Login

तू चाल पुढं... भाग 2

संपूर्ण गावाला शिक्षणाची वाट दाखवणारी एक इरसाल आजी

तू चाल पुढं.... भाग 2

मागील भागात आपण पाहिले की झामाबाई तिच्या नातीचे लहान वयात लग्न होऊ नये म्हणून चिंतेत असते . सुमनला पुढे शिकायची इच्छा आहे . गावात घडलेल्या एका घटनेमुळे तिच्या वर्गातील मुलींचे शिक्षण धोक्यात आले होते. आता पाहूया पुढे .


काहिही झाले तरी सुमन बळी जाणार नाही असा निर्धार आजीने केला होता . दुसऱ्या दिवशी सकाळीच झामाबाई लवकर उठली आणि स्वतः चे आवरून तिने शाळेची वाट धरली .

दहावीचे तास घेणाऱ्या परदेशी बाई सकाळीच शाळेत आलेल्या असतं . मुलींना आईची माया लावणाऱ्या बाई सगळ्या गावाच्या आवडत्या होत्या . बाईच आपल्याला मार्ग दाखवतील याची झामाबाईला खात्री होती .


शाळेच्या दारात येताच नमस्कार करून आपल्या डोक्यावरचा पदर सावरत झामा आजी आत शिरली . बाईंनी लांबूनच आजीला येताना पाहिले होते . तसेच काही खास कारण असल्याशिवाय आजी इकडे येणार नाही . मुलांना अभ्यास सांगून त्या बाहेर आल्या .


" आजी,आज इकडे काय काम काढले ? सुमन कुठेय ? आज आली नाही तासाला ? "
बाईंनी विचारले .

" त्येच सांगायला म्या आले हाय . सुमी, संगी, राधी ह्या पोरींना त्यांच आईबाप साळत धाडीना झाल्यात . आमचा गुजा खुळ्यागत वागतोय बगा . "
आजी तळमळीने सांगू लागली .

" आजी,आपण जरा पारावर झाडाखाली बसून बोलूया . " परदेशी बाई आजीना घेऊन झाडाखाली आल्या .


" माझ्याही कानावर आले आहे . शालन प्रेमविवाह करून पळून गेल्याने पालक मुलींना पाठवायला तयार नाहीत . परंतु हे चूक आहे . "
परदेशी बाईंनी मुद्दा मांडला .

" आव आमचा गुजा आन तारी सुमीच लगीन लावायला निघाले हाय . "
झामाबाई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या.


" आजी,मला तुमचे दुःख समजते . तसेही अठरा वर्षे होण्याआधी लग्न लावणे कायद्याने गुन्हा आहे . "
बाई चिडून बोलत होत्या .

" बाई,म्या घरी जाते . कायतरी उपाय काडा लई उपकार व्हतील . "
झामाबाई उदास मनाने घरी आली .

तारा घर साफ करत होती .

" आत्या आव कुठं गेल्या व्हत्या घरात लई काम पडल्यात ." ताराबाई म्हणाली .

" तारे आता काय दिवाळी हाय का दसरा तवा येवढं नाचती व्हय गं?"
आजी चिडली .

" ह्या म्हातारीला काही सांगायला गेलं की टांगायला उठती . आता येवढं नातीच लगीन ठरत हाय पर म्हातारी बगा ."
ताराबाईने उत्तर दिले .

" तारे आग पोरं एवढी हुशार हाय. तिला शिकवून मोठं करायचं सोडून हे काय करताय ? "
शेवटचा प्रयत्न म्हणून झामाबाई गोड बोलून समजावत होती .

" आत्या उगा माझ्या पोरीच्या डोक्यात कायबाय भरवू नगा . आव तुमच्याच लेकीला देतेय पोरगी . "
तारा उत्तर देऊन आत निघून गेली .

झामाबाई प्रचंड चिडली होती . आत आली तर सुमन एका कोपऱ्यात बसली होती रडून तिचे डोळे सुजले होते .

" सुमे अशी थोबाड पाडून बसू नग . तुला काय हिरीत ढकलून देत न्हाय आमी . "
तारा चिडून म्हणाली .
" माझ्या स्वप्नांचा चुराडा करताय ते कमी आहे का ?" सुमन म्हणाली .

" लई चुरूचुरू बोलायला लागली त्वा . शिकली तेवढी हुकली . म्हणूनच आता बास झाली शिकवणी . "
तारा म्हणाली .
झामाबाई नातीजवळ गेली .

" रडू नग कायतरी उपाय निघलं . " आजीने तिला धीर दिला .

परंतु तिला स्वतः ला देखील काही सुचत नव्हते . गुजाबा सरळ ऐकणार नाही याची तिला पक्की खात्री होती .
दुसरा दिवस उगवला .

" सुमे तुला पातळ नेसावायला शेजारची सूर्की यील . जरा नीट तयार हो . "
तारा सूचना देत होती .


स्वयंपाकाची तयारी करत असताना ताराचे लक्ष सतत पाहुणे कधी येणार याकडे लागले होते . थोड्याच वेळात रखमा,तिचा नवरा आणि मुलगा तसेच घरच्यांना घेऊन आली . झामाबाई लेकीला पाहूनही आत निघून गेली .


" वन्स आता तुमीच समजवा आत्याबायला . कालपासून राग धरला हाय . "
तारा पाणी देत म्हणाली .

" वैनी म्या सांगते तिला . " रखमा आत आली .

" आये आग नात्यात सोयरिक व्हती हाय . दादाची पोरगी काय मला परकी हाय का ?"
रखमा लाडीगोडी लावत म्हणाली .

" रखमा , गुजा आन तारी समजली का मला ? पाच वरीस झालं त्वा सोयरिक बघती पोराला ? दारुड्या पोराला कोण पोरगी देईना तुझ्या . माझी अश्राप सुमी त्याला द्यायची व्हय गं ?"
झामाबाई रोखठोक बोलली .


" आये दादाला पटल हाय . आता थोडाफार नाद आसतो बापय माणसाला . "
रखमा रागाने बाहेर निघून गेली .


लग्न ठरणे फक्त औपचारिकता होती . सुमन बिचारी नाइलाजाने येऊन बसली . ओटी भरली आणि लग्न ठरल्याचे भावकितील एकाने जाहीर केले .

" वैनी गॉड कायतरी आणा . "
एकजण म्हणाला .

तारा पटकन जाऊन पेढे घेऊन आली . सगळ्यांनी तोंड गोड केले .

सुमन मात्र आपली स्वप्ने पुसली जाणार याची तयारी करत होती . रखमा आणि तिची माणसे निघून गेली आणि थोड्या वेळाने संगिता आली .

तिने झामाबाईला बाजूला घेतले आणि एक निरोप सांगितला .

झामाबाई इकडे तिकडे बघत हळूच म्हणाली, " संगे पोरी म्या हाय तुमच्या संग . "

" आज्जे, कायबी झालं तरी साळा नग बंद व्हायला आमची . " संगिता एवढे बोलून निघून गेली .



आठ दिवसांनी साखरपुडा धरला होता . दोन दिवसांनी तालुक्याला जाऊन कपडे खरेदी करायचे होते . तारा आणि गुजाबा दोघे नुसते काय करू अन् काय नको असे करत होते . बाजाराला जायचा दिवस उगवला आणि त्याच सकाळी रखमाचा पुतण्या काशिनाथ निरोप घेऊन आला .

" तारे चा टाक वाईच . पावण आल्यात . "
गुजाबा म्हणाला .

" मामा, चा नग आधी मोठ्याईचा निरोप आईका . "

काशिनाथने निरोप सांगितला आणि गुजाबा मटकन खालीच बसला .


काय असेल निरोप ?
संगिता आजीला काय सांगून गेली ?
आजी यशस्वी होईल का ?
वाचा अंतिम भागात .
©® प्रशांत कुंजीर.
अष्टपैलू 2025 स्पर्धा


🎭 Series Post

View all