तू चाल पुढं भाग ८

One Inspirational Journey
तू चाल पुढं भाग ८

मागील भागाचा सारांश: राजनचा सीईटी मध्ये रँक चांगला आल्याने त्याचा नंबर गव्हर्नमेंट कोट्यातून नाशिकच्या डेंटल कॉलेजला लागला होता. वाघ सरांना रेवासोबत बोलायचे असल्याने त्या दोघांना त्यांनी बोलावून घेतले होते.

आता बघूया पुढे…

राजन व रेवा वाघ सरांची वाट बघत त्यांच्या केबिनमध्ये बसलेले होते. काही वेळाने वाघ सर तिथे आले.

“सॉरी, तुम्हाला वाट बघावी लागली.”

“सर, सॉरी काय त्यात?” राजन.

“सर, तुम्हाला माझ्यासोबत काय बोलायचं होतं?” रेवाने सरांना विचारले.

“हे बघ रेवा, मी इकडचं तिकडचं बोलण्यापेक्षा डायरेक्ट मुद्द्यावरच येतो. तू राजनला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेस, त्याला पाठींबा देत आहेस, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे.

इथून पुढचा पाच वर्षांचा प्रवास तुमच्यासाठी जास्त चॅलेंजिंग राहणार आहे. चार वर्षे शिक्षण आणि एक वर्ष इंटर्नशिप बी डी एस मध्ये असते. या दरम्यान तुमची भावनिक आणि आर्थिक तारांबळ उडणार आहे.

बऱ्याचदा अस होईल की, तुझा संयम सुटेल. तुझी खूप चिडचिड होईल. तीच वेळ रेवा तुला सांभाळून घ्यायची आहे. कॉलेजला जाणं राजनसाठी इतकं काही सोपं नसेल. कॉलेजचे विद्यार्थी राजनपेक्षा छोटे असतील, त्यांच्या विचारांशी जुळवून घेणे त्याच्यासाठी कठीण असेल. नवीन कॉलेज, अभ्यासक्रम, वेगळे वातावरण, वेगळे लोकं त्याला तिथे भेटतील. या सगळ्यात तो आधीच थोडा खचलेला असेल. यात त्याला तुझ्या आधाराची गरज असेल. तेव्हा त्याला तुझ्याकडून जास्त अपेक्षा असतील आणि नेमकं त्याच काळात जर तू त्याला समजून घेतलं नाही, तर मग तुमच्यात भांडण होत राहतील.

तुमच्या दोघांचं नशीब चांगलं की, राजनला नाशिक मधील कॉलेज मिळालं, त्यामुळे तुम्हाला एकमेकांसोबत राहता येईल. राजनला रहाण्याचा, जेवणाचा खर्च लागणार नाही. राजनचे मित्र-मैत्रिणी बदलल्याने त्याच्या राहणीमानात, विचारांत थोडा बदल होऊ शकेल, तो रेवा तुला पचवता यायला हवा. कितीही राग आला तरी व्यक्त होताना विचार करत जा.

स्वतःला मानसिक आणि भावनिक रित्या कसं सांभाळायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. आता सगळी सोंगं आणता येतात, पण पैश्याच सोंग आणता येत नाही. आता तुमच्या दोघांमध्ये रेवा एकटी कमावती असणार आहे, तर पैसे वापरताना जरा जपून खर्च करत जा. आर्थिक नियोजन व्यवस्थित करा.

राजन, माझा एक मित्र डेंटिस्ट आहे. कॉलेज सुटल्यावर संध्याकाळी तीन तास त्याच्याकडे तू काम करू शकतोस. याचा दोन फायदे तुला होतील, एक तर तुला खर्च करण्यापुरते पैसे मिळतील आणि प्रॅक्टिकल काम डोळ्यासमोर असताना थिअरी समजायला मदत होईल. अभ्यास, कॉलेज आणि ही नवीन नोकरी करताना तुझी दमछाक होऊ शकेल, पण तुला कष्ट करण्याची सवय असल्याने सहजासहजी हे जमेल.

तू या सगळ्यावर विचार कर आणि मला कळव. राजन आणि रेवा, तुम्हाला दोघांना कुठल्याही प्रकारची मदत लागली, तर माझ्याकडे हक्काने यायचं.”

“सर, असेच आमच्या सोबत कायम रहा. तुमचं मार्गदर्शन हेच आमच्यासाठी अमूल्य आहे.” राजन हात जोडून म्हणाला. राजनच्या डोळ्यात पाणी होते.

राजन व रेवा सरांच्या जोडीने पाया पडले.

पुढील पंधरा दिवसांनी राजनचे कॉलेज सुरू झाले. राजनने आपल्या पहिल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. वाघ सरांच्या मित्राकडे काम करायला राजनने होकार दर्शवला होता.

आपल्या सोबतचे विद्यार्थी आपल्यापेक्षा लहान असल्याने राजनला त्यांच्याशी मैत्री कशी करावी हे समजत नव्हते. शिवाय डेंटल कॉलेज म्हणजे मुलींचे प्रमाण जास्त व मुलांचे प्रमाण कमी. राजनला मुलींशी बोलायला आवडत नव्हते.

“राजन, कॉलेज कसं सुरू आहे? मी माझ्या प्रोजेक्ट मध्ये इतकी बिजी होती की, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बोलायला वेळच मिळाला नाही.” रेवा जेवण करता करता म्हणाली.

“कॉलेजमध्ये आता जायला जरा बरं वाटतंय. दोन मुलांशी ओळख पण झालीय. जेवायला, क्लासमध्ये आम्ही सोबतच असतो. नेमक्या आमच्या प्रॅक्टिकलच्या बॅच वेगळ्या आहेत. बायोकेमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला माझी पार्टनर एक मुलगी आहे. आमच्या कॉलेजला मुली जरा जास्तच आहेत.” राजनच्या बोलण्यावर रेवाला हसायला आलं.

“तू मुलींना घाबरतोस का?”

“हे नाही. मी मुलींना का म्हणून घाबरू? मी मराठी शाळेत शिकल्याने मला मुलींशी जास्त बोलण्याची सवय नाहीये.” राजन.

“ओके. बाकी अभ्यासक्रम जास्त कठीण आहे का?” रेवाने पुढील प्रश्न विचारला.

“डॉक्टर व्हायचे म्हटल्यावर सोपे नाहीयेच. बायोकेमिस्ट्री मध्ये केमिकल रिऍक्शन आहेत. अनाटॉमी मध्ये पूर्ण मानवी शरीराचा अभ्यास आहे. फिजीऑलॉजी मध्ये थोडी थिअरी जास्त आहे आणि डीएडीएच मध्ये दातांचा बेसिक अभ्यास आहे.” राजनचं बोलणं रेवाला फार काही कळलं नव्हतं.

“मला तुझे विषय फारसे काही कळले नाहीत. मला कधीतरी निवांत समजावून सांग.” रेवा.

“अरे हो. मी बोलताना तो विचार केलाच नव्हता. नॉन- मेडीकलना हे सगळे विषय समजणे अवघड असेल. मी तुला निवांत सगळे विषय, त्यातील अभ्यासक्रम समजावून सांगेल.” जेवण झाल्यावर दोघांनी मिळून घरातील पसारा आवरला.

दिवसामागून दिवस जात होते. राजन आता कॉलेजमध्ये रुळला होता, त्याचं रुटीन सेट झालं होतं. रेवाही तिच्या ऑफिसच्या कामात भरपूर व्यस्त झाली होती. रेवाच्या कष्टाळू आणि प्रामाणिक स्वभावामुळे तिचे प्रमोशन झाले होते. रेवाचा पगार वाढल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती जरा बरी झाली होती.

एकदा राजन व रेवा रविवारी फिरायला मॉलमध्ये गेले होते, मागून कोणीतरी राजन म्हणून आवाज दिला. राजन व रेवा जागीच थबकले आणि त्यांनी मागे वळून बघितले, तर दोन मुली त्यांच्या दिशेने चालत येत होत्या. राजनने त्यांच्याकडे बघून स्माईल दिली.

“हाय राजन, तू बायको सोबत फिरायला आला आहेस. आम्ही म्हणतो तर आमच्यासोबत कुठेच येत नाही.” त्यातील एक मुलगी म्हणाली.

“रेवा, ही इशा आणि ही रिया. ह्या दोघी माझ्याच वर्गात आहेत.” राजनने त्या दोघींची आणि रेवाची ओळख करून दिली.

रेवाने दोघींशी हँडशेक केला. इशा व रिया राजनच्या जास्तच जवळ येऊन बोलत होत्या, त्याच्या सोबत हसी मजाक करत होत्या. त्या तिघांमध्ये कॉलेज मधील गप्पा सूरु होत्या. राजनही त्यांच्याशी हसत बोलत होता. रेवाला त्यांचं बोलणं कळत नसल्याने ती शांत राहून त्यांना बघत होती.

ती मध्येच म्हणाली,
“राजन, मी फूड कोर्ट मध्ये जाऊन बसते. तुमच्या गप्पा झाल्या की तू तिकडे ये.”

रेवा बोलून लगेच निघून गेली, तेव्हा इशा म्हणाली,
“राजन, तुझी बायको रागावली वाटत.”

“बहुतेक.” राजन पाठमोऱ्या जाणाऱ्या रेवाकडे बघत म्हणाला.

“अरे मग, तू इथे का थांबला आहेस. तिच्यामागे जाऊन तिचा राग घालव. आपण उद्या कॉलेजमध्ये भेटूच.” रिया म्हणाली.

राजन लगेच रेवाच्या पाठोपाठ गेला. रेवा फूड कोर्टमधील एका खुर्चीत जाऊन बसली होती. राजन रेवाच्या समोरील खुर्चीत बसला, तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला,
“रेवा, तुला राग आलाय का?”

“मला आणि तुझा राग कधी येईल का?” त्याच्या हातातून आपला हात सोडवत रेवा म्हणाली.

“अग त्या दोघी कॉलेज मधील गप्पा मारत बसल्या, मग मलाही त्यांच्याशी बोलावं लागलं.” राजन रेवाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता.

“तू त्यांच्याशी बोलला म्हणून मला राग आला नाहीये, तर मीही तिथेच होते हे तुला जाणवायला हवं होतं. आपण कधीतरीच बाहेर येतो आणि त्यात तू माझा मूड ऑफ करतोस.” रेवा.

“सॉरी यार, पुढच्या वेळी अस नाही होणार.” राजन आपले दोन्ही कान हाताने पकडून म्हणाला.

रेवाचा राग दूर कसा करायचा हे त्याला चांगलंच माहीत होतं. रेवा आणि राजनच नातं चांगलंच बहरलं होत. वाटेत अडचणी भरपूर आल्या, पण त्या दोघांनी मिळून त्यातून वाट काढली.

क्रमशः

©® Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all