Login

तु असा जवळी रहा ( भाग ५५ वा अंतिम)

त्याची गाडी गेटबाहेर पडली. हातानेच खुणावत त्याने गाडीचा वेग वाढवला आणि निघूनही गेला.ते दोघे गाडी दृष्टीआड गेल्यावरही त्याच वाटेने पाहत तिथेच थांबले होते.आयुष्याच्या क्षितिजावरचा तो सूर्य कठिण परिस्थितीत तळपून आज कायमचा अस्ताला चालला होता अपराधाचा संधिप्रकाश कायमचा मागे सोडून..
तु असा जवळी रहा (भाग ५५ वा अंतिम)
©® आर्या पाटील

दुपार टळून गेली होती. मंदारला गोळ्या घ्यावा लागतील याची जाणीव होताच आभा त्याच्या मांडीवरून उठली. कपाळावरची जखम भरली होती पण व्रण अजूनही ओलसर होते. त्या जखमेवर फुंकर घालत तिने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला.
त्याला त्या स्पर्शाने तिच्या निखळ प्रेमाची जाणीव झाली.

" होईल व्यवस्थित सगळं. नको काळजी करूस." म्हणत त्याने तिला आश्वस्त केले.

मानेनेच होकार देत ती रूमबाहेर पडली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीला न्याहाळत मंदार विचारांत हरवला. बेडवर टेकत त्याने डोळे मिटले.
इकडे स्वयंपाकघरात येत तिने त्याच्यासाठी डाळखिचडी बनवली. श्रेयशचा विचार मात्र तिला बैचेन करीत होता. अपराधीपणाची भावना आतून पोखरत होती. प्लेटमध्ये जेवण घेत ती रुममध्ये आली. बेडवर मंदार शांत पडला होता. त्याच्याजवळ बसत तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तिच्या स्पर्शाने त्याची झोप चाळवली.

" आभा, ठिक आहेस ना ?" अजूनही त्याला तिचीच काळजी होती.
तिने मान हलवत होकार दिला.

" जेवण करून घे. खूप उशीर झाला आहे. तुझ्या गोळ्या बाकी आहेत."जेवणाची प्लेट त्याच्यासमोर धरत तिने सांगितले.

त्या प्लेटमधून घास उचलत त्याने मात्र आधी तिला भरवला. त्याच्या या कृतीने ती पुन्हा भावूक झाली.
स्वतःला सावरत तिने घास उचलत त्याला भरवला.
हळव्या क्षणी एकमेकांना सावरत ते पुन्हा उभे राहत होते.

इकडे ऑफिसमध्ये आलेला श्रेयश शरीराने तेथे होता पण मनाने मात्र भूतकाळात विसावला. सगळी कामे मार्गी लावत तो केबीनमध्ये शांत बसला. इतक्या वर्षांनी आज मनाला शांतता लाभली होती. आतल्या आत घुसमटत असलेला तो मोकळा झाला होता.आभासोबत घालवलेले ते भावनिक क्षण सारखे आठवत होते. तिच्या आयुष्यातून कायमचं निघून जातांनाही तो समाधानी होता. समाधान ती सुखात असल्याचं, समाधान तिने त्याचं प्रेम आयुष्यभर जपल्याचं, समाधान तिच्या मनातला गैरसमज दूर झाल्याचे, समाधान मंदारसारखा जोडीदार तिला मिळाल्याचे..
त्या समाधानाला वेदनेची हलकी झालरही होतीच.
वेदना तिच्या सोबत नसल्याची, वेदना तिच्यापासून कायमचं दूर जाण्याची, वेदना उशीरा समजलेल्या सत्याची.त्या वेदनेत समाधानाने मात्र बाजी मारली होती. आयुष्यात प्रवाही होण्याचं तिला दिलेले वचन तेवढेच काय दडपणाचे कारण ठरत होतं. केबीनमधून बाहेर येत तो त्या प्राजक्ताच्या झाडापाशी पोहचला. फुलांच्या मंद सुगंधाने आजही त्याचं अंर्तमन उजळून निघालं.आईच्या कुशीत विसावल्याचं समाधान होतं त्या झाडाच्या सावलीत. कितीतरी वेळ तसाच तिथे विसावत त्याने समोरच्या गार्डनकडे पाहिले.आभाच्या मेहनतीने कमी वेळात त्या जागेचा कायापालट झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले. झाडाखालची फुले वेचत त्याने ती ओंजळीत घेतली. ओंजळ नाकाजवळ घेत त्याने तो सुगंध परत एकदा अंतरात उतरवला आणि परतीला निघाला.

आज पहिल्यांदाच त्याला घराकडे जाण्याची ओढ लागली होती. बंगलाजवळ येताच आपसूकच नजर आभाच्या घराकडे वळली पण यावेळेस त्याला अपराधी वाटले नाही. घरात जाताच आभाचा मघासचा क्षणिक सहवास त्याला पुन्हा आठवला.संदिग्ध भावनांचं कोंदण ल्यालेलं तिचं बोलणं आठवताच डोळ्यांतून येणारे अश्रू तो नाही रोखू शकला. त्याच्या त्या अश्रूंमध्ये आज मात्र कोणतीही वेदना नव्हती. तिचं सत्य स्विकारून त्याने स्वतःलाच सावरले होते. मंदारच्या सहवासात तिला सुखी पाहून त्याने स्वतःच्या मनाची तयारी केली होती. तिच्या वचनात कटिबद्ध होत त्याने प्रेमासाठी प्रेमाचा त्याग करण्याचे ठरवले होते.
आज खूप दिवसांनी बेडवर पडल्या पडल्या त्याला झोप लागली होती. एवढ्या वर्षांचा वनवास संपून आज तो आयुष्याच्या त्याच वाटेवर परतला होता.

आभाला मात्र झोप लागत नव्हती. श्रेयशचा तो अगतिक चेहरा तिला बैचेन करत होता.सरपोतदार मॅडम आणि सरांचं रडणं तिच्या काळजाचा ठोका चुकवत होते. क्षणभर डोळा लागला असेल तोच स्वप्नांत श्रेयशला स्वतःला संपवतांना पाहिलं आणि ती दचकून जागी झाली.
तिच्या आवाजाने मंदारही जागा झाला. आभाच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता.

" आभा, काय झालं ? स्वप्न पाहिलस का ?" तो तिला जवळ घेत म्हणाला.

तशी मान हलवत ती रडू लागली.

" श्रेयश आत्महत्या करतोय असं स्वप्न..." तिला आता बोलणेही अशक्य झाले होते.

" शांत हो. स्वप्न होते ते. श्रेयश ठिक आहे." तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो म्हणाला.

तिला मात्र काहीच सुचत नव्हते.
" मला खूप अपराध्यासारखं वाटतय." म्हणतांना तिच्या डोळ्यांत पुन्हा पाणी तरळले.

" आभा, सावर स्वतःला. जे घडलं ते का घडलं, कोणामुळे घडलं नाही माहित पण आता यातून त्याला सावरण्यासाठी तुला खंबीर व्हावं लागेल." तो तिला शांत करत म्हणाला.

" तो जेव्हा यातून सावरेल तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. जोपर्यंत तो आयुष्यात पुढे जात नाही तोपर्यंत माझी अपराधीपणाची भावना कमी होणार नाही." म्हणतांना तिची अगतिकता त्याला स्पष्ट जाणवली.

" सगळं ठिक होईल आभा.." म्हणत त्याने तिला कुशीत घेतले. तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांत केलं.

कितीतरी वेळ तो तिला तसाच सांभाळत होता. त्याच्या कुशीतच पहाटे पहाटे तिला झोप लागली.

श्रेयशला उगवणारी सकाळ नव्या आशेची द्योतक वाटत होती. खूप दिवसांनी आज त्याची झोप पूर्ण झाली होती. मनातल्या शांततेने चेहऱ्यावर चमक आली होती. आन्हिके आवरून त्याने निघण्याची तयारी सुरु केली. सामानाची बऱ्यापैकी आवराआवर कालच झाली होती. ट्रान्सपोर्ट एजेन्सी मार्फत त्याचे सामान त्यांच्या गाडीत चढवले जात होते. तासा दिड तासात त्याचं सामान घेऊन ती गाडी निघून गेली. मागे राहिलेलं आवरून त्याने आपली बॅग भरली. भिंतीवरचा आईबाबांचा फोटो काढून त्याने पुन्हा एकदा उराशी कवटाळला.
आभाला एकदा शेवटचं भेटण्याची इच्छा त्याला घराबाहेर पडू देत नव्हती. तिच्या घरी जाऊन निरोप घेण्याची हिंमत नव्हती.मंदारच्या मैत्रीशी प्रतारणा होईल असं काहीच त्याला वागायचं नव्हतं.
इकडे आभाच्या मनातही त्याच्याशी भेटून पुन्हा एकदा माफी मागण्याची प्रबळ इच्छा होती पण मंदारसमोर ती व्यक्त करता येत नव्हती. मंदारने मात्र त्यांच्या भेटीत अडसर न बनण्याचे ठरवले होते.

" आभा, जाऊन भेट त्याला ." त्याने असे म्हणताच ती मात्र शांत झाली.

" कदाचित ही भेट त्याच्याही जगण्याची प्रेरणा बनेल." तो तिला साथ देत म्हणाला.

" आपली भेट त्याच्या जगण्याची प्रेरणा नक्की बनेल. तुलाही माझ्यासोबत यावं लागेल." म्हणतांना ती खूप खंबीर होती.

" नको. आपल्याला एकत्र पाहून त्याला वाईट वाटेल." माघार घेत त्याने सांगितले.

" याउलट आपल्याला एकत्र पाहून आयुष्यात पुढे जाण्याची हिंमत येईल त्याला. तुझ्या सोबतीने नव्या पर्वाच्या दिशेने झालेला माझा प्रवास कदाचित त्यासाठी दिशादर्शक ठरेल. तुझ्या मैत्रीचा खूप आदर करतो तो. मित्रासाठी तुला माझ्यासोबत यावं लागेल." तिने असे म्हणताच त्याचा मात्र नाइलाज झाला. त्यालाही श्रेयशचं सुखच तर हवं होतं.

हिंमत करून तो तिच्यासोबत त्याच्या घरी निघाला. एरवी त्याच्यासोबत जातांना तिचे पाय जड व्हायचं पण आज मात्र त्याचं हृदय भारी झालं होतं.
घराचा दरवाजा उघडा होता. आभाच्या मागोमाग मंदारही आत शिरला.

" आभा, मला माहित होतं तु..."तिच्यापाठी मंदारला पाहून मात्र श्रेयशचे बोलणे तोंडातच विरले.

त्याला सत्य समजले तर नसेल या जाणिवेने क्षणभर तो धास्तावला. नजर भरून आली आणि आपोआप खाली गेली.
त्याला असे भावनिक झालेले पाहून मंदार पुढे आला. काही कळायच्या आत त्याने श्रेयशला मिठी मारली.

" मला वाटलं होतं या जगात मीच खूप दुःख सहन केलं आहे पण मित्रा तु सहन केलेल्या दु:खापुढे ते कवडीमोल आहे. वाईट यायच वाटतय की तुझ्या दुःखाचं एक कारण माझं तुझ्या आयुष्यात असणंही आहे." मंदारने हक्काने असे म्हणताच श्रेयशला मात्र अश्रू अनावर झाले. त्यालाही आपल्या मिठीत जेरबंद करत तो रडू लागला.

" आम्हांला एकत्र पाहून क्रित्येकदा आतून तुटला असशील पण चेहऱ्यावर कधीच दाखवलं नाहीस. तुम्ही एकत्र पाहिलेल्या स्वप्नांना माझ्या डोळ्यांत सत्यात उतरलेलं पाहून किती त्रास झाला असेल तुला पण तु स्मितहास्याने ते दुःख लपवलस. आईच्या इच्छेखातर उभारलेल्या ऑफिसचा श्रीगणेशा करतांना आम्हांला सत्यनारायणाच्या पुजेला बसवलस. माझ्याने नसतं झालं हे सगळं." मंदारलाही आता अश्रू अनावर झाले.

त्या दोघांना असं एकत्र पाहून आभाला मात्र स्वतःचा राग येत होता. दोघांना होत असलेला वेदनेचं तीच तर मुळ होती.

" आभा आणि माझी सोबत क्षणिक होती तर तुमची साथ शाश्वत आहे. माझ्याहून अधिक प्रेम करणारं तिच्या आयुष्यात कोणी येणार होतं म्हणून नियतीने रचलेला खेळ होता हा. मंदार, आभा खूप नशिबवान आहे की तिच्या आयुष्यात तु आहेस. तिला सावलीसारखा जपणारा. ती खूप हळवी आहे पण तु मात्र तिला खंबीर बनून साथ देतोस. ती खूप निरागस आहे आणि तु मात्र तिची निरागसता जपतोस. तिचं खूप प्रेम आहे आपल्या माणंसावर आणि तु त्या प्रेमाची प्रेरणा बनतोस." असे बोलून त्याने मात्र प्रेमाची परिभाषा बदलली.

" तुला त्रास नाही का होतं हे असं बोलतांना.कोणी एवढं चांगलं कसं असू शकतं..." तो आश्चर्याने म्हणाला.

" तुझ्याकडूनच शिकलो आहे हा चांगुलपणा. आभाचा भूतकाळ स्विकारून तिच्या पाठीशी खंबीर उभं राहणाऱ्या नवऱ्याकडून, माझ्याशी काहीही ओळख नसतांना मैत्री जपणाऱ्या मित्राकडून. आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीला सुखात पाहून त्रास कसा होईल ? प्रेम म्हणजे मिळवणं नसतं त्याचं अस्तित्व आयुष्यात असणं असतं.कालही याच प्रेमाच्या आधाराने मी जगलो किंबहुना पुढेही जगत राहीन." तो त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

" तु नेहमी सुखात राहावस एवढीच या मित्राची इच्छा आहे. तुझ्या प्रेमाचं पावित्र्य मी नक्की राखेन. त्यावर कोणताही डाग लागणार नाही याची काळजी घेईन." म्हणत मंदारने आभाकडे पाहिले.
तिने डोळे टिपत स्मित वदनाने त्याला दुजोरा दिला.

" याची पूर्ण खात्री आहे मला. तुझ्यापासून सत्य लपवून मी आपल्या मैत्रीचाही अनादर केला आहे पण त्यावेळेस तेच योग्य होतं कदाचित. जमल्यास मला माफ कर." हात जोडत श्रेयश म्हणाला.

" माफी मागून मला अपराधी बनवू नकोस. आज तु जे गमावलय ते माझ्या जगण्याचा आधार बनलय. तुझं हे देणं माझ्यावर उसणं राहिल. पुढच्या जन्मात तुझं हे प्रेम शेवटपर्यंत तुझ्या सोबत रहावं हीच देवाकडे प्रार्थना करेन." त्याच्याकडे पाहत तो भरल्या हृदयाने म्हणाला आणि तसाच माघारी फिरला.

त्याच्या शब्दांनी मात्र श्रेयश आणि आभालाही भरून आले. मागे उभ्या असलेल्या आभाच्या डोक्यावर हात ठेवून त्याने तिला श्रेयशसोबत बोलण्याची मोकळीक दिली आणि तो बाहेर निघून गेला.
डोळ्यांतील अश्रू टिपत आभा श्रेयशजवळ पोहचली.
त्याचे हात हातात घेत तिने त्याला शांत केले.

" श्रेयश, मी कितीही माफी मागितली तरी माझा गुन्हा कमी होणार नाही. तु जेव्हा सुखात राहशील तेव्हाच खऱ्या अर्थाने मी या भारातून मोकळी होईन. माझ्या आयुष्यात तु प्रेमऋतु घेऊन आलास.तुझा सहवास आयुष्यातील सगळ्यात सुखद काळ होता.प्रेम, माया आणि ममतेने तु माझी ओंजळ भरलीस. मी व्यक्त न केलेल्या इच्छाही मनापासून पूर्ण केल्यास. खूप प्रेम केलस माझ्यावर पण त्याबदल्यात मी तुला मात्र तिरस्कार दिला..." ती बोलत होती की त्याने तिला शांत केले.

" आभा, आपलं प्रेम व्यवहार नव्हतं ती निर्मळ भावना होती. गावकऱ्यांपासून वाचविण्यासाठी मला स्वतःपासून कायमचं दूर करणे हे प्रेम नव्हतं तर काय होतं. मला प्रेमाच्या बदल्यात प्रेमच मिळालं आहे ." तो स्पष्टपणे म्हणाला तशी ती गहिवरली.

त्या दिवशी त्याला लगावलेली चपराक आठवताच डोळयांतून अश्रू ओघळते. आपल्या हातांनी त्याच्या गालावर स्पर्श करतांना आजही तिच्या काळजाला तिच वेदना झाली.

" श्रेयश माफ कर मला." म्हणत ती रडू लागली.

" आभा, शांत हो. तुला असं रडतांना पाहून मी तुटतो." तो ही हळवा झाला.

" मग तुला दुःखात पाहून माझी काय अवस्था होत असेल याची कल्पना कर. माझ्या मी न व्यक्त केलेल्या इच्छा जश्या पूर्ण केल्यास तशीच ही इच्छाही पूर्ण कर. आयुष्यात पुढे जा. ज्या प्रेमाने तुझ्या जीवनातील सगळ्या उणीवा भरून निघतील, तुझ्या हक्काचं सुख तुला मिळेल त्या प्रेमाला स्विकार. मी एकाच रात्रीत तुझ्या विचाराने बैचेन झाले रे तु एवढया रात्री मनावर ओझे घेऊन कसा जगलास ? तु खूप खंबीर होतास पण मी नाही. हा अपराधीपणा माझा जीव घेईल." त्याच्या हाताच्या ओंजळीत चेहरा लपवत ती रडू लागली.

" अजिबात नाही.माझ्या वाट्याला विचारांच्या ज्या काळ्याकुट्ट रात्री आल्या त्या तुझ्या वाट्याला नाही येऊ देणार मी." तो निर्धाराने म्हणाला.

" तु लग्न केलस तरच ते शक्य आहे अन्यथा.." असे बोलून मात्र तिने त्याला भावनिक केले.

" हो मी करेन लग्न पण तु स्वतःला त्रास करून घेऊ नकोस." म्हणत आता तोच रडू लागला.

" अजूनही तुला माझाचसाठी सगळं करायचं आहे. मंदार माझ्या आयुष्यात आल्याने स्वतःला नशिबवान समजावे की तुला कायमचं कमावून अभागी तेच कळत नाही. माझ्या जगण्यातला हा विरोधाभास जीवघेणा आहे. माझ्या गुन्ह्याची याहून मोठी शिक्षा कोणती असेल." म्हणत तिने डोळे टिपले.

" आभा, स्वतःला दोष देऊ नकोस. तुला सावरावं लागेल तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मंदारसाठी आणि तुझा जीव असलेल्या श्रेयासाठी. श्रेयाला न भेटता गेल्याची खंत कायम मनात खदखदत राहील. खूप गोड आहे ती तिला जप. स्वतःची काळजी घे. एक विचारायचं होतं होतं" तो विनंतीवजा शब्दांत म्हणाला.

" बोल ना.." म्हणत तिने स्वतः ला सावरले.

"आईबाबांना भेटण्याची परवानगी हवी होती." तो हळवा होत म्हणाला.

" हे विचारून तु माझं अपराधीपणाचं ओझं आणखी वाढवत आहेस. तुला त्यांना भेटण्याचा पूर्ण अधिकार आहे. केव्हाही जाऊन तु त्यांना भेटू शकतोस.." ती डोळ्यांतील अश्रू टिपत म्हणाली. त्याने मान हलवत तिच्या भावनांचा आदर ठेवला.

" मला उशीर होत आहे आता निघावं लागेल." तो तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला. त्याच्या शब्दांत मनातली निरवानिरव स्पष्ट जाणवत होती.

" तुझा नंबर.." ती आणखी काही बोलणार तोच त्याने नकारार्थी मान हलवली.

" मला तुला कोणत्याच बंधनात अडकून ठेवायचं नाही. आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय जेव्हा घेईन तेव्हा पहिल्यांदा तो तुला कळवेन हे वचन आहे माझं." म्हणत त्याने निघायची तयारी दाखवली.

ओलेत्या नजरेने होकार देत तिनेही त्याच्या निर्णयाचा आदर केला.
त्याच्या आणखी जवळ जात तिने त्याला आलिंगन दिले. तिच्या सावलीत शेवटचं लपेटून घेत त्यानेही त्याचा स्विकार केला. पुढच्याच क्षणी टाचा उंच करत तिने त्याच्या कपाळावर स्पर्शखूण रेखाटली आणि तशीच माघारी फिरत निघूनही गेली.त्या स्पर्शाने त्याचं मन भरून आलं.डोळे बंद करून त्याने ती स्पर्शखूण हृदयाच्या गाभाऱ्यात कायमची सामावून घेतली. त्याच्या घराबाहेर पडत आभा गेटजवळ उभ्या असलेल्या मंदारजवळ पोहचली. त्याच्या कुशीत शिरत भरून आलेलं भावनेचं आभाळ तिने रितं होऊ दिलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत मंदारनेही तिला मोकळं होऊ दिलं.

" आभा, ठिक आहेस ?" तिचा चेहरा ओंजळीत पकडत त्याने विचारले.

डोळे टिपत तिने होकारार्थी मान हलवली.
थोड्याच वेळात आपलं सामान घेऊन श्रेयशही बाहेर पडला. घराला आतून शेवटचं न्याहाळून त्याने दरवाजा ओढून घेत कुलूपबंद केला.
समोर आभा आणि मंदारला पाहून त्याने स्वतःला खंबीर बनवले.

" चला निघतो. काळजी घ्या एकमेकांची." चेहऱ्यावर हसू आणत तो हक्काने म्हणाला.

" तु ही काळजी घे." म्हणत मंदारने त्याला पुन्हा एकदा आलिंगन दिले.

श्रेयशने एकवार आभाकडे पाहिले आणि गाडीत बसला. गाडी सुरू करताच आभाला मात्र गहिवरून आले. त्याला पुन्हा कधी पाहणे होईल माहित नव्हते त्यामुळे ओलेत्या नजरेत त्याला सामावून घेत तिने चेहऱ्यावर हसू आणले आणि त्याला निरोप दिला.

त्याची गाडी गेटबाहेर पडली. हातानेच खुणावत त्याने गाडीचा वेग वाढवला आणि निघूनही गेला.ते दोघे गाडी दृष्टीआड गेल्यावरही त्याच वाटेने पाहत तिथेच थांबले होते.आयुष्याच्या क्षितिजावरचा तो सूर्य कठिण परिस्थितीत तळपून आज कायमचा अस्ताला चालला होता अपराधाचा संधिप्रकाश कायमचा मागे सोडून..

समाप्त

©® आर्या पाटील
( सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे. सत्य घटनेशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा. लेखिकेच्या परवानगी शिवाय कथामालिका वापरणे कायदयाने गुन्हा ठरेल. या कथेसाठी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनस्वी आभार)