तू चाल पुढं भाग ५

One Inspirational Journey
तू चाल पुढं भाग ५

मागील भागाचा सारांश: राजनने वाघ सरांची भेट घेतली. वाघ सर त्याला विनामूल्य मदत करायला तयार होते. राजन जोमाने अभ्यासाला लागला होता, त्याच्या हातात सात महिने होते.

आता बघूया पुढे….

“रेवा, तुझ्या लग्नाला फक्त एक महिना झालाय ना?” रेवाच्या शेजारी बसणाऱ्या ऑफिस कलीग रेश्माने जेवण करता करता विचारले.

“हो, पण तू असा प्रश्न का विचारलास?” रेवाने प्रतिप्रश्न केला.

“तुझा नवरा कधी तुला घ्यायला येत नाही किंवा सोडवायला सुद्धा येत नाही. तुम्ही विकेंडला सुद्धा बाहेर फिरायला जात नाहीत. लग्न झाल्यावर नवीन नवीन सगळेजण फिरायला जात असतात.” रेश्माने स्पष्टीकरण दिले.

“माझा नवरा राजन त्याचं आणि माझं स्वप्न पूर्ण करण्यात बिजी आहे. फिरायला, एन्जॉय करायला पूर्ण आयुष्य पडलं आहे.” रेवाने आपल्या चेहऱ्यावर स्माईल ठेवून उत्तर दिले.

“तुमच्या दोघांचं असं कोणतं मोठं स्वप्न आहे की जे पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे सुरुवातीचे दिवस एन्जॉय करत नाहीयेत.” रेश्माला प्रश्न पडला होता.

“राजनला डेंटिस्ट व्हायचे आहे.” रेवाने उत्तर दिले.

“काय? अग पण…”

रेश्माला थांबवत रेवा म्हणाली,
“हे बघ रेश्मा, तुझ्या मनात बरेच प्रश्न असतील, पण त्या प्रश्नांची उत्तरे मी तुला आता नाही तर दहा महिन्यांनी देईन.”

रेवा असं बोलल्याने रेश्मा पुढे काहीच बोलली नाही.

एके दिवशी रेवाला ऑफिसमध्ये बरंच काम असल्याने तिला घरी जायला उशीर झाला. रेवा दरवाजातून आत पाऊल ठेवते तोच राजन म्हणाला,
“रेवा, किती उशीर केलास. मी तुझी केव्हाची वाट बघतोय. मला खूप भूक लागली आहे. आता पटकन एक कप कॉफी कर. तुझा स्वयंपाक होईपर्यंत तेवढाच माझ्या पोटाला आधार मिळेल.”

रेवाने राजनकडे बघितलं तर तो पुस्तकात बघून तिच्याशी बोलत होता. रेवा काही न बोलता रूममध्ये गेली. दोन मिनिटात फ्रेश होऊन ती स्वयंपाक घरात गेली. एका गॅसवर तिने राजनसाठी कॉफी ठेवली, तर दुसऱ्या गॅसवर भाजी शिजायला ठेवली. राजनला कॉफी देऊन ती स्वयंपाकाला लागली. तिचा स्वयंपाक होत होताच तोच राजनने तिला आवाज दिला,

“रेवा, स्वयंपाक झाला आहे का?”

रेवाने ताट वाढलं व त्याच्यासमोर नेऊन ठेवलं. स्वयंपाक घरातील बाकीची कामे आवरता आवरता तिला जेवण करण्याची इच्छा राहिली नव्हती. स्वयंपाक घरातील पसारा आवरून ती रूममध्ये गेली तर राजन बेडवर पुस्तक वाचत बसलेला होता. रेवा आल्याची चाहूल लागताच तो म्हणाला,

“रेवा, तुला इथलं काय आवरायचं असेल ते आवर. मला पुढील पंधरा मिनिटात झोपायचं आहे. आज कंपनीत खूप काम असल्याने मी थकलो आहे. आता लवकर झोपतो आणि उद्या सकाळी लवकर उठतो.”

राजनचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातच पाणी आलं. राजनचं तिच्याकडे लक्ष नसल्याने तिच्या डोळ्यातील पाणी त्याला दिसले नाही. ती आवरून त्याच्याशी काही न बोलता झोपून गेली.

नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी राजन उठून आपल्या अभ्यासाला लागला. त्याला कॉफी प्यावीशी वाटली म्हणून तो रेवाला उठवायला आला.

राजनने रेवाला लांबूनच आवाज दिले. रेवाचा काहीच रिस्पॉन्स न आल्याने तो तिच्याजवळ जाऊन बसला व त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला, तर तिचे अंग प्रचंड तापाने फणफणले असल्याचे त्याला जाणवले. राजनने रेवाला हलवून उठवले. ती तापाच्या ग्लानीत असल्याने तिला डोळे उघडायला जड जात होते. तिने हळूच डोळे उघडले.

घरात तापावरील एक गोळी होती, ती राजनने त्वरित रेवाला दिली. राजनच्या मदतीने रेवा बेडवर उठून बसली होती.

“रेवा, आपण डॉक्टरकडे जाऊयात.” राजन म्हणाला.

“राजन, आता तू गोळी दिली आहेस ना, तर मला बर वाटेल. माझ्यात चालण्याचे त्राण राहिले नाहीये. मला थोडं बर वाटुदेत, मग आपण डॉक्टरकडे जाऊ.” रेवाला कुठेही जाण्याची इच्छा होत नव्हती.

राजनने तिला चहा बिस्कीट खाऊ घातले. रेवा नाही म्हणत असताना त्याने बळजबरी तिला भरवले. रेवाला थोडं बर वाटल्यावर राजन तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिले आणि काही औषधे दिली.

राजनने तिच्यासाठी नारळपाणी घेतले. रेवाला अशक्तपणा आला होता. रेवा व राजन दोघे घरी आले.

“राजन, तू कंपनीत जा. मला थोड्यावेळात पूर्ण बर वाटेल.” रेवा म्हणाली.

“रेवा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तुला नीट उभं सुद्धा राहता येत नाहीये. तुला अश्या अवस्थेत एकटीला सोडून मी कसा जाऊ शकेल? आता तू ऍसिडिटीची गोळी घे. मी तुझ्यासाठी मुगाची फिक्की खिचडी बनवतो. खिचडी खाऊन बाकीच्या गोळ्या घेता येतील. तू आराम कर.” राजन रेवाला गोळी देऊन स्वयंपाक घरात गेला.

रेवाला कधी झोप लागली हे तिचं तिलाच कळलं नाही. खिचडी बनवून झाल्यावर राजनने रेवाला उठवले आणि बळजबरी आपल्या हाताने खिचडी खाऊ घातली. जेवणानंतरच्या गोळ्या घेतल्यावर रेवाला पुन्हा झोप लागली. त्यावेळेत राजन आपला अभ्यास करत बसला.

जवळपास दोन तासांनी रेवाला जाग आली, तेव्हा तिचा ताप बऱ्यापैकी उतरला होता. आपल्या हातातील पुस्तक बाजूला ठेवून राजन तिच्याजवळ घेऊन बसला.

“रेवा, असा अचानक तुला इतका ताप कसा आला?”

“काल संध्याकाळीच मला थोडी कणकण जाणवत होती.” रेवा.

“मग तू हे मला कालच का नाही सांगितले?” राजनला तिचा राग आला होता.

“राजन, मी काल घरी आल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तू माझ्याकडे डोकं वर करून बघितलं तरी का? मी जेवण केलं की नाही हे सुद्धा तुला विचारावं वाटलं नाही. रात्री झोपताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण तेही तुला दिसलं नाही.” रेवाला बोलताना भरून आले होते.

राजनने पुढे होऊन तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले व तिला आपल्या मिठीत घेतले,

“सॉरी रेवा, माझं हे असंच होऊन जातं. मी एकदा अभ्यासात गुंगलो की मला आजूबाजूच्या जगाचे भान राहत नाही. मी तुझ्याकडे दुर्लक्ष करायला नको होतं. मी इथून पुढे तुझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही. समजा असं झालंच तर मला ओरडून सांग.” राजनचेही डोळे पाणावले होते.

पुढील दोन-तीन दिवसांत रेवा बरी झाली. रेवाने राजनला स्वतःहून डॉक्टर होण्यासाठी प्रोत्साहन दिले होते, पण असे काही क्षण यायचे की ज्यावेळी तिला राजन आपल्या सोबत असावा असे वाटायचे.

राजन व रेवाच्या आयुष्यात असे कोणते कठीण क्षण येतील? ते बघूया पुढील भागात…

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all