तू चाल पुढं भाग ४

One Inspirational Journey
तू चाल पुढं भाग ४

मागील भागाचा सारांश: राजनचे कामात लक्ष नसल्याने त्याचा बॉस अजय याने त्याला त्याबद्दल विचारणा केली. राजनने त्याला त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितले. अजयने त्याला एकदा प्रयत्न करून बघायला हरकत नाही असे सुचवले. राजन डॉ दीक्षित सोबत बोलला, तर त्यांनीही त्याला ही संधी सोडू नकोस, असे सांगितले. रेवाला नोकरी मिळाली होती.

आता बघूया पुढे….

दुसऱ्या दिवशी रेवालाही ऑफिसला जायचे असल्याने झोपेतून ती लवकर उठली. राजन व स्वतःसाठी तिने डबा तयार केला. दोघेजण सोबत नाश्ता करत असताना रेवा त्याला म्हणाली,

“राजन, सीईटीची चौकशी कशी करणार आहेस? काही ठरवलं का?”

“मी ज्या कॉलेज मधून बारावी पास झालो, तेथील एका सरांचा नंबर मला एका मित्राकडून मिळाला आहे. दुपारी त्यांना फोन करून चौकशी करतो. गरज पडली तर प्रत्यक्ष भेट घेऊन येईल. ऑनलाईन अभ्यासक्रम बघतो आणि त्यानुसार लागणारी पुस्तके आणि नोट्स गोळा करतो.” राजनने उत्तर दिले.

“ओहो! साहेबांची जय्यत तयारी झालेली दिसतेय.” रेवा हसून म्हणाली.

“हो मग. माझं असच आहे. पूर्ण तयारी केल्याशिवाय मैदानात उतरत नाही. आता माझ्या बायकोने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ करून दाखवण्याची माझ्यावर जबाबदारी आहे.” राजन रेवाचा गाल खेचत म्हणाला.

आपल्या प्लेट मधील नाश्ता संपल्याने रेवा प्लेट ठेवण्यासाठी स्वयंपाक घरात गेली तर राजनही तिच्या मागोमाग गेला. रेवा बेसिनमध्ये भांडी घासत असताना राजनने तिला मागून मिठी मारली.

“राजन, मला काम करू दे ना. आज माझ्या कामाचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी उशीरा जाऊन मला माझं वाईट इम्प्रेशन पाडायचं नाहीये.” हाताच्या कोपऱ्याने राजनला बाजूला करत ती म्हणाली.

“ओके मॅडम.” राजन बाजूला जात म्हणाला.

भांडी घासून झाल्यावर रेवा बेडरूममध्ये जाऊन तयार झाली. एका हातात पर्स घेऊन ती हॉलमध्ये आली, तर राजन तिच्याकडे एकटक बघतच होता.

“असा का बघतोय?” रेवाने त्याला विचारले.

“माझी बायको तयार झाल्यावर किती सुंदर दिसतेय हे बघतोय.” राजन गालातल्या गालात हसत म्हणाला.

“तुझं बघून झालं असेल तर मला स्टॉपवर सोडून दे.” रेवा दरवाजा उघडत म्हणाली.

राजन तिच्याजवळ गेला. तिने उघडलेला दरवाजा त्याने बंद केला आणि तिला आपल्या मिठीत घेतले. रेवाच्या कपाळावर आपल्या ओठांची मोहर लावून त्याने तिला हळूच बाजूला केले.

आपली बॅग घेऊन घरातील सगळे लाईट्स बंद करून तो दरवाजा बाहेर जाऊन उभा राहिला. रेवा त्याच्याकडे बघून हलकीच हसली. घराला कुलूप लावून दोघेही घराबाहेर पडले.

राजनने तिला बस स्टॉपवर सोडले आणि तो आपल्या कंपनीच्या दिशेने गेला. बस आल्यावर रेवा बसमध्ये बसून आपल्या ऑफिसच्या दिशेने मार्गस्थ झाली.

राजनने कॉलेज मधील सरांना फोन करून सीईटीची चौकशी केली, तर त्यांनी नाशिक मधील वाघ सरांची भेट घेण्यास त्याला सांगितले. राजनने कंपनीतून लवकर निघून वाघ सरांची भेट घेतली. वाघ सरांनी राजनचा संपूर्ण प्रवास ऐकला, त्यावर ते म्हणाले,

“राजन, तुझ्या डोळ्यात जी जिद्द मला आज दिसते आहे, ती शेवट पर्यंत टिकवून ठेव. हीच जिद्द तुला यशाजवळ पोहोचण्यास मदत करणार आहे. तुला लागेल ती मदत मी करायला तयार आहे.

तुझं लग्न आताच झालं असल्याने तुला इमोशनली स्ट्रॉंग व्हावं लागेल. तुझी बायको तुला सपोर्ट करते आहेच, पण तिलाही मानसिक, शारीरिक आधाराची गरज भासेल, त्यावेळी तुला तुझा अभ्यास सांभाळून तिलाही सांभाळाव लागणार आहे.

तुला जेव्हाही मन मोकळं करावं वाटेल, तेव्हा माझ्याशी कोणत्याही विषयावर तू बिनधास्त बोलू शकतोस. कोणतीही अडचण आली की मला सांगत जा, मी शक्य होईल तितकी मदत तुला करेल.

तुझ्याकडे सात महिने आहेत, हे महिने तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. यावर तुझं भविष्य अवलंबून आहे. या सात महिन्यात तुला कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे.”

यावर राजन म्हणाला,
“सर, मी खूप मेहनत करणार आहे. नोकरी करून, बायकोला सांभाळून अभ्यास करणं म्हणजे माझ्यासाठी तारेवरची कसरत असणार आहे. हा प्रवास वाटेल तितका सोपा नसेल, पण मी माझे शंभर टक्के देणार आहे.”

“हीच जिद्द हवी असते आणि ती तुझ्यात आहे. उद्या ऑफिसला येऊन नोट्स आणि पुस्तके घेऊन जा आणि जोमाने अभ्यासाला लाग.” वाघ सर राजनच्या पाठीवर थाप मारत म्हणाले.

“सर, पुस्तक व नोट्स यांची फी किती असेल?” राजनने त्याला पडलेला प्रश्न विचारला.

“काहीच नाही.” सरांनी हसून उत्तर दिले.

“पण का?” राजन.

“मी डॉक्टर होण्याचे स्वप्न लहानपणी बघितले होते, पण काही कारणाने ते पूर्ण होऊ शकले नाही. तुझ्यासारखा विचार आणि प्रयत्न जर मी वेळेवर केले असते तर आज सर न होता डॉक्टर झालो असतो. मला जे जमलं नाही ते तू करून दाखवू शकतोस, हे तुझ्या डोळ्यात दिसत आहे.” वाघ सर.

“सर, तुम्ही जरी डॉक्टर झाले नसतील तरी तुम्ही खूप जणांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत केली आहे.” राजन म्हणाला.

“तू अभ्यास करून डॉक्टर झाला की मला माझी फी मिळाली असं समज. तू चाल पुढं, मी तुझ्या पाठीशी आहे.” वाघ सर हसून म्हणाले.

राजनने त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.

घरी गेल्यावर राजनने रेवाला वाघ सरांबद्दल सांगितलं. रेवाने आपला ऑफिसचा पहिला दिवस कसा गेला याबद्दल राजनला सांगितले.

दुसऱ्या दिवशी राजनने नोट्स व पुस्तके वाघ सरांच्या क्लासेस मधून घेतले आणि तो अभ्यासाला लागला. राजन आता दररोज सकाळी ४ वाजता उठून अभ्यासाला बसायचा. रेवा त्याला घरातील कोणतंही काम करू देत नव्हती. राजनला सगळं जागेवर ती आणून देत होती.

कंपनीत मोकळा वेळ मिळाल्यावर राजन पुस्तक घेऊन बसायचा. रात्री १२ वाजेपर्यंत तो अभ्यास करायचा. या सगळ्यात तो रेवाला वेळ देण्याचाही प्रयत्न करायचा. शनिवार- रविवार वाघ सरांचे एक्स्ट्रा क्लासेस रहायचे, तो ते अटेंड करायचा.

रेवाने घरातील कामांची जबाबदारी पूर्णपणे स्वतःवर घेतली. यात तिची बरीच धावपळ व्हायची, पण तिला राजनचे स्वप्न पूर्ण झालेले बघायचे असल्याने ती धीराने घेत होती.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all