तू चाल पुढं भाग १० (अंतिम)

One Inspirational Journey
तू चाल पुढं भाग १० (अंतिम)

मागील भागाचा सारांश: राजनने पहिल्या वर्षात चांगले गुण मिळवले होते. राजन व रेवाला कन्यारत्न प्राप्त झाले होते.

आता बघूया पुढे….

राजन व रेवाने आपल्या मुलीचे नाव रिया ठेवले होते. रिया सोबत खेळल्यावर राजनचा दिवसभरातील थकवा, टेन्शन निघून जायचं. रियाचे घरात आगमन झाल्याने राजन व रेवाचे आयुष्य बदलून गेले होते, त्यांचं पूर्ण जग रिया झाली होती.

“सॉरी रेवा.”
रेवा किचनमध्ये काम करत असताना राजन तिथे येऊन म्हणाला.

“कशासाठी?” रेवाने त्याच्याकडे आश्चर्याने बघितले.

“मी तुझी काहीच मदत करू शकत नाहीये. तू दिवसभर ऑफिसच काम करते. रियाला सांभाळते, घरातील पसाराही तुलाच आवरावा लागतो. रिया रात्रीची उठली की तुझे जागरण होते. तुला नीट झोप मिळत नाहीये.” राजन खाली मान घालून बोलत होता.

रेवाने त्याच्या हनुवटीला धरून त्याचा चेहरा वर केला व ती म्हणाली,
“राजन, तुझं कॉलेज सुरू नसत तर तू मला मदत केलीच असती ना? हा प्रवास आपण दोघांनी मिळून सूरु केला आहे. हा सध्याचा काळ आपल्यासाठी खडतर आहेच, पण त्यापेक्षा येणारा काळ हा आपल्यासाठी सोनेरी सकाळ घेऊन येणार आहे हा विचार केल्यावर आता जो त्रास होतो आहे, त्याच मला काहीच वाटत नाही.

मलाही कधी कधी हा सगळा त्रास असह्य होतो. एकटीने सगळं हँडल होत नाही, पण तुझा अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे. तू स्वतःला दोषी मानू नकोस. ही शेवटची दोन वर्षे इतक्यात उडून जातील बघ.”

“माझं बीडीएस पूर्ण झाल्यावर मी लगेच क्लिनिक टाकेल. क्लिनिकचा अनुभव आधीच गाठीशी असल्याने माझ्यासाठी प्रॅक्टिस करणे सोपं जाणार आहे. माझं क्लिनिक सुरळीत सुरू झालं की तुला काही दिवस सक्तीचा आराम देणार आहे.” राजन.

“तो क्षण लवकरच येणार आहे. आता तुझ्या डोक्यात जे काही गिल्ट आहे, ते काढून टाक. मी जाऊन झोपते. रिया उठली तर माझी तेवढीही झोप होणार नाही.” रेवा राजनला मिठी मारून आपल्या रूममध्ये निघून गेली.

राजन अभ्यास करायला बसला, पण त्याच्या डोक्यात रेवाचं बोलणं येत होतं.
‘मी किती नशीबवान आहे. रेवासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली. तिने मला माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त केले नसते तर आज मी त्याच कंपनीत असतो. तिने मला पाठींबा दिला. मी माझे स्वप्न पूर्ण करू शकतो, हा विश्वास निर्माण तिने केला. माझ्या पंखात बळ भरण्याचे काम तिने केले.’

दिवसामागून दिवस जात होते. राजनच शेवटचं वर्ष सुरू झालं होतं. रिया मोठी होत होती. रेवाचे प्रमोशन झाल्याने तिचे काम वाढले होते. रेवाला आता आठवड्यातून दोन दिवस ऑफिसला जायला लागायचे. रियाला सांभाळायला तिने पूर्णवेळ एक बाई कामाला ठेवली होती. राजनचा अभ्यास वाढला होता.

रेवाला एकहाती रियाचे आजारपण, तिच्या बाकीच्या गोष्टी सांभाळाव्या लागत होत्या. राजनचा वाढता अभ्यास, त्याचे बिजी शेड्युल लक्षात घेता रेवा त्याला जास्त डिस्टर्ब करत नव्हती. सगळं सांभाळणे डोईजड झाले, तरी ती राजनपर्यंत काहीच नेत नव्हती.

राजनच शेवटचं वर्ष रेवासाठी एक आव्हान होतं. रिया मोठी होत चालल्याने तिचा त्रासही वाढला होता. रेवा राजनचे शेवटचे वर्ष संपण्याचे दिवस बोटावर मोजत होती.

सगळी धावपळ करताना रेवाही बऱ्याचदा आजारी पडली, पण त्याही अवस्थेत ती धीराने उभी होतीच. बोलता बोलता राजनची शेवटच्या वर्षाची परीक्षा संपली.

“राजन, आता थोडे दिवस मला सगळ्याच कामातून सुट्टी घ्यायची आहे. प्लिज दोन दिवस रियाला सांभाळ.” रेवा म्हणाली.

“ कुठे जाणार आहेस?” राजनने विचारले.

“आईकडे. मला दोन दिवस शांत झोपायचं आहे. रिया झाल्यापासून मला निवांत झोप मिळालीच नाहीये.” रेवा.

“तू आज हॉलमध्ये झोप. मी रिया सोबत बेडरूममध्ये झोपतो.” राजन.

“तसं केलं तरी रियाचा आवाज आल्यावर मला जाग येईलच.” रेवा.

“तू आईकडे गेल्यावर एकच दिवसात परत येशील. तुला रिया शिवाय तिथे झोप येणारच नाही. तुला तिची इतकी सवय झाली आहे की, तू तिच्याशिवाय राहूच शकत नाही.” राजन म्हणाला.

यावर रेवा म्हणाली,
“हे मात्र खरं आहे. मी कितीही म्हटले आईकडे किंवा दुसरीकडे जाऊन राहते, पण रिया शिवाय मला करमणार नाही.”

“आपण तिघेच कुठेतरी बाहेर जाऊन येऊ, तिघांनाही बरं वाटेल.”

“हो चालेल.” रियाने होकार दर्शवला.

तीन दिवसांसाठी रेवा, राजन व रिया बाहेर फिरायला गेले होते. कितीतरी वर्षांनी राजन व रेवा ते बाहेर फिरायला गेले होते.

राजन चांगल्या गुणांनी बीडीएस पास झाला होता. इंटर्नशीप सुरू झाल्यावर राजनला कॉलेजला जावे लागत होते, पण अभ्यास, परीक्षा याचं टेन्शन त्याला नव्हतं. इंटर्नशीप सुरू असतानाच राजनने क्लिनिक साठी जागा शोधून ठेवली होती. पहिल्या वर्षापासून क्लिनिक मध्ये काम करत असल्याने त्याच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज भरपूर होते.

इंटर्नशीप संपल्यावर राजनने क्लिनिकचे उदघाटन लगेच केले होते. रिया डेंटल क्लिनिक अस त्याने क्लिनिकचे नाव ठेवले होते. क्लिनिकच्या उदघाटनाच्या दिवशी सगळे पाहुणे मंडळी आपल्या घरी निघून गेले होते. रियाला रेवाची आई घरी घेऊन गेली होती. क्लिनिक मध्ये राजन व रिया दोघेच होते. राजनने रियाला त्याच्या रिव्हॉलव्हिंग चेअरवर बसवले.

“राजन, ही तुझी खुर्ची आहे. मला इथे का बसवलं?”

“रेवा, ही खुर्ची, हे क्लिनिक, ही डिग्री हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. तू माझ्या आयुष्यात आली नसती, तर हे सगळं शक्यच झालं नसत. तू मला पुढे चालायला लावलं आणि माझ्या सोबत तू सुद्धा चालत होतीस.

दुःख एकाच गोष्टीच वाटत की, आजचा दिवस बघायला आई इथे असायला हवी होती. आई- बाबांच्या आशीर्वादामुळे आणि तुझ्या साथीमुळे राजन हा डॉ राजन झाला.” राजनच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

रेवाने त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले व तिने त्याला मिठी मारली. ती मिठीत राहूनच म्हणाली,
“तू चाल पुढं.”

तर अशी होती आपल्या राजन व रेवाची कथा.

समाप्त.

©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all