तू चाल पुढं भाग १

One Inspirational journey
तू चाल पुढं भाग १

बेल वाजवल्यावर २ सेकंदात रेवाने दरवाजा उघडून हसतमुखाने राजनचे स्वागत केले. रेवा राजनसाठी स्वयंपाक घरात पाणी घ्यायला गेली होती, तोच राजनने तिला मागून जाऊन मिठी मारली.

“राजन, पाणी सांडलं असत बघ.” रेवा हातातील पाण्याचा ग्लास घेऊन राजनच्या दिशेने वळली. राजनने तिच्या हातातील पाण्याचा ग्लास बाजूला ओट्यावर ठेवला आणि तिला आपल्या जवळ ओढून घट्ट मिठी मारली.

“जवळपास आठ तास माझ्या या परीपासून मी दूर होतो.” मिठी घट्ट करत राजन म्हणाला.

रेवाचे कान त्याच्या छातीजवळ असल्याने तिला त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. पुढील तीन ते चार मिनिटे ते दोघेही मिठीत राहून एकमेकांचा सहवास अनुभवत होते.

“राजन, सोड आता. मी इथेच आहे.” रेवा त्याच्या मिठीतून सुटत म्हणाली.

मिठीतून सुटू पाहणाऱ्या रेवाला राजनने पुन्हा आपल्या जवळ खेचले व तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि मग तिला हलकेच आपल्या मिठीतून बाजूला केले.

मगाशी ओट्यावर ठेवलेला पाण्याचा ग्लास त्याने तोंडाला लावला.

“तू फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी तुझ्यासाठी चहा करते.” गॅसवर पातेले ठेवत रेवा म्हणाली.

राजन फ्रेश होण्यासाठी बेडरूममध्ये गेला. चहा झाल्यावर रेवा चहाचा कप हातात घेऊन हॉलमध्ये आली व तिने राजनला आवाज दिला. राजन कपडे बदलून आला होता.

राजन व रेवाचं एक महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. आठ दिवसांपूर्वीच राजन व रेवा गावाहून त्याच्या नोकरीच्या ठिकाणी नाशिकमध्ये रहायला आले होते. नवीन संसार असल्याने त्यांच्याकडे सामान गरजेपुरते होते. हॉलमध्ये बसण्यासाठी दोन प्लास्टिकच्या खुर्च्या व एका बाजूला छोटी गादी होती. याव्यतिरिक्त एक प्लास्टिकचा टीपॉय होता.

राजन व रेवा गादीवर शेजारी एकमेकांच्या हातात हात गुंफून बसले होते. चहाचा एक घोट प्यायल्यावर राजन म्हणाला,
“रेवा, चहात साखर टाकायला विसरलीस का?”

“नाही, मी तर साखर टाकली होती.” रेवाने राजनच्या हातातून चहाचा कप घेतला व चहाचा एक घोट घेऊन त्यात साखर आहे की नाही ते चेक केलं.

“राजन, यात तर बरोबर साखर आहे.” रेवा म्हणाली.

राजनने तिच्या हातातून कप घेतला व तो चहाचा एक घोट पिऊन म्हणाला,
“आता बरोबर आहे बघ.”

त्याच्या चेहऱ्यावरील मिश्किल भाव बघून त्याने हे मुद्दाम केलं हे तिला कळून चुकलं होतं. तिने त्याच्या दंडावर एक फटका मारला.

“राजन, तू पण ना. माझी गंमतच करत असतो.” रेवा लाजली होती.

राजन तिच्या हनुवटीला धरून म्हणाला,
“अग, तू इतकी छान लाजतेस, हसतेस. हे तुझं रूप बघून माझ्या मनाला भुरळ पडते, म्हणूनच मी अशी गंमत करत असतो. तुला नसेल आवडत तर तसं सांग, इथून पुढे तुझी गंमत करणार नाही.”

“नाही, तू माझी गंमत करत जा. मला आवडतं.” रेवा त्याचा हात हातात घेत म्हणाली.

“तुला दिवसभर घरी कंटाळा येतो का?” राजनने रिकामा चहाचा कप बाजूला ठेवत विचारले.

“दुपारच्या वेळी कंटाळा येतोच. मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलले आहे, ती ज्या कंपनीत काम करते तिथे वॅकन्सी आहे. मी माझा रिझ्युम तिला मेल केला आहे. उद्या ती तिच्या सरांशी बोलणार आहे.” रेवाने त्याला माहिती दिली.

“ओके. तुला घरातील कामं करून नोकरी करायला जमेल ना? म्हणजे तुझी जास्त धावपळ तर होणार नाही ना?” राजनला तिची काळजी वाटत होती.

त्याच्या हातावर आपला हात ठेवत ती म्हणाली,
“राजन, घरातील काम करण्यात तू माझी मदत करत असतोच. तू पण धावपळ करतच असतो ना. मी नोकरी केली तर तेवढाच माझा रिकामा वेळ मार्गी लागेल आणि आपल्या संसारासाठी थोडा हातभार लागेल.”

“ओके चालेल. तुझी इच्छा आहे ना नोकरी करायची तर बिनधास्त कर. माझा तुला पूर्ण पाठींबा आहे.” राजनने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले.

“राजन, मला तुला काहीतरी विचारायचं होत.” रेवाच्या डोळ्यात प्रश्नार्थक भाव होते.

“विचार ना.” राजन.

“मी आज मोठ्या सुटकेस मधील सगळं सामान व्यवस्थित लावत असताना माझ्या हाताला तुझी सर्टिफिकेटची फाईल लागली. त्यात तुझं बारावीचं मार्कशीट, सी ई टीचं मार्कशीट होतं. गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजचा फॉर्मही त्यात होता. फॉर्ममध्ये तुझी सगळी माहिती भरलेली होती. तुला सी ई टीला भरपूर मार्क्स होते.” रेवा बोलत असताना तिचे बोलणे तोडत राजन म्हणाला,

“तुला काय विचारायचं आहे, हे समजलंय मला. तू स्वयंपाक बनव. जेवण झाल्यावर आपण या विषयावर बोलू. मी बिल्डींगच्या सेक्रेटरीला भेटून आलो. आपण इकडे नवीनच रहायला आल्याने त्यांनी मला भेटायला बोलावले आहे.” राजन बाहेर निघून गेला.

रेवाला राजनच्या अश्या वागण्याचे आश्चर्य वाटले. जेवण झाल्यावर तो त्या विषयावर बोलणार असल्याने रेवा थोडी निश्चिन्त झाली होती. रेवा स्वयंपाक घरात जाऊन स्वयंपाकाला लागली. पुढील काही वेळात राजन बाहेरून जाऊन आला. सेक्रेटरीने सांगितलेल्या सुचना त्याने रेवाला सांगितल्या.

जेवण झाल्यावर रेवा स्वयंपाक घरातील भांडी आवरत होती, तर राजनने बेडरूम मधील पसारा आवरला. भांडी घासून झाल्यावर रेवा बेडरूममध्ये येऊन बसली. राजन तिच्यासमोर बसला, तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला,
“रेवा, काही गोष्टी माणसाच्या हातात नसतात. काही स्वप्नही पूर्ण होत नाहीत. कधी ना कधी हे मी तुला सांगणार होतोच.

लहानपणापासून मी डॉक्टर होण्याचे स्वप्न बघितले होते, त्यासाठी मी मन लावून अभ्यास करायचो. माझे वडील शेतकरी होते, आमच्या भागात जास्त पाऊस न पडल्याने उत्पन्न अल्प असायचे. घरात मी, आई, वडील आणि एक लहान बहीण असं आमचं चौकोनी कुटुंब होतं.

माझ्या बहिणीला सुरुवातीपासूनच अभ्यासाची इतकी आवड नव्हती. माझा प्रत्येक वर्षी शाळेत एक नंबर यायचा. दहावीला मी तालुक्यात पहिला आलो होतो, तेव्हा एका प्रसिद्ध डॉक्टरांना शाळेने सत्कार समारंभासाठी बोलावलं होतं. माझा सत्कार त्यांनी केल्यावर मी त्यांना ‘डॉक्टर होण्यासाठी काय करावे लागेल?’ हा प्रश्न विचारला होता.

त्या डॉक्टरांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केले होते. त्यांनी मला जो कानमंत्र दिला होता, त्यानुसार मी अकरावीच्या पहिल्या दिवसापासूनच जोमाने अभ्यासाला लागलो होतो. दहावीला चांगले मार्क्स मिळाल्याने मला तालुक्याच्या नंबर एकच्या कॉलेजला मोफत ऍडमिशन मिळाले होते. माझे घर तेथून पंधरा किलोमीटरवर होते, पण येण्या-जाण्यात वेळ वाया जाऊ नये म्हणून मी कॉलेज जवळ असणाऱ्या गव्हर्नमेंट होस्टेलला रहायला होतो.

बाकीच्या मुलांनी सी ई टीचे क्लासेस लावले होते. क्लासची फी खूप असल्याने मला क्लासेस लावणे परवडणार नव्हते. मी मित्रांकडून क्लासच्या नोट्स घेऊन अभ्यास करायचो.

एक क्षणही वाया जाऊ द्यायचा नाही हे मी ठरवले होते. अकरावी व बारावी या दोन वर्षांत मी घरी मोजून चार की पाच दिवस गेलो असेल. जीव तोडून मेहनत घेत होतो. त्या मेहनतीचं फळ मला मिळालं देखील. सी ई टी मध्ये मला गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागेल इतके मार्क्स मिळाले होते.

माझे मार्क्स ऐकल्यावर ते इतके मोठे डॉक्टर माझं अभिनंदन करण्यासाठी आमच्या घरी आले होते. त्यांनीच पुढे ऍडमिशन प्रोसिजर कशी असते याची माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ऍडमिशन फॉर्म भरला. पहिल्या राऊंडलाच माझा गव्हर्नमेंट कोट्यातून डेंटल कॉलेजला नंबर लागला होता.

घरातील सगळेजण इतके खुश होते की काही सांगायलाच नको. तेव्हा हे नव्हतं माहीत की, दुसरा दिवस आमच्यासाठी काय घेऊन येणार होता. दुसऱ्या दिवशी मी बाबांसोबत त्या कॉलेजला जाण्यासाठी घरातून लवकर पडलो. दुपारी २ वाजेच्या दरम्यान कॉलेजला पोहोचलो. कॉलेजच्या ऑफिसमध्ये जाऊन ऍडमिशन प्रोसेसला सुरुवात झाली होती. समोरील सर जे फॉर्म देत होते, ते मी भरत होतो. फॉर्मवर फक्त माझी सही बाकी होती, तेवढ्यात माझ्या बाबांना चक्कर आली व ते खाली पडले.

ऑफिस मधील शिपायाच्या मदतीने कॉलेज शेजारी असलेल्या हॉस्पिटलमध्ये मी बाबांना घेऊन गेलो. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आल्याचे सांगितले. बाबांची डावी बाजू पूर्णपणे निकामी झाली होती. बाबांना या अवस्थेत बघून माझं औसान गळून पडलं होतं.

हॉस्पिटल गव्हर्नमेंट असल्याने बाबांना उपचारासाठी पैसे लागत नव्हते, पण घरापासून इतक्या दूर आम्ही दोघेच इकडे होतो. तिकडे जास्त दिवस राहणं शक्य नव्हतं. दोन-तीन दिवसांत बाबांना ऍम्ब्युलन्सने मी गावाला घेऊन गेलो. माझ्या ज्या डॉक्टरांनी सत्कार केला होता, ते रुजू असलेल्या हॉस्पिटलमध्ये बाबांना ऍडमिट केलं.

आई अडाणी असल्याने ती हॉस्पिटलमध्ये बाबांजवळ राहून उपयोग नव्हता. दिवसरात्र मीच हॉस्पिटलमध्ये थांबत होतो. बाबांच्या आजारपणाच्या जबाबदारीपुढे डॉक्टर होण्याचं स्वप्नावर मला पाणी सोडावं लागलं. कॉलेज मधून ऍडमिशनसाठी बरेच फोन आले होते, पण बाबांना या अवस्थेत सोडून जाणे मला योग्य वाटले नव्हते.”

राजनला बोलता बोलता भरून आले होते, तो रेवाच्या कुशीत शिरून रडत होता. इतक्या दिवस दडवून ठेवलेल्या अश्रूंना त्याने वाट करून दिली होती.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all