ईरा चॅम्पियन ट्रॉफी:-२०२५
जलद लेखन कथा स्पर्धा
शीर्षक:- तू ही आधी मुलगा होतास..
भाग:-३
"सगळं दिलेस रे तू. पण तू कधी प्रेमाने जवळ घेऊन त्याला विचारलेस का? कधी मायेने डोक्यावरून हात फिरवलास का? " सुधाकर म्हणाले तसा तो शांत बसला.
"अरे अजित मुलांना प्रेमाने जोपासावे रे. ते जेव्हा कधी ते चुकत असतील त्या प्रसंगी कठोर बोलावं, एखादा फटका पण द्यावा. शिस्त, बंधन असावे रे पण ते अति असू नये. मी पाहत आलोय की तू त्याला न विचारताच कितीतरी गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध करतोस. तो लहान होता तेव्हा ठीक होतं, नंतर त्याला समज आल्यावर तरी तू त्याच्यावर गोष्टी न लादता कलेने घ्यायला हवं होतंस. त्याला चित्रकला आवडते, तो गिटार ही छान वाजवतो, अर्थात तुला त्याच्या या आवडी व छंद माहितीच नसतील. त्याची आवड निवडही लक्षात घ्यायला हवे ना. त्या उलट त्याला जे आवडत नाही तेच जर तू करायला सांगशील तर तो कसा घडणार? परिणामी त्याला कोणत्याही गोष्टीत रस उरणार नाही आणि तो काही बोलला की मघ दमदाटी करून त्याला फैलावर घ्यायचासं, नाही तर श्रीमुखात फडकावयचास. मघ पुढे तोही काही विचारायचा नाही. "
"पण बाबा, मी हे सगळं त्याच्या भल्यासाठीच करतो ना. त्याला तेवढी समज तरी आहे का?" अजित विचार करत बोलला.
"मान्य आहे रे तू त्याच्या भल्यासाठीच करतोस ते. त्याला समज नाही असे म्हणू नकोस. आठव जेव्हा तूही मुलगा होतास तेव्हा तू कसा वागत होतास? तुला एखादी गोष्ट आवडत नव्हती तर मी कधी तुझ्यावर सक्ती केली नाही. मला वाटतं होतं तू डाॅक्टर व्हावे ; पण तुला मशिन, इंजिनमध्ये जास्त इंटरेस्ट होता तर पुढे तुला त्यातच शिक्षण घेऊ दिलं. सोबत तू तुझं पुस्तक वाचनाची आवडही जोपासत तू लेखनही करत राहिलास. मी किंवा तुझ्या आईने कधीही तुझ्या या आवडीत आडकाठी आणली नाही. मग समूच्या बाबतीतही तू थोडं समजून घ्यावस. इतक्या सगळ्या क्लासेसमुळे त्याला त्याची आवड आणि छंदासाठी वेळच मिळत नाही. म्हणून त्याच्याकडून असे घडते." सुधाकर त्याला त्याचा आरसा दाखवत म्हणाले.
अजित विचार करत राहिला,'खरंच की आपण समूच्या बाबतीत जास्तच अपेक्षा ठेवून त्याचं बालपण हिरावून घेतोय. त्याची आवड, छंद विसरून गेलो. बाबा म्हणत आहेत ते बरोबर आहे. भरमसाठ क्लासेसमुळे त्याला स्वतःलाही वेळ मिळत नाही हे मी कसे विसरलो. त्याला कधी प्रेमाने बोलल्याचेही आठवत नाही. असा कसा वागलो मी?' अजित मनात विचार करत स्वत:ला कोसत होता.
"काय रे, काय विचार करतोस?" त्याला विचारात गढलेले पाहून सुधारणा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.
"तुमचं म्हणणं पटलं मला, बाबा. मी आलोच." असे म्हणत अजित समरच्या रूममध्ये गेला.
समर शैलाच्या मांडीवर डोकं ठेवून पहुडला होता.
अजितला पाहून तो घाबरून पटकन उठून बसला व रडका चेहरा करत म्हणाला," पप्पा, मी पुढच्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून पहिला नंबर मिळवेन, आय ऽ आय प्रॉमिस ! " शेवटचे बोलताना त्याने अडखळत गळा चिमटीत पकडला. त्याचे डोळे भरून आले होते.
अजितला त्याला तसं पाहून कसं तरी झालं. तो पटकन पुढे होऊन त्याला मिठीत कवटाळून घेत रडू लागला.
"आय एम सॉरी, समू. तुझ्यावर मी हात उचलला. तू तुझ्या आवडीचं करं. बाकी कसल्या क्लासेसला जाण्याची गरज नाही." तो त्याचा चेहरा ओंजळीत घेत म्हणाला आणि त्याच्या माथ्यावर प्रेमाने ओठ टेकवले.
समर आणि शैला आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. तर त्याच्यामागे आलेले सुधाकर त्यांच्याकडे बघत गालात हसत होते.
समाप्त:-
©® जयश्री शिंदे
टीम सुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा