तू चाल पुढं भाग ६

One Inspirational Journey
तू चाल पुढं भाग ६

मागील भागाचा सारांश: अभ्यासात गुंग झाल्याने राजनचे रेवाकडे दुर्लक्ष होत चालले होते. त्यात रेवा एकदा खूप आजरी पडल्यावर राजनला त्याची चूक उमगली.

आता बघूया पुढे….

सीईटीला एक महिना अवधी राहिला असताना एका रविवारी सकाळी सहाच्या दरम्यान राजन हॉलमध्ये अभ्यास करत बसलेला होता, तर रेवा बेडरूममध्ये झोपलेली होती. राजनच्या मोबाईलची रिंग वाजली. मोबाईलच्या स्क्रीनवर आईचे नाव दिसल्याने राजन टेन्शनमध्ये आला.

राजनने घाबरतच फोन उचलला,
“हॅलो राजन, मी महादू काका बोलतोय.”

“महादू काका, तुम्ही आईच्या फोनवरुन फोन का केला? तेही यावेळी.” राजनला प्रश्न पडला होता.

“राजन, तुझ्या आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. तू लवकरात लवकर ये.” महादू काकांनी सांगितले.

“हो काका, मी लगेच निघतो.” राजनने फोन कट केला.

राजन बेडरूममध्ये गेला, रेवाला उठवत तो रडक्या आवाजात म्हणाला,
“रेवा, आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. आपल्याला लगेच निघावं लागेल.”

रेवा खाडकन झोपेतून उठली. राजनच्या डोळ्यात आलेलं पाणी व त्याच्या चेहऱ्यावरील काळजी बघून ती म्हणाली,
“राजन, आई ठीक असतील. तू स्वतःला सांभाळ.”

राजन व रेवाने घाईघाईत आवरून गावाला जाण्यासाठी घराबाहेर पडले. रिक्षा पकडून बस स्टॉपवर जाऊन गावाला जाणाऱ्या बसमध्ये बसले.

“रेवा, मी आईचा फोन लावतोय, पण आता तो कोणीच उचलत नाहीये.” राजनच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसून येत होते.

“राजन, महादू काका किंवा इतर शेजाऱ्यांना लावून बघ.” रेवाने सुचवले.

राजनने महादू काकांच्या मुलाला फोन लावल्यावर त्याने त्यांना डायरेक्ट हॉस्पिटलला येण्यास सांगितले. राजन व रेवा दोघेही आईची तब्येत चांगली असावी याची देवाकडे प्रार्थना करत होते. पुढील काही तासांतच बस राजनच्या गावी पोहोचली. राजन व रेवा डायरेक्ट हॉस्पिटलला गेले. महादू काका व त्यांचा मुलगा हॉस्पिटलच्या प्रांगणात उभे होते.

राजन त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला,
“काका, आईला काय झालंय?”

“राजन, त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्या आय सी यु मध्ये ऍडमिट केलंय.” महादू काकांनी सांगितले.

राजनने हॉस्पिटलच्या आता धाव घेतली. रेवा, महादू काका व त्यांचा मुलगाही त्याच्या पाठोपाठ हॉस्पिटलमध्ये गेले.

वेटींग एरियात राजनची बहीण बसलेली होती, ती राजनला बघून जोरात ओरडून म्हणाली,
“दादा, आपली आई आपल्याला पोरकं करून गेली रे.”

राजन तिचा हंबरडा ऐकून एका जागीच उभा राहिला, त्याच्या हातातील बॅग खाली पडली. रेवाच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ती राजनच्या बहिणी जवळ गेली. त्याची बहीण रेवाच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडत होती. महादू काकांनी राजनच्या खांद्यावर हात ठेवला, तो काकांकडे बघून रडक्या स्वरात म्हणाला,
“काका, हे कसं झालं?”

“बाळा, हा सगळा दैवाचा खेळ असतो. आपल्या हातात काहीच नसतं. पहाटे तुझ्या आईने आमच्याकडे फोन करून तिच्या छातीत दुखत असल्याचे सांगितले. आम्ही तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. इथे आल्यावर पाच मिनिटांत तिने प्राण सोडला.” हे ऐकल्यावर राजनने आईच्या नावाने मोठा आक्रोश केला.

महादू काकांनी राजनला धीर दिला. गावातील इतर लोकांनी राजनच्या आईच्या अंत्यविधीची व्यवस्था केली. पुढील काही वेळातच राजनच्या आईचा मृतदेह हॉस्पिटल मधून घरी नेण्यात आला. राजनला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. रेवा त्याला सावरत होती.

अंत्यविधीची तयारी झाल्यावर राजनच्या आईला स्मशानभूमीत नेण्यात आले. राजनने आपल्या आईच्या शवाला अग्नीडाग दिला. त्यावेळी त्याच्या मनाला ज्या यातना होत होत्या, त्या त्यालाच ठाऊक होत्या.

अंत्यसंस्कार झाल्यावर सगळेजण घरी गेले. राजनला जवळचे असे कोणीच नातेवाईक नव्हते. राजनच्या बहीणीच्या सासरचे लोक त्यांचं सांत्वन करून आपापल्या घरी निघून गेले. आता घरी रेवा, राजन व त्याची बहीण असे तिघेच होते. महादू काका त्यांच्यासाठी जेवण घेऊन आले होते.

राजन व त्याची बहीण जेवायला तयार नव्हते, पण रेवाने त्यांना आईची शपथ घालून थोडं जेवायला भाग पाडलं. संध्याकाळी राख सावडण्याचा कार्यक्रम झाला.

रात्री रेवा व राजन दोघेच बसलेले असताना राजन म्हणाला,
“रेवा, अजूनही आई आपल्यात नाही, अस वाटतच नाहीये. अस वाटतंय की, ती शेतात गेली आहे आणि काही वेळातच घरी परत येईल. आई माझा खूप मोठा आधार होता ग. बाबा आजारी असताना सुद्धा आईच्या मदतीने, आधाराने त्या सगळ्या परिस्थितीवर मात करता आली होती. आई नाही तर जगण्याची इच्छाच राहिली नाहीये.

जीने जन्म दिला, तिचं हे जग सोडून गेली. मला आईला नाशिकला घेऊन जायचे होते. आपलं लग्न झाल्यावर आईला नाशिकला चल बोललो तर ती म्हणे, “ तुम्ही दोघे आधी एकमेकांसोबत रुळा, मग मी येईल.”

मला आईला काहीच सुख देता आलं नाही. तिचं आयुष्य कष्टातच गेलं.” राजन रेवाच्या कुशीत शिरून रडत होता.

रेवा त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होती,
“राजन, जास्त त्रास नको करून घेऊस. तू असं रडलेलं आईंना आवडलं असत का? काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आईंच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचे संस्कार कायम तुझ्यासोबत जिवंत राहणार आहेत.”

रेवा राजनला समजावून सांगत होती. रेवा राजन व त्याच्या बहिणीला वेळोवेळी त्यांच्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती.

“दादा, तुझी परीक्षा आहे ना?” राजनच्या बहिणीने विचारले.

“हो, पण आता मला परीक्षा देण्याची इच्छा राहिली नाहीये.” राजन म्हणाला.

“राजन, अस करून कस चालेल. तू परीक्षेतून माघार घेतलेली आईंनाही आवडली नसती. ते काही नाही. सगळे विधी उरकल्यावर आपण नाशिकला जाणार आहोत आणि तू परीक्षा देणार आहेस.” रेवा म्हणाली.

“रेवा, ह्या मनस्थितीत माझा अभ्यास होणार नाही.” राजन.

“दादा, आम्हाला तुझी मनस्थिती समजतेय. तुझ्याजागी मी असते तरी मी पण हेच बोलले असते. दादा, तुला डॉक्टर होता आले नाही, याचं आई व बाबा दोघांना नेहमी वाईट वाटायचं. बाबा बऱ्याचदा म्हणायचे की, “माझ्यामुळे राजनला डॉक्टर होता आले नाही.”

निदान त्यांच्या मनातील गिल्ट कमी व्हाव म्हणून तरी एकदा ही परीक्षा दे.” राजनच्या बहिणीने त्याला समजावून सांगितले.

आई गेल्याच्या दुःखात राजन अभ्यास करून परीक्षा देऊ शकेल का? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all