तू चाल पुढं भाग ३

One Inspirational Journey
तू चाल पुढं भाग ३

मागील भागाचा सारांश: राजनने रेवाला त्याचा शिक्षणाचा पूर्ण प्रवास सांगितला. यावर रेवाने त्याला सुचवले की, तो अजूनही त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो. राजनने विचार करायला तिच्याकडून वेळ मागून घेतला.

आता बघूया पुढे….

दुसऱ्या दिवशी नेहमीच्या वेळेला राजन आपल्या कामावर निघून गेला. रेवा तिच्या मैत्रिणीच्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी गेली. राजन कंपनीत काम जरी करत होता, तरी त्याच्या डोक्यात रेवाचे बोलणे फिरत होते, तो त्यावरच विचार करत होता.

नेहमी लक्ष देऊन काम करणारा राजन आज वेगळ्याच विचारात आहे, हे त्याचा बॉस अजयला जाणवले. अजयने राजनला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. राजन अजय समोर जाऊन उभा होता.

“सर, तुम्ही मला बोलावलंत?”

“हो. तू खुर्चीत बस, मग आपण बोलूयात.” अजय आपल्या समोरील खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाला.

राजन खुर्चीत बसल्यावर अजयने आपल्या हातातील फाईल बाजूला ठेवली.

“राजन, आज सकाळपासून तुझं कामात लक्ष दिसत नाहीये.” अजय म्हणाला.

“सर, माझ्याकडून कामात काही चूक झालीय का?” राजनने घाबरतच विचारले.

“नाही रे. तुझ्याकडून काहीच चूक झाली नाहीये,पण तुझ्या चेहऱ्यावरून तू कोणत्या तरी गहन विचारात आहेस, हे मला जाणवलं. लग्न झाल्यापासून तर तू जास्तच खुश दिसत होतास, मग आता काय प्रॉब्लेम झालाय?
हे बघ तुला माझ्याशी शेअर करायचं असेल तर करू शकतोस. कदाचित मी तुला त्यावर काही मदत करू शकेल.” अजयने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला.

राजनने अजयला त्याचा शैक्षणिक प्रवास व रेवाचे बोलणे सविस्तरपणे सांगितले.

“सर, मला काय निर्णय घेऊ हेच कळत नाहीये. रेवाच म्हणणही पटतंय, पण माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यांचा विचार डोक्यात आला की मग जे आहे ते तसेच सुरू ठेवावे असं वाटतंय.”

राजनच्या बोलण्यावर थोडा विचार करून अजय म्हणाला,
“हे बघ राजन. हे तुझं आयुष्य आहे, यात जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो सर्वस्वीपणे तुला घ्यायचा आहे. माझं मत विचारशील तर, हे बघ आपल्याला आयुष्य एकच असतं, ते कसं जगायचं हे आपण ठरवायचं असतं.

रेवाच्या रूपाने आयुष्य तुला पुन्हा संधी देऊ इच्छित आहे, त्या संधीचे काय करायचे हे तुझं तुला ठरवायच आहे. रेवासारखी बायको मिळायला नशीब लागतं. तू जर शिकण्याचा मार्ग निवडला, तर सगळ्यात जास्त कॉम्प्रोमाइज तिला करावं लागणार आहे.

तुला काय करायचं आहे. नोकरी करता करता सीईटीचा अभ्यास करायचा आहे. रिझल्ट मनासारखा आला तर कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे आणि नाही झालं तर ही नोकरी आहेच ना. तुला फक्त काही दिवस अभ्यास करून आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला तरी वाटतंय की, तू एकदा हे चॅलेंज स्विकारावे.”

“सर, पण इतक्या दिवसांनी मला पुन्हा अभ्यास करायला जमेल का? मला माझ्या क्षमतेवर विश्वास नाहीये. मला माझ्याबद्दलच खात्री नाहीये.” राजनने आपल्या मनातील भीती बोलून दाखवली.

“अरे बाबा, मग ही तुझ्यासाठी मोलाची संधी आहे. स्वतःला आजमावून बघ.” अजय त्याला समजावत होता.

“ओके सर. मी ८०% सीईटी देण्यासाठी तयार झालो आहे. आता फक्त २०% विचार पक्का झाला की तुम्हाला सांगतो.” राजनने सांगितले.

“एक काम कर. तू डॉ दीक्षित सोबत बोल. त्यांच्याशी बोलल्यावर तुझं कन्फ्युजन लगेच दूर होईल.” अजयने सुचवले.

“बरोबर सर. माझ्याही हेच डोक्यात होतं.” राजन चेहऱ्यावर स्माईल आणून म्हणाला.

राजन अजयच्या केबिनमधून बाहेर पडला. लंच ब्रेक झाल्यावर राजनने डॉ दीक्षितांना फोन लावला. त्यांनीही राजनला एकदा सीईटी देऊन बघ असे सांगितले.

राजन नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरी गेला. रेवाने दरवाजा उघडल्यावर राजनने जाऊन तिला मिठी मारली. रेवाने त्याच्या समोर पेढ्यांचा बॉक्स धरला.

“पेढे कसले?” राजनने विचारले.

“मला नोकरी मिळाली.” रेवा त्याला पेढा भरवत म्हणाली.

“अरे वा! अभिनंदन.” राजनने तिला पेढा भरवला आणि त्याने पुन्हा तिला मिठी मारली.

राजनच्या मिठीतून सुटत ती म्हणाली,
“तू फ्रेश होऊन ये. मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते.”

रेवा स्वयंपाक घरात जाण्यासाठी वळली असता राजनने तिचा हात धरून तिला अडवले.

“रेवा, माझा निर्णय झालाय.”

“काय?” रेवाने त्याच्याकडे बघत विचारले.

“मी सीईटी द्यायला तयार आहे.” राजनने तिला सांगितले.

रेवाच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता.
“मला माहित होतं, तू हाच निर्णय घेशील म्हणून.”

“रेवा पण….”

“राजन, पण काय?” रेवाने त्याच्या डोळ्यात बघत विचारले.

“हा सगळा प्रवास वाटतो तितका सोपा नसेल. यात तुला तुझ्या बऱ्याच इच्छा माराव्या लागतील. आपल्याला बाहेर फिरायला जाता येणार नाही. दररोज घरी आल्यावर मला अभ्यास करावा लागेल. आपल्याला गप्पा मारता येणार नाही. आता जशी मी तुला घरकामात मदत करतो, तशी करता येणार नाही.” राजन रेवाला सांगत होता.

राजनचं बोलणं अर्धवट तोडत रेवा म्हणाली,
“राजन, या सगळ्याचा विचार मी आधीच केला आहे. मला माहित आहे की, या सगळ्याचा कळत नकळतपणे मला खूप त्रास होईल, पण त्यापेक्षा तुला जर तुझे स्वप्न पूर्ण करता आले तर सगळ्यात जास्त आनंदही मला होईल.

आता समज, जे स्वप्न तुझे आहे, ते स्वप्न माझे असले असते तर तू मला सपोर्ट केला असताच ना. आता यावेळी तुला सपोर्ट करण्याची वेळ माझी आहे.”

राजनने रेवाला जवळ घेतले. तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेत तो म्हणाला,
“मी खूप नशीबवान आहे की, मला तुझ्यासारखी बायको भेटली.”

रेवाने त्याला घट्ट मिठी मारली.

राजन व रेवाचा पुढील प्रवास बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all