जलदलेखन स्पर्धा
तू दुर्गा तू स्वयंसिध्दा - समर्पण - भाग २
शालीनीने त्या बाळाला वाढवण्याचा निर्णय घेतल्यावर
शरद राव आणि शीला खूपच संतापले. शरद राव म्हणाले,
शरद राव आणि शीला खूपच संतापले. शरद राव म्हणाले,
"शालिनी अगं तुला काही कळतंय का. अगं ही मुलगी कितीही गोंडस आणि निरागस असली तरी तू तिला वाढवू शकणार नाहीस. आपण तिला एखाद्या अनाथाश्रमात ठेवूया. तिथे तिचं चांगलं पालनपोषण होईल. आपल्या घरात आता तुम्हा तिघींमध्ये अजून एकीची भर नको."
"नाही बाबा मी हिला दत्तक घेईन. तिची पूर्ण जबाबदारी मी घेईन तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही."
"अगं पण तुझं आणि तुझ्या बहिणींच्या लग्नाचं काय?"
"मी तर लग्नच नाही करणार. शर्मिला आणि राजश्रीचं योग्य वेळी लग्न होईलच."
"तुझ्या अशा वागण्याने त्यांच्याशी कोण लग्न करणार. एका बेवारस मुलीला तू घरात आश्रय दिलास तर ते समाज मान्य करणार नाही."
"काहीही झालं तरी मी ह्या मुलीला वाढवणारच."
"तुला या मुलीला दत्तक घ्यायचं असेल तर तुला हे घर सोडावे लागेल. तुझ्या एका अविचारी निर्णयामुळे अजून दोघींची आयुष्य उध्वस्त होतील. ते मला चालणार नाही. तुझे विचार बदलले तर मला सांग नाहीतर उद्याच्या उद्या तू घराबाहेर जायचं."
शालिनीने त्या मुलीला दत्तक घ्यायचा निर्णय तर घेतला पण आता पुढे काय करायचं तिला काही सूचेना. तिला अनाथाश्रमात ठेवण्याची तिची तयारी नव्हती. शालिनीची अतिशय जिवलग मैत्रीण कल्पना मुंबईत राहत होती. ती तिथे संगीताचे क्लासेस घेत होती. तिने कल्पनाला फोन केला. तिला सारा प्रकार कथन केला. कल्पना पण अविवाहितच होती. शालिनी तिला म्हणाली,
"कल्पना तू मला फक्त तुझ्या घरात राहायला आसरा दे. बाकी माझी आणि या बाळाची कसलीही जबाबदारी मी तुझ्यावर पडू देणार नाही. प्लीज नाही म्हणू नकोस. मी तुझ्या घरची सगळी स्वयंपाकाची जबाबदारी घेईन आणि इतरही कामं करीन."
"अगं शालिनी असं काय बोलतेस! हेच का तू तुझ्या मैत्रिणीला ओळखलंस. तू त्या बाळाला घेऊन बिनधास्त ये. आपण तिची व्यवस्थित काळजी घेऊ." शालिनीने तिचा निर्णय आई-बाबांना सांगितला. आई-बाबांना खूपच वाईट वाटले. शरदरावांनी तिला निक्षून सांगितलं,
"आता यापुढे आम्ही तुझ्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही. तू आमच्यापैकी कोणाला कधीही फोन करायचा नाही किंवा कोणताही पत्रव्यवहार करायचा नाही."
"ठीक आहे बाबा जशी तुमची इच्छा."
तिने तिचे कपडे आणि थोडे पैसे बरोबर घेतले आणि आईची एक जुनी साडी बाळासाठी घेतली. मुंबईला येऊन ती कल्पना कडे गेली. कल्पनाने तिचे हसतमुखाने स्वागत केले. कल्पनाची आर्थिक परिस्थिती संगीत क्लासमुळे बऱ्यापैकी होती. तिने तिला विश्वास दिला,
"हे बघ शालिनी हे बाळ जरी तू आणलं असलंस तरी आपण दोघी मिळून तिची नीट व्यवस्थित काळजी घेऊ. तू आत्ताच आली आहेस तर जेवून थोडा आराम कर. मी बाहेर जाऊन बाळासाठी थोडे कपडे आणि त्याला लागणारं सामान घेऊन येते. सकाळी नऊ ते बारा आणि संध्याकाळी पाच ते आठ माझे क्लासेस असतात त्यामुळे मला आत्ताच जाऊन सर्व घेऊन यावे लागेल."
"कल्पना खरंच तू मला आधार दिलास तुझे हे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही."
"तू आता शांत बस काहीच बोलू नकोस आणि असं बोलून मला परकं करू नकोस. मी हिच्यासाठी मिल्क पावडर, कपडे सगळं घेऊन येते. तोपर्यंत तिला घरातलं दूध थोडसं पातळ करून ती पिते का बघ."
"हो मी प्रवासात तसंच दिलं गं तिला. जा तू जाऊन ये मी बघते घरातलं."
कल्पना गेल्यावर शालिनी विचारात पडली. लगेच तिला दत्तक घेता येणार नव्हतं. तिने एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यायचं ठरवलं. कल्पना लहान बाळाला आवश्यक असे सर्व सामान घेऊन आली. ते सर्व पाहून शालिनी तिला म्हणाली,
"आपण हिचं काय नाव ठेवूया ग. आता थोडी मोठी झाल्यावर ती तुझ्याकडे संगीत शिकेलच ना. आपण तिला स्वरा म्हणूया. कसं वाटतं तुला हे नाव."
"अगदी माझ्या मनात हेच नाव आलं."
शालिनीने सकाळची दोन जवळचीच स्वयंपाकाची कामे धरली. कल्पनाचे क्लास सुरू होण्याआधी ती घरी येऊ लागली. तसेच दुपारची पण दोन कामं तिने धरली. कल्पनाची पण वेळ सांभाळली जात होती. शालिनीला कामही करायला मिळत होतं आणि स्वराचं पालनपोषण पण नीट होत होतं. कल्पनाच्या क्लासमध्ये एक मुलगी यायची तिची सावत्र आई होती. ती तिला खूप त्रास द्यायची म्हणून ती कल्पनाच्या घरी जास्त राहायची. ती सुद्धा स्वराला खेळवायची. हळूहळू स्वरा मोठी होत होती. अगदी तान्ही असल्यापासूनच तिच्या कानांवर संगीताचे स्वर निनादत होते. त्यामुळे आपसुकच तिच्यात संगीताची आवड निर्माण झाली.
क्रमशः
(शालिनी ही सर्व जबाबदारी कशी निभावेल पाहूया पुढल्या भागात)
©️®️ सीमा गंगाधरे