तू दुर्गा तू स्वयंसिद्धा - समर्पण - भाग ५ (अंतिम)

एक कुमारीका बाळाला दत्तक घेते

जलद कथालेखन स्पर्धा

तू दुर्गा तू स्वयंसिध्दा - समर्पण - भाग ५ (अंतिम)

सुयशबद्दल शालिनी आणि कल्पनाचं खूपच चांगलं मत होतं. शिवाय स्वरा आणि सुयशचे एकमेकांवर प्रेम होते. कलासक्त मनाचा, संगीताचा उपासक सुयश हा एका नामांकित कंपनीत इंजिनिअर पदावर कार्यरत होता. एक दिवस तो क्लासला आला असताना त्याने शालिनीला सांगितले,

"माझ्या आई-बाबांना स्वरा पसंत आहे आणि त्यांनी तुम्हाला भेटायला बोलावले आहे. तुम्ही कधी येऊ शकाल ते सांगा त्याप्रमाणे मी माझ्या आई-बाबांना सांगतो."

स्वरा आणि सुयश दोघेही सातवे आसमाॅंपे होते. त्यांना दोघांनाही जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी तेच दिसत होते. ठरल्याप्रमाणे शालिनी, कल्पना आणि स्वरा सुयशच्या घरी गेले. सुयशचं घर म्हणजे एक टुमदार सुंदर बंगला होता. त्याचा बंगला म्हणजे शिल्पकलेचा एक उत्तम नमुना होता. सुयशच्या आई-बाबांनी त्या सगळ्यांचे स्वागत केले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर,
चहापाणी झाल्यावर शालिनीने मूळ मुद्द्यालाच हात घातला. तिने त्यांना स्पष्टपणे विचारलं,

"तुम्हाला सुयशने सांगितलं असेलच की स्वरा ही माझी
सख्खी मुलगी नाही आणि मी तिला दत्तक घेतलं आहे. स्वरा खूपच गुणी मुलगी आहे. नंतर काही किंतुपरंतु निघायला नको म्हणून मी आधी स्पष्टच विचारते."

सुयशचे आई बाबा दोघे एकमेकांकडे बघायला लागले. नंतर त्यांनी सुयशकडे बघितलं. सुयश म्हणाला,

"मी तुम्हाला सांगणारच होतो पण सोहळ्याच्या दिवशी तुम्हाला स्वरा खूप आवडली म्हणून मी म्हटलं नंतरच सांगेन."

"सुयश ही इतकी महत्त्वाची गोष्ट तेव्हाच तू सांगायला हवी होती. जिच्या कुळाचा, घराण्याचा काहीच पत्ता नाही अशी मुलगी आम्ही सून म्हणून कशी स्वीकारू?"

"सुयशचे आई-बाबा असून तुमचे विचार इतक्या कोत्या मनोवृत्तीचे असतील असं मला वाटलं नव्हतं. आज कोणत्या जमान्यात वावरत आहात तुम्ही. इथे आमच्या डोळ्यादेखत लहानाची मोठी झालेली मुलगी तिच्याबद्दल आम्ही खात्रीने सांगू शकतो ती कशी आहे." कल्पना जरा जरबेनेच बोलली. शालिनी पण दुखावली गेली आणि कधीही उलटून न बोलणारी शालिनी पण म्हणाली,

"तुम्ही घराण्याचं म्हणताना. आपण समाजात वावरताना आजूबाजूला पाहतो की अगदी उच्च घराण्यातली मुलगी सुद्धा कधी उद्धट, वाईट चालीची निघते. अशावेळी तुम्ही घराणं श्रेष्ठ म्हणाल की व्यक्ती श्रेष्ठ म्हणाल. अर्थात हा तुमचा दृष्टिकोन आहे. आम्ही निघतो आता." सुयश त्यांना थांबवायचा प्रयत्न करत होता पण त्या तिघी दुखावल्या गेल्या होत्या. स्वराला कधीच वाटलं नव्हतं की या कारणामुळे आपल्या लग्नात विघ्न येऊ शकतं.

शालिनीला स्वराची मनःस्थिती कळत होती. स्वरा मनातून खूप दुःखी होती परंतु आईचा आदर्श घेऊन ती काही झालंच नाही अशा आविर्भावात वावरत होती. शालिनीने स्वराला मोठं करताना अक्षरशः जीवाचं रान केलं होतं. एक क्षण तिला वाटलं एका लहानग्या जीवासाठी आपण केलेला त्याग व्यर्थ जाणार की काय. दुसऱ्याच क्षणी तिचं मन तिला खात्री देऊ लागलं अरे एक सुयश नाही तर काय असे कितीतरी तरुण असतीलच जे व्यक्तीतले गुण बघतील घराणं नाही बघणार.

दुसऱ्या दिवसापासून सुयश क्लासला आलाच नाही. परंतु त्याने हार मानली नाही. त्याने आपल्या आई-बाबांना समजवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. तो आईबाबांना म्हणाला,

"उद्या एखादी उच्च घराण्यातील मुलगी सून म्हणून आपल्या घरात आली आणि तिने योग्य तो मान तुम्हाला दिला नाही, तुमचा सारखा अपमान केला, तुमच्या डोक्यावर मिरे वाटले तर तुम्हाला चालेल का? एखादी व्यक्ती कशी आहे ते आपण तिला पूर्णपणे ओळखतो तेव्हाच सांगू शकतो ना. स्वरा जर आपल्या घरात आली तर ती तुमच्याशी खूप प्रेमाने वागेल. तुम्हालाही जाणवेल कि ती सून नसून तुमची मुलगीच आहे. मी तिला आता इतके दिवस ओळखतो आहे पण तिच्यावर तिच्या आईचे आणि मावशीचे खूपच चांगले संस्कार झाले आहेत. ती नामांकित गायिका आहे पण तिला अजिबात गर्व नाही. बघा तुम्ही विचार करा. पण मी लग्न केलं तर स्वराशीच करेन नाहीतर मी आजन्म अविवाहित राहीन. तुम्हीच काय ते ठरवा."

"अहो मी काय म्हणते सुयश आपला एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या सुखातच आपलं सुख आहे आणि तो म्हणतो त्यात तथ्य सुद्धा आहेच. मी माझ्या एक दोन मैत्रिणींच्या सुना पाहिल्या आहेत. फक्त स्वराच्या घराण्याचा पत्ता नाही म्हणून आपण तिला नाकारू नये असं मला वाटतं."सुयश ची आई समजावण्याच्या सुरात त्याच्या बाबांना म्हणाली.

"खूप विचारांती मला सुद्धा सुयशचं म्हणणं पटलं आहे. स्वरा खूपच गुणी आणि नम्र आहे. मोठ्या माणसांबद्दल तिला आदर आहे. मुख्य म्हणजे तिला परिस्थितीची जाणीव आहे. म्हणून स्वरा मला सून म्हणून पसंत आहे."

"हो ना आई बाबा मग आपण उद्याच स्वराच्या घरी जाऊ आणि त्यांना ही आनंदाची बातमी सांगूया. स्वराला या घरात आणून तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो."

शालिनीला खूपच वाईट वाटत होतं. उद्विगतेने ती कल्पनाला म्हणाली,

"या समाजाला कधी कळणार की अशा बेवारस सोडलेल्या तान्ह्या बाळाचा काहीच दोष नसतो. निर्व्याज, निरागस असं तान्हं बाळ या जगात येताना हा एक कलंक घेऊनच येतं. अशा बालकांना जर लहानपणापासूनच चांगले संस्कार मिळाले तर ते काय बनू शकतात याचे उत्तम उदाहरण आपली स्वरा आहे."

"तू काळजी करू नकोस शालिनी आपल्या स्वराचं नक्कीच चांगलं होणार. तिचं भवितव्य खूप उज्वल आहे."

"अगदी खरं आहे शालिनीची आई. आम्हाला आमच्या वागण्याचा खूप पश्चाताप होत आहे. कोणत्याही व्यक्तीची ओळख तिच्या गुणांनी होते. सुयशने आमचे डोळे उघडले. आम्ही आमच्या सुयशसाठी तुमच्या स्वराला मागणी घालायला आलो आहोत. स्वरा आम्हाला आमची सून म्हणून पसंत आहे." बाजूला उभ्या असलेल्या स्वराचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिचं सुयश वर मनापासून प्रेम होतं. शालिनी आणि कल्पनाला पण खूपच आनंद झाला. स्वराला तिच्या मनासारखा जोडीदार मिळावा, तिच्या गुणांची कदर करणारा असावा अशी शालिनीची आंतरिक इच्छा होती. ती लगबगीने पुढे आली आणि म्हणाली,

"या या ना तुम्ही बाहेर का उभे? स्वरा बघितलंस का कोण आलंय. सुयश तू पण बस ना."

लग्नाची बोलणी तशी काही करायचीच नव्हती. सुयशने शालिनीच्या परिस्थितीची आई-बाबांना कल्पना दिली होती. यथावकाश एका सुमुहूर्तावर स्वरा आणि सुयशचं लग्न झालं. स्वरासारख्या हिऱ्याला सुयशसारखं अनुरूप कोंदण मिळाले होते. दोघंही संगीत क्षेत्रातले असल्यामुळे स्वराच्या कारकीर्दीला बहरच येणार होता. स्वराचं सासर शहरातच असल्यामुळे शालिनी आणि कल्पना पण खुश होत्या. शालिनीने स्वतःचे आयुष्य पणाला लावून स्वराला दत्तक घेऊन यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले त्याचे आज चीज झालं होतं. आनंदाने शालिनी गुणगुणू लागली,

"या सुखांनो या, या सुखांनो याss"