तू दुर्गा तू स्वयंसिद्धा - समर्पण - भाग 3

एक कुमारीका बाळाला दत्तक घेते

जलदलेखन स्पर्धा

तू दुर्गा तू स्वयंसिध्दा - समर्पण - भाग ३


स्वराला वाढवताना शालिनीला तारेवरची कसरत करावी लागत होती. कल्पना पण तिला मावशीचं प्रेम देत होती. शालिनी पहाटे लवकर उठून आधी कल्पनाचा आणि तिचा स्वयंपाक करत असे. नंतर ती दुसऱ्या घरी कामासाठी जायची. कल्पनाने तिला कितीतरी वेळा सांगितलं की तुझा आणि माझा स्वयंपाक मी करत जाईन तू का एवढी धांदल करतेस. पण शालिनीच्या मनात नेहमीच कल्पनाने केलेल्या उपकाराची जाणीव असायची. ती दिवसभर काही ना काही काम करतच असायची. त्यामुळे तिला रात्री थकून झोप पण छान लागायची. कधी कधी तिला घरची खूपच आठवण यायची आणि तिचे डोळे वाहू लागायचे. अशावेळी कल्पना तिला धीर द्यायची. तिला स्वयंपाकाची काम मिळून दोन महिने झाले आणि दोन कुटुंब अचानक स्थलांतरित झाली त्यामुळे तिची खूप आर्थिक ओढाताण होऊ लागली. परंतु फावल्या वेळात घरोघरी फिरून तिने अजून दोन कामं मिळवली आणि जमाखर्चाची घडी बसवली.

छोट्या स्वराला शाळेत घालण्याची वेळ आली. तेव्हा शालिनीने कायदेशीररित्या स्वराला दत्तक घेतलं आणि तिचं नाव तिला दिलं.छोटी स्वरा शाळेत जाऊ लागली. तिचा शाळेचा खर्च वाढला. मुळातच काटकसरी स्वभाव असल्याने शालिनीने थोडे थोडे पैसे बाजूला ठेवले होते. त्यात कल्पना पण स्वराला लागेल ते आणून देत होती. एक दिवस कल्पना क्लास घेत असताना स्वरा तिथे बाजूलाच बसली होती. कल्पना एका लहान मुलीला स्वरालंकार शिकवत होती. इथे स्वरा तिचे ऐकून अगदी सुरात त्यानंतर गात होती. कल्पनाला खूपच आश्चर्य वाटलं. तिने तिला सांगितलं उद्यापासून आता तू पण माझ्याकडे संगीत शिकायचं. शालिनीला खूपच आनंद झाला.

स्वराची शाळा आणि संगीत असे दोन्ही आघाड्यावर शिक्षण सुरू झाले. शाळेत सुद्धा स्वराने पहिला नंबर कधीच सोडला नाही. मुळातच ती खूप हुशार होती. अगदी तान्ही असल्यापासून संगीत कानावर पडल्यामुळे तिचे स्वर खूपच तयारीचे होते. हळूहळू ती लहान मुलांच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिथे बक्षीसं पटकावू लागली. तिची प्रगती पाहून शालिनीला खूपच आनंद व्हायचा. स्वराला एकंदरीत सर्व परिस्थितीची जाणीव होती. तिने एकदा शालिनीला तिचे बाबा कोण असे विचारलं होतं. तेव्हा पुढील प्रश्नोत्तरे टाळण्यासाठी शालिनीने तिला जे सत्य होते ते सांगितलं होतं.

शालेय शिक्षणाबरोबरच स्वरा संगीताच्या परीक्षा सुद्धा देत होती. या सर्व प्रवासात तिने तारूण्यात कधी प्रवेश केला हे तिलाही कळलं नाही. तरतरीत नाकाची, गव्हाळ वर्णाची,सरळ रेशमी मऊ केसांची, काळ्याभोर डोळ्यांची तरुण स्वरा अधिकच देखणी दिसत होती. कुणाच्याही डोळ्यात तिचं सौंदर्य भरेल असंच होतं. याची जाणीव तिला झाली जेव्हा कल्पना मावशीच्या क्लासमध्ये
तिच्यापेक्षा थोडा मोठा राजबिंडा तरुण येऊ लागला तेव्हा. सावळा वर्ण, कुरळे केस, कोरीव दाढी, पावणेसहा फूट उंची आणि चेहऱ्यावरील आत्मविश्वास त्याच्या रूपात अजून भर घालत होता. त्या तरुणाचं नाव होतं सुयश दामले.

सुयश क्लासमध्ये आला की सर्वांची नजर चुकवत त्याच्यात आणि स्वरामध्ये नेत्रपल्लवी सुरू व्हायची. स्वरा सुयशकडे चोरून पाहत असताना त्याची नजर तिच्याकडे गेली की स्वराची नजर आपसूक खाली झुकत होती. त्यांच्यातील अबोल प्रेम बहरत असताना सुयशने एकदा तिला बाहेर भेटायला बोलावलं. दोघांनी एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली. दोघांनी ठरवलं होतं की आयुष्यात काहीतरी भक्कम केल्याशिवाय आपलं प्रेम जाहीर करायचं नाही. पण मांजर जरी डोळे मिटून दूध पीत असलं तरी शालिनी आणि कल्पनाला त्यांच्यातल्या प्रेमाची चाहूल लागली. या चाहूलीने दोघींनाही खूप आनंद झाला. दोघेही संगीताशी निगडित असल्यामुळे शालिनीला जाणीव झाली की आपल्या स्वरासाठी सुयशच योग्य मुलगा आहे.

इथे स्वरा वयाने मोठी होत होती तसतसं तिच्या कीर्तीचा सुगंध आजूबाजूला पसरत होता. तिचं गाणं ऐकताना सारेच कसे मंत्रमुग्ध होऊन जात. कल्पना मावशीने तिला खूपच चांगलं तयार केलं होतं. स्वरा आणि सुयशचं प्रेम हळुवारपणे फुलत होतं. इथे यायच्या आधी सुयश संगीत शिकला होता त्यामुळे त्याला संगीताचे चांगलं ज्ञान होतं. काही कार्यक्रमात स्वरा आणि सुयश द्वंद्वगीत सादर‌ करत होते. दोघांचे गाणं अगदी नादमधूर होत असे. स्वराला चित्रपटसंगीत,दूरदर्शन,आकाशवाणी सगळीकडूनच गाण्यासाठी आमंत्रित केले जाते होते. आज तर तिला प्रसिद्ध संगीतकार पंडित आनंद सागर यांचा नावाचा एक प्रतिष्ठित पुरस्कार मिळणार होता.

शालिनी भूतकाळात रमली असतानाच तिच्या नावाचा दोन वेळा पुकारा झाला तेव्हा ती भानावर आली. स्वरा तिला व्यासपीठावर नेण्यासाठी खाली आली. ती स्वरा बरोबर व्यासपीठावर गेली तेव्हा ती खूपच भावुक झाली होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. निवेदकाने तिला दोन शब्द बोलण्यासाठी सांगितले परंतु तिच्या तोंडातून अवाक्षरही बाहेर पडू शकले नाही

क्रमशः

(भावविवश शालिनी काही बोलू शकेल का पाहूया पुढल्या भागात)