तू दुर्गा तू स्वयंसिद्धा - समर्पण - भाग ४

एक कुमारिका बाळाला दत्तक घेते

जलदलेखन स्पर्धा

तू दुर्गा तू स्वयंसिध्दा - समर्पण - भाग ४


शालिनी काही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हती हे पाहून स्वराने माईकचा ताबा घेतला आणि ती म्हणाली,

" माझी आई आता खूपच भावुक झाली आहे ती यावेळी काही बोलू शकणार नाही. मी आज तुमच्यासमोर उभी आहे याचे सारे श्रेय मी माझ्या आईला देईन. माझ्यासारख्या एका झाडाच्या बुंध्याजवळ सोडून दिलेल्या बेवारस मुलीला कुमारीका असूनसुद्धा माझ्या आईने छातीशी कवटाळलं. तिने माझ्यासाठी तिच्या साऱ्या ऐहीक सुखाचा त्याग केला. आपल्या कुटुंबीयांच्या विरुद्ध जाऊन तिने मला आपलं म्हटलं. त्यासाठी घर सोडून ती मुंबईला आली. तिथे तिला माझ्या कल्पना मावशीने आसरा दिला. मला आईचं प्रेम देऊन मोठं करताना माझ्या आईने खूपच तारेवरची कसरत केली आहे. आज संगीत क्षेत्रात माझं इतकं नाव मोठं झालंय ते फक्त आणि फक्त माझ्या कल्पनामावशी मुळेच. आज हा पुरस्कार घेताना मी तिला व्यासपीठावर बोलावलं नाही तर हा माझा कृतघ्नपणा ठरेल. मावशी तू पण व्यासपीठावर ये. स्वरांचं बाळकडू मला कल्पना मावशीकडूनच मिळालं. तिनेच माझ्या संगीताला आकार दिला. माझ्यासाठी तिने खूपच मेहनत घेतली आहे."

पुरस्कार सोहळ्यासाठी सुयश पण त्याच्या आई-बाबांना घेऊन आला होता. स्वराची आणि त्याची नजरानजर होताच स्वरा लाजत होती. आज स्वरा खूपच सुंदर दिसत होती. तिने परिधान केलेली मोरपंखी रंगाची साडी तिला शोभून दिसत होती. सरळ रेशमी मऊ केस तिने पाठीवर मोकळे सोडले होते. सुयशची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. सुयश जेव्हा आई-बाबांना सोहळ्यासाठी घेऊन आला तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले. एरव्ही कधीही तो कोणत्याही कार्यक्रमाला आई-बाबांना बरोबर घेऊन जात नव्हता. परंतु स्वराला पाहताच त्यांच्या शंकेचे निरसन झालं. त्यांना सुद्धा स्वरा पाहताक्षणीच आवडली. सुयशने मध्यंतरात आई-बाबांना स्वराची ओळख करून दिली. स्वरा नम्रपणे त्यांच्या पाया पडली. जुजबी बोलणं झाल्यावर स्वरा त्यांना म्हणाली,

"आता कार्यक्रम सुरू होईल आपण पुन्हा निवांत भेटूया."

मधल्या काळात शालिनीचे बाबा निवृत्त झाले होते आणि ते मुंबईतच स्थायिक झाले होते. शालिनीच्या दोन्ही बहिणी शर्मिला आणि राजश्रीचं लग्न झालं होतं आणि दोघी मुंबईतच राहत होत्या. स्वराचं नाव सर्वांनी ऐकलं होतं परंतु वर्तमानपत्रात तिचा नेहमी एकटीचाच फोटो यायचा. ह्या पुरस्कार सोहळ्याआधी स्वराबद्दल खूप मोठी बातमी छापून आली होती तेव्हा तिचा शालिनीबरोबरचा फोटोही दिला होता. स्वराबरोबर शालिनीला पाहून शरदरावांचे बापाचं काळीज खूपच हळवं झालं. त्यांना आणि शीलाला शालिनीला भेटण्याची ओढ निर्माण झाली. त्यांना तिचा अभिमानाच वाटला. समाजाच्या भीतीने ते जे वागले त्याचा त्यांना पश्चाताप होऊ लागला. शालिनीला आणि स्वराला भेटण्यासाठी ते सुद्धा तिकीट काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. बाकीचे लोक निघून गेल्यावर शरदराव आणि शीला शालिनी आणि स्वरा कधी बाहेर येतात याची वाट पाहत थांबले होते. इतक्यात शालिनी, स्वरा आणि कल्पना तिघी चालत येताना दिसल्या. त्या समोर येताच शरदरावांनी शालिनीला हाक मारली. त्या दोघांना पाहून शालिनीच्या मनाचा बांध फुटला. तिने धावत जाऊन बाबांना आणि आईला मिठी मारली. तिच्या डोळ्यातून संमिश्र भावनांचे अश्रू ओघळत होते. कल्पनाने स्वराला हे शालिनीचे आई-बाबा असल्याचे सांगितलं तेव्हा स्वरा अलिप्तपणे दूर उभी राहिली. स्वराच्या मनात त्यांच्याबद्दल राग होता कारण त्यांनी शालिनीला घराबाहेर काढलं होतं. शालिनीने स्वराला जवळ बोलावलं तेव्हा ती जबरदस्तीने त्यांच्याजवळ गेली. स्वरा शालिनीला म्हणाली,

"आई इतके दिवस समाज काय म्हणेल या भीतीने त्यांनी तुला दूर केलं मग आता आपण प्रसिद्धीच्या झोतात आहोत म्हणून ते आपल्याला जवळ करताहेत का."

"स्वरा असं म्हणू नकोस गं. त्यावेळी त्यांच्या जागी ते योग्यच होते. मी जर तुला घेऊन तिथेच राहिले असते तर माझ्या दोन बहिणींशी कोणी लग्न केले नसते. त्यांच्यातल्या आई-वडिलांनी तसं कृत्य करण्यास त्यांना भाग पाडलं. पण बघ ना एका अर्थी ते चांगलं झालं ना. जर मी तुला घेऊन मुंबईला आले नसते तर तुझा आणि संगीताचा संबंध पण आला नसता. आज जे यश तुझ्या पदरात पडले ते कदाचित तुला पाहायलाही मिळालं नसतं. म्हणून म्हणतात ना 'जे होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं.' किती झालं तरी ते माझे आई-बाबा आहेत. त्यांनी मला जन्म दिला आहे. त्यांच्यामुळे मी या जगात आहे त्यांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. ये तू पण तुझ्या आजी आजोबांना नमस्कार कर." शालिनीचं बोलणं ऐकून स्वरा पुढे आली आणि आजी-आजोबांना नमस्कार केला. शरदराव
गहीवरून म्हणाले,

"पोरी मला माफ कर. त्यावेळी आम्ही फक्त आमच्यापूरता स्वार्थी विचार केला. तुला जर कोणी जवळ केलं नसतं तर तुझे काय हाल झाले असते याची आता मी कल्पना पण करू शकत नाही. शालिनीने जे अफाट धैर्य दाखवले त्याबद्दल ती माझी लेक असल्याचा मला खूप अभिमान वाटतोय. तेव्हा मला तिचा खूप राग आला होता. मी तिला नाही नाही ते बोललो परंतु तिने त्याबद्दल कधीही माझ्याकडे तक्रार केली नाही."

"आजोबा माझी आई खूप जगावेगळी आहे तिने मनात कोणाबद्दलही कधीच राग धरला नाही. दुसऱ्यांच्या दुःखाने व्यथित होणारी, हळव्या मनाची, सर्वांना समजून घेणारी अशी आहे माझी आई. मला तिचा खूप अभिमान आहे."

क्रमशः

(सुयशच्या आई-बाबांना स्वरा सून म्हणून पसंत पडेल का पाहूया पुढच्या भागात)