तू चाल पुढं भाग ७

One Inspirational Journey
तू चाल पुढं भाग ७

मागील भागाचा सारांश: राजनच्या आईचा अचानक मृत्यू झाल्याने तो कोलमडला होता. रेवाने त्याला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. राजन सीईटी द्यायला तयार होत नव्हता, पण त्याच्या बहिणीने त्याला समजावले.

आता बघूया पुढे….

आईचे सगळे विधी उरकल्यावर राजन व रेवा नाशिकला परतले. राजनला पहिल्यासारखी अभ्यास करण्याची इच्छा होत नव्हती.

“रेवा, माझ्याकडून पुन्हा अभ्यास होईल असं वाटत नाही. अभ्यास करण्यासाठी मन एकाग्र केलं की मला आईची खूप आठवण येते.”

यावर रेवा म्हणाली,
“राजन, मला तुमची मनस्थिती समजते आहे. जन्म - मृत्यू हा आयुष्याचा फेरा आहे, तो कोणालाच चुकलेला नाहीये. जो व्यक्ती जन्माला येतो, तो कधी ना कधी मरण पावणारच असतो. प्रत्येकाची वेळ ठरलेली असते, ती आपण टाळू शकत नाही.

आईंच्या आठवणीने तुला त्रास होणे स्वाभाविकच आहे, पण त्याचा परिणाम अभ्यासावर होऊ देऊ नकोस. तू डॉक्टर होणं हे आई-बाबांचं स्वप्न होतंच ना. आई गेल्याने तू जर अभ्यास करून परीक्षा दिली नाहीस, तर त्या जिथून आपल्याला पाहत असतील, त्यांना तिथे किती त्रास होईल.

तुला फक्त पुढील दहा दिवस अभ्यास करायचा आहे. प्लिज स्वतःला सावर. तू गेल्या ७ महिन्यांपासून जी मेहनत घेत आहेस, ती वाया जाऊ देऊ नकोस.”

राजन खचला की रेवा सतत काहीना काही बोलून त्याचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत होती. बोलता बोलता राजनच्या परीक्षेचा दिवस येऊन ठेपला.

राजन व रेवा त्या दिवशी लवकर उठून तयार झाले. राजन नाही म्हणत असताना रेवाने त्याला नाश्ता करायला भाग पाडले. राजन व रेवाने मंदिरात जाऊन देवाचा आशिर्वाद घेतला. वाघ सरांनी फोन करून राजनला शुभेच्छा दिल्या.

राजन व रेवा परीक्षा केंद्राच्या इथे वेळेत पोहोचले होते.

राजनचा हात हातात घेऊन रेवा म्हणाली,
“राजन, उत्तरे लिहिताना डोकं शांत ठेवून लिही. अतिविचार आणि टेन्शन घेऊ नकोस. अति टेन्शनमध्ये तुझी उत्तरे चुकू शकतात. ऑल द बेस्ट.”

राजनने मान हलवून होकार दर्शवला व तो आतमध्ये निघून गेला. रेवा बाहेर एका झाडाखाली देवाचे नाव घेत बसली होती.

“तुमचं कोण परीक्षेला बसलेलं आहे?” रेवाच्या शेजारी बसत एका महिलेने विचारले.

“माझे मिस्टर.” रेवाने उत्तर दिले.

रेवाचे उत्तर ऐकून त्या महिलेच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसले. ते बघून रेवा म्हणाली,

“वय होता तेव्हा काही कारणाने त्यांच्या शिक्षणात अडथळा आला होता. आता नशिबाने पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे. स्वतःचं नशीब ते पुन्हा एकदा आजमावून बघत आहेत.”

“ग्रेट.” ती महिला म्हणाली.

रेवा व त्या महिलेमध्ये इन जनरल गप्पा सुरु होत्या. काही तासांनी परीक्षा संपल्यावर राजन बाहेर आला. रेवा त्याची वाट बघत गेटमध्येच उभी होती. राजनला बाजूला घेऊन ती म्हणाली,

“परीक्षा कशी गेली?”

“ओव्हरऑल छान होती. निकाल लागल्यावरच काय ते कळेल.” राजनने उत्तर दिले.

रेवा व राजन दोघे तसेच वाघ सरांकडे गेले. वाघ सरांनी राजनला परीक्षा झाल्यावर भेटायला बोलावले होते. राजन व वाघ सरांमध्ये पेपर वरून बऱ्याच वेळ चर्चा झाली.

राजनच्या खांद्यावर हात ठेवत वाघ सर म्हणाले,
“माझा अनुभव मला सांगतोय की, तुला यश नक्कीच मिळेल.”

वाघ सरांचा निरोप घेऊन राजन व रेवा घरी परतले. त्या दोघांचं रुटीन सुरू झालं होतं. अभ्यासाचा ताण नसल्याने राजन रेवाला वेळ देत होता. एका संध्याकाळी राजन रेवाला घेऊन फिरायला गेला होता. हातात हात घालून ते दोघे एका गार्डन मधील बाकड्यावर बसले होते.

“राजन, तुझी अशी सोबत असण्याची सवय होते आणि मग अभ्यास असल्यावर तू बिजी होतोस, मग मात्र मला या क्षणांची मला खूप आठवण होते.”

“रेवा, तुझ्या मनाची तगमग मला समजते ग. आता सीईटीचा निकाल जर चांगला लागला तर पुन्हा अभ्यास, कॉलेज सुरू होईल. चांगला नाही लागला तर मग हेच आपलं कायमस्वरूपी रुटीन सुरू होऊन जाईल.” राजन.

“मला हे असं रुटीन नकोय. मला तुला डॉक्टर झालेलं बघायचं आहे. हे जे थोडेफार क्षण माझ्या वाट्याला येतील तेच मी मनभरून जगणार आहे.” रेवा चेहऱ्यावर हसू आणून म्हणाली.

दिवसामागून दिवस जात होते. निकालाचा दिवस येऊन ठेपला होता. राजन त्या दिवशी कंपनीत गेलाच नव्हता. रेवाला मात्र महत्त्वाचे काम असल्याने ड्युटीवर जावे लागले होते. रेवा ड्युटीवर असली तरी तिचे सगळे लक्ष फोनवर होते. राजनचा कधी फोन येईल आणि त्याचा निकाल काय लागेल याकडे तिचे लक्ष लागून राहिले होते.

पुढील काही वेळातच निकाल लागला. राजनचा रँक चांगला आला होता. राजनने पहिला फोन रेवाला केला. वाघ सरांच्या मते राजनचा बी डी एसला नंबर गव्हर्नमेंट कोट्यातून लागेल. राजन व रेवा दोघेही खूप खुश होते.

राजनने ऍडमिशन फॉर्म भरला होता. पहिल्याच राऊंडला राजनला नाशिकच्या डेंटल कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट कोट्यातून ऍडमिशन मिळाले होते. राजन व रेवाला एकत्र राहूनच त्यांचे स्वप्न पूर्ण करता येणार होते.

वाघ सरांनी राजन व रेवाला भेटायला बोलावले होते.

“सर, तुम्ही अचानक आम्हाला दोघांना भेटायला का बोलावले?” राजनला प्रश्न पडला होता.

“मला तुमच्या दोघांसोबत खासकरून रेवा सोबत काही बोलायचं होतं.” वाघ सर म्हणाले.

“माझ्यासोबत?” रेवाच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते.

वाघ सर पुढे काही बोलणार तोच त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणार शिपाई राजू धावतपळत सरांच्या केबिनमध्ये येऊन म्हणाला,

“सर, पटकन खाली चला. रोहन देशमुखचा नंबर मेडीकलला न लागल्याने त्याने खाली खूप गोंधळ घातला आहे. तो आमचं कोणाचंच ऐकत नाहीये.”

वाघ सर आपल्या खुर्चीतून उठत म्हणाले,
“अभ्यास करताना कष्ट घ्यायला नको आणि नंबर लागला नाही म्हणून क्लासच्या नावाने खडे फोडायला तयार होतात. राजन, रेवा तुम्ही इथेच बसून रहा. मी जरा जाऊन येतो.”

वाघ सर केबिनच्या बाहेर पडले.

“राजन, सरांना माझ्यासोबत काय बोलायचं असेल?” रेवाला प्रश्न पडला होता.

“मलाही हाच प्रश्न पडलाय. सर परत आल्यावरच कळेल.” राजन म्हणाला.

वाघ सरांना रेवासोबत काय बोलायचं असेल? बघूया पुढील भागात…

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all