तू चाल पुढं भाग ९

One Inspirational Journey
तू चाल पुढं भाग ९

मागील भागाचा सारांश: राजनने बीडीएसला ऍडमिशन घेतल्यावर वाघ सरांनी राजन व रेवाला वाटेत येणाऱ्या अडचणींबद्दल समजावून सांगितले, त्यावेळी संयम कसा ठेवायचा हे सांगितले. राजनचे कॉलेज व रेवाची नोकरी सुरळीत सुरू झाली होती.

आता बघूया पुढे….

पहिल्या वर्षात चांगले गुण मिळवून राजन पास झाला होता. राजन दुसऱ्या वर्षात गेल्यावर पहिल्यापेक्षा जास्त बिजी झाला होता. अभ्यास, परीक्षा, सबमिशन हे सगळंच वाढलं होत. राजनची आता घरी आल्यावर दररोज चिडचिड होत होती. राजनला कॉलेज, घर आणि नोकरी सांभाळता सांभाळता त्याचा संयम कमी होत चालला होता, अश्या वेळेत रेवाने काही तक्रार केली की, तो तिच्यावर चिडायचा.

राजनच्या चिडक्या स्वभावामुळे रेवाने त्याच्याशी बोलणे कमी करून टाकले होते. रेवा त्याच्याशी फक्त कामापुरत बोलत होती. एक दिवस राजन क्लिनिक वरून घरी आला होता. रेवा मोबाईल बघत होती.

“रेवा, तू जेव्हा बघावं तेव्हा मोबाईल का घेऊन बसलेली असतेस? तुला दुसरी कामं नाहीत का?” राजन चिडून बोलत होता.

रेवा आपल्या हातातील मोबाईल बाजूला ठेवून म्हणाली,
“हं बोल. तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे?”

रेवा हाताची घडी घालून त्याच्याकडे बघत होती.

“मला काय प्रॉब्लेम असेल. तू माझ्याशी नेहमीसारखी बोलत नाहीस. मी येण्याआधी तू जेवण करून बसलेली असतेस. मला कॉलेज बद्दल विचारत नाहीस. दिवसभरात घडलेल्या घडामोडी तू सांगत नाहीस.” राजन तक्रारींचा पाढा वाचत होता.

“गेल्या दोन महिन्यांपासून तू माझ्याशी नीट बोललेला मला आठवत नाही. काही विचारलं की फक्त चिडतोस. आपल्या दोघांमध्ये संवादच होत नाहीये. तू सतत चिडत असतोस म्हणून मी शांत बसायचं ठरवलं आहे.” रेवाच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

“रेवा, मी हे सगळं मुद्दाम करत नाहीये. सगळं सांभाळताना तारांबळ उडते आहे. तुझ्या सोबत वेळ घालवावा वाटतो, पण त्यासाठीही माझ्याकडे वेळ नाहीये.” राजनला त्याची चूक कळली होती.

“वाघ सरांनी आपल्याला ह्याच काळात संयमी रहावं लागेल हे सांगितलं होतं.” रेवा.

“मी आपल्या दोघांसाठी कॉफी घेऊन येतो. आज कॉफी विथ रेवा होऊन जाऊ देऊ.” राजन हसून म्हणाला. रेवाने मान हलवून होकार दर्शवला.

कॉफी पिता पिता दोघांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. रेवा कॉफीचे कप ठेवण्यासाठी म्हणून जागेवरून उठली तर तिला चक्कर आल्यासारख झालं. ती बाजूला असलेल्या भिंतीला धरत म्हणाली,

“राजन, मला थोडं गरगरत आहे.”

राजन तातडीने आपल्या जागेवरून उठला, त्याने तिच्या हातातील कप बाजूला ठेवले व तिला बेडवर नेऊन बसवले. तो तिच्यासाठी पाणी घेऊन आला. पाणी प्यायल्यावर तिला थोडं बर वाटलं. राजन तिला डॉक्टरकडे जाऊ बोलला, पण तिने टाळलं.

दोन ते तीन दिवसांनी रेवाला ऑफिसमध्ये असताना चक्कर आली, तेव्हा तिला डॉक्टरकडे तिची मैत्रीण घेऊन गेली. डॉक्टरांनी तिला काही तपासण्या करायला सांगितल्या, त्यात ती प्रेग्नंट असल्याचे समजले.

रेवाच्या मैत्रिणीने तिला घरी सोडवले. ऑफिसमध्ये चक्कर आल्याचे रेवाने राजनला फोन करून सांगितले, म्हणून तो लवकर घरी आला. रेवाने राजनच्या हातात प्रेग्नन्सी रिपोर्ट दिले.

“राजन, आपण आई-बाबा होणार आहोत.”

“हे सांगताना तुझ्या चेहऱ्यावर हसू का नाहीये? तुला हे मूल नकोय का?” राजनने रेवाला विचारले.

“मला मूल हवंय, पण आता सध्या तुझं कॉलेज, माझी नोकरी, आपली आर्थिक परिस्थिती हे सगळं जुळून येईल का? हे समजत नाहीये.” रेवाने आपल्या मनातील भीती बोलून दाखवली.

राजन रेवाचा हात हातात घेऊन म्हणाला,
“रेवा, माझीही मनस्थिती तुझ्यासारखीच आहे. माझ्याही मनात तेच प्रश्न आहेत, पण देवाच्या कृपेने आपल्याला ही गोड बातमी मिळाली आहे. आता आपण आपल्या सोयीनुसार बाळ अबोर्ट करायचे ठरवले आणि पुढे जाऊन जेव्हा आपल्याला बाळ हवे असेल तेव्हा झालेच नाही तर….

मला कल्पना आहे की, आपली खूप तारांबळ उडेल, पण मला खात्री आहे की, आपण दोघेही हे सगळं व्यवस्थितपणे हाताळू.”

रेवाच्या चेहऱ्यावर हसू आले होते,
“मला तुझ्याकडून ह्याच पाठिंब्याची आवश्यकता होती. मला तुझ्यावर ही जबाबदारी लादायची नव्हती. तुझ्या मनात नेमक काय सुरू आहे याचा अंदाज घ्यायचा होता.”

“ओह! मॅडम तर माझीच परीक्षा घेत आहेत.” राजनने रेवाला मिठी मारली.

राजन जमेल तशी रेवाची काळजी घेत होता. रेवा आपली तब्येत सांभाळून घरातील, ऑफिसची कामं करत होती. रेवा राजन कडून जास्त अपेक्षा करत नव्हती. त्याचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे, याची तिला जाण होती.

जास्त काम करून रेवाला थकवा जाणवायला लागल्यावर तिने घरकामासाठी एक बाई ठेवली. राजनची परीक्षा सुरू असताना रेवाला त्रास झाल्याने तिला डॉक्टरकडे जावे लागले होते. डॉक्टरांनी तिला तीन ते चार दिवसांसाठी ऍडमिट व्हायला सांगितले होते.

राजनच्या अभ्यासावर परिणाम व्हायला नको म्हणून तिने चार दिवसांसाठी माहेरी जाऊन येते असे राजनला खोटे सांगितले. हॉस्पिटलमध्ये आपल्या सोबत थांबण्यासाठी तिने आपल्या आईला बोलावून घेतले होते. रेवाच्या मैत्रिणीने त्यांना जेवणाचे डबे पुरवले होते.

राजनची परीक्षा झाल्यावर त्याबद्दल रेवाने त्याला कल्पना दिली होती. आपण त्याकाळात रेवा बरोबर नव्हतो, याचे राजनला वाईट वाटले होते.

राजन आता तिसऱ्या वर्षात गेला होता. वर्ष वाढत होते, तसे त्याचा अभ्यासही वाढत होता. आठवा महिना लागल्यावर रेवाने ऑफिस मधून सुट्टी घेतली होती. डिलिव्हरी साठी ती आपल्या माहेरी गेली होती. राजन शिवाय तिला आणि रेवा शिवाय राजनला करमत नव्हते. दोघांना एकमेकांची खूपच सवय लागली होती, पण त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता.

नववा महिना लागल्यावर पाच दिवसांनी रेवाचे पोटात दुखायला लागल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. रेवाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. राजनला ही बातमी कळल्यावर तो दुसऱ्या दिवशी रेवाला व आपल्या बाळाला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला.

आपल्या मुलीला हातात घेतल्यावर त्याच्या डोळ्यातून पाणी आले, तो रेवाकडे बघून म्हणाला,
“थँक् यू रेवा. मला इतके छान गिफ्ट दिलेस.”

बाळ दोन महिन्यांचे होईपर्यंत रेवा माहेरी राहिली, नंतर ती नाशिकला गेली. रेवा बाळासोबत रुळेपर्यंत काही दिवस तिची आई नाशिकला थांबली. रेवाचा ऑफिस मधील परफॉर्मन्स चांगला असल्याने तिला वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी ऑफिसने दिली. बाळाला सांभाळण्यासाठी एक बाई ठेवण्यात आली. रेवा घरूनच ऑफिसचे काम करू लागली होती.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all