Login

तू चाल पुढं... भाग 3 अंतिम

संपूर्ण गावाला शिक्षणाची वाट दाखवणारी इरसाल आजी

तू चाल पुढं.... भाग 3 (अंतिम)

मागील भागात आपण पाहिले झामाबाई आटोकाट प्रयत्न करूनही सुमनचे लग्न ठरते . खरेदीला जायच्या सकाळीच एक निरोप येतो . आता पाहूया पुढे .


" कारभारी आव काय झालं ? वन्स बऱ्या हाईत नव्हं ?" तारा चहाचे कप बाजूला ठेवत धावत आली .


" मामी , हे लगीन हूनार न्हाई असा निरोप दिला हाय मोठ्याईन . " काशिनाथ एका दमात बोलून मोकळा झाला .

" काय ? आव पर काल पतोर त्याच माग लागल्या हुत्या . तुझी पोर दे म्हणून किती हेलापाट मारलं . ते काय न्हाय , कारभारी चला आसच जाऊन वन्सना इचारू ."
तारा काय सुचेल ते बडबडत होती .

" मामी,मोठ्याई एकच्या गाडीन येणार हाय . पर तुमी बाजाराला जायला नग म्हणून म्या फूड आलो निरोप द्यायला . "
काशिनाथ सायकलवर टांग मारून निघून गेला .

आता घडले ते स्वप्न की सत्य हेच तारा आणि गुजाबा दोघांना कळत नव्हते .

" आता रखमी यील तवा कळलं की काय झालं ते . तारे आग खायाला बनव कायतरी . "
झामाबाई खोटे दुःख दाखवत म्हणाली .

आता सुमनचे आई वडील तिच्या आत्याची वाट बघत होते .


एकची. एस. टी. गावात शिरली . रखमा झपाझप पावले टाकत निघाली . घरजवळ येताच तिचा वेग अधिकच वाढला . सरळ घरात जाऊन ती खाली बसली . तिला आलेले बघून सुमन आणि तिची आजी गप्प लांब बसले .

" आक्के अग काय हे ? त्वा मागं लागली व्हती ना ? मंग आता काय झालं ? "
गुजाबा चिडला .

रखमाने हातातली पिशवी काढली आणि त्यातून एक कागद काढला .

" काल सांच्याला पोस्टमन दिवून गेला . "
रखमा हळूच म्हणाली .

" आक्का सरकारी टपाल दिसतय ? काय लिवल हाय ह्यात?" गुजाबा म्हणाला .

" आता हाय का ? मला वाचता येत व्हय ? म्या साळत जाऊन तिथल्या मास्तर कडून वाचून घेतल . तुमी बाल विवाह करत हाय अशी तक्रार केली कुणीतरी पोलीस ठेसनात . सुमे वाच कागद . "

रखमाने कागद सुमनच्या हातात दिला .


सुमनने कागद घेतला आणि वाचून दाखवला .

" आक्का, म्हणजी दोन वरीस लगीन करता याचं न्हाई तर?" गुजाबा म्हणाला .

" गुजा पर दोन वरीस कसं थांबू र ?"
रखमा म्हणाली .

" व्हय ना, तसबी हिच्या पोराचं वय वाढतं चाललं हाय . " झामाबाई म्हणाली .


शेवटी दुःखद अंतःकरणाने भावाचा निरोप घेऊन रखमा निघून गेली . तारा आणि गुजाबा शेतात गेले आणि इतका वेळ दाबून धरलेले हसू सोडून सुमन खो खो हसत सुटली .


तितक्यात संगिता,राधा आणि सुरेखा आत आल्या आणि पाठोपाठ परदेशी बाई .

" संगे, किती चुका त्या पत्रात ?" सुमन हसली .

" अय सुमे त्वा वळखल व्हय ? " संगिता म्हणाली .

" काय आजी कशी वाटली युक्ती ? आता एक फक्कड चहा आणा . "
बाईंनी फर्मान सोडले .

" बाई , आत्याला संशय आला असता तर ? आणि तसेही लग्न रद्द झाले म्हणजे शाळेत जाऊ देतील असे नाही . दोन वर्षांनी लावतील लग्न . "
सुमन म्हणाली .

" त्यावरचा उपाय माझ्याकडे आहे . फक्त आजीची तयारी पाहिजे . "
बाई हसून म्हणाल्या .

" ह्या पोरींचे भले होणार असेल तर म्या सांगाल ते करील . " आजी म्हणाली .

" उद्या सुमनसोबत शाळेत या . "
परदेशी बाई चहा घेऊन निघून गेल्या .


दुसऱ्या दिवशी सुमन शाळेची तयारी करत होती .

" सुमे कुठं निघाली ? आता साळा बास . आजपासून शेतावर जायचं . "
गुजाबा ओरडला .

" अय गुजा आन तारे तुबी आईक सुमन साळला जाणार . बघू कोण आडवं येत ? "
झामा आजी पदर खोचून म्हणाली .

" अस्स, मंग साळच्या खर्चाला एक छदाम देणार न्हाय म्या . " गुजाबा ओरडला .

" व्हय घरात राहायचं आसल तर आमचं आयकायला लागलं . " ताराने दुजोरा दिला .

" आर नग दिऊ पैक . म्या हाय खमकी . आन तारे घर माझ्या धन्याचं हाय . सुमे चल कोण बाजीराव तुला आडीवतो बघू . " झामाबाई तिला सोबत घेऊन निघाली .

" आजी , माझी शाळा सुरु झाली पण माझ्या मैत्रिणी घरीच आहेत ."
सुमन काळजीने बोलत होती .

बोलता बोलता शाळा आलीदेखील . सुमन वर्गात गेली . परदेशी बाईंनी आजीला आत बोलावले .


" आजी ह्या वसुंधराबाई लहान वयात होणारी मुलींची लग्न , मुलींची मधूनच शाळा बंद करणे या समस्यांवर यांची संस्था काम करते . "
बाईंनी समजावल .

" बेस हाय की , पर नेमक काय करता तुमी ? "
झामाबाईने विचारले .

" आम्ही गावात मेळावे घेतो , हळदी कुंकू समारंभ , नाटक असे कार्यक्रम घेऊन लोकांना समजावतो . वेळप्रसंगी कायद्याची मदत देखील घेतो . "
वसुंधराबाईंनी सांगितले .

" लई झ्याक . मला ह्या कामात घ्याल काय ? आमच्या गावात लोकं लई अडाणी इचार करत्यात ."
झामाबाई म्हणाल्या .

" आजी त्यासाठीच तर तुम्हाला बोलावले आहे . "
परदेशी बाई म्हणाल्या .

शाळेतून झामाबाई बाहेर पडली ती एक वेगळाच विचार घेऊन .


" आजी आज दहावीचा निरोप समारंभ आहे . वेळेत पोहोच . " सुमन झामाबाईला बजावून सांगत होती .

" व्हय , म्या येते लवकर . पंचायत हाफिसात काही काम हाय तेवढी करून येते . सोबत तुझ्या आई आन आबा दोघांना आणते . "
सुमन शाळेला निघून गेली .


समारंभ सुरू झाला परदेशी बाई उभ्या राहिल्या .

" मी सरपंच झामाबाई जाधव यांना विनंती करते त्यांनी यावर्षीची आदर्श विद्यार्थिनी सुमन गुजाबा जाधव हिला पारितोषिक प्रदान करावे . "
सुमन बक्षीस घ्यायला गेली .

आपली लेक आणि आई दोघींचे कौतुक पाहून गुजाबाला आपली चूक समजली होती .


तितक्यात सुरेखा व्यासपीठावर गेली .

" आज आम्ही शाळेत आहोत कारण आमची आणि सगळ्या गावाची झामा आजी . आमच्या पाठीशी ठाम उभ्या असलेल्या आजीसाठी आम्ही एक गीत सादर करणार आहोत ."


मुली व्यासपीठावर आल्या आणि गाणे सुरू झाले .

मन शुद्ध तुझे गोष्ट आहे पृथ्वीमोलाची .
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कुणाची .

गाणे संपले आणि टाळ्यांच्या कडकडाटात आजी आणि नात खाली उतरल्या .

आता गावातील कोणत्याची मुलीचे लहान वयात लग्न होणार नव्हते किंवा शिक्षण थांबणार नव्हते . कारण त्यांना साथ द्यायला त्यांची आजी ठाम उभी होती .


©® प्रशांत कुंजीर.