ईरा चॅम्पियन ट्रॉफी:-२०२५
जलद कथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- तू ही आधी मुलगा होतास..
भाग:-१
"हजार वेळा सांगितले थोडं अभ्यास कर पण नाही ऐकायचं काही. तुझं काय जातंय? तुझ्या बापाचं जातंय. होय ना." पालक सभेतून आलेला अजित, समरच्या अंगावर धावून जात दात ओठ खात म्हणाला.
घाबरून समरने डोळे गच्च मिटून चेहऱ्यासमोर स्वतःचा हात आडवा केला. आधीच दोन गालावर पडल्याने त्याच्या गालावर अजितच्या हाताच्या बोटांची नक्षी उमटली होती. पुन्हा आता बाबा अजून आपल्याला चोपणार या भीतीने त्याच्या हातापायाची गाळण उडाली. डोळे गच्च मिटले असले तरी त्याच्या गालावरून अश्रू ओघळत होते.
समरची आई शैला पटकन त्याला रोखत म्हणाली,"अहो, काय करताय? थोडं शांततेत घ्या ना. लहान नाही तो असे मारायला. मोठा झालाय तो."
"मोठा झालाय फक्त नावाला ! नको अडवूस तू आज मला. याची चामडी लोळवल्याशिवाय त्या़ची अक्कल ठिकाण्यावर येणार नाही. तू हो बाजूला." अजितचा रागाचा पारा चढला होता, तो तिचा हात झटकत पुन्हा त्याच्या दिशेने दोन पावलं टाकत होता तोच तिने पुन्हा त्याचा हाताला धरत मागे खेचत गयावया करत म्हणाली," अहो, रागात आहात तुम्ही आता. रागात भलते सलते होईल. थोडं समजून घ्या ना. इथून पुढे तो करेल चांगला अभ्यास. मी सांगते ना समजावून त्याला."
"तू समजावणार याला,या ss या नालायक कार्ट्याला? तुझेच फाजिल लाड आहेत, दरवेळी तू त्याला पाठीशी घालतेस ना म्हणून हा शेफारलाय. त्याच्या अंगात मुंग्या झाल्यात ते जरा झाडू दे मला म्हणजे मग बघ वठणीवर येईल. सोड तू मला." तो तिचं ऐकून न घेता हात झिडकारत तावातावाने पुन्हा त्याला मारायला त्याच्या दिशेने धावला.
त्याला खाली वाकवून त्याने त्याच्या पाठीत एक जोराचा रट्टा दिला. तसा समर "आई गं" म्हणत कळवळून पाठीला हात लावत रडू लागला.
शैलाही रडत त्याच्या दिशेने धावली.
तो अजून एक रट्टा त्याच्या पाठीत घालणार तोच त्याच्या कानावर एक कठोर, धारदार आवाज कानावर पडला," खबरदार, अजित. पुन्हा त्याला मारशील तर याद राख."
त्या व्यक्तीला पाहून समर त्यांच्यांकडे धावतच गेला आणि त्यांच्या कमरेला विळखा मारून इतक्या वेळ दाबून ठेवलेला हुंदका सोडून तो ओक्साबोक्शी रडू लागला.
ते त्याला मिठीत घेत त्याच्या पाठीवरून एक हात मायेने फिरवत होते तर दुसऱ्या हाताने त्याचे डोके कुरवाळत होते.
अजितकडे रागाने लाल झालेल्या डोळ्यांनी ती व्यक्ती पाहत होती.
"शैला, समूला आत घेऊन जा. त्याला तोंड धुवून खायला दे." ती व्यक्ती शैलाला म्हणाली. तिने पदराने स्वतःचे डोळे पुसत मान डोलावली.
मग त्यांनी समरचे डोळे पुसत त्याला मी आहे ना असे डोळ्यांने खुणावले. त्याने हुंदके देत मान डोलावली आणि शैला त्याला तेथून दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेली.
आता त्या व्यक्तीने अजितकडे मोर्चा वळवला.
क्रमशः
कोण असेल ती व्यक्ती? काय बोलेल अजितला?
©® जयश्री शिंदे
टीम सुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा