोणताच मार्ग सापडला नाही. मी चुकले त्याच्या बाबतीत." म्हणत तिने त्याच्याभोवतीची मिठी घट्ट केली आणि रडू लागली.

तिच्या स्पर्शात त्याला तिची अगतिकता स्पष्ट जाणवली, तिच्या मनाची झालेली अवस्था त्याच्या मनाला कळाली आणि त्याने तिला आपल्या मिठीचा आधार दिला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. अमितच्या अपघाताचं सत्य ऐकून त्यालाही श्रेयशबद्दल वाईट वाटले. श्रेयश त्यांच्या प्रेमाआड आल्याचा त्याचा अंदाज मागे पडला. त्या दोघांच्या प्रेमाआड आपण आलो आहोत या जाणिवेने तो ही हळवा झाला. डोळ्यांत दाटलेले पाणी डोळ्यांतच अडवत त्याने मात्र तिला समजून घेण्याचे ठरवले.
रडणाऱ्या तिला आपल्या मिठीतून बाहेर काढत त्याने समोर बेडवर बसवले. ड्रॉवरमधून फर्स्ट एड बॉक्स बाहेर काढला आणि तिच्या जखमेवर मलम लावले.
" आय ॲम..." तो पुढचं काही बोलणार तोच आभाने त्याला शांत केले.
" आय ॲम सॉरी मंदार. मी चुकले. माझा भूतकाळ जाणीवपूर्वक लपविण्याचा काहीही उद्देश नव्हता पण तो सांगण्याची हिंमतही नव्हती. लग्नाआधी आणि लग्नानंतरही त्या आठवणींनी मी कातर व्हायचे.श्रेयशचा जरी तिरस्कार करत असले तरी त्याच्यावर केलेलं प्रेम कमी नव्हतं झालेलं. या प्रेमाची प्रतारणा केल्याचा अपराध आपल्या हातून घडला आहे हे शल्य मनाला पोखरत असायचे. आईबाबांनी वचनबद्ध केल्यामुळे मला तुझ्याशी लग्न करावं लागलं. तुझ्या सहवासात मी त्याच्या आठवणी जगायचे." तिचे बोलणे त्याला रडवून गेले. त्याच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू टिपण्याची त्यावेळेस तिला हिंमत झाली नाही.

" मी तुमच्यामध्ये आलो. माझ्यामुळे तुम्ही कायमचे वेगळे झालात. मी नसतो तर आज तु श्रेयशसोबत.." त्याला पुढचं बोलणं अशक्य झालं. तिच्या हातावर डोके ठेवून तो रडू लागला.

" आम्ही वेगळं होण्यासाठीच एकत्र आलो होतो. नियतीने आमच्या नात्यासाठी हेच ठरवलं असणार नाहीतर असं अचानक सगळच संपलं नसतं. तु आमच्यामध्ये आधीही नव्हताच आणि आताही नाहीस. आमचं एकमेकांवरचं प्रेम तेव्हाही अबाधित होतं किंबहुना नेहमीच राहिल . जुनं प्रेम हृदयाच्या गाभाऱ्यात जपत मी मात्र तुझ्या प्रेमात पडले. माझ्या बाबतीत खरं प्रेम एकदा न होता त्याची पुनरावृत्ती झाली. नशिबवान समजते मी स्वतःला की माझ्या आयुष्यात तु आलास. प्रेमाची नवी परिभाषा शिकवणारा तुझा सहवास मला तुझ्या प्रेमात पडण्यासाठी विवश करून गेला. जुन्या आठवणींच्या कातरवेळी तु आशेचा मिणमिणता दिवा झालास आणि अंर्तमन उजळून काढलस. माझ्या डोळ्यांतील अश्रू टिपणारा तु हक्काचा सोबती बनलास.मित्र बनून माझ्या आयुष्यात आलास आणि माझं सर्वस्व झालास.आयुष्यात जगण्याची उमेद हरवून बसलेल्या या नदीला तु प्रवाही बनवलस आणि समुद्रागत तुझ्यात सामावून घेतलस.माझ्या आईबाबांची माझ्यापेक्षा अधिक काळजी घेत त्यांचा मुलगा बनलास. श्रेयाच्या जन्मावेळी तर माझी आईच झालास. मी आनंदी असल्यावर तुझी कळी खुलते तर मी दुःखी असल्यावर तुझ्या चेहऱ्यावर अगतिकता दिसते. मी झोपल्यावरही कितीतरी वेळ जेव्हा मला एकटक पाहत असतोस तेव्हा खूप स्पेशल असल्यासारखे वाटते. माझ्या प्रत्येक दुःखात, अडचणीत तुला माझ्यापुढे राहायचं असतं. मंदार, तु आहेस म्हणून मी जिवंत आहे. तुझ्याशिवाय या जगण्याला अर्थच नाही. तु कधीच आमच्यामध्ये आलास नाही कारण माझ्या आयुष्यात तुझं स्वतःचं अस्तित्व तु निर्माण केलं आहेस ज्याशिवाय मी अपूर्ण आहे." तिने असे म्हणताच त्याने तिला उराशी कवटाळलं. डोळ्यांतील अश्रू तिच्या डोक्यावर प्रेमाचा वर्षाव करते झाले.

" माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि मरेपर्यंत ते तसेच अबाधित राहिल." त्याच्याभोवतीची मिठी घट्ट करत ती म्हणाली .

" श्रेयश, ठिक आहे ना ? त्याच्याविषयी खूप वाईट वाटतय." त्यावेळेसही त्याला श्रेयशचं दुःख जास्त मोठ वाटत होतं.
श्रेयशबद्दल त्याच्या एकेरी उच्चाराने त्यांच नातं आणखी गहिरं झालं होतं याची अनुभूती आभाला आली.

" खूप शांत वाटत होतं त्याला.मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झाल्याचं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.खूप काही गमावल्यानंतर आज नियतीने त्याला पुन्हा नव्याने जगण्याची संधी दिली. रुपेशने सत्य सांगून मी त्याच्यावर करत असलेला अन्याय थांबवला आहे." ती रडतच म्हणाली.

" पण त्याने गमावलेल्या त्या प्रत्येक नात्याचं काय ?" तो जणू त्याच्यासाठी भांडत होता.

" त्याचे उत्तर नाही माझ्याकडे पण आमच्या प्रेमाच्या त्या पाऊलखूणा माझ्या अंतरात कायम पुजल्या जातील.त्याच्यावर केलेलं पहिलं प्रेम नेहमीच पहिल्या पावसासारखं दरवळत राहील. तुझ्यावर केलेलं प्रेम माझं जगणं आहे तर त्याचं प्रेम त्या जगण्याची प्रेरणा ठरेल ." जणू परवानगी मागत त्याच्या नजरेत पाहत म्हणाली.
क्षणाचा अवकाश की त्याच्या ओलेत्या नजरेने त्यासाठी होकार दिला.

" भूतकाळ लपवून तुझ्या भावनांशीही खेळलेच ना मी. त्याच्यासोबत तुझ्यावरही मी अन्यायच केला आहे. मघाशी श्रेयशच्या घराबाहेर पडतांना मी तुला सगळं सांगावं अशी इच्छा व्यक्त केली होती त्याने. तुला बाहेरून कळलं तर जास्त त्रास होईल असं वाटत होतं त्याला. मला मात्र हे सत्य तुला कळू द्यायचं नव्हतं. तुला तुटतांना नव्हते पाहू शकत. तुझ्या मनाला होणाऱ्या वेदनांना फुंकर घालण्याची माझी हिंमत नव्हती. तुझ्या आणि त्याच्या मैत्रीआड नव्हतं यायचं मला. तुमची मैत्री तुटू नये, तु तुटू नयेस म्हणून सत्य सांगण्याचं टाळलं. मी रडतांना जेव्हा तु अगतिक होऊन कारण विचारायसाच तेव्हा मी सांगणं टाळायचे. एकांतात मात्र तुला टाळणं मला बैचेन करायचं. सगळं सांगून शांत व्हावं असं वाटायचं पण पुढच्याच क्षणी मन कच खायचं. मनातल्या भावना ऊन सावलीचा खेळ खेळायच्या अन् मी मात्र हतबल होऊन त्या खेळातली सोंगटी बनायचे. हिंमत करून जर तुला सत्य सांगितले असते तर आज ही वेळ आली नसती. तु बंद दाराआड असतांना मनात नकोनकोते विचार येऊन गेले. स्वतःचा प्रचंड राग आला. माझं सत्य लपवितांना मी तुझ्या दुःखाचं कारण ठरली." त्याला पुन्हा बिलगत ती म्हणाली आणि रडू लागली.

" जेव्हा रुपेशकडून श्रेयश आणि तुझ्या नात्याविषयी कळलं तेव्हा मी प्रचंड हतबल झालो होतो. घरी येऊन तुझ्याशी स्पष्टपणे बोलण्याची हिंमत केली पण तु भेटली नाहीस. श्रेयशच्या घरात जेव्हा तुम्हा दोघांना एकत्र पाहिलं आतून पुरता खचलो. हिंमत करून आईला कॉल केला. त्यांना वचनबद्ध करत सत्य सांगण्याची विनंती केली. त्यांनी सांगितलेल्या तुझ्या भूतकाळाने तर मी पुरता कोलमडलो. क्षणात सगळच संपल्यासारखं वाटलं. तुझा प्रचंड राग आला आणि स्वतः ची कीव वाटली. त्या क्षणी तुझीही काही बाजू असेल याचा विचारच केला नाही. माझ्याच भावनेत मी इतका वाहत गेलो की तुला हा असा त्रास दिला. माफ कर मला." तिच्या जखमेकडे पाहत तो गहिवरला.

तिने नकारार्थी मान हलवत त्याला माफी मागण्यापासून थांबवले.
आपण किती नशिबवान आहोत याची अनुभूती तिला त्याच्या सहवासात नव्याने आली.
तिचे डोळे पुसत त्याने तिला खाली बेडवर बसवले.
" श्रेयश निघतोय उद्या. आपल्या आयुष्यातून कायमचं निघून जाण्याचा निर्णय घेतला आहे त्याने." ती खंबीर होत म्हणाली.
" पण त्याच्या आयुष्याचं काय ? मला वाटतं आपण त्याला थांबवावं." तिच्या पुढ्यात बसत त्याने प्रश्न केला.

" नाही नको . तो इथे थांबला तर कायम त्याच वेदनेत पोळत राहिल. त्याला आयुष्यात पुढे जावं लागेल. जुन्या आठवणींच्या ढगाआड त्याच्या भविष्याचा सूर्य दडला आहे. त्याला त्या दिशेने पाऊल टाकावं लागेल. इथे थांबला तर तो कधीच या आठवणींतून बाहेर येणार नाही. माझ्या जगण्याचा जसा तु आधार बनलास तसाच त्यालाही जगण्याचा तो आधार स्विकारावा लागेल. योग्य जोडीदारासोबत त्याचं जगणं सुसह्य होईल, तिच्या प्रेमाच्या छायेत त्याच्या थकलेल्या मनाला नवचेतना मिळेल.चांगला नवरा,चांगला बाबा बनून त्याला संसारात रमतांना पाहायचं आहे,त्याला सुखात पाहायचं आहे . कदाचित तेव्हाच मी त्याच्यावर केलेल्या अन्यायाचं ओझं कमी होईल. तो जर इथे राहिला तर ते कधीच शक्य होणार नाही आणि असे झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही ." म्हणत तिने आपल्या मनातील विचार स्पष्टपणे त्याच्या समोर मांडले. त्यालाही तिचे बोलणे योग्य वाटले. त्याने होकारार्थी मान हलवत तिच्या बोलण्याला दुजोरा दिला.

" उद्या निघतांना भेटायचं आहे त्याला." तिने सांगितले. मंदार सोबतच्या आपल्या नात्यात पारदर्शकता राहावी याची पुरेपुर काळजी तिला घ्यायची होती.
त्याने पुन्हा एकदा मानेनेच होकार देत तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बेडवरच त्याच्या मांडीवर डोके ठेवत ती विसावली. त्याच्या सहवासात तिला मनाची शांती लाभली.
तिकडे आभाची आई मात्र काळजीने व्याकूळ झाली होती. तिला चैन पडत नव्हता. तिने पुन्हा एकदा आभाला कॉल लावला. फोन उचलत मंदारने तो आभाकडे दिला.
" आभा, मंदारराव ठिक आहेत ना ?" त्यांनी काळजीने विचारले.

" आई मंदार ठिक आहे." म्हणतांना तिला मात्र रडू कोसळले.

" बाळा, तुमचं नातं जप एवढच म्हणेन मी. त्यांच्यासारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं." म्हणत पलिकडून त्यांनी डोळ्यांना पदर लावला.
आईच्या शब्दांनी तिचा धीर मात्र खचला. अमितच्या अपघाताविषयी सगळं खरं सांगून टाकावं असं वाटलं पण रुपेशच्या बाबतीत पुन्हा श्रेयशसारखं घडू नये म्हणून तिने ते जाणिवपूर्वक टाळले. रुपेशनेही अमितला मुद्दामहून धक्का दिला नव्हता हे सत्य तिने स्विकारले होते.
तिला हतबल झालेले पाहून मंदाराने फोन घेतला.

" आई, आम्ही ठिक आहोत. काळजी करू नका. आभाचा भूतकाळ आमच्या नात्यात कधीच अडसर ठरणार नाही. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. श्रेयाची काळजी घ्या आणि बाबांना काहीच कळू देऊ नका." म्हणत त्याने फोन ठेवला.
त्याला पुन्हा एकदा आपल्याला सावरतांना पाहून आभाला गहिवरून आलं.