तू चाल पुढं भाग २

One Inspirational Journey
तू चाल पुढं भाग २

मागील भागाचा सारांश: रेवा आणि राजनचा संसार नेटकाच सुरू झाला होता. राजनचे बारावीचे मार्कशीट व बी डी एस चा फॉर्म रेवाला सापडल्याने तिच्या मनात बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. राजनने तिला त्याच्या आयुष्याचा प्रवास थोडक्यात सांगितला.

आता बघूया पुढे…

राजन रेवाच्या मांडीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडत होता. रेवा त्याच्या केसातून, पाठीवर हात फिरवत त्याला गोंजारत होती.

“राजन, शांत हो. तुला जर इतका त्रास होईल हे मला आधीच माहीत असत तर मी तुला हा प्रश्न विचारलाच नसता.” रेवाच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते.

रेवाच्या डोळ्यातील अश्रूचा एक थेंब त्याच्या गालावर पडला तसं त्याने रेवाकडे बघितले, तिच्या डोळ्यातील अश्रू बघून तो घाईघाईने उठला व त्याने तिचे डोळे पुसले.

“ये बाळा, तू का रडते आहेस?” राजन तिच्या डोळ्यातील पाणी पुसत होता, तशी रेवा त्याच्या मिठीत शिरली.

“माझ्या राजनच्या डोळ्यात अश्रू आलेले मला सहन होत नाही. मला तुला कायम आनंदी बघायचं आहे.” रेवा त्याच्या मिठीत राहूनच बोलत होती.

राजन तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन म्हणाला,
“अरे बाळा, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी आनंदीच आहे. आता राहिली काही स्वप्न अपूर्ण तर काही फरक पडत नाही. माझ्यावर इतकी प्रेम करणारी बायको मला भेटली आहे. तिला आनंदी ठेवणे हेच माझे स्वप्न आहे.

बरं झालं तू मला हा प्रश्न विचारला, त्यामुळे माझ्या मनात इतक्या दिवस साचलेलं अश्रूंच्या रुपात बाहेर पडलं.”

“तुझ्या पुढील प्रवासाबद्दल काही सांगशील का? अर्थात तुला त्रास होणार नसेल तर…” रेवा त्याचा हात हातात घेत म्हणाली.

राजन तिच्या हातावर आपला हात ठेवत म्हणाला,
“बाबा हॉस्पिटलमध्ये जवळपास पुढील दोन महिने होते. ज्या डॉक्टरांनी मला बक्षीस दिले, ज्यांनी मला मार्गदर्शन केले, ते डॉ दीक्षित. एक दिवस मी हॉस्पिटलच्या कॉरिडॉर मध्ये बसलेलो होतो, त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं,
“राजन, पुढे काय करायचं ठरवलं आहे?”

“माहित नाही.” मी उत्तर दिले.

“असा हातावर हात धरून किती दिवस बसणार आहेस?” डॉक्टरांनी थोड्या मोठ्या आवाजात विचारले.

“सर, बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांना एकट सोडून मी कुठे जाऊ. आई व बहीण घरी आहेत. आम्ही चौघे सोडलं तर आम्हाला कोणाचा आधार नाहीये.” मी हताशपणे बोललो.

यावर डॉ दीक्षित म्हणाले,
“तुझ्या बाबांना डिस्चार्ज मिळाल्यावर तुम्ही घरी घेऊन जाल. तुझे बाबा शेती करायचे तेव्हा तुमचं घर चालायचं. आता ते पुन्हा कधी काम करायला लागतील हे आपण सांगू शकत नाही. मग तुमचा उदरनिर्वाह कसा होईल?

तू शेती करशीलही, पण तुला बाबांइतके कष्ट करायला जमतील का? तुला कॉलेजला जाऊन शिक्षण घेता येत नसेल, तर एखाद्या ओपन युनिव्हर्सिटी मधून डिग्री घे. राजन, कोणतही शिक्षण कधीच वाया जात नाही.”

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे मी ओपन युनिव्हर्सिटी मध्ये बी बी ए ला ऍडमिशन घेतले. बाबांना घरी घेऊन गेलो. सुरुवातीला बाबांची तब्येत बरी होती. मी शेतीची काम करू लागलो होतो.

सहा महिन्यांनी बाबांची तब्येत खूप खालावली आणि त्यातच बाबा कायमचं हे जग सोडून गेले. दुष्काळी भाग असल्याने शेतीच उत्पन्न हवं तसं मिळत नव्हतं. मी तालुक्याला एका दुकानात कामाला लागलो. काम करता करता शिक्षण सुरु होतंच. बी बी ए झाल्यावर मी इथे या कंपनीत नोकरीला लागलो.

नोकरी लागल्यावर दोन महिन्यांतच बहिणीचं लग्न झालं. मुलगा नातेवाईकांमधील असल्याने त्यांनीच सगळा लग्नाचा खर्च केला. शेती वाट्याने करायला दिली आहे. आईला इकडे करमत नाही, म्हणून ती तिकडेच गावी राहते.

२१व्या वर्षी नोकरी लागली. आता या कंपनीत लागून मला २ वर्षे पूर्ण झाली. तुझ्याशी लग्न झालं आणि आयुष्य परिपूर्ण झाल्यासारखं वाटतंय.”

“बी डी एसला वयाची अट २५ असते. तू यावर्षी सीईटी दिली तरी तुला ऍडमिशन मिळेल.” रेवा मोबाईल मध्ये काहीतरी बघत होती.

“रेवा, तुला काय म्हणायचं आहे?” राजनला तिच्या बोलण्याचा अर्थ कळत नव्हता.

“राजन, तू यावर्षी अभ्यास करून सीईटी दे. तुझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करायला तुझ्याकडे अजून दोन वर्षे अवधी आहे.” रेवाने त्याला समजावून सांगितले.

“रेवा, तू काहीपण बोलते आहेस.” राजन म्हणाला.

“राजन, मी पूर्णपणे विचार करूनच बोलत आहे.” रेवा.

“रेवा, माझ्यावर तुझी, आईची जबाबदारी आहे. मी शिकत बसल्यावर आपला खर्च कसा भागेल? आपल्याला घर, गाडी घ्यायची आहे. आईला तीर्थयात्रेला पाठवायचं आहे. मी नोकरी सोडली तर हे सगळं कसं शक्य होईल?” राजनने त्याच्या मनातील शंका बोलून दाखवली.

“राजन, तुला लगेच नोकरी सोडायची गरज नाहीये. तू नोकरी करता करता सीईटीचा अभ्यास कर. तुझा गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला तरच तू नोकरी सोड. आता राहिला प्रश्न आपला घरखर्च कसा भागेल याचा, तर मी नोकरी करणार आहे. थोडी काटकसर केली, तर हे होऊ शकेल. तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मलाही थोडे कष्ट करुदेत.” रेवा राजनला मोटीव्हेट करण्याचा प्रयत्न करत होती.

“रेवा, या वयात पुन्हा अभ्यास करणं शक्य नाही. गव्हर्नमेंटला ऍडमिशन मिळणे एवढं सोपं नाहीये. मला पुन्हा अभ्यास करायला जमणार नाही. नोकरी करता करता अभ्यास कस शक्य आहे? शिवाय अभ्यास करत बसलो तर तुला वेळ कधी देऊ?” राजनला एकेक प्रश्न पडत होते.

“राजन, हे बघ तुझ्याकडे ही संधी चालत आली आहे. ती तुला धुडकवायची की आपलं नशीब पुन्हा एकदा आजमावून बघायचं हे तुझ्या हातात आहे. आता या संधीचा उपयोग केला नाही, तर पुढे जाऊन पस्तावण्याची वेळ येऊ शकते.” रेवा म्हणाली.

“बरं, मला यावर जरा विचार करुदे. आतातायीपणा करून मला कोणताही निर्णय घ्यायचा नाहीये.” राजन.

“उद्या संध्याकाळ पर्यंत तुला वेळ देतेय. विचार करून निर्णय घे.” रेवाने सांगितले.

“ओके, राणी सरकार. आता आपण झोपूयात का? उद्या कंपनीत वेळेवर जायचं आहे.” हात जोडून राजन म्हणाला.

“हो झोपा राजेसाहेब.” रेवा हसून म्हणाली.

राजन काय निर्णय घेईल? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all